Halloween Costume ideas 2015

भारतीय राजकारणात क्रांतीची गरज

भेजा गया था जिनको कयादत के वास्ते
गोशा नशीन होके वो दुनिया से कट गए
बातिल है कामियाब मिटाने के वास्ते
हम इत्तेहाद तोडके फिरकों में बंट गए


42 मध्ये ’भारत छोडो’ आंदोलनानंतर ब्रिटिशांची भारतावरील प्रशासकीय पकड कमी होत गेली. तेव्हा ब्रिटनमध्ये भारताला स्वातंत्र्य देऊन टाकावे, असा एक विचार प्रबळ झाला. त्याचा  विरोध करत तत्कालीन ब्रिटिश प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्वातंत्र्याच्या पाच महिन्याअगोदर ब्रिटिश संसदेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याच्या मागणीवर भाष्य करताना खालील  टिप्पणी केली होती. ’सत्ता दुष्टांच्या, बदमाशांच्या आणि लुटारूंच्या हातात जाईल. भारताचे सगळे नेते निम्न क्षमता असणारे भुसकटासारखे लोक असतील. त्यांची जीभ गोड असेल  परंतु, मन कामचुकार असेल. ते सत्तेसाठी एकमेकांशी भांडतील आणि याच राजकीय भांडणामध्ये भारताचा खात्मा होऊन जाईल. एक दिवस असा येईल जेव्हा भारतात हवा आणि  पाण्यावर सुद्धा कर लावला जाईल.’
विन्स्टन चर्चिलच्या या भाकीताला दोन वेळा काळजीपूर्वक वाचल्यास प्रत्येक प्रामाणिक वाचकाच्या मनात हा विचार नक्कीच येईल की, यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत.  चालू लोकसभेच्या निवडणुकींच्या प्रचाराची पातळी पाहता चर्चिलचे भाकीत आपण खरे ठरविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहोत की काय? अशी शंका येते. प्रचाराची अनेक वळणे  घेत शेवटी मतदान जाती-धर्माच्या आधारावर होतो, पैसा, दारू आणि खर्जुल्या कोंबड्या घेऊन लोक मतदान करतात. दिवसेंदिवस निवडणुकांची व्याप्ती आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.  नेते एकमेकांशी भांडत आहेत. शस्त्रास्त्रांचा साठा जप्त होत आहे. एकूणच लोकशाहीचा सांगाडा राहिलेला असून, त्यातील आत्मा हरवलेला आहे.
याचे एकमात्र कारण अनैतिक प्रवृत्तींच्या लोकांच्या हाती राजकारणाची सुत्रे गेलेली आहेत. प्रत्येक पक्षात अनैतिक प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. युपीएच्या काळात भ्रष्टाचार रोखण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग सारख्या नीतिमान नेत्याला आलेल्या अपयशाचे उदाहरण या संदर्भात पुरेसे बोलके आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रत्येक स्तरावर  राजकारणाची सुत्रे अनीतिमान लोकांच्या हाती एकवटली आहेत. म्हणून देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुठभर लोक श्रीमंत होत आहेत. बाकी जनता गरीब होत आहे. खेडी उदास होत आहेत. शहरं भकास होत आहेत. पर्यावरणाची पातळी खालावलेली  आहे. मूलभूत सुविधा कोलमडलेल्या आहेत. जी काही प्रगती झालेली दिसते ती असंतुलित आहे.
गेल्या 70 वर्षात देशाच्या जनतेने अनेक पक्षांना आलटून पालटून सत्तेची सुत्रे देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र प्रत्येक वेळेस जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पार्टी विथ डिफ्रन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपाला 2014 मध्ये भरघोस मतदान करून एक संधी देऊन पाहिली आहे. मात्र भाजपलाही जनतेचे जीवन सुसह्य करता आले नाही उलट त्यांच्या काळात जगणे अधिक कठिण झाले. बेरोजगारीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली. सार्वजनिक संस्थांची अपरिमित हानी झाली. म्हणून सध्याच्या निवडणुकांमध्ये 2014 सारखा उत्साह दिसून  येत नाही, ही लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक स्थिती म्हणावी लागेल. सामान्य माणसाचा विश्वास लोकशाही व्यवस्थेवर टिकून राहणे गरजेचे आहे. मात्र गेल्या 70  वर्षाच्या अनुभवावरून जनतेमध्ये हताशा निर्माण होऊ पाहत आहे.

म्हणून क्रांतीची गरज...
या परिस्थितीला पूर्णपणे बदलून एक नवीन पर्यायी राजकारणाची पायाभरणी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाची शासनव्यवस्था कल्याणकारी होणार नाही. चालू लोकसभा निवडणुकीमध्ये  राजकारण्यांची जिंकण्यासाठीची फरपट पाहता त्यांच्या कोणाच्या हातून हे पुण्य काम होईल, असे वाटत नाही. म्हणून देशाच्या राष्ट्रीय राजकारणाला नीतिमान बनविण्याचे आव्हान  स्वतःला ’उम्मते वस्त’ म्हणविणाऱ्या मुस्लिमांनी स्विकारायला हवे. आजपर्यंत दोन प्रकारचे राजकारण मुस्लिमांनी केले आहे. एक-गल्लीबोळातील थिल्लर राजकारण तर दूसरे काँग्रेस  आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये प्रवेश करून त्यांच्या बरोबर व त्यांच्यासारखेच केलेले राजकारण. या दोन्ही प्रकारच्या राजकारणामध्ये असलेले मुस्लिम
कार्यकर्ते व नेते आणि मुस्लिम्मेत्तर कार्यकर्ते व नेते यांच्यात नावं सोडली तर कुठलाच फरक अनुभवायला आलेला नाही. (अपवाद खेरीज करून तो ही असेल तरच). दोघेही सारखेच  अनीतिमान.
या दोहोंशिवाय, मुस्लिम धार्मिक संस्था आणि संघटनांचा एक मोठा गट गेल्या 70 वर्षापासून राजकारणापासून अलिप्त राहिलेला आहे. या गटामध्ये मोठ्या प्रमाणात नीतिमान उलेमा व इतर बुद्धिमंतांचा भरणा आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे हा गट कुठल्यातरी एका राजकीय पक्षाला, बहुतकरून काँग्रेसला पाठींबा देतो व आपल्या कोषात परत जावून शांतपणे  बसतो. या गटाच्या निष्क्रीयतेचा फटका केवळ मुस्लिम समाजालाच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाला सुद्धा बसलेला आहे. आता वेळ आली आहे की, त्यांनी पुढे यावे, स्वतःचा पक्ष  काढावा किंवा योग्य वाटेल त्या पक्षात जावे आणि अगदी पंचायत स्तरापासून लोकसभेपर्यंत नीतिमान राजकारण कसे करतात हे देशाला दाखवून द्यावे.
हे काम अत्यंत कठीण आहे. मात्र अशक्य नाही. अशा नितीमान राजकारणाचे मॉडेल प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सातव्या शतकात मदिनामध्ये तयार करून ठेवलेले आहे. व चार पवित्र  खलीफांनी ते मॉडेल यशस्वीपणे राबवून कल्याणकारी शासन कसे असते याचे उदाहरण जगासमोर ठेवलेले आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हिजरत नंतरच्या 23 वर्षाच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यातील गजवात (युद्ध) वगळून बाकी राजकारण जसेच्या तसे करावे. विरोधकाला विरोध समजावे शत्रू नाही. बोलावे तर खरे बोलावे, वागावे तर खरे वागावे,  जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी. नगरसेवक असो का आमदार किंवा खासदार शासनाकडून मिळालेल्या एकेका पैशाचा सदुपयोग जनतेसाठी करावा. कोणाला आमिष दाखवू  नये. कोणाच्या आमिषाला बळी पडू नये, कोणाची चहाडी करू नये, सर्वांची टिका सहन करावी, विरोध सहन करावा, प्रसंगी मारहाण होईल तीही सहन करावी, मात्र नीतिमान  राजकारणाची बांधिलकी जपावी.
एवढे होऊनही मुस्लिमांच्या विषयी असलेल्या बाय डिफॉल्ट तिरस्कारामुळे मुस्लिमेत्तर बहुसंख्यांक बंधू मुस्लिम राजकारणाला सुरूवातीला स्विकारणार नाहीत. मात्र मुस्लिम राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पक्षपात हा एका मर्यादेपर्यंतच काम करत असतो. त्या पुढे गेले की, तो काम करत नाही. माणूस प्रामाणिक आहे याची खात्री पटली की  अलिकडे ज्या प्रमाणे बॅरिस्टर ओवेसींची स्विकार्हता बहुसंख्य बांधवांमध्ये हळूहळू वाढत आहे. तशीच स्विकार्हता इतर नितीमान मुस्लिम नेत्यांची वाढेल, यात शंका नाही. आज देशातील  जनता अनीतिमान राजकारण्यांना कंटाळलेली आहे. केवळ पर्याय नसल्यामुळे ती त्यांना सहन करत आहे. त्यांची शेवटची आशा भाजपवर होती. ती ही आता मावळलेली आहे. पर्यायी  नीतिमान राजकारणी उपलब्ध असल्यास मग ते कोणत्या जाती, धर्माचे आहेत हे न पाहता त्यांना स्वीकारल्याशिवाय जनतेसमोर पर्याय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक  आहे. देशाच्या राजकारणावरून लोकांचा विश्वास उडून जाण्याआधी नीतिमान मुस्लिमांनी पुढे यावे.
किंबहुना नीतिमान राजकारण करण्याची अघोषित जबाबदारी नियतीने त्यांच्यावर टाकलेली आहे. त्यांनी हे आव्हान स्विकारावे व स्वतः नीतिमान राजकारणाचा पर्याय देशाला देऊ  शकतो, हे सिद्ध करून दाखवावे. सुरूवातीला मुस्लिम असल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाईल, माध्यमे दखलही घेणार नाहीत. मात्र हा पक्षपाती विरोध लवकरच गळून पडेल.  कारण माणसं माणुसकीची भुकेली असतात. भारतीय राजकारणातून माणुसकी केव्हाच लोप पावलेली आहे. नीतिमान राजकारण करून तिची पुनर्स्थापना करावी लागेल.
लक्षात ठेवा वैयक्तिकरित्या नीतिमान लोक कोट्यावधींच्या संख्येने असतील तरी समाजाला त्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र हेच लोक जर का संघटित झाले व  त्यांनी संभाव्य  विरोध सहन करून जर का एकदा नीतिमान राजकारणाद्वारे मिळेल त्या स्तरावर प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली तर पक्षपात आणि विरोध दोन्ही गळून पडतील. ज्याप्रमाणे बहुसंख्य हिंदू बंधू नीतिमान मुस्लिम व्यापाऱ्यांकडून सामान घेतात. नीतिमान मुस्लिम डॉक्टरकडून औषधोपचार घेतात. नीतिमान मुस्लिम टॅक्सी ड्रायव्हरच्या टॅक्सीचा उपयोग करतात. नीतिमान मुस्लिमाच्या हॉटेलमध्ये आनंदाने जेवण करतात. तसेच एक दिवस असा येईल की ते नीतिमान मुस्लिम राजकारण्यावरही विश्वास ठेवतील. मात्र त्या आधी मुस्लिम  नेतृत्वाला प्रामाणिकपणाच्या टाकीचे घाव सोसावे लागतील. बिन पैशाने जनतेची कामे करावी लागतील. स्वतः नीतिमान असल्याचा पावलो पावली जनतेला प्रत्यय येईल, असे वागावे  लागेल. जेव्हा त्यांच्या नीतिमान राजकारणाचा अनुभव जनतेला वारंवार येतील तेव्हा इस्लाम खरा असल्याचा माझा जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास हे नीतिमान मुस्लिम  राजकारणाला येथील जनता स्वीकारेल, यावरही आहे.
यासंदर्भात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे संस्थापक अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ इस्लाम की आख़री दावत अरब से उठी, अरबों ही को इस का अलम (ध्वज) बुलंद करने का शर्फ  (सौभाग्य) हासील है. मगर इसमें कभी हुकुमत व फ़रवारवाई को अरब के साथ मख़सूस नहीं किया. जब तक अरब सालेह (पात्र) रहे उन्होंने आधी दुनिया पर हुकुमत की. जब उनमें  सलाहीयत (योग्यता) बाक़ी ना रही तो जिन अजमी क़ौमों ( अरबेत्तर लोक समूह) को अरबों ने फ़ताह किया था, वो इस्लामी हुकुमत की मसनदनशीं (सत्ताधारी) बन गये और उन्होंने  ख़ुद अरब पर हुकुमत की. तुर्क इस्लाम के शदीद दुश्मन थे, मगर जब वो इस्लाम के दायरे में दाख़ील हो गये तो दुनिया-ए-इस्लाम के आधे से ज़्यादा हिस्से में उन्हें अपना हूक्मरां  तस्लीम किया और चाटगाम से लेकर ख़रताजना तक उनकी फ़रमारवाई के फरेरे (बैरखें) उडते रहे. हम तस्लीम करते हैं के आज मुसलमान क़ौमों में क़ौमीयत और नसल का  इम्तीयाज़ अच्छा ख़ासा पाया जाता है. मगर उसको इस्लाम से कोई वास्ता नहीं. इस्लामने अपने किसी तालीम में और अपने किसी हूक्म में इस इम्तीयाज़ (फर्क) को ज़र्रा बराबर भी  जगाह नहीं दी है. (संदर्भ : अल जिहाद फिल इस्लाम. पे.नं 130).
एकदा का नीतिमान राजकारणाची मुहूर्तमेढ मुस्लिमांद्वारे रोवली गेली की नाईलाजाने का होईना बाकी राजकारण्यांना सुद्धा नीतिमान राजकारण करणे भाग पडेल व देशामध्ये नितीमान राजकारण करणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढेल व इन-शा- अल्लाह नितीमान शासन देण्यासाठी राजकीय पक्षामध्ये चूरस सुरू होईल व खऱ्या अर्थाने देशात खरी लोकशाही  अस्तित्वात येईल, हे एका वेड्या लेखकाचे स्वप्न आहे, असे समजणाऱ्यांना मी सुचवू इच्छितो की सुरूवातीला कोणतेही काम अशक्यच वाटते. नदी आपल्या उगमाच्या ठिकाणी  छोट्याश्या झऱ्याएवढीच असते. मात्र जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा तिचे पात्र नजरेत मावणार नाही, एवढे विशाला होऊन गेलेले असते.

ऍक्शन प्लान
मुस्लिमांना केवळ निवडणुकीचे राजकारण करून नीतिमान राजकारणाचा डोलारा उभा करता येणार नाही. त्यापूर्वी त्यांना दोन कामे करावी लागतील. एक - आपण ज्या क्षेत्रात आहेत  त्या क्षेत्रात उच्च नितीमुल्यांचा अनुभव जनतेला करून द्यावा लागेल. दुसरे खिदमते खल्क म्हणजेच जनकल्याणाची शक्य तेवढी कामे मोठ्याप्रमाणात करावी लागतील. आज सुरूवात केली की पुढच्या निवडणुकीत लगेच फळ मिळणार नाही. यथाशक्ती निरंतरम या योग तत्वाप्रमाणे सातत्याने हे काम केले तर पुढील पाच-पंचेवीस वर्षात जनतेच्या मनामध्ये नीतिमान  राजकारण आणि नितीमान राज्यकर्त्यांविषयी नक्कीच विश्वासाची भावना निर्माण होईल. कारण की, ’सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नही’. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना  करतो की, नीतिमान राजकारणाचे महत्व ओळखून ती करण्याची समज आणि शक्ती तो आपल्या सर्वांना देवो आमीन.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget