शेवटी विद्वेषाची होळी पेटलीच. ही होळी पेटली असे म्हणणे अयोग्य ठरेल, ती पेटवली गेली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. यावेळी थेट देशाची राजधानीच यासाठी निवडण्यात आली. होळी पेटवण्याचा दिवसही अगदी विशेष निवडण्यात आला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताच्या भेटीवर येण्याचा! होळी पेटवण्याची तयारी दिल्ली निवडणुकीच्या वेळीच सुरू करण्यात आली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री, हिमाचल प्रदेशातील खासदार अनुराग ठाकूर ने ‘देश के गद्दारोन्को गोली मारो सालोंको’ ही जाहीर घोषणा निवडणुकीच्या काळात देऊन इंधनाची तयारी करून ठेवली होती. त्याला अभिप्रेत असणारे गद्दार कोण हे सांगण्याची गरज नाही. अमित शहा यांनी पण अनेक भडकावू भाषणे केली. गिरीराज सिंग, आदित्यनाथ, संबित पात्रा यांचे विषारी गरळ ओकण्याचे काम चालूच होते. याच काळात राजधानी दिल्लीतील शाहीन बागेत सी.ए.ए. विरोधात शेकडो लोग सत्याग्रह करीत होते. यात तहान-भूक, ऊन-थंडी यांची पर्वा न करता रस्त्यावर ठाण मांडलेले आबाल वृद्ध मुस्लिमच नव्हते तर अनेकहिंदू अल्पसंख्याक, दलित, बहुजन आणि सुशिक्षित युवक युवती होते. बघता बघता ‘शाहीन बाग’ हा सी.ए.ए.विरोधी आंदोलनाचा एक अहिंसक आणि प्रतिकात्मक चेहरा बनला.
देशाच्या कानाकोपऱ्यात‘शाहीन बाग’ आंदोलन उभे राहू लागले. फक्तआपल्या भवितव्यासाठी किंवा स्वत:च्या असुरक्षिततेच्या भीतीपोटी एखाद्या समाज समुहाने उभे केलेले हे आंदोलन नव्हते. हे आंदोलन भारताचा आत्मा नष्ट करू पाहणाऱ्या संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात उभे राहिले होते. देशाचे विभाजन आणि मतांचे ध्रुवीकरण करण्याचे षड्यंत्र भारतीय जनता हाणून पाडीत होती. या आंदोलनाचा संयमी, राष्ट्रप्रेी, अहिंसात्मक, अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष चेहरा हिंदुत्ववाद्यांना सलणारा होता. शाहीन बागेचा जालियानवाला बाग होणार की काय अशी भीती त्याचवेळी वाटू लागली.
22 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली येथील जाफराबाद येथे 500 मुस्लिम महिला सी.ए.ए. विरोधात धरणे धरण्यासाठी तेथील मेट्रोच्या पुलाखाली बसल्या. भाजपाच्या कपिल मिश्रा नामक नेत्याने आधीच ठासून भरलेल्या इंधनाला काडी लावण्याचे कार्य थंड डोक्याने केले. 39 वर्षीय हे महाभाग आपच्या उमेदवाराकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. पण मुळात त्यांची आई भाजपची नगरसेवक असताना आपचे बोटधरून ते राजकारणात आले. मोदी यांची थट्टा करीत आमदार म्हणून निवडून आले आणि केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून स्थानापन्न झाले. पुढे त्यांनी केजरीवाल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘आप’चे आमदार असताना भाजपाच्या व्यासपीठावर जायला सुरुवात केली, लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. यामुळे दिल्ली विधान सभेच्या सभापतींनी त्याचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर त्याने भाजपामध्ये प्रवेश करून गेली विधानसभा निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. अशा या नेत्याने दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 23 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिसांनाच दम भरला की जाफराबाद आणि चांद बाग येथील आंदोलकांना एकतर हाकला नाहीतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावरून परत जाताच आम्ही ते काम करू. आपल्या या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘ट्विटर’वर टाकला. प्रत्यक्षात ट्रम्प जाण्याची वाट न पाहताच या कामाची सुरुवात करण्यात आली. जाफराबाद मोकळे करण्यात येत आहे आणि आता पुन्हा दुसरी शाहीन बाग घडणार नाही असे ट्वीट त्याने टाकले. बघता बघता दिल्ली पेटली. 48 माणसे गेली, त्यात एक पोलिस आणि एक आय.बी. अधिकारीही गेला. पोलिसावर तर गोळी झाडण्यात आली. अद्यापही हा गोळी झाडणारा आंदोलक सापडलेला नाही (आणि तो सापडण्याची शक्यता नाही). शेकडो जखमी झाले, हजारो घरे आणि दुकाने जाळली गेली. पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार गौतम गंभीर यांनाही कपिल मिश्राच्या भडक भाषणाचा निषेध करावा लागला आणि अशा सर्व लोकांच्या अटकेची मागणी करावी लागली. दिल्ली जळत होती, माणसे मरत होती, पोलीस मूक आणि निष्क्रिय होते. काही ठिकाणी तर हिंदुत्ववादी गुंडांना मदत करीत होते. पोलीस दलाचे हिंदुत्वीकरण होत चालले आहे ही बाब अत्यंत घातक आहे.
हे घडत असताना ट्रम्प आणि परिवाराचे भव्य स्वागत करण्यात देशाचे पंतप्रधान मशगुल होते. मोदी यांनी सर्व राजनैतिक संकेत आणि सभ्यता झुगारून ह्युस्टन येथे ट्रम्प यांच्या प्रचाराची सभा घेऊन ‘अब की बार ट्रम्प सरकार’असा नारा काही महिन्यांपूर्वी दिला होता. भारतात येणाऱ्या राष्ट्र प्रमुख दर्जाच्या पाहुण्याचे स्वागत प्रथम देशाच्या राजधानीत करण्याचा राज शिष्टाचार आणि संकेत असतो. तो झुगारून मोदी यांनी शेकडो कोटी रुपये खर्चून ट्रम्प यांचे अहमदाबादमध्ये भव्य स्वागत केले. अहमदाबाद नटवले, गरिबी झाकण्यासाठी उंच भिंती उभ्या केल्या. सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, उपाध्याय, मुखर्जी आणि अगदी सरदार पटेलही बाजूला सारून ट्रम्प पती पत्नींना सर्व प्रथम महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात सुत कताईसाठी नेले. शेरे पुस्तकात बहुतेक गांधी नावाचे स्पेलिंग चुकण्याच्या भीतीने ट्रम्प यांनी मोदींचे नाव लिहिले. तेथून दोघेही ट्रम्प यांच्या अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारासाठी अहमदाबाद येथे आयोजित सभेसाठी जगातील सर्वात मोठे मोंतेरो क्रिकेट स्टेडीयमवर गेले. सव्वालाख मोदी-ट्रम्प प्रेमी तेथे जल्लोष करीत होते. अमेरिकेतील भारतीयांसाठी हा संदेश होता. तेथून ट्रम्प सहपरिवार आग्रा येथील शाहजहान राजाने बांधलेला ताज बघण्यासाठी रवाना झाले. दिल्ली पेटू लागली होती. रात्री ट्रम्प दिल्लीत पोहोचले. दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी राजघाटावरील गांधी समाधीला भेट दिली. अहिंसेच्या पुजाऱ्यावर ट्रम्प फुले वाहत होते आणि उत्तर-पूर्व दिल्ली हिंसेत होरपळत होती. ट्रम्प यांनी 70 बिलियन डॉलरचे करार पदरात पाडून घेतले. हिंसेच्या आगीत माणसे मरत असताना राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत झाले. राजेशाही थाटात त्यांना मेजवानी दिली गेली. राष्ट्रपती हा भारतीय प्रजासत्ताकाचा घटनात्मक प्रमुख. भारतीय जनतेने त्यांना आपल्या घामातून दिलेल्या राजमहालात ही मेजवानी चालू असताना काही किलोमीटर अंतरावर आपल्या प्रजासत्ताकाचा आणि त्यातील नागरिकांचा गळा घोटला जात असल्याचा त्यांना पत्ता लागला नव्हता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात बलाढ्य आणि धनाढ्य लोकशाहीचे प्रमुख. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश. ही मेजवानी भारताच्या राजधानीत झोडत असताना भारतातील लोकशाहीचा गळा काही अंतरावर घोटला जात आहे याचे त्यांना वैषम्य नव्हते. हा भारताचा अंतर्गत मामला होता. अमेरिकेतील भारतीय ‘बनिये’ आणि हिंदुत्ववादी यांची मते आणि व्यापारी करार पदरात पाडून घेणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. देशाचे गृहमंत्री दंगलग्रस्त भागाच्या दिशेलाही फिरकले नाहीत. प्रचंड हिंसा आणि जाळपोळ झाल्यावर चार दिवसांनी पंतप्रधान मोदी जागे झाले.
हे सर्व घडत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, त्यांचे मंत्रीगण आणि 62 आमदार जनतेला, ‘आम्ही तुमच्या इतकेच असहाय्य आहोत असे सांगत होते.’ त्यांची असहाय्यता हेलावून टाकणारी होती. काँग्रेस सरकारला हटवायला आणि भाजपा सरकारला आणायला कारणीभूत ठरणारे त्यांचे लोकपाल आंदोलन आम्हाला आठवले. वास्तविक जनलोकपालाची त्यांची कल्पना ही एक फसवी लोकशाहीवादी आणि हुकुमशाही राजवटीच्या कल्पनेचे दुसरे रूप होती. या आंदोलनात संघ परिवार अत्यंत संशयास्पदरीत्या प्रचंड प्रमाणावर सामील झाला होता. आंदोलनाच्या व्यासपीठावर अखंड भारताचा भारत मातेच्या रूपातील नकाशा झळकला होता. तिरंगा नाचवला जात होता. व्यासपीठावर वावरणारे अनेक नेते आंदोलन संपताच भाजपात मोठी पदे पटकावून स्वगृही परतले. आंदोलनाचे अध्वर्यू ‘प्रति महात्मा गांधी’ अण्णा हजारे मौनीबाबा बनले. संघाला मदत होईल अशावेळी मौन सोडत राहिले. अयोध्या निकालावर, सी.ए.ए., एन.आर.सी., एन.पी.आर.वर केजरीवाल यांनी मौन स्वीकारले. जे.एन.यु., जामिया मिलियामधील विद्यार्थ्यांच्या दिशेलाही ते फिरकले नाहीत. आपच्या सुरुवातीच्या काळात ते उठल्यासुटल्या आंदोलने करीत. मुख्यमंत्री बनूनही रस्त्यावर येत. आपली जनता होरपळत असताना ते किमान आपले मंत्रिमंडळ आणि आमदार घेऊन दंगलग्रस्त भागात घुसून शांततेचे आवाहन करीत हिंडू शकले असते. हे शक्य नाही तर केंद्राकडे तातडीने लष्कराला पाचारण करण्याचा आग्रह धरू शकले असते त्यांच्याच पक्षाचा माजी आमदार, मंत्री आणि विद्यमान भाजपा नेता कपिल मिश्राच्या अटकेची मागणी करू शकले असते. कदाचित त्यांनी जनतेच्या रक्षणासाठी हनुमान चालिसाचे पठण केले असावे. आता ते दंगलग्रस्तांवर मदतीचा वर्षाव करतील. इतर विरोधी पक्षांचे नेतेही जनतेला वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत. गेलेले निष्पाप जीव परत येणार नाहीत, जळलेले संसार पुन्हा उभे राहणार नाहीत आणि दिल्लीच्या सहिष्णूतेवर लागलेला डाग कधी पुसला जाणार नाही. 1984 साली दिल्ली मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेले ‘शिखांचे हत्याकांड’ हा डाग कधीच पुसला गेला नाही.2002 सालच्या गुजरात दंगलीचा मोदी-शहा यांच्यावरील कलंक कधीच पुसला जाणार नाही. काँग्रेसच्या महापातकाच्या आड दडून भाजपाने या दंगलीचे समर्थन करून चालणार नाही.
भूतकाळात एखाद्या राजकीय पक्षाने केलेले हत्याकांड हे वर्तानातील एखाद्या राजकीय पक्षाच्या हत्याकांडाचा नैतिक आधार बनू शकत नाही. अर्थात दिल्ली ही ‘ये तो सिर्फ झांकी है, काशी मथुरा बांकी है’ असे ठरणार नाही ना, अशी भीती आम्हाला वाटत आहे. भविष्यातील वंशछेदाची, हॉलोकास्टची ही नांदी ठरू नये. भाजपच्या एक नेत्याने कालच म्हटले आहे की, देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत नाहीसे करू.
23 कोटी जनतेच्या शिरकाणाची ही भाषा व्यवहार्य आहे की नाही यापेक्षा अत्यंत घातक आहे हे विसरून चालणार नाही. एन.पी.आर. आणि एन.आर.सी. ही यासाठीची प्राथमिक फेरी ठरू शकते. देशभर आंदोलने पेटून आणि बिहारासहित अनेकराज्यांनी नकार देऊनही मग्रूर अमित शहा अद्यापही मागे हटण्याची भाषा करीत नाहीत. फक्त मुस्लिम नाही तर कोट्यवधी अल्पसंख्याक हिंदूंच्या मनातही आपल्या भवितव्याची चिंता निमार्ण करणारी ही पावले आहेत. भारतीय राजकारणाला सत्ताधारी ज्या दिशेने नेत आहेत ती दिशा त्यांच्या मातृसंघटनेला, संघाला जरी अभिप्रेत असली तरी ती राष्ट्रविघातक आहे, देशातील कोट्यवधी जनतेला ‘डिटेन्शन कँप’मध्ये सडायला लावणारी किंवा त्यांना दुय्यम नागरिकत्व देणारी आहे. जय श्री राम किंवा भारत माता की जय किंवा जय भवानी जय शिवाजी या घोषणा अल्पसंख्याक जनतेच्या मनात हिंसेची भीती निर्माण करणाऱ्या ठरणे हा भारत नावाच्या विशाल हृदयी राष्ट्र कल्पनेचा अंत आहे. क्रौर्य हा भारतीय प्रजासत्ताकाचा चेहरा बनू शकत नाही. भारतीय लोकशाहीचे सर्व स्तंभ ढासळत आहेत. न्यायव्यवस्थाही आता सत्ता धार्जिणी बनत आहे. द्वेषमूलक भाषणे करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांवर कारवाईचे आदेश देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुरलीधर या न्यायाधीशांची तातडीने बदली करण्यात आली. आता एकच मार्ग शिल्लक आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी धर्म बाजूला ठेवून एक व्हायला हवे. उघडी कृश छाती घेऊन अनवाणी पायांनी नौखालीचा ज्वालामुखी विझवणारा निधडा महात्मा गांधी आज आपल्यात नाही. पण आपल्यातील प्रत्येक जण त्याचा अंश बनू शकतो आणि ज्वालामुखीची एक-एक ज्वाळा विझवू शकतो.
दिल्लीतील दंगल विझत आहे. ही दंगल पोलिसांनी विझवली नाही. लष्कर येण्याच्या आत ती विझली. जनतेने आपली सदसद्वविवेकबुद्धी चेतवून ती विझवली. अनेक हिंदूंनी मुस्लिमांचे रक्षण केले, त्यांना आसरा दिला. काही मुस्लिमांनी देवळे वाचवली. मानवतेची हत्या करणे जमले नाही. पण ही मानवता हिंदू मुस्लिमांची एकी घडवेल आणि ही एकी हिंदू राष्ट्राच्या आड येणारी असेल. सर्व धर्मीय एकी भारत उभा करेल पण हिंदू राष्ट्र नाही. ज्यांना भारत नको आहे आणि हिंदुस्थान हवा आहे त्यांना दंगली हव्या आहेत. दिल्लीतील ही दंगल एका भयानक वाटचालीची सुरुवात ठरू नये !
- डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com

Post a Comment