(मक्काकालीन - एकूण १६५ आयती)
(१) स्तुती अल्लाहकरिता आहे ज्याने पृथ्वी व आकाश बनविले. प्रकाश व अंधकारांना निर्माण केले, तरीदेखील ते लोक ज्यांनी सत्याचे आवाहन मानण्यास नकार दिला आहे, इतरांना आपल्या पालनकर्त्यासमान ठरवीत आहेत!१
(२) तोच आहे ज्याने तुम्हाला माती-पासून निर्मिले,२ मग तुमच्याकरिता जीवनाची एक कालमर्यादा ठरवून दिली, आणि एक दुसरी कालमर्यादा आणखीदेखील आहे जी त्याच्याजवळ ठरलेली आहे.३ परंतु तुम्ही लोक आहात की शंका-कुशंकांत गुरफटला आहात.
(३) तोच एक अल्लाह आकाशातही आहे व पृथ्वीवरदेखील, तुमच्या गुप्त व प्रकट सर्व अवस्था जाणतो आणि जो वाईटपणा वा चांगुलपणा तुम्ही कमविता ते त्याला चांगल्याप्रकारे माहीत आहे.
(४) लोकांची परिस्थिती अशी आहे की, त्यांच्या पालनकर्त्याच्या संकेतांपैकी एकही संकेत असा नाही जो त्यांच्यासमोर आला आणि ते त्यापासून पराङ्मुख झाले नाहीत,
(५) म्हणून आता जे सत्य त्यांच्यापाशी आले त्यालादेखील त्यांनी खोटे ठरविले. तेव्हा ज्या गोष्टीचा ते आतापर्यंत उपहास करीत राहिले आहेत, लवकरच त्याच्याशी संबंधित काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील.४
(६) यांनी पाहिले नाही की यांच्याअगोदर कित्येक अशा जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले ज्यांचे आपापल्या काळांत प्राबल्य राहिले आहे? त्यांना आम्ही भूतलावर ती सत्ता प्रदान केली होती जी तुम्हाला प्रदान केलेली नाही, त्यांच्यावर आम्ही आकाशातून भरपूर वृष्टी केली आणि त्यांच्या खाली कालवे प्रवाहित केले, (परंतु जेव्हा त्यांनी कृतघ्नता दर्शविली तेव्हा) सरतेशेवटी आम्ही त्यांना त्यांच्या अपराधापायी नष्ट करून टाकले आणि त्यांच्याजागी नंतरच्या काळातील लोकांना उभे केले.
(७) हे पैगंबर (स.)! आम्ही कागदावर लिखित एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर अवतरित केला असता आणि लोकांनी आपल्या हातांनी स्पर्श करून जरी पाहिले असते तरीदेखील ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे त्यांनी हेच सांगितले असते की ही तर उघड जादू आहे.
(८) ते म्हणतात की या पैगंबरावर एखादा दूत (फारिश्ता) का नाही अवतरला ोला?५ जर आम्ही एखादा दूत अवतरला असता तर आतापावेतो केव्हाच निर्णय झाला असता, मग यांना कोणतीच सवलत दिली गेली नसती.६
१) हे संबोधन अरबच्या अनेकेश्वरवाद्यांशी आहे. जे या गोष्टीला मानत होते की जमीन व आकाशांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे, तोच दिवस रात्रीचे नियोजन करतो आणि त्यानेच सूर्य आणि चंद्राला निर्माण केले आहे. त्यांच्यापैकी कुणाचाही विश्वास नव्हता की, हे काम लात, हुबल किंवा उज्जा अथवा आणखी काही देवीदेवतांचे आहे. म्हणून त्यांना संबोधन करून सांगितले आहे, `नादानांनो! जेव्हा तुम्ही स्वयम हे मान्य करता की जमीन व आकाशांचा निर्माता आणि रात्र व दिवसाला आलटून पालटून आणणारा अल्लाह आहे. मग हे दुसरे कोण लागून गेलेत की, त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक होता, नवस आणि चढावे चढविता, त्यांच्याकडे प्रार्थना करता आणि त्यांच्यापुढे याचना करता (पाहा सूरह १ (अल्फातिहा, टीप २, सूरह - २ टीप १६३) प्रकाशाविरुद्ध अंधाराला बहुवचनात वर्णन केले आहे. कारण अंधार नाव आहे प्रकाशाच्या अभावाचे आणि त्याचे विभिन्न चरण आहेत म्हणून प्रकाश एकच आहे आणि अंधार अनेक आहेत.
२) मानवी देहाची सर्व तत्वं जमिनीतून प्राप्त् होतात. त्यातील एक अंशसुद्धा धरती बाहेरील नाही. म्हणून म्हटले गेले आहे की तुम्हाला मातीपासून निर्माण केले गेले आहे.
३) म्हणजे प्रलय (कयामत) ची वेळ जेव्हा तमाम मागील पुढील माणसांना पुनश्च जिवंत केले जाईल आणि हिशेब देण्यासाठी आपल्या निर्माणकर्त्या प्रभुसमोर हजर केले जाईल.
४) संकेत आहे हिजरत (देश परित्याग) आणि त्या सफलतेंकडे की जे हिजरतनंतर इस्लामला सतत प्राप्त् होणार होते. ज्या वेळी हा संकेत दिला गेला त्या वेळी विरोधक हा विचारसुद्धा करू शकले नाही की कशा प्रकारचे संदेश त्यांना मिळणार आहेत आणि मुस्लिमांनासुद्धा माहीत नव्हते. मुस्लिमांच्या मनातही असा कुठला विचार नव्हता किंबहुना खुद्द पैगंबर (स.) यांना भविष्यातील या संभावनेचा अंदाज नव्हता.
५) म्हणजे ही व्यक्ती अल्लाहकडून पैगंबर म्हणून पाठविली गेली तेव्हा आकाशातून एका देवदूताने (फरिश्ता) उतरून लोकांना सांगितले पाहिजे होते की, हे अल्लाहचे पैगंबर आहेत. यांचे ऐका अन्यथा तुम्हाला शिक्षा दिली जाईल. या अज्ञानी लोकांना यावर आश्चर्य वाटत होते की, जमीन व आकाशांचा निर्माणकर्ता प्रभु एखाद्याला पैगंबर म्हणून नियुक्त करतो आणि त्याला दगड व शिव्या खाण्यासाठी अशाप्रकारे असहाय सोडून देतो. या महानतम सम्राटाचा दूत जर मोठ्या लवाजम्यासह आला नाही तरी कमीतकमी एक देवदूत तरी त्यांनी अंगरक्षक म्हणून बरोबर ठेवला असता. म्हणजे त्या देवदूताने पैगंबर मुहम्मद (स.) यांची सुरक्षा केली असती आणि धाक बसविला असता. या देवदूताने पैगंबरनियुक्तीचा विश्वास लोकांत निर्माण केला असता. अनैसर्गिकरित्या पैगंबराची कामे त्याने केली असती.
६) हे त्यांच्या आक्षेपांचे पहिले उत्तर आहे. याचा अर्थ होतो की ईमानधारक बनण्यासाठी आणि आपल्या वागणुकीत सुधार करण्यासाठी जी सवलत तुम्हाला मिळाली आहे, ती फक्त त्याच काळापर्यंत आहे जोपर्यंत वास्तविकता परोक्ष (गुप्त्) आहे. जिथे परोक्षची स्थिती समाप्त् झाली तर संधी कस्रfप मिळणार नाही. त्यानंतर केवळ हिशोबच घेणे फक्त बाकी राहील. कारण या जगातील जीवन तुमच्यासाठी एक परीक्षाकाळ आहे आणि परीक्षा या गोष्टीची आहे की तुम्ही वास्तविकतेला प्रत्यक्ष न पाहाता आपल्या बुद्धीविवेकाचा योग्य उपयोग करून त्याची अनुभूती करता किंवा नाही. त्या अनुभूतीनंतर आपल्या मनाला आणि इच्छा-आकांक्षाना काबूत ठेवून आपले आचरण वास्तविकतेनुसार दुरुस्त करता किंवा नाही. या परीक्षेसाठी परोक्षचे परोक्ष असणे अनिवार्य अट आहे. तुमचे हे या जगातील जीवन जी वास्तविकपणे परीक्षेसाठीची सवलत आहे, त्याच वेळेपर्यंत कायम राहू शकते जोपर्यंत परोक्ष परोक्ष आहे. एकदा का परोक्ष प्रत्यक्षात परिवर्तीत झाला तेव्हा ही सवलत निश्चितच समाप्त् होईल आणि परिक्षेऐवजी निकाल लागण्याची वेळ येऊन ठेपेल. म्हणून तुमच्या मागणीनुसार हे शक्य नाही की तुमच्यासमोर फरिशत्याला त्याच्या मूळ स्वरुपात प्रकट केले जावे. कारण की अल्लाह आताच तुमचा परीक्षाकाळ संपवू इच्छित नाही. (पाहा सूरह २, टीप २२८)
Post a Comment