विक्रमने नेहमीप्रमाणेच आपला हट्ट सोडला नाही. आपला बेताल कार्यकर्ता बसलेल्या हॉटेलरमध्ये जाऊन त्याने त्याला उचलले आणि आपल्या गाडीत बसवून तो त्याला मतमोजणीच्या मंडपाकडे नेऊ लागला.
'इ का करत हे बा?' बेताल कार्यकर्त्याने शुध्दीवर येण्याचा प्रयत्न करीत विचारले.
'अरे बेताला, अजून मतमोजणी संपली नाही आणि तू इकडे कसा येऊन बसलास?'
'अरे, जबार आय सी यु मा पेसंट मरन की तैयारी करत हैं तबार रिस्तेदार चाय नाही तो का लस्सी पिवत हैं?'
'अरे, बेताला, आपण मराठी माणसं आहोत. जरा मराठीत बोल ना. हे काय भोजपुरी बोलतोय?'
' विक्रमा, आता तू म्हणतोस म्हणून बोलतो मराठी पर बिहार मा आई के भोजपुरी हमार अच्छी लगन लगी बा.'
'खबरदार जर परत भोजपुरी बोललास तर. आता निमूटपणे माझ्यासोबत चल.'
'विक्रमा, तू म्हणतोस म्हणून येतो मी तुझ्यासोबत मतमोजणीच्या ठिकाणी, पण हे म्हणजे आपलं वस्त्रहरण होणार आहे हे माहीत असतांनाही द्रौपदीने स्वतःहून दुर्योधनाच्या दरबारात जाण्यासारखं झालं! पण तिथे पोहचण्याआधी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तू दिलेल्या उत्तरांनी माझं समाधान झालं नाही तर तात्काळ मी तुझ्या गाडीतून उतरून परत हॉटेलमध्ये जाऊन बसेन. समझे बा?'
विक्रमने पक्षाच्या विचारविनिमय बैठकीत बसल्याप्रमाणे फक्त होकारार्थी मान डोलवली.
'जरा ध्यान देईके सून बा. मला सांग आधीच महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला नाकारल्यानंतरही आपण जनतेचा कौल धुडकावून सत्तेसाठी असंगाशी संग केला आणि जी काही थोडीफार किंमत आपल्याला मोठ्या साहेबांच्या नावामुळे होती तीसुद्धा गमावून बसलो. मग आता परत इथे बिहारमध्ये हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची काही गरज होती का? जे बिहारी रोजगारासाठी आपल्या राज्यात आलेले आपल्याला चालत नाहीत; त्यांची मतं आपण कोणत्या तोंडाने मागितली? आपल्या उमेदवारांना मिळणारी मते ही 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी असतील असा रंग दिसतोय. म्हणजेच मतं मिळविण्याच्या बाबतीत आपण दारिद्र्य रेषेच्याही खाली आहोत. इ बोलन वा मा हमे सरम आवत हैं बा, पर सच बोलन वा मा काहे की सरम बा? हूं? बारामतीकर काकांनी काही केलं की आपणही ते करायलाच हवं का? बारामती पुढे आपली 'मती' अशी कुंठीत का होते? कधी 'बारामती'च्या कलाने तर कधी 'बालमती'च्या बालबुद्धीने सरकार का चालतं?'
'बेताला, पोटात गेलेल्या सोमरसाने तुझा तुझ्या मेंदूवरचा आणि जिभेवरचा ताबा सुटलेला दिसतो. त्यामुळेच तू अशी बेताल बडबड करतोय, पण हळूहळू येशील शुध्दीवर. काही गोष्टी एकदमच सगळ्यांना लक्षात येत नसतात. हळूहळू येतील लक्षात. आपल्याला घाई करायची नाहीये. अजिबात घाई करायची नाहीये. किंबहुना मी तर म्हणीन की घाई नकोच. आपले साहेब आपले कुटुंबप्रमुख आहेत आणि एखाद्या कुटुंबप्रमुखाने कुटुंबाच्या हितासाठी जे आणि जसे निर्णय घ्यायचे असतात तसे ते घेत आहेत. हळूहळू घेतायेत, पण घेतायेत ना? घरात बसून घेत असतील, पण त्याच्याने काय फरक पडतो? आपल्या निवडणूक वचननाम्यात त्यांनी असं कुठे वचन दिलं होतं की, मी रोज घराबाहेर पडीन, म्हणून? कदाचित आज आपले साहेब परबुध्दीने वागतायेत असं कोणाला वाटत असेल तर वाटू दे. खुशाल वाटू दे. आपल्या साहेबांचं लपूनछपून काही नसतं. जे असतं ते खुल्लमखुल्ला असतं. आपल्या साहेबांची बिहारींबद्दलची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपल्याला आपल्या राज्यात बिहारी नकोतच. आपल्या राज्यात कुठे आपण त्यांची मतं मागतोय? आपण तर त्यांच्या बिहारसाठीच त्यांची मतं मागतोय ना? आता त्यांना तितकीही अक्कल नसेल तर त्याला आपले साहेब काय करणार? माणसाने आपल्या बुद्धीने चालू नये. आपल्याच बुद्धीने चालणाऱ्या त्या चुलत राजेंची काय हालत झाली पाहतो आहेस ना? मग थोडी परबुद्धी वापरली तर बिघडलं कुठे?'
'विक्रमा, एखादी गोष्ट जर आपल्याला एखाद्याला दान करावीशी वाटली तर ती आपल्या जवळ नसतांनाही आपण ती दान करू शकतो का? आणि मनातल्या मनात आपण आपल्या जवळ नसलेली गोष्ट दान केल्याबद्दल आपल्याला माफी मागावी लागते का? असे असेल तर ऐश्वर्या राय अभिषेकला दान दिल्याबद्दल मला बच्चन कुटुंबियांची माफी मागावी लागेल का?'
'बेताला, अरे तू डोक्यावर पडला होतास की काय?'
'विक्रमा, प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने देतोस? हा निघालो मी परत हॉटेलमध्ये.'
असे बोलून बेताल गाडीतून उतरून परत हॉटेलकडे निघाला.
-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,
संपर्क-७८७५०७७७२८
Post a Comment