Halloween Costume ideas 2015

व्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा

शिमगा, धुळवडीच्या बोंबाबोंबी सणांतून रंगाचा उत्सव रंगतदार होतोय. सकाळपासून गल्लीतल्या रस्त्यांवरून रंग खेळले जात आहेत. स्वतःला रंगीत रंगमय करून घेण्याचे दिवस आता संपलेत आता या रंगाना जातीय अस्मितेचे केमिकली अंधत्व चिकटलय.
    आपल्या जातधर्म अस्मिता मिसगाईडेड जिनिअसनी रंगात वाटल्या आणि माणूसपणाच्या गोष्टीतून आपण हद्दपार होऊ लागलो. भारतीय असण्या-नसण्याच्या तकलादू गोष्टींचा कहर मात्र आज वाढत चाललाय. सणांच्या निमित्ताने हे सर्टिफिकेशन सुरूय. अगदी सर्फ एक्सेलच्या जाहिरातीवरून आलेल्या इंटेलेक्चूअल कृत्रिम विचारवंतांनी बुद्धीरंग उधळलाच.
    या सगळ्या जाहिरातींच्या गर्दीत एक जाहीरात आठवते पहा, एक वृद्ध जोडपं, बाहेरून आपल्या घरी परतलंय... पण चावी सापडत नाहीए..या सगळ्या वैतागात बुरखा पहेरावातील आई आणि छोटी चिमुरडी त्यांना क्रॉस करून आपल्या घरच्या दाराशी जातात, दार उघडून ती म्हणते, ’चावी भूल गए आप, आईये, हमारे यहाँ इंतजार कीजिए” वृद्ध जोडप्यातल्या तो (पियुष मिश्रा) तिच्या बोलावण्याला ’नै’ म्हणून असा काही हावभाव करत नकार देतो की बस... (ईट्स द अलगपणा)..
    पण ती मुस्लिम (?) म्हणते, मैं चाय बना रही हूं”.. आत जाते, रेड लेबल ब्रॅन्ड दिसतो. चहाच्या उकळीचा सुगंध त्या दोघांनाही आत येण्यास भाग पाडतो. सगळे चहा घेतात. टॅगलाईन पंच मारते.” कुछ घरों के चाय में अपने पण का स्वाद होता है स्वाद अपनेपण का!!”
    अशा जाहीराती पाहिल्या की खिरी-शिरखुर्म्याचे घरोघरी फिरणारे डबे आठवतात. सणांमध्ये कुठला मित्र काय खाणार याची यादी करूनच अम्मी बोलावयाची सर्वांना. सुक्कं मटण, मसाला, पांढरा रस्सा, बिर्याणी, तांबडा रस्सा, चोरून खाणार्‍यांसाठी अंडाकरी, खिमा चपाती.. आणि खुश्का ... हे गावातलं कल्चर, केवढ फूडकल्चर नव्हत... ते जन्मजात एकोप्याची मूळे घट्ट करत येत होत... पण
गेल्या दशकांपासून हे बदलत चाललंय. रोज, सण उत्सव - ईद सीमित झालं. एकतेच्या पुलावर अस्मितेच्या धर्मांध अडथळ्यांची बॅरियर्स आली. माणूस म्हणून चालणं मुश्किल झालं.
    त्यात मीडियाच्या सहेतूक टीआरपी संदेश देणार्‍या जाहिरातींची क्रीयेटीवीत क्षणभर बरं वाटाव अशी मांडणी करून मुस्लिम दुय्यमत्व अधोरेखित. ही सायलेंट कॉन्सिरसी सलग सुरूय. मूर्ती बनवणारा कारागीर मुस्लिम आहे हे समजून थबकणारा उतीउत्साही ग्राहक त्यासोबतील आर्टीस्ट चाच्याची ’इबादतची व्याख्या’ आणि कटींग चाय ... अफलातून जोडे मारतात हे लोक पण लागतात मुस्लिमांनाच! असो. जाहीरातीतून प्रतिकांच्या उच्छादरोगाची लागण हा स्वतंत्र मोठा अभ्यासाचा विषय आहे. नरसिंह अवतारातून चिरफाड करणारा सनी देओलचा प्रत्येक सिनेमा आणि त्यातील खलनायक सगळे मुस्लिम नावाचेच. याच्यावर तर एक अख्खा ’भारत एक खोज’ सारखा प्रचंड ग्रंथ लिहून होईल... पण सध्यातरी लेखात शब्दबद्ध करताना गोव्यातल्या शिमग्याचा पारंपारिक रंग मोबाईलच्या व्हीडीओ क्लीपमधून दिसतो. सगळ्या भिंतीच गायब झाल्यात. पण गोवा आठवला की मग शुचिर्भूत केलेली अकादमी आठवते.
    माझं हे असंच होत. शब्दांनी सांडत जाताना स्वतःला बांधून नाही घेता येतं. शब्द कसाही येवो त्याला दुःख उजागर करून सुखाच्या कवडशाची झळाळी येणं, मला महत्वाचं वाटतं. जाहिरातींच्या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकताना, भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेण्यासाठी सोशल मीडियावर भरकटलो.
    उच्च शिक्षण का घेतले म्हणून मारहाण झालेला विद्यार्थी, विष्ठेची प्रतिष्ठा मांडणारी अतिनिच मानसिकता या गोष्टी ठळक दिसताहेत पण पुन्हा तेच गुरूग्राम (दिल्ली गुडगांव) येथे धर्मांध गुंडानी होळी सणादिवशीच मुस्लिम कुटुंबाला घुसून मारलं. घरातले स्त्री पुरूष यांना मरेस्तोवर मारून पुन्हा ’पाकिस्तानी जा’ म्हणूनचा अजेंडा गडद केलाय. त्यावर काही कारवाई उशिराच होईल, आजपावेतो झाली असेन दिखाऊपणे.. या घटनेवर मात्र मौनम सर्वार्ध साधनम् म्हणून सगळेच गुपचूप बसले. निवडणुकीच्या काळातला घोडेबाजार सट्टा लिलाव चालला असताना, मरणार्‍या मुस्लिमांकडे लक्ष देणं एवढं महत्त्वाचं नसतं.
    अशा घटनांवरून डायव्हर्ट करून रंग ऊधळणीकडे लक्ष देणे भाग पाडते ही हिप्नॉटीझी भांडवली सनातनी व्यवस्था.  या अशा व्यवस्थेला लाथ मारून, शोषीतांच्या बाजूने लढत लिहीत मारला जाणारा ’पाश’ किंवा हुतात्म्यांची अभिमानी परंपरेत इंडो-पाक आदर्श ठरणारा भगतसिंग यांची लेखक म्हणून स्मृती होतेच आहे.
    ”मेरा रंग दे बसंती चोला’ या ओळीतला रंग... व्यापून राहतो. आणि गुरूग्राम सारख्या घटना दरवाज्यावर दस्तक देताना पाशच्या ओळी सतावताहेत. रंगाच्या खेळातल्या खेळीमिळीत, मिळमिळीत बोलण्याचे टाळून. आपले दुःख आपलेच अश्रू गाळून मोठ्याने ओरडायला लागेल. व्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा. बहिर्‍या आंधळ्या व्यवस्थेला कानठळ्या बसायला हव्यात.
    माझा मुलगा रंगांत भिजून आलाय... सगळे रंग पाण्याने धुवून, आंघोळीतून उतरताहेत. पण मानवतेचा रंग त्याच्या स्मितहास्यातून पाझरतोय. ते हसणं सगळ्यांना मिळो... माझ्या मख्ख चेहर्‍यावरून गुरू ग्रामच्या घरात खेळलेली विद्वेषी पंचमी मात्र अजून गडद. शेवटी गुरू-विद्यार्थ्यांच्या ’चहाजाहिरातीचा एक तुकडा उरतोय लेखनीतून’
    आपल्या यशस्वी इंजिनिअर विद्यार्थ्यांच्या हातचा चहा पिऊन झाल्यावर रिटायर्ट गुरूजी हसत म्हणतात... आजही चान्स आहे...इंजिनिअरपेक्षा, कॉलेजबाहेर चाय कॅन्टीन सुरू कर.. हसत-हसत जाहीरात संपते.
    ’चायवाला मोठा ठरतो... चाय-चौकीदार-चोर या बद्दल चकार न बोलता मी चुपचुप चूचकारतो. माझा चहा आलाय, कंटीग स्पेशल.
    जो तौर है दुनिया का उसी तौर से बोलो
    बहरों का इलाका है जरा जोर से बोलो.
    चलो चाय पिलो....

- साहिल शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget