Halloween Costume ideas 2015

स्त्री समाजाचा स्तंभ

Muslim Lady
पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे, म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या  कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात  यशस्वी व्हा ! महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती !

स्तंभ म्हणजे काय? स्तंभ या शब्दाच्या 15 व्याख्या आहेत. प्रामुख्याने स्तंभ म्हणजे आधार देणारी वस्तू. स्तंभ म्हटले की डोळ्यासमोर येतो तो आपल्या लाडक्या तिरंग्यातील अशोक  स्तंभ, दिल्लीतील कुतूब मिनार, भीमा कोरेगावचा विजय स्तंभ, पण स्त्री समाजाचा स्तंभ कशी होऊ शकते? स्त्री आणि स्तंभामध्ये अशा कोणत्या समान गोष्टी आहेत ज्यामुळे तिला  स्तंभ म्हटले जाते? स्तंभ हा मजबूत असतो, तशी स्त्री सुद्धा मजबूत असते. म्हणायला स्त्रीला अबला नारी म्हणून कमकुवत समजण्यात येते. मात्र दिसतं तस नसतं. स्त्री दिसायला  जरी कमकुवत दिसली तरी तिच्या व्यक्तीमत्वात अनेक शक्ती लपलेल्या असतात. उदा. आपल्या मर्जीविरूद्ध केवळ आई-वडिलांच्या समाधानासाठी ते सांगतील त्या व्यक्तीबरोबर लग्न  करण्याचीच नव्हे तर ते निभाऊन दाखविण्याची शक्ती, आपल्या मनाविरूद्ध जावून पतील खुश ठेवण्याची शक्ती, आजकालच्या जिद्दी मुलांना सांभाळण्याची शक्ती, घरचे सगळे काम  करून परत ऑफिसचे काम करण्याची शक्ती, ऑफिसमधील आपले सहकारी आणि अधिकारी यांना तोंड देण्याची शक्ती, सासरच्या मंडळींचे मन जिंकण्याची शक्ती, अनाहुतपणे न  सांगता घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची शक्ती, शेजाऱ्याची काळजी घेण्याची शक्ती, मैत्रिणींसाठी वेळ काढण्याची शक्ती, विविध पाककला आत्मसात करून प्रत्यक्षात त्या  तयार करून घरच्या मंडळींना खाऊ घालण्याची शक्ती, काटकसरीने शॉपिंग करण्याची शक्ती, मुले नालायक निघाली तर आई-वडिलांचा सांभाळ करण्याची शक्ती, न कमाविणाऱ्या किंवा  दारूड्या पतीसोबत संसार करण्याची शक्ती, माणसे जोडण्याची शक्ती. एवढे सर्व करत असताना स्वत:कडे दुर्लक्ष करण्याची शक्ती. ह्या एक ना अनेक शक्तींचा समुचय म्हणजे स्त्री. जी की एका कुटुंबामध्ये एका स्तंभासारखी उभी असते.

स्तंभ आणि स्त्री मधले दूसरे साम्य
म्हणजे स्तंभ, ज्या प्रमाणे अनेक धातूंचा समुच्चय करून बांधण्यात येतो तसेच परमेश्वरांनी स्त्री नावाच्या या स्तंभाला अनेक धातू उदा. माया, करूणा, क्षमा, सहनशिलता यांच्या समुच्चयाने तयार केलेले आहे. स्तंभ आणि स्त्रीमध्ये तिसरे साम्य म्हणजे स्तंभ हे विजयाचे चिन्ह मानले जाते. स्त्री सुद्धा सगळ्या अडचणींवर मात करून स्वत:च नव्हे तर कुटुंबाला  सुद्धा विजयापर्यंत नेते. म्हणून स्त्री ही कुटुंबाचाच नव्हे तर देशाचा स्तंभ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
स्तंभाचे खूप प्रकार असतात. उदा. श्रद्धा स्तंभ. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नी ज्यांना उमहातूल मोमिनात (मुस्लिम समाजाची माता) म्हटले जाते आणि त्यांच्या सोबत काम  करणाऱ्या महिला ज्यांना सहाबियात म्हटले जाते, ते आणि त्यांची जीवन शैली हे आमचे श्रद्धास्तंभ होत. शिक्षणाचे स्तंभ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख यांचा आदर्श  आपल्या सर्वासमोर आहेत. करूणा स्तंभ म्हणून मदर तेरेसांचे उदाहरण ठळकपणे समोर येते. शौर्यस्तंभ म्हणून राणी लक्ष्मीबाई, नगरवाली राणी चाँदबीबी, रजिया सुलताना, चित्तोडची  पद्मावती यांना कसे बरे विसरता येईल. आंतरिक्षातील स्तंभ म्हणून कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स् यांचे उदाहरण जगासमोर आहे. धैर्याचे स्तंभ म्हणून श्रीमती इंदिरा गांधी  आणि किरण बेदी यांच्याकडे पाहता येईल. क्रिडा क्षेत्रातील स्तंभ म्हणून मेरी कॉम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी.सिंधू यांना दृष्टीआड करता येत नाही. आज आएएएसमध्ये  अन्ना मलहोत्रा व नेत्रहीन आयएएस प्रांजल पाटील यांच्यासारख्या अनेक महिलांनी देशाच्या प्रशासनामध्ये आपण प्रशासकीय स्तंभ आहोत, हे ही दाखवून दिलेले आहे. बोईंग सारखे  विमान चालवून एक यशस्वी कमर्शियल पायलट सरला ठकराल यांच्याकडे धाडसाचे स्तंभ म्हणून पाहता येईल. ही काही उदाहरणं झाली. विविध क्षेत्रामध्ये स्तंभाप्रमाणे पाय रोवून  आपल्या कार्याने जगाला सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया खरोखरच्याच स्तंभ आहेत की काय? असे वाटावे इतपत दृढता त्यांच्यात आहे. विशेष म्हणजे हे स्तंभ समाजाकडून काय मागतात?  दूसरं काही नाही. फक्त प्रेम, विश्वास आणि त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक. आपण असे झाड पाहिले आहे काय की जे 20 ते 25 वर्षे एका जागी उभा राहते व नंतर त्याला दूसरीकडे  लावलं जातं तरीही ते छान वाढते, फुलं आणि फळं देते. नाही ना ! आपला अंदाज चुकीचा आहे. असा एक वृक्ष आहे ज्याचे नाव ’स्त्री वृक्ष’ आहे. परंतु दुर्दैवाने या वृक्षाला आजकाल  ’मनी प्लांट’ची वेल समजले जात आहे, जी की घरात शोभलीही पाहिजे आणि पैसेही देत राहिली पाहिजे. स्त्री ही समाजाचा अर्धा भाग आहे. जर का स्त्री भ्रुणहत्या नाही झाल्या तर   त्यांची संख्या पुरूषांपेक्षा जास्त होईल. अशा या अर्ध्या समाजाच्या गरजा आपल्याला जाणून घेता आल्या पाहिजेत. त्यांची पहिली गरज जन्माचा अधिकार. दूसरी गरज जगण्याचा  अधिकार. तिसरी गरज चांगलं पालन पोषणाचा अधिकार, चौथी गरज शिक्षणाचा अधिकार, पाचवी गरज तिच्या सन्मानाचा आणि अब्रुच्या रक्षणाचा अधिकार, सहावी गरज  हुंडाबळीपासून मुक्तीचा अधिकार. अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अगोदर नवजात मुलींना जीवंत गाडण्याची प्रथा होती. ती प्रेषित सल्ल. यांनी बंद पाडली आणि तिला  जगण्याचा अधिकार दिला. तिच्या चांगल्या पालन पोषणासाठी लोकांना प्रवृत्त केले आणि तिचे हक्क जे अल्लाहने तिला दिले ते अदा करण्याचे फरमान जाहीर केले. आज बहुतकरून  जगभरातील महिला निर्धोकपणे जन्म घेतात, शिक्षण घेतात आणि आपल्या समाजाला आधार देतात.
प्रेषितांच्या काळात एकटी स्त्री अंगभर सोने घेऊन रस्त्यावरून जात असे. तिला कोणाची भीती नसायची. बलात्कारासारखा प्रकार त्या काळात नावाला नव्हता. दारूला हराम करून स्त्रीयांना दारूड्या नवऱ्यापासून कायमची मुक्ती प्रेषित सल्ल. यांनी मिळवून दिली होती. पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे. म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती  तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू  नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात यशस्वी व्हा. महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती.

- डॉ. सीमीन शेख, लातूर
8788327935

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget