फ्रान्समध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाचा गळा चिरून यासाठी हत्या केली की त्याने विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावरील व्यंगचित्र वर्गात दाखविले. या घटनेनंतरही फ्रान्स आणि ऑस्ट्रियामध्ये काही हिंसक घटना घडल्या. या घटनांमध्ये जे लोक मारले गेले किंवा जखमी झाले त्यांच्या प्रती हार्दिक संवेदना व्यक्त करून हल्ला करणार्यांचा मी निषेध करतो आणि याप्रकरणात मुस्लिमांनी कसे व्यक्त व्हावे? याबद्दल आपले मत वाचकांसमोर मांडतो.
मुदलात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनात अनेक अशा घटना घडल्या होत्या ज्यात त्यांचा जाणून बुजून अपमान केला गेला होता. एवढेच नव्हे तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याचा तपशील या ठिकाणी देणे शक्य नाही. परंतु, प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना या संबंधिचा तपशील माहित आहे. त्यामुळे व्यंगचित्राप्रकरणी मुस्लिमांनी कसे व्यक्त व्हावे, या प्रश्नाचे साधे आणि सरळ उत्तर हे आहे की, आपला अपमान झाल्यावर प्रेषित सल्ल. जसे व्यक्त झाले तसेच मुस्लिमांनी व्यक्त व्हावे. परंतु, आपण पाहतो मुस्लिमांनी या प्रकरणी व्यक्त होतांना गैरइस्लामी पद्धतीचे अनुरसरन केलेले आहे. मुंबईमध्ये मुहम्मदअली रोडवर व मध्यपूर्वेच्या देशातील काही हॉटेल्समध्ये फरशीवर अशा पद्धतीने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे छायाचित्र चिटकवण्यात आले, ज्यावरून लोक आणि वाहने जातील. अनेक ठिकाणी लाखोंचे मोर्चे निघाले, निषेध सभा झाल्या, शिवीगाळ करण्यात आली. परंतु, यात मुस्लिमांचेच नुकसान झाले. अनेक ठिकाणी पोलिसांनी प्रदर्शन करणार्यांना अटक करून तुरूंगात टाकले. गंभीर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत या प्रकरणी मुस्लिमांनी कसे व्यक्त व्हावे? यासंबंधीचा विचार हा महत्त्वपूर्ण ठरतो. तर चला पाहूया कुरआन आणि हदीस या संदर्भात काय मार्गदर्शन करतात?
प्रेषितांंची व्यंगचित्रे का बनविली जातात?
जगामध्ये विशेष: युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर व्यंगचित्रे काढून अधुन मधून प्रकाशित केली जातात. फ्रान्सच्या शार्लि हेब्दो या व्यंगचित्र नियतकालिकाने तर यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. गेरेट विल्डर्स याने प्रेषित सल्ल. वरील व्यंगचित्रांची स्पर्धाच आयोजित केली होती. हे सर्व ते अभिव्यक्तीचा अधिकार या नावाखाली करतात. हे जरी खरे असले तरी 1482 वर्षापूर्वी अरबस्थानाच्या वाळवंटामध्ये जन्मलेल्या एका व्यक्तीविरूद्ध आज 21 व्या शतकात व्यंगचित्रे तयार करण्याची गरजच काय ? हा प्रश्न सहज उपस्थित होतो. प्रेषित सल्ल. यांचा अपमान करणारी व्यंगचित्रेच नव्हे तर मागच्या 100 वर्षात त्यांच्याविरूद्ध 60 हजार पुस्तके लिहिली गेली. म्हणजे एका दिवसात 2 पुस्तके. एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रेषित सल्ल. यांच्याविरूद्ध पुस्तकं लिहिण्याचेही कारण काय? हा प्रश्न व्यंगचित्राबरोबरच विचारार्थ घेण्यात यावयास हवा. तर चला पाहूया प्रेषितांविरूद्ध पुस्तके आणि व्यंगचित्रे का लिहिली आणि काढली जातात?
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविरूद्ध का अपमानास्पद सामुग्री प्रकाशित केली जाते?
जगामध्ये अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य प्रत्येक सभ्य देशामध्ये दिलेले आहे. परंतु, हे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अमर्याद नाही. त्यावर काही सनदशीर मर्यादासुद्धा आहेत. परंतु त्या मर्यादांचे भान न ठेवता जगात सर्वात जास्त पुस्तके आणि व्यंगचित्रे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविरूद्ध काढल्या जातात. त्याची निम्नलिखित कारणे आहेत.
1. सर्वात मोठे कारण म्हणजे सत्तेतून बेदखल होण्याची भीती.
जगाच्या इतिहासामध्ये आजपावेतो तीन महासत्ता होवून गेल्या. आज अमेरिका महासत्ता आहे. त्यापूर्वी ब्रिटन महासत्ता होती. त्यापूर्वी मुस्लिमांची महासत्ता होती. जवळ-जवळ एक हजार वर्षे मुस्लिमांनी या जगाच्या विविध भूभागावर राज्य केलेले आहे. युरोपातील अनेक देशात इस्लामी शासन राहिलेले आहे. त्यांना भीती आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामचा वाढता प्रभाव येत्या पाच-पन्नास वर्षात त्यांना सत्तेतून बेदखल करू शकतो. आपल्या हातातून सत्ता जाईल या भीतीतून निर्माण झालेल्या कुंठेमुळे ते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविरूद्ध अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रेषित सल्ल. यांचा अपमान करणारे व्यंगचित्र आणि साहित्य प्रकाशित करीत असतात.
2. युरोपमध्ये मुस्लिमांची वाढती लोकसंख्या
फ्रान्सच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेमध्ये असलेल्या चंगळवादी जीवन शैलीमुळे त्यांचा जन्मदर हा गेल्या अनेक वर्षांपासून स्थिरच नव्हे तर नकारात्मक झालेला आहे. त्यामुळे दैनंदिन कामं करण्यासाठी त्यांना आपल्या इमिग्रेशन पॉलिसीमध्ये बदल करून बाहेरील देशातील लोकांना बोलवावे लागते. त्याचा फायदा तुर्की, मध्यपूर्वी आणि आफ्रिकेमधील मुस्लिम उठवतात आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये जावून मिळेल ती कामे करतात. ही कामे करत असतांना ते आपले वेगळे अस्तित्व अबाधित राहील यासाठी प्रयत्न करतात. असे म्हटले जाते की, चार युरोपीयन एका ठिकाणी जमा झाले की एक कंपनी सुरू करतात. आणि चार मुस्लिम एका ठिकाणी जमा झाले की एक मस्जिद बांधतात. मुस्लिम जगाच्या कुठेही असो आपला धर्म आणि त्यावरील आपली निष्ठा कधीच सोडत नाहीत. इस्लाम हा ईश्वरनिर्मित सत्यधर्म असल्यामुळे त्यांच्याकडे बघून अनेक स्थानिक लोक इस्लामकडे आकर्षित होतात आणि इस्लामचा स्विकार करतात. अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी स्व: प्रेसशी बोलताना असे मत वक्तव्य केले होते की, इस्लाम इज द फास्टेट ग्रोईंग रिलिजन इन युनायटेड स्टेट्स. एकतर स्व:च्या नकारात्मक जन्मदर आणि धर्मांतरामुळे घटती ख्रिश्चन लोकसंख्या आणि त्यात इमिग्रेशन व वाढत्या मुस्लिम जन्मदरामुळे वाढती मुस्लिम लोकसंख्या याच्या संयोगातून युरोपमध्ये खरीखुरी लोकशाही असल्यामुळे येत्या 5-50 वर्षात कुठलेही युद्ध न करता लोकशाहीमार्गाने मुस्लिम युरोप आणि अमेरिकेमध्ये सत्तेमध्ये येतील, अशी भीती या लोकांच्या मनामध्ये आहे. या भीतीमुळे उत्पन्न झालेल्या कुंठेमुळे ते प्रेषित सल्ल. यांचा अपमान करणारे साहित्य आणि व्यंगचित्र प्रकाशित करतात.
3. युरोप आणि अमेरिकेच्या व्याजाधारित आणि गरीबांच्या शोषण करणार्या अर्थव्यवस्थेचा जागतिक मुस्लिम समुदाय कडाडून विरोध करतो व शक्य त्या ठिकाणी बिनव्याजी बँक व्यवस्था सुरू करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. मुस्लिमांची ही व्याजविरहित अर्थव्यवस्था जी की जनकल्याणाची गुरूकिल्ली आहे यशस्वी झाली तर आपली अर्थव्यवस्था धाराशाई होईल आणि आपले अस्तित्वच संपून जाईल, या भितीतून निर्माण झालेल्या कुंठेमुळे ते प्रेषित सल्ल. यांच्याविरूद्ध साहित्य आणि व्यंगचित्र प्रसिद्ध करीत असतात.
4. ’प्लेन ट्रुथ’ नावाच्या नियतकालिकाने एक सर्व्हेक्षण अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्यात म्हटलेले आहे की, उच्छृंखल (अनैतिक, आवारा) जीवनशैलीला कंटाळून युरोप आणि अमेरिकेमधील अनेक लोक इस्लामच्या पवित्र जीवनशैलीकडे आकर्षित होत आहेत. 11 सप्टेंबर 2001 नंतर 40 हजारांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांनी इस्लामचा स्विकार केला असल्याचे प्लेन ट्रुथ या नियतकालिकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. रोज साधारणपणे 400 लोक युरोपमध्ये इस्लामचा स्विकार करतात असेही या अहवालात नमूद केलेले आहे. अगदी अलिकडेच सोफी पेट्रोनिन या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त फ्रेंच सामाजिक कार्यकर्त्या यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये इस्लाम स्विकारल्यामुळे तर फ्रांसचे जनमानस हादरून गेले आहे.
आश्चर्य म्हणजे सोफी पेट्रोनिन प्रमाणेच इस्लाम स्विकारण्यामध्ये महिलांचा जास्त सहभाग असल्यामुळे भविष्यात आपल्या लोकसंख्येची निर्मिती प्रभावित होईल, याची त्यांना सार्थ भीती वाटते. यातूनच निर्माण झालेल्या कुंठेमुळे ते प्रेषितांच्या विरूद्ध साहित्य आणि व्यंगचित्र प्रकाशित करीत असतात.
5. युरोप आणि अमेरिकेमध्ये असलेल्या अनैतिक जीवनशैलीच्या विरूद्ध त्या ठिकाणी राहत असलेल्या मुस्लिमांनी यल्गार पुकारलेला असून, युरोपीयन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेल्या नशा, अश्लिलता, मुक्त लैंगिक संबंध, बेईमानी, ठगबाजी, स्वार्थ, हिंसा, बंदुक संस्कृती याचा ते आपल्या नैतिक आचरणातून सातत्याने विरोध करतात. त्यामुळे या नैतिक जीवनशैलीचे जनक म्हणून हे लोक प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविरूद्ध साहित्य आणि व्यंगचित्र प्रकाशित करत असतात.
6. युरोप आणि अमेरिकेचे लोक आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगू इच्छितात, मुस्लिम मात्र अल्लाहच्या मर्जीप्रमाणे जीवन जगू इच्छितात. या दोघांच्या जीवनशैलीमधील रोजच्या टकरीमधून इस्लामी जीवनशैली विजयी होत असल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या कुंठेमधून हे लोक प्रेषित सल्ल. यांच्याविरूद्ध साहित्य आणि व्यंगचित्र प्रकाशित करत असतात.
पश्चिमेचा वैचारिक पराभव
युरोप आणि अमेरिकेमध्ये राहणार्या लोकांमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांनी सादर केेलेल्या इस्लामचा वैचारिक पराभव करण्याची पात्रता नसल्यामुळे त्यांनी त्यांचे व्यंगचित्र बनवून आपली कुंठा व्यक्त करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, ’व्हेन यू कांट डिफेन्ड युवरसेल्फ दॅन डिफेम ऑदर्स.’
मुळात चुकीच्या जीवनशैलीमुळे या लोकांमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे विचार समजून घेण्याची पात्रताच शिल्लक राहिलेली नाही. मायकेल हार्ट ज्याने जगावर प्रभाव टाकणार्या 100 लोकांची निवड करून त्यात प्रथम स्थान प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना का दिले, याचा जरी अभ्यास या लोकांनी केला तरी यांना प्रेषितांचे महत्त्व कळेल. जगामध्ये 700 कोटी लोकसंख्येपैकी 200 कोटी लोकांच्या हृदयावर राज्य करणारे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे विचार हेच मानवतेचे कल्याणकरणारे विचार आहेत. हे जोपर्यंत या लोकांना कळणार नाही, तोपर्यंत हे त्यांचा अपमान करण्याची चूक पुन्हा-पुन्हा करत राहणार. यांनी काहीजरी केले तरी इस्लामची घौडदौड अशीच सुरू राहील. उलट त्यात काळानुरूप गतीच येत जाईल. इस्लामचे भारतीय मूलचे दक्षिण आफ्रिकेमधील इस्लामचे अभ्यासक अहेमद दिदात यांची भविष्यवाणी यासंदर्भात लक्ष्यवेधी स्वरूपाची आहे. ते म्हणतात, ”इस्लामला तुमच्या मदतीशी काही देणेघेणे नाही. हा कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच. तुम्ही मात्र इस्लामशिवाय अपयशी आणि अपमानित व्हाल.”
या संदर्भात कुरआनचे मार्गदर्शन
प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र आणि त्यांच्याविरूद्धचे साहित्य हे तर प्रकाशित होत राहणार कारण ज्यांना इस्लाम कळत नाही त्यांना इस्लामचा द्वेष करण्याचा अधिकार आहे. असे होत आहे म्हणून डोक्यात राग घालून हिंसक कारवाया करून स्व:चेच नुकसान करून घेणे इस्लामला अजिबात मान्य नाही. प्रेषितांना विरोध होणार याची भविष्यवाणी कुरआनमध्ये खालील शब्दात करण्यात आलेली आहे.
”तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (सल्ल.) ला मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे. जेणेकरून त्याला समस्त धर्मावर प्रभूत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटेना” (कुरआन : सुरे सफ आयत क्र.9)
हदीसमध्ये सुद्धा भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. प्रेषित सल्ल. स्व: म्हणतात, ” एक अशी वेळ येईल की जमीनीवरील प्रत्येक कच्चे आणि पक्क्या घरामध्ये इस्लामचा शिरकाव होईल. मग लोक त्याचा सन्मानाने स्वीकार करोत की स्व:चा अपमान करून घेऊन करोत.” (मिश्कात : हदीस क्र. 42).
उपाय
इस्लामचे गाढे अभ्यासक आणि जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी रहे. यांनी एक मस्त उपाय यावर सुचविलेला आहे. तो समारोपापूर्वी नमूद करण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ते म्हणतात, ”जेवढे वैर ते मानवतेचे उपकारक हजरत मुहम्मद सल्ल. यांच्याविषयी आपल्या मनात बाळगतात तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही प्रेषित सल्ल. यांच्याबद्दल आपल्या मनात बाळगा. ते जेवढ्या ताकदीने प्रेषित सल्ल. यांचा निषेध करतील तुम्ही तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीने त्यांचे समर्थन करा. ते जेवढे प्रेषित सल्ल. यांचे वाईट करू इच्छितात तुम्ही तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त त्यांचे पाईक बना आणि प्रेषितांसाठी ती प्रार्थना करा जी देवदूत रात्रंदिवस त्यांच्यासाठी करत आहेत. ती दुआ म्हणजे, ”हे समस्त जगाच्या निर्मात्या ! ज्या प्रमाणे तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेत तू ही त्यांच्यावर अनंत उपकार कर, त्यांचे स्थान जगामध्ये उंच कर आणि मरणोप्रांत जीवनामध्येही तुझ्या जवळ राहणार्या लोकांपैकी सर्वात जास्त जवळीक त्यांना प्रदान कर.” आमीन.
- एम.आय. शेख
Post a Comment