(१९) यांना विचारा, कोणाची साक्ष सर्वाहून श्रेष्ठ आहे? - सांगा, माझ्या व तुमच्यामध्ये अल्लाह साक्षी आहे.११ आणि हा कुरआन माझ्याकडे ‘वह्य’ (दिव्य अवतरण) द्वारे पाठविला गेला आहे जेणेकरून तुम्हाप्रत आणि ज्या ज्या लोकांपर्यंत हा पोहोचेल त्या सर्वांना मी सावध करावे. काय खरोखरच तुम्ही अशी साक्ष देऊ शकता की अल्लाहबरोबर इतर ईश्वरदेखील आहेत?१२ सांगून टाका, अशी साक्ष तर मी कदापि देऊ शकत नाही.१३ सांगून टाका, ईश्वर तर तोच एक आहे आणि मी त्या अनेकेश्वरत्वापासून सर्वस्वी अलिप्त आहे ज्यांत तुम्ही गुरफटला आहात.
(२०) ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या गोष्टीला अशाप्रकारे नि:संदिग्धपणे ओळखतात जशी त्यांना आपल्या पुत्रांना ओळखण्यात यत्किंचितही शंका वाटत नाही.१४ परंतु ज्यांनी आपण होऊन स्वत:ला नुकसानीत टाकले आहे ते हे मान्य करीत नाहीत.
(२१) आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाहवर खोटे आळ घेतो१५ अथवा अल्लाहच्या निशाण्यांना खोटे लेखतो?१६ नि:संशय असले अत्याचारी कधीही सफल होऊ शकणार नाहीत.
(२२) ज्या दिवशी आम्ही या सर्वांना एकत्र करू आणि अनेकेश्वरवाद्यांना विचारू की आता ते तुमचे ठरविलेले भागीदार कोठे आहेत ज्यांना तुम्ही आपला ईश्वर
समजत होता?
(२३) तर ते याखेरीज कोठलाच उपद्रव माजवू शकणार नाहीत (अशी खोटी साक्ष देतील) की हे आमच्या स्वामी! तुझी शपथ, आम्ही मुळीच अनेकेश्वरवादी नव्हतो.
(२४) पाहा, त्या वेळेस हे कशाप्रकारे आपल्याविरूद्ध स्वत:च असत्य रचतील, आणि तेथे यांचे सर्व बनावटी उपास्य हरवलेले असतील.
(२५) यांच्यापैकी काही लोक असे आहेत जे कान देऊन तुमचे म्हणणे ऐकतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे का आम्ही त्यांच्या हृदयावर पडदे घातले आहेत ज्यामुळे त्यांच्या काहीच लक्षात येत नाही आणि त्यांच्या कानांना बधिरता आणली आहे (की सर्वकाही ऐकूनसुद्धा काहीच ऐकत नाहीत.)१७
११) म्हणजे या गोष्टीवर साक्षी आहे की मी त्याच्याकडून पाठविला गेलो आहे आणि जे काही सांगत आहे त्याच्याच आदेशाने सांगत आहे.
१२) एखाद्याविषयी साक्ष देण्यासाठी केवळ युक्ती आणि अनुमान योग्य नाही तर त्याच्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारे मनुष्याने विश्वासाने सांगू शकावे की असे आहे. म्हणजे प्रश्नाचा अर्थ हा आहे की काय वास्तविकपणे तुम्हाला हे ज्ञान आहे की संपूर्ण विश्वात अल्लाहशिवाय आणखी कोणी अधिकारप्राप्त् शासक आहे, जो भक्ती आणि पूजेला पात्र असावा?
१३) म्हणजे तुम्ही ज्ञानाविना मात्र खोटी साक्ष देऊ इच्छिता तर खुशाल द्या. मी तर अशी साक्ष देऊ शकत नाही.
१४) म्हणजे अस्मानी ग्रंथांचे ज्ञान ठेवणारे या सत्याला नि:संदिग्धपणे जाणतात की अल्लाह एकच आहे आणि ईशत्वात कोणाचीच काहीएक भागीदारी नाही. ज्याप्रकारे एखाद्याचे मूल इतर अनेक मुलांमध्ये उभे असले तरी तो मनुष्य आपल्या मुलाला ओळखेल. त्याचप्रमाणे ज्याला ईशग्रंथाचे ज्ञान असेल तो ईशत्वाविषयी लोकांच्या अनेक धारणा आणि विचारसरणीमध्येसुद्धा स्पष्टत: जाणून घेतो की यापैकी सत्य काय आहे?
१५) म्हणजे हा दावा करावा की अल्लाहसोबत इतर अनेक शक्तीसुद्धा ईशत्वात भागीदार आहेत व ईशगुण त्यांच्यातही आहेत. तेही ईशअधिकार राखतात आणि याचे अधिकारी आहेत की मनुष्याने त्यांचीही पूजाअर्चा करावी. हासुद्धा अल्लाहवर खोटा आरोप आहे की, अल्लाहने अशा काही विभूतींना आपल्या खास जवळचे ठरविले आहे आणि त्यानेच हा आदेश दिला आहे वा कमीतकमी त्याला हे मान्य आहे की यांच्याकडे ईशगुण जोडले जावेत आणि त्यांच्याशी तोच मामला केला जावा जो एका दासाने अल्लाहशीच करावयास हवा.
१६) अल्लाहच्या निशाण्यांनी अभिप्रेत त्या निशाण्यासुद्धा आहेत ज्या मनुष्याच्या शरीरात आणि संपूर्ण सृष्टीत पसरलेल्या आहेत. आणि त्या साक्षीसुद्धा ज्या पैगंबरांच्या जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्यातून प्रकट झाल्या. तसेच त्या साक्षीसुद्धा ज्या अस्मानी ग्रंथात प्रस्तुत आहेत. या साऱ्या साक्षी एकाच तथ्याकडे निर्देश करतात. ते हे की साऱ्या विश्वात अल्लाह केवळ एकच आहे आणि इतर सर्व दास आहेत. आता जो कोणी या सर्व पुराव्यांना डावलून एखाद्या वास्तविक साक्षीविना किंवा एखादे ज्ञान, एखादे अवलोकन आणि एखाद्या अनुभवाविनाच केवळ अनुमानाने, अटकळीने किंवा पूर्वजांच्या अंधानुकरणाने इतरांना ईशगुण राखणारे व ईशअधिकार राखणारे ठरवितो तर स्पष्ट आहे की त्याच्यापेक्षा अत्याचारी दुसरा कोणीही असू शकत नाही. असा मनुष्य सत्य आणि वास्तविकतेवर अत्याचार करत आहे आणि स्वत:वरसुद्धा अत्याचार करत आहे. तो सृष्टीतील त्या प्रत्येक वस्तूवर अत्याचार करीत आहे जिच्याशी तो या चुकीच्या धारणेवर व्यवहार करतो.
१७) येथे हे स्पष्ट व्हावे की निसर्गनियमानुसार जे काही जगात घडते त्याला अल्लाह आपल्याशी जोडतो. कारण या नैसर्गिक कायद्यांना निर्माण करणारा अल्लाहच आहे, आणि जे परिणाम या कायद्यानुसार समोर येतात ते सर्व अल्लाहच्या हुकमाने व इराद्यानेच घडत असतात. सत्याच्या हट्टी विरोधकांनी सर्वकाही ऐकल्यानंतरसुद्धा काहीं न ऐकणे तसेच सत्यवाहकाच्या सांगण्याचा अंशसुद्धा त्यांच्या मनात न उतरणे हे त्यांच्या दुराग्रही, पक्षपाती आणि वुंâठित वृत्तीचा स्वाभाविक परिणाम आहे. निसर्गनियम आहे की मनुष्य जेव्हा जिद्द करू लागतो तेव्हा तो निष्पक्षपणे सत्यप्रिय व्यक्तीप्रमाणे वर्तनाचा स्वीकार करत नाही. त्याच्या मनाची दारे सत्यासाठी बंद होतात कारण सत्य त्याच्या इच्छेविरुद्ध असते. हीच गोष्ट व्यक्त करताना आम्ही म्हणू की, मनुष्याच्या मनाचे दार बंद आहे आणि हीच गोष्ट व्यक्त करताना अल्लाह म्हणतो आम्ही त्याच्या मनाचे दार बंद केले आहे कारण आम्ही फक्त घटनेचे वर्णन करतो आणि अल्लाह यथार्थाला प्रकट करतो.
Post a Comment