Halloween Costume ideas 2015

हाईट बुद्धीची

निसर्गानं एखाद्यात काही कमतरता ठेवली तर तो अधिक जोमानं काम करतो का? सगळं काही असतानाही धडधाकट असणारी मुलं नेहमी कमी का पडतात? गरिबीच्या झळा  सोसल्यावरच आपण खूप मोठे होतो का? एखाद्याच्या शारीरिक व्यंग्यामुळे त्याला डावलणं, त्याच्या कामावर शंका घेणं हे योग्य आहे का...?

आत्मप्रेरणा’ या आपल्या पुस्तक प्रकाशनाला येण्याबाबत बारामतीचे मित्र लक्ष्मण जगताप यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आग्रह धरला होता. ‘तुम्ही आल्याशिवाय मी पुस्तक प्रकाशन   करणार नाही’, या त्यांच्या प्रेमाच्या तंबीपुढं माझं काहीही चाललं नाही. कामाचं मोठं वेळापत्रक मनाशी योजून मी बारामतीला दोन दिवस मुक्कामी गेलो. जगताप यांनी भरगच्च कार्यक्रम आखले होते.
सकाळी सहा वाजताच आम्ही बाहेर पडलो. महेश घोलप आणि गणेश डावखर हे माझे सहकारी समवेत होते. पहिली भेट जगताप यांचे प्रयोगशील शिक्षक मित्र भारत पवार यांच्या घरी होती. पूर्वी रोजगार हमी योजनेवर काम करणारे पवार शिक्षक झाले. गावातला पहिला माणूस जेव्हा शिक्षक होतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. तो विश्वास न बसणारा आनंद  असतो, असं काहीसं पवार यांच्या बाबतीत घडलं होतं. परीट समाजाचे पवार हे आपल्या आईला कपडे धुण्यासाठी मदत करायचे. आई चार घरी कपडे धुण्याचं काम करून कुटुंबाच्या  उदरनिर्वाहाचं काम करायची. पवार यांना जशी शिक्षकाची नोकरी मिळाली तसं इतरही अनेकांना पोटापाण्याचं काम मिळत असतं आणि त्यातून येणारी पिढी घडण्याची प्रक्रिया सातत्यानं  होत असते. आपला संघर्ष कायम ठेवला पाहिजे, त्याला एक दिवस फळ मिळतंच, असं सांगणारी पवार यांची कहाणी आहे. पवार यांच्या घरात मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो त्या  हॉलमध्ये जिकडे नजर टाकावी तिकडे पारितोषिकंच पारितोषिकं होती. ‘‘ही सगळी पारितोषिकं तुमचीच का?’’ मी पवार यांना विचारलं.
ते म्हणाले : ‘‘नाही, माझा मुलगा हृषीकेश याची आहेत ती.’’
मी म्हणालो : ‘‘एवढी सगळी?’’
ते म्हणाले : ‘‘हो. तो वक्तृत्व स्पर्धेत जिथं जातो तिथं त्याचा पहिला क्रमांक येतो. अगदी इयत्ता पहिलीपासून हे असं घडत आलं आहे.’’
ही माहिती सांगता-सांगता त्यांनी माझ्यासमोर प्रमाणपत्रांच्या फायली ठेवल्या. ते वर्तमानपत्रांच्या कात्रणाच्या आणखी फायली काढत होते, तितक्यात जगताप म्हणाले : ‘‘अहो, नका  काढू. आमचं पाहून होणार नाही. आम्ही आणखी कुणाकुणाला वेळ दिला आहे आणि आम्हाला तिथं वेळेत पोचायचंय.’’ तरीही पवार यांनी त्या फायली माझ्यासमोर ठेवल्याच. एवढं  कौतुक ज्या मुलाचं होत आहे तो इतरांपेक्षा वेगळा होता हे त्या फोटोंमधून दिसत होतं.
‘‘मला हृषीकेशला भेटायचंय’’ मी त्यांना म्हणालो. पवार यांनी त्याला बोलावलं. हृषीकेश माझ्यासमोर बसला. तो आल्यावर आम्ही त्याच्याकडं पाहतच राहिलो. त्यानं त्याचं नाव सांगितलं.
मी विचारलं : ‘‘सध्या काय करतोस?’’
‘‘मी सध्या बीएस्सी ग्रीच्या तृतीय वर्षात शिकतोय.’’
तो त्याच्या विषयी जसजशी माहिती देऊ लागला तसतसे आम्ही आश्चर्यचकित होत गेलो. विषयाची पद्धतशीर मांडणी...बोलण्यात नम्रता; पण विचारांत स्पष्टपणा...ठराविक ठिकाणी  पॉज घेऊन बोलण्याची त्याची पद्धत...ही त्याची वैशिष्ट्यं जाणवली. पवार यांच्याकडची भेट आम्ही अर्ध्या तासातच आटोपणार होतो; पण दोन-अडीच तास कधी संपले कळलंही नाही.
हृषिकेश पवार. वय 23. शिक्षण डिग्रीचं शेवटचं वर्ष. चित्रकला स्पर्धेत नैपुण्य. आतापर्यंतच्या सगळ्या म्हणजे पहिलीपासून ते डिग्रीपर्यंतच्या सगळ्या परीक्षांमध्ये पहिला क्रमांक.  शिक्षकांचा प्रिय, मित्रांचा प्रिय, स्पर्धांच्या निमित्तानं भारतभर मित्रवर्ग. आणि या सगळ्याचा पुरावा म्हणजे माझ्यासमोर असलेली त्याची असंख्य पारितोषिकं, बक्षीसं... हृषीकेशमुळे  त्याच्या आई- वडिलांनाही वेगळी ओळख मिळाली. त्यांनाही अनेकदा पुरस्कार मिळाले. हृषीकेशसारखी अन्य मुलं आपल्याकडे नाहीत अशातला भाग नाही; पण हृषीकेश त्या सगळ्या  मुलांमध्ये वेगळा होता; किंबहुना निसर्गानं त्याला वेगळंच घडवलं होतं. त्यामुळे त्याचे आई-वडील काहीसे खचलेले वाटले; मात्र स्वतः हृषीकेश खचला नव्हता. हृषीकेशच्या बुद्धीची ‘हाईट’  मोजायला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मोजपट्ट्या-फूटपट्ट्या लागतील...अडचण होती ती त्याच्या शरीराच्या उंचीची. ती आहे तीन फूट. त्यामुळे हृषीकेश हा त्यांच्या आई-वडिलांसाठी  लहानपणापासूनच काळजीचा विषय असणं अगदी साहजिक होतं. खूप इलाज केले; पण यश मिळालं नाही. शेवटी, इलाज थांबवावे लागले. हृषीकेशला इयत्ता पहिलीपासून मिळत गेलेली  शाबासकी त्याच्या आई-वडिलांची उमेद वाढवणारी ठरली.
हृषीकेश म्हणाला : ‘‘सकारात्मकतेतून सातत्यानं काम करत राहायचं, हे मी वडिलांकडून शिकलो. कधी थकायचं नाही हे मी आई-वडील दोघांकडून शिकलो. माझ्या आई-वडिलांचे हे दोन  मूलमंत्र माझ्यासाठी संजीवनी ठरले आहेत. कधी-कधी हाईटवरून वाईटही वाटतं. आमच्याकडे दहीहंडी हा खूप मोठा उत्सव असतो. त्यात सहभागी होता येत नाही. गर्दीच्या ठिकाणी   जाता येत नाही. माझ्या हाईटमुळे मला करता येऊ शकत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत.’’ हे सांगत असताना हृषीकेशच्या सांगण्यात विषाद अजिबात नव्हता. त्याची यशस्वी   वाटचाल, यशस्वी जगणं तो अतिशय उत्साहात आमच्या पुढं उलगडत होता. तो बराच वेळ बोलत होता, त्यामुळे त्याला त्याच्या आईनं पाणी आणून दिलं. जणू तो पाणी प्यायला  मिळण्याची वाटच पाहत होता. त्यानं पाण्याचा ग्लास क्षणार्धात संपवला. आपल्या मुलाला कधी काय लागतं हे फक्त आईलाच कळतं, हे यासंदर्भातलं एक साधंसं उदाहरण. आई  हृषीकेशच्या शेजारी बसली आणि त्याच्या पाठीवर हात फिरवू लागली.
हृषीकेशच्या आई कीर्तीताई मला म्हणाल्या : ‘‘कसा मुलगा जन्माला घातला?’ अशी दूषणं मला एकेकाळी देणारेच आता हृषीकेशच्या कामगिरीनंतर पुष्पगुच्छ घेऊन मला भेटायला येतात.’’ हृषीकेशच्या गालावर प्रेमभरानं हात फिरवणाऱ्या कीर्तीताईंचे डोळे पाणावले होते. हृषीकेशचं भरभरून कौतुक करताना, त्याचं वेगवेगळ्या क्षेत्रांतलं यश, प्रावीण्य सांगताना त्यांना  शब्द कमी पडत होते. त्या चहा आणायला आत गेल्या.
हृषीकेश आमच्याशी पुन्हा बोलायला लागला. म्हणाला : ‘‘ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला उत्तम वक्ता म्हणून तयार करावं अशी माझी इच्छा आहे. तेच माझ्या आयुष्याचं ध्येय  आहे.’’ हे सांगताना त्याचे डोळे आत्मविश्वासानं चमकत होते. राजकारण, समाजकारण आणि कृषिव्यवस्था हे हृषीकेशच्या आवडीचे विषय. वक्तृत्व स्पर्धेत हेच त्याचे विषय असल्याचं  त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. समुपदेशनासाठीही त्याला असंख्य मुलांचे फोन येत असतात. निराश झालेली मुलं त्याचा सल्ला घेतात. हृषीकेश उत्तम समुपदेशक म्हणून परिचित आहे. स्पर्धा परीक्षेविषयीचं मार्गदर्शनही तो करतो.
‘‘तू वक्तृत्वस्पर्धेची तयारी कशी करतोस?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला : ‘‘सुरुवातीला मी भाषणं पाठ करायचो. दहावीपर्यंत मुद्दे लक्षात ठेवायचो. पुढं पुन्हा काही दिवस मुद्दे लिहूनही   घ्यायचो;  पण आता तसं नाही. जो कुठला विषय स्पर्धेसाठी असेल, त्या विषयाचा मूलभूत अभ्यास करायचा, त्याचे सामाजिक परिणाम शोधायचे आणि त्यावर चिंतन करायचं. आपल्या  मनात तो विषय अगदी पक्का झाल्याची खात्री करून घ्यायची. दोन वर्षांपूर्वीपर्यंत आणि अलीकडच्या काळातही त्या विषयावर कुणी काही लिहिलंय का याचाही अभ्यास करायचा. तेही  मुद्दे लक्षात घ्यायचे आणि आपल्या शैलीत अगदी साधेपणानं तो विषय मांडायचा. कुणीतरी सहानुभूतीपोटी मला वरचा क्रमांक देतंय...माझी हाईट कमी आहे म्हणून कुणीतरी  सहानुभूतीनं मला मदत करू पाहतंय हे मला बिलकूल आवडत नाही. जिथं मला सहानुभूतीचा वास येतो तिथलं सगळं मी नाकारतो.’’ स्वयंपाकघरात एव्हाना चहा तयार झाला होता.  हृषीकेशनं खुर्चीवरून उडी मारली आणि तरातरा जाऊन आईनं भरलेले चहाचे कप तो घेऊन आला. आम्हाला चहा दिला. चहा झाल्यावर आम्ही एकेक करून त्याची पारितोषिकं पाहिली.  एकेका पारितोषिकाजवळ जाऊन त्याविषयीची माहिती देताना तो सांगत होता : ‘‘हे पारितोषिक मला शरद पवारसाहेबांच्या हातून मिळालं...हे सुप्रिया सुळे मॅडम यांच्या हातून  मिळालं...हे राज्यपातळीवरचं आहे... हे भारतात पहिला आल्यावर मिळालेलं आहे...’’
‘‘तुझी हाईट कमी असल्यानं तुझी मित्रमंडळी तुझी चेष्टा करत असतील...’’ असं विचारल्यावर तो हसून म्हणाला : ‘‘त्यात काय मग? त्यांना आनंद मिळतोय हे काय कमी आहे का?  मी दोन दिवस कॉलेजला गेलो नाही तर मित्रांना हुरहूर लागते.’’ हृषीकेशचे वडील मध्येच म्हणाले : ‘‘मी जेव्हा त्याला कॉलेजला सोडायला जातो तेव्हा त्याची बॅग घेण्यासाठी त्याचे दोन- तीन मित्र गेटवर वाट पाहत उभे असतात. गप्पाटप्पा होतात, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्याचे दोन-तीन मित्र त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्याच्यासोबत आवर्जून जातात.’’  तीनसाडेतीन तास हृषीकेशच्या घरी घालवल्यावर आता निघायची वेळ झाली होती. निघता निघता मी कीर्तीताईंना म्हणालो : ‘‘तुमच्यासारखी आई प्रत्येकाला मिळत नाही हेही तेवढंच  खरं आहे.’’ त्यावर त्या लगेच म्हणाल्या : ‘‘हृषीकेशसारखा मुलगाही सगळ्यांच्या आयुष्यात येत नाही. बघा ना...तो तेवीस वर्षांचा झालाय तरी रोज रात्री एखाद्या लहान बाळासारखा माझ्या कुशीत झोपलेला असतो. नाहीतर मुलांची पाचवी झाली की त्यांच्या अधिकच्या स्पर्शासाठी आई आसुसलेली असते. माझ्या लेखी हा लहान बाळ अजूनही लहानच आहे.’’
निसर्गानं एखाद्यात काही कमतरता ठेवली तर तो अधिक जोमानं काम करतो का? सगळं काही असतानाही धडधाकट असणारी मुलं नेहमी कमी का पडतात? गरिबीच्या झळा  सोसल्यावरच आपण खूप मोठे होतो का? एखाद्याच्या शारीरिक व्यंग्यामुळे त्याला डावलणं, त्याच्या कामावर शंका घेणं हे योग्य आहे का...? हृषीकेशशी बोलत असताना असे अनेक  प्रश्न मला पडत गेले... आम्ही हृषीकेशचा निरोप घेत असताना तो काहीसा भावुक झाला. आपल्या आयुष्यातली त्रुटी लक्षात घेऊन आपला चांगुलपणाही मोजायला कुणीतरी आज  आपल्या जवळ आलं याचा त्याला आनंद झाला होता. बारामतीच्या वेगळेपणाचे अनेक पैलू मी दोन दिवस अनुभवले... तिथल्या अनेक व्यक्तींचे चेहरे अभ्यासले... पण हे सगळं करत  असताना अनेक वेळा समोर येत होता तो हृषीकेशचाच चेहरा. तो चेहरा समोर आला आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठीची सगळी उत्तरं मला मिळू लागली आणि आपल्या पोराला  शंभर हत्तींचं बळ देणाऱ्या हृषीकेशच्या आईमध्ये मी माझीही आई शोधू लागलो...

- संदीप काळे, मुंबई
9890098868
(साभार : सकाळ)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget