(९) आणि आम्ही दूत जरी अवतरला असता तरीदेखील त्याला मानवी रूपातच अवतरला असता आणि अशाप्रकारे यांना त्याच शंकेत गुरफटविले असते, ज्यात सध्या हे गुरफटलेले आहेत.७
(१०) हे पैगंबर (स.)! तुमच्या अगोदरदेखील कित्येक पैगंबरांचा उपहास केला गेला आहे, परंतु त्या टवाळकी करणाऱ्या लोकांवर सरतेशेवटी तेच सत्य उलटल्याविना राहिले नाही ज्याचा उपहास ते करीत होते.
(११) यांना सांगा, जरा पृथ्वीतलावर फेरफटका मारून पाहा, खोटे ठरविणाऱ्यांचा शेवट कसा झाला आहे.८
(१२) यांना विचारा, आकाशांत व पृथ्वीतलावर जे काही आहे ते कोणाचे आहे? - सांगून टाका, सर्वकाही अल्लाहचेच आहे,९ त्याने दया व कृपेची नीती स्वत:साठी अनिवार्य करून घेतली आहे. (म्हणूनच तो अवज्ञा व उद्धटपणावर तुम्हाला लगेच पकडीत नाही.) पुनरुत्थानाच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना अवश्य जमा करील. हे एक सर्वस्वी नि:संदिग्ध सत्य आहे. परंतु ज्या लोकांनी आपणहून स्वत:ला विनाशाच्या धोक्यात टाकले आहे ते त्याला मानीत नाहीत.
(१३) रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात जे काही स्थिरावले आहे, सर्व अल्लाहचे आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
(१४) सांगा, अल्लाहला सोडून काय मी इतर कोणाला आपला पालक बनवू? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. आणि तो उपजीविका देतो, उपजीविका घेत नाही?१० सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी, (आणि ताकीद करण्यात आली आहे की कोणी अनेकेश्वरवादी होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस.
(१५) सांगा, जर मी आपल्या पालनकत्र्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की एका मोठ्या (भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल.
(१६) त्यादिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली. आणि हेच (उघड) स्पष्ट यश आहे.
(१७) जर अल्लाहने तुम्हाला एखाद्या प्रकारची हानी पोहोचवली तर त्याच्याशिवाय इतर असा कोणीच नाही जो तुम्हाला त्या हानीपासून वाचवू शकेल. आणि जर त्याने तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीने उपकृत केले तर त्याला प्रत्येक गोष्टीचे सामथ्र्य प्राप्त आहे.
(१८) त्याला आपल्या दासांवर सर्वाधिकार प्राप्त आहे आणि तो बुद्धिमान व जाणकार आहे.
७) त्यांच्या आक्षेपांचे हे दुसरे उत्तर आहे. देवदूतांच्या प्रकट होण्याची प्रथम स्थिती ही असू शकत होती की तो लोकांसमोर आपल्या वास्तविक अनुभूतीरूपात प्रकट झाला असता परंतु वर सांगितले गेले आहे की आता ती वेळ आलेली नाही. आता दुसरी स्थिती ही शिल्लक आहे की देवदूत मानवी रूपात यावा. याविषयी सांगितले गेले आहे की, जर देवदूत मानवी रूपात आला तर त्याला अल्लाहने नियुक्त केले याबद्दल तुम्हाला तीच शंका येईल; जशी शंका तुम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहने पाठविण्याविषयी येत आहे.
८) म्हणजे गतकालीन लोकसमुदायाच्या पुरातत्व आणि ऐतिहासिक कथानक साक्षी देतील की सत्य आणि वास्तविकतेला झुगारून दिल्याने आणि असत्यावरच ठाम राहिल्यामुळे यांना कशाप्रकारच्या भयानक परिणामांना सामोरे जावे लागले.
९) ही एक सूक्ष्म वर्णनशैली आहे. प्रथम आदेश झाला की यांना विचारा जमिनीवरील व आकाशातील वस्तू कोणाच्या आहेत? विचारणाऱ्याने त्यांना विचारले आणि उत्तरासाठी थांबून राहिला. संबोधित माणसे या मताशी सहमत आहेत. ते स्वत:हून सांगतील की सर्वकाही अल्लाहचेच आहे. त्यांच्यात चुकीचे उत्तर देण्याचे साहस नाही की खरे उत्तरसुद्धा ते देऊ इच्छित नाही. कारण सत्य उत्तर दिले तर त्यांना भीती आहे की प्रतिपक्ष याचा अनेकेश्वरत्व विचारसरणीविरुद्ध पुरावा म्हणून उपयोग करतील. म्हणून ते या कारणाने कोणतेच उत्तर देऊ इच्छितच नाहीत. तेव्हा आदेश होतो की तुम्ही स्वत: हून म्हणा की सर्वकाही अल्लाहचे आहे.
१०) यात एक सूक्ष्म व्यंग आला आहे. अनेकेश्वरवादी लोकांनी अल्लाहशिवाय ज्यांना ज्यांना आपला ईश्वर बनवून ठेवले आहे ते सर्व ईश्वर आपल्या दासांना उपजीविका पूरविण्याऐवजी उलटी त्यांच्याकडूनच उपजीविका प्राप्त् करण्यास बाध्य आहेत. एखादा फिरऔन ईशत्वाचा थाठ तोपर्यंत जमवू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याचे दास कर आणि नजराणे देत नाहीत. एखादे थडगे पूजनिय तेव्हाच बनते जेव्हा त्याचे उपासक त्या थडग्यावर भव्य घुमट बांधतात. एखाद्या देवीदेवतेचा दैवी थाट तोपर्यंत सजू शकत नाही जोपर्यंत त्याचे पुजारी त्याची मूर्ती बनवून एखाद्या भव्य मंदिरात ठेवत नाहीत आणि तिला चांगल्या प्रकारे साजसज्जेच्या सामग्रीने सजविले जात नाही. अशाप्रकारचे सर्व बनावटी (नकली) ईश्वर स्वत: आपल्या दासांचे (भक्तांचे) मुहताज (आश्रित) आहेत. परंतु विश्वात एकमात्र विश्वात्मक अल्लाह असा वास्तविक ईश्वर आहे ज्याचे ईशत्व (खुदाई) स्वयंभू आहे. तो कोणाच्याही मदतीचा मुहताज नाही उलट सर्व त्याचेच आश्रित (मुहताज) आहेत.
Post a Comment