शेठजी आणि भटजीचा पक्ष म्हणून शिक्का बसलेल्या भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केलेले जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाजत गाजत प्रवेश केला. गेली चार वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आणि पदांचे गाजरं दाखवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मात्तब्बर नेते व बिनीचे कार्यकर्ते यांना भाजपात घेऊन मुळच्या भाजपच्या शिलेदारांची नाकेबंदी करून त्यांना अडगळीत टाकून महाप्रताप केला होता. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी बेंबीच्या देठापासून प्रचार केला, त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम असलेले अनेक चेहरे भाजपात घेतले. त्यांना पक्षाची द्वारं मोकळी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यागी कार्यकर्त्यांनी जीव तोडून नैतिकता, भ्रष्टाचार आदी मुद्दे प्रचारात लोकांना सांगितले पण फडणवीसांनी राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बहूतेक भ्रष्ट लोकं भाजपात घेवून कमरेचे डोक्याला गुंडाळून "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" या प्रश्नाचे उत्तर स्वत:च देऊन टाकले आणि "सत्तेसाठी काय पण" याचे प्रत्यंतर आणून दिले. सत्ता मिळत असेल तर भाजपा कुठल्याही थराला जावू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. ज्या अजित पवारांना अटक करण्याच्या वल्गना केल्या त्याच अजित पवारांशी सत्तेचे साटेलाटे करत पहाटे पहाटे अंधारात निर्लज्जपणे शय्यासोबत केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली.
२०१४ च्या निवडणूकीत सर्व भ्रष्ट कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पिलावळ आणि त्यांच्या बगलबच्च्यांना बेड्या घालून तुरूंगात टाकणार असा प्रचार फडणवीस करीत होते. मात्र ह्याच भ्रष्ट लोकांना सन्मानाने भाजपमध्ये अगदी वाजत गाजत घेऊन निवडणुकीत तिकीटं,त्यांना तिथे पदं,व इज्जत दिली. मात्र दुस-या बाजूला ज्यांनी हयातभर रात्रीचा दिवस करून पक्ष उभा केला, राब राब राबून तळागाळापर्यंत पोहोचवला त्यांना केवळ व्यक्तीद्वेषाने पछाडून अडगळीत टाकले. ज्या भाजपाला शेटजी भटजींचा पक्ष म्हणून अस्पृष्य समजले जात होते त्याच महाराष्ट्रात भाजपाला घरोघरी पोहोचवण्याचे काम गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, अण्णा डांगे, आदी लोकांनी केले. गांधी हत्येनंतर तेव्हांची जनसंघाची पणती काही केल्या महाराष्ट्रातील बहूजनांच्या दारात आणि मनात ही प्रज्वलीत होत नव्हती. पुढे भाजपा हे बारसे करून पणतीला विझवून चिखलातले कमळ स्वच्छ धुवून पुसून महाराष्ट्रात मिरविले. पण भाजपाचे हे कमळ काही केल्या उमलेना. हे कमळ साधे हातात घेण्याचेही कुणी धाडस करित नव्हते. बहुजन समाजातील कुणी भाजपाला वाऱ्याला उभा रहात नव्हते. ब्राम्हण गल्लीत आणि ब्राम्हण वाड्या समोरच्या संघ शाखेपुरते मर्यादित भाजपाची अर्थात या सरड्याची धाव कुंपणापर्यंतच होती. त्या काळात या लोकांनी भाजपाला घरा-घरात पोहोचवले. प्रचंड कष्ट केले, प्रचंड मेहनत केली आणि पक्ष वाढवला. मुंडे, खडसे, तावडे व डांगे ही बहूजन तोंडावळा असलेली माणसं होती.
पुढे हळूहळू त्यात माळी, धनगर, वंजारी आणि मराठा या समाजातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना आणण्यात मुंडे, खडसे, तावडे आणि डांगे यांनी मोठ्या हिकमतीने बाजी मारली. उत्तर प्रदेश मध्ये मायावतींनी जो सोशल इंजिनियरींगचा प्रयोग केला होता, तोच भाजपात केला गेला. खरेतर भाजपा हा पक्ष बहूजनांचा कधीच नव्हता आणि आजही नाही. भाजपाचा मुळ अजेंडा हा शेठजी आणि भटजींच्या उध्दाराचाच राहिला आहे. भाजप देशात पुर्ण बहूमताने सत्तेत आल्यावर तर ते अधिकच स्पष्ट झाले. या देशात सत्तर वर्षे लोकांनी भाजपाला स्विकारले नाही ते उगाच नाही. भाजपवाल्यांची भूमिका नेहमीच समाज तोडणारी राहिली आहे, जोडणारी कधीच नव्हती. गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे आणि विनोद तावडे सारख्या नेत्यांच्यामुळे हा पक्ष महाराष्ट्रात तग धरून राहीला. मुंडेंना-खडसेंना भाजपाने पदं देवून मेहरबानी नाही केली किंवा त्यांच्यावर उपकार केले नाही. कारण भाजप नावाचे रोपटे लावण्यासाठी व त्यांचा वटवृक्ष होईपर्यंत तो वाढविण्यासाठी कष्ट उपसले ते मुंडे, खडसे, तावडे, डांगेंनी. आता त्या झाडाला फळे लागल्यावर ती चाखायला गडकरी, फडणवीस, गिरीष महाजन, गिरीष कुलकर्णी पुढे आले. पण ख-या अर्थाने हा पक्ष महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात नेला तो याच मुंडे, खडसे, डांगे व तावडे या लोकांनी. आज सत्ता आल्यावर हे बहूजन चेहरे भाजपाने बेदखल केले आहेत. पक्षात त्यांना पध्दतशीरपणे डावललं जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात तर त्यांना फार किमंत दिली जात नव्हती. आता चाळीस वर्षाचे आयुष्य भाजपाला दिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर वाजत गाजत प्रवेश केला आहे एकनाथ खडसेंच्या या पवित्र्यामुळे भाजपातून पुढील काळात अनेक जण बाहेर पडतील, त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाची मुळंच उचकटली जातील. आजघडीला भाजपात मासबेस असणारा एकही मासलिडर उरलेला नाही. जे उरले आहेत ते फडणवीसांचे बगलबच्चे आणि हुजरे. फडणवीस हे मासलिडर नाहीत आणि कधीच नव्हते. त्यांनी आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचे उद्योग केले आहेत. कॉंग्रेसची ज्या पध्दतीने दरबारी हुजऱ्यांनी वाट लागली त्याच दिशेने भाजपाची वाटचाल सध्या सुरू आहे.बाळासाहेब ठाकरेंचा आधार मिळाला नसता तर महाराष्ट्रात भाजपा रूजू शकली नसती हे वास्तव नाकारता येणार नाही. पण याचे भान सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या देवेंद्रजींना नाही.
फडणवीसांनी मुख्यमंत्री पद मिळताच पक्षातलीच लोकं संपवायला सुरूवात केली. त्यांचा एकुणच आविर्भाव एखाद्या हुकूमशाही सरंजामदारासारखा होता.खडसे, तावडे, पंकजा मुंडे यांचे हात-पाय छाटण्यास त्यांनीं बिलकूल मागेपुढे पाहिले नाही,त्यातच ज्या महाराष्ट्राला तर सोडाच पण कोल्हापूरलाही ज्यांची ओळख नव्हती, कोल्हापूरच्या सामाजिक व राजकीय चळवळीत आपला एक पाय ही कधी टाकला नव्हता त्या चंद्रकांत पाटील यांना तर स्वर्ग दोन्ही हातांच्या बोटांवर आल्यासारखे वाटत होते. ज्यांनी भाजपाला बहूजन तोंडावळा दिला त्यांच्यावर दररोज या ना त्या निमित्ताने तोंडसुख घेण्यात धन्यता मानत फडणवीसांची हुजरेगिरी करू लागले होते. ज्या खडसेंनी भाजपा उभा केला त्या खडसेंना काल आलेल्यांनी टोले मारावेत, त्यांची अवहेलना करावी हे दुर्दैव आहे. बापाने मरमर मरून कष्ट करावेत आणि पोरांनी त्याची उधळपट्टी करावी. बापाचे मुस्काट फोडावे, त्याला अपमानीत करावे अशातला हा प्रकार आहे.
जे आयत्या घरात घरोबा करायला आले आहेत त्यांनी मालकासारखी भाषा वापरून घर मालकालाच अवमानीत करत हाकलावे असे झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी " मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार"चा जो बाजारबसव्यांसारखा जो गलका केला,त्याची संपूर्ण महाराष्ट्रात ची थू झाली. चाणक्यासारख्या राजकीय खेळ्या करून पहाटेच्या सुमारास काळ्या अंधारात सत्तेसाठी जो आटापिटा केला तो महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेला बिलकूल आवडला नाही. आपले वर्चस्व ठेवण्यासाठी कीती खालच्या थरात आपण जाऊ शकतो, ते दाखवून फडणवीसांनी स्वत:ला व पक्षाला पार गाळात नेऊन ठेवले आहे. अर्थात पक्षाच्या मुळावरच घाव घातले आहेत.स्वार्थासाठी स्वकीयांना लाथा मारल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचे हे दळभद्री व कुटील राजकारण एक दिवस भाजपाला खुप महागात पडेल. "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ!" अशी एक मराठीत म्हण आहे. येणा-या काळात फडणवीस हे भाजपासाठी कु-हाडीचा दांडा ठरतील. मोदींचा करिष्मा संपला की याची जाणीव भाजपाला नक्कीच होईल. सध्या मोदींच्या करिष्म्यालाही ओहोटी लागलीय. लवकरच भाजपाला लक्षात येईल की आपण काय गमावलय आणि काय कमावलय? अजून सत्तेची धुंदी आहे. माणसाला धूंदीत भान नसते. फार जिकीरीने बहूजन तोंडावळा मिळालेल्या भाजपाने तो स्वत:च भिरकावून दिलाय, त्याची टर उडवलीय, अवहेलना आणि कुचेष्टा केली आहे. अहंकार हा माणसाला काय किंवा माणसांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या संघटनेला काय तळात नेऊन जमीनदोस्त केल्या शिवाय रहात नाही,हे आजवर अनेक वेळा सिध्द झाले आहे.भाजपाला ही लवकरच त्याची प्रचिती येईल हे नक्की.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment