Halloween Costume ideas 2015

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांची निवड नुकतीच झाली. त्यांचा जन्म 1973 चा असून, ते इले्नट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर  आहेत. त्यांची स्वतःची एक संगणक कंपनी आहे. त्यांना इस्लामची अत्यंत चांगली समज असून, आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके आणि 200 पेक्षा जास्त लेख उर्दू आणि इंग्लिशमध्ये  लिहिलेले आहेत.
या पदावर निवड होण्यापूर्वी ते जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी ते स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते बोर्ड ऑफ ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन  दिल्लीचे सदस्य असून, सेंटर फॉर स्टडी अँड रिसर्च दिल्लीचे संचालक आहेत. इदारतुल तहेकीक व तसनीफ-ए-इस्लामी अलिगढचे ते आजीवन सदस्य असून, इस्लामिक अ‍ॅकॅडमिक ट्रस्ट  दिल्लीचे विश्वस्त आहेत. शिवाय, बोर्ड ऑफ इस्लामिक पब्लिकेशन दिल्लीचे सदस्यही आहेत. शिवाय, एडिटोरियल बोर्ड ऑफ तसनीफी अ‍ॅकॅडमी, एमएमआय पब्लिशर्स दिल्लीचे सदस्य  असून, अ‍ॅडव्हायझरी बोर्ड जमियतुल फलाह आजमगढचे माजी सदस्य राहिलेले आहेत. ते आपल्या लेखन शैली आणि विचारपूर्ण भाषणांसाठी इस्लामी जगतामध्ये परिचित आहेत. त्यांची  ही निवड 4 वर्षासाठी म्हणजे 2023 पर्यंत झालेली आहे. अगदी साधी राहणीमान आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.  भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून  निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी अमीर (अध्यक्ष) निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

जमाअते इस्लामीच्या अध्यक्षांची निवड कशी होते?

जमाअते इस्लामी हिंदची स्थापना ऑगस्ट 1941 मध्ये अखंड भारत असताना लाहौर येथे झाली. देशाच्या फाळनीनंतर 1948 साली जमाअते इस्लामी हिंद नावाची स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली जिचा जमाअत-ए-इस्लामी पाकिस्तानशी कुठलाच संबंध नाही. जमाअतए- इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष अबुलैस इस्लाही नदवी हे होते. आतापावेतो या संघटनेचे पाच  अध्यक्ष झालेले असून, मागच्या आठवड्यात मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या ठिकाणी तरूण अभियंते व जमाअतचे उपाध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड कशी होते? याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लोकांना वाटते की, इतर संघटनांच्या निवडीप्रमाणेच या संघटनेध्येही काही लोक अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल   करत असतील, उमेदवार जोरदार प्रचार करत असतील आणि शेवटी त्यावर मतदान होऊन अध्यक्षाची निवड होत असावी. मात्र असा काही प्रकार येथे होत नाही. जमाअत-ए-इस्लामी  हिंद हिची व्यवस्था शुराई निजाम म्हणजे एकमेकांच्या सल्लामसलतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबवून आहे. जी की पूर्णपणे देशाच्या घटनेच्या आधीन काम असून नोंदणीकृत  संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामीचे जवळ-जवळ 12 हजार पेक्षा अधिक सदस्य भारताच्या 20 मोठ्या राज्यात आहेत. 31 मार्च 2019 रोजी मागच्या अध्यक्षांची 4 वर्षांचा कार्यकाळ  संपला होता. पुढील अध्यक्षांच्या निवडीसाठी देशभरातून मजलिस-ए-नुमाईंदगान (प्रतिनिधी सभा)चे 157 सदस्य दिल्लीत जामिया नगरमधील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य  कार्यालयात 1 एप्रिलपासूनच जमा झाले होते. त्यांची निवड याआधीच झालेली होती. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची निवडसुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. यांची निवड दोन टप्प्यामध्ये  झाली.
पहिल्या टप्प्यामध्ये जमाअते इस्लामीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या पसंतीच्या राज्याबाहेरील सदस्याचे नाव सुचवायचे असते व दूसऱ्या टप्प्यात स्वतःच्या राज्यातील पसंतीचे नाव  सुचवायचे असते. यात स्वतःचे नाव सुचविता येत नाही. जमाअते इस्लामी हिंदचे वैशिष्ट्ये असे की, या संघटनेमध्ये कोणत्याही पदासाठी कोणालाही स्वतःचे नाव सुचविता येत नाही किंवा त्यासाठी लॉबिंग करता येत नाही. तसे काही आढळून आल्यास तात्काळ त्या सदस्याची संघटनेतून हकालपट्टी केली जाते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेचे सर्व सदस्य दिल्ली येथे जमा झाले. प्रतिनिधी सभा ही जमाअते इस्लामी हिंदची सर्वात मोठी आणि प्रभावशाली सभा असते. या  सभेच्या सदस्यांना अमीरे जमाअतच्या निवडीचे व त्यांना काढून टाकण्याचे सुद्धा अधिकार असतात. शिवाय, चार वर्षाच्या काळामध्ये जमाअतची ध्येय धोरण ठरविणे तसेच कामाचे नियोजन करणे हे अधिकार याच प्रतिनिधी सभेला असतात. यावर्षी 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 157 सदस्यांनी आपसात विचारविमर्श  करून अनेक नावांपैकी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. येथेही सआदतुल्लाह हुसैनी यांनी स्वतःला अध्यक्ष करावे म्हणून नामांकन  दाखल केले नव्हते किंवा लॉबिंगही केलेली नव्हती. उलट ही जबाबदारी मला नको, असे ते म्हणत होते. उपस्थित 157 सदस्यांपैकी काही सदस्यांनी काही लोकांची नावे या पदासाठी  सुचविली होती. त्यावर ज्यांची नावे या पदासाठी सुचविली गेली होती. त्यांना बैठकीत सामील न करता त्या सर्व नावावर प्रतिनिधी सभेमध्ये सखोल चर्चा झाली. जमाअतच्या  संविधानाप्रमाणे अध्यक्षामध्ये जी गुणवत्ता हवी ती सुचविल्या गेल्या लोकांपैकी कोणामध्ये जास्त आहे. त्यांची बलस्थाने कोणती आहेत इत्यादीवर सखोल चर्चा झाली व त्यानंतर  सआदतुल्ला हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड मजलिसे नुमाईंदगान ने एकमताने 7 एप्रिल रोजी केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्षपद तर सोडा साध्या सदस्यात्वासाठीही जर कोणाची निवड करायची असेल तरी त्याचे चारित्र्य तपासले जाते, त्याचे व्यवहार तपासले जातात व  जमाअतच्या संविधानाच्या कलम 8 आणि 9 प्रमाणे त्याचा दर्जा आहे काय, हे पाहिले जाते. जमाअतचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि काटेकोरपणे केले जातात.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget