जेपींचे आंदोलन
इंदिरा गांधी यांचा विश्वास खरा ठरला. एक ते सव्वा कोटी लोकं तत्कालीन पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशाला परत गेले. अनेकांना अशी शंका होती की लक्षावधी लोकांची कुठे नोंदच नव्हती. कमीतकमी असे लोक भारताच्या इतर राज्यांत जाऊन राहतील आणि कुणालाही त्यांची ओळख पटवून परत पाठवलं जाणार नाही. पण तसेदेखील काही घडले नाही.
पाकिस्तानबरोबरच्या या युद्धात चीनने भारताला धमकी देण्यापलीकडे काहीही केलं नाही. अमेरिकेत त्या वेळी रिचर्ड निक्सन राष्ट्रपती होते, त्यांना इंदिरा गांधी आवडत नव्हत्या. एकदा इंदिरा गांधी त्यांना भेटावयास अमेरिकेला गेल्या असता निक्सन यांनी दोन-चार तास त्यांना बसवून ठेवले होते. शेवटी पाकिस्तान आणि अमेरिकेत जिव्हाळ्याचे संबंध होते, असे पाकिस्तानला वाटायचे. अमेरिका नक्कीच भारतावर दबाव टाकून हे युद्ध अधांतरी संपेल असे त्यांना वाटे. अमेरिकेने आपल्या सातव्या आरमारच्या नौका भारताच्या दिशेने हलवल्या त्या वेळी सर्वांना वाटले होते की अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उडी घेईल. पण तसे काही घडले नाही. सातव्या आरमारचे ते जहाज काही दिवस हिंद महासागरात तरंगत राहिले आणि शेवटी परत गेले. इतर कोणत्याही देशानं भारताविरूद्ध भूमिका घेतली नाही. हे युद्ध भारताने म्हणजेच इंदिरा गांधी यानी जिंकले. स्वतःहून इंदिरा गांधींनी युद्धबंदीची घोषणा केली आणि बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयास आले.
इंदिरा गांधींनी ते कार्य केले होते जे भारताच्या भल्या मोठ्या लोकसंख्येला अभिप्रेत होते. इंदिरा गांधींकडे देशाच्या सर्व शक्ती एकवटल्या. त्यांच्या तोडीचा, त्यांच्यासारखा प्रभावशाली नेता देशात दुसरा कुणी नव्हता. त्यांची तुलना दुर्गादेवीशी केली जाऊ लागली. एम. एफ. हुसैन यांनी याच थीमवर आधारित त्यांचं चित्र काढलं होतं. त्यास खूप प्रसिद्धी मिळाली. कोणत्याही पक्षात त्यांच्यापुढे कसलेही आव्हान उभे करण्याची ताकद नव्हती. आपल्याला लाभलेल्या बळाच्या प्रसिद्धीच्या जोरावर इंदिरा गांधींनी उरल्यासुरल्या विरोधी पक्षांचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांचा धाक आणि धमकीपुढे कुणाची उभं राहण्याची हिंमत नव्हती. १९७२ साली झालेल्या निवडणुकांमध्ये विविध राज्यांत त्यांनी लढवलेल्या २५२९ जागांपैकी १९२६ जागा जिंकल्या होत्या. एक गोष्ट महत्त्वाची की पाकिस्तानवर विजय मिळवूनदेखील त्यांनी कोणता जल्लोष केला नाही. त्यांनी फक्त भारतीय सैन्य आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले बस्स!
जनसंघ भारताच्या सत्तेत येण्यासाठी वर्षानुवर्षे झटत होता. पण इंदिरा गांधी सत्तेत असताना त्यांना कवडीमोलही किंमत उरली नव्हती. इंदरा गांधी यांचा दरारा आणि त्यांची शक्ती पाहून रा. स्व. संघाच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या वेळी राजकारणातून अलिप्त राहूनदेखील आपला प्रभाव टाकणारे एक नेते होते- जयप्रकाश नारायण (जेपी)! संघाला त्यांच्यात एक संधी दिसली.
बिहार राज्यातून जयप्रकाश नारायण यांनी एक आंदोलन सुरू केले. निमित्त होते तिथल्या एका कॉलेज होस्टेलमध्ये भ्रष्टाचाराची क्षुल्लक घटना. या घटनेविरूद्ध विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी आंदोलन सुरू केले. जेपींना या क्षुल्लक भ्रष्टाचाराच्या घनेमध्ये एक मोठी संधी दिसली. त्या वेळी देशात कुठे भ्रष्टाचाराच्या मोठ्या घटना घडल्या नव्हत्या, नव्हे घडतही नव्हत्या. २-जी सारखे घोटाळे किंवा कॉमनवेल्थ गेम्स अगर कोळसा खाणीसारखे घडवल्या गेलेल्या भ्रष्टाचाराच्या घटना कुणाच्या ऐकिवातही नव्हत्या. तरी पण बिहारमधील तरूण विद्यार्थी एका कॉलेजमधील भ्रष्टाचाराचा विरोध करताना पाहून जेपींच्या मनात एक मोठे आंदोलन उभं करण्याचा विचार आला. त्यांना हे आंदोलन देशभर उभारायचे होते. त्यांची नजर रा. स्. संघाच्या कार्यकर्त्यांवर गेली. त्यांची साथ मिळाली तर हे आंदोलन बळकट होईल असा त्यांचा अंदाज होता आणि तो चुकीचाही नव्हता. संघाचे कार्यकर्ते आणि जनसंघ (सध्याचा भाजप) त्यांच्याकडे आधीपासूनच टक लावून बसले होते. झालं मग. दोन्हींची हातमिळवणी झाली. “संपूर्ण क्रांती”चे आंदोलन बिहारमध्ये उभे केले गेले आणि संघाने इतर राज्यांत विशेषतः गुजरातमध्ये याआधी नवनिर्माण आंदोलन उभे केले, त्यांनी जेपींना या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकार करण्याची विनंती केली. जेपींचे हे आंदोलन पुढे जाऊन प्रामुख्याने जनसंघ आणि रा. स्व. संघाचे भारत्याच्या राजकारणात येण्याच्या स्वप्नाची पूर्तता ठरले.
जेपींना संपूर्ण क्रांतीचे उद्दिष्ट अभिप्रेत होते. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विचारधारा, शिक्षण आणि आध्यात्मिक अशा सात उद्दिष्टांचा समावेश होता. यामागे सध्याच्या सामाजिक रचनेला सर्वोदयाशी सुसंगत करण्याचा हेतू होता. जेपी सुरुवातीस मार्क्सवादी विचारधारेचे होते, नंतर समाजवादी विचारांचा अंगीकार केला आणि सामाजिक पुनर्निर्माणावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. संघाची साथ मिळण्याआधी त्यांनी लोकांना संघटित करण्याचे जे काही प्रयत्न केले त्यात त्यांना सामान्य माणसांसहित कुठल्या नेत्याचेही समर्थन प्राप्त झालेले नव्हते. आणि म्हणूनच त्यांनी १९७४ सालच्या बिहारमधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाद्वारे संबोधून त्यांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन केले. त्यांना प्रशासनाविरूद्ध उभे केले जेणेकरून सरकार चालवणे शक्य होऊ नये. त्यांनी गावपातळीपासून सर्वत्र लोकराज स्थापन करण्यास प्रवृत्त केले. गावपातळीपासून पंचायत आणि जिल्हास्तरावर अशा समित्या स्थपन करावयास उत्तेजन दिले जे सरकारच्या एकाधिकाराविरूद्ध उभे राहू शकतील. समता, गरिबीचे उच्चाटन, अत्याचार-अन्याय रोखण्यासाठी समाजाचे पुनर्गठन करण्याची जबाबदारी पार पाडता यावी.
जेपींच्या संपूर्ण क्रांतीमध्ये संसदीय लोकशाहीला काही एक स्थान नव्हते. देशात एकाच पक्षाची सत्ता असावी, दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमुळेच देशात भ्रष्टाचारास बळ प्राप्त होते, असे त्यांना सुचवायचे होते. आपल्या उद्दिष्टांमध्ये गावपाळीपासून जिल्हास्तरावर समीत्यांचे गठन करण्याचा संकल्प करणारे जेपी दुसरीकडे असे सांगतात की लोकशाही नागरिकांना जगण्यासाठी उत्तम सोयीसुविधा पुरवण्याची हमी देत नाही. एकीकडे एकाधिकारशाहीला आळा घालण्याची गोष्ट करत असताना दर पाच वर्षांनी होणाळया निवडणुका तसेच संसदीय लोकशाही प्रणालीचा विरोध करतात आणि एकाच पक्षाच्या सत्तेस प्रोत्साहन देण्याची गोष्ट करतात. या त्यांच्या संपूर्ण क्रांतीच्या कार्यक्रमातील या विरोधाभासामुळे त्यांना खरेच काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट होत नसले तरी संघाच्या याबाबतच्या विचारप्रणालीशी ते सहमत असल्याचे उघड होत आहे. जेपी आणि संघाचे विचार सुसंगत आहेत असे स्पष्ट दिसत आहे.
त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप विस्तारत गेले. आता या आंदोलनाचे रुपांतर त्या वेळच्या काँग्रेस पक्षाचे शासन प्रामुख्याने इंदिरा गांधींविरूद्ध देशभरात एका बलशाली लढ्यात झाले. यासाठी त्यांनी बिहारच्या विद्यार्थ्यांना संबोधून एका दीर्घकालीन लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. याच संबोधनत ते असेही म्हणाले की लोकशाहीला जीवित आणि प्रभावशाली बनवण्यासाठी देशात एका मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. आधी ते लोकशाहीला प्रभावशून्य सांगतात आणि देशात एकाच पक्षाचे सरकार असावे असे म्हणतात, तर दुसरीकडे मजबूत विरोधी पक्ष आणि लोकशाही पद्धतीला बळकट करण्याची गोष्ट करतात याचा अर्थ काय लावावा? काँग्रेसचे सरकार पाडून दुसऱ्या पक्षाचे सरकार स्थापन करावे, तो पक्ष कोणता याचे उत्तर त्यांनी नंतर दिले.
- सय्यद इफ्तिखार अहमद,
संपादक,
मो.- ९८२०१२१२०७
Post a Comment