Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(७६) ज्या लोकांनी ईमानचा मार्ग अवलंबिला आहे ते अल्लाहच्या मार्गात लढतात आणि ज्यांनी द्रोहाचा (कुफ्र) मार्ग अवलंबिला आहे ते तागूतच्या (विद्रोही लोकांच्या) मार्गात  लढतात,१०५ तर शैतानाच्या साथीदारांशी लढा आणि खात्री बाळगा की शैतानाची कारस्थाने खरे पाहता अत्याधिक दुर्बल आहेत.१०६
(७७) तुम्ही त्या  लोकांनादेखील पाहिले आहे का ज्यांना सांगण्यात आले होते की आपले हात रोखून ठेवा, आणि नमाज कायम करा व जकात अदा करा? आता जेव्हा त्यांना लढाईचा  आदेश दिला गेला तर त्यांच्यापैकी एका गटाची अवस्था अशी आहे की लोकांना असे भीत आहेत जसे अल्लाहला भ्यायले पाहिजे अथवा याहूनही काही अधिक, म्हणतात,१०७ हे अल्लाह!  हा आम्हावर लढाईचा आदेश का लादलास? आम्हाला आणखी सवलत का दिली नाहीस? यांना सांगा, ऐहिक जीवनाचे भांडवल फार थोडे आहे आणि परलोक ईशपरायण माणसाकरिता  अधिक उत्तम आहे आणि तुम्हावर जुलूम तिळमात्रदेखील केला जाणार नाही.१०८
(७८) उरला मृत्यू, तर जेथे कोठे तुम्ही असाल तो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला येणारच, मग तुम्ही कितीही मजबूत इमारतीत असा. जर त्यांना एखादा लाभ पोहचतो तर म्हणतात  की हा अल्लाहकडून आहे आणि जर एखादे नुकसान झाले तर म्हणतात की हे नबी (स.), हे तुमच्यामुळे आहे,१०९ सांगा की सर्वकाही अल्लाहकडूनच आहे. या लोकांना झाले तरी काय की कोणतीच गोष्ट यांच्या लक्षात येत नाही.
(७९) हे माणसा, तुला जी कोणती भलाई प्राप्त होते अल्लाहच्या कृपेने होते आणि जी संकटे तुझ्यावर ओढवतात ती तुझ्या स्वत:च्याच कृत्यामुळे होय. हे मुहम्मद (स.)! आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगंबर बनवून पाठविले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे.
(८०) ज्याने पैगंबराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो पराङ्मुख झाला तर आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठविले नाही.११०




१०५) हा अल्लाहच्या स्पष्ट निर्णय आहे. अल्लाहच्या मार्गात या ध्येयासाठी लढणे की जमिनीवर अल्लाहचा अवतरित जीवन धर्म प्रस्थापित व्हावा; हे ईमानधारकांचे काम आहे. जो  खरोखरीच ईमानधारक आहे तो या कामापासून कधीच दूर राहणार नाही. ईशद्रोही लोकांचे (तागुत) हे काम आहे की पृथ्वीवर त्यांचे राज्य यावे; यासाठी ते कार्यरत राहतात. कोणी  ईमानधारक मनुष्य हे काम कधीही करू शकत नाही.
१०६) म्हणजे शैतान आणि त्याचे साथीदार मोठी तयारी करतात आणि मोठमोठे डाव खेळतात. परंतु ईमानधारक त्यांची तयारी पाहून भयभीत होत नाहीत आणि त्यांच्या कुटील डावांनी घाबरत नाहीत. कारण या ईशद्रोही लोकांचा शेवटी विनाश ठरलेला आहे.
१०७) या आयतचे तीन भावार्थ आहेत आणि तिन्ही अर्थ योग्य आहेत.
(१) प्रारंभी हे लोक स्वत: युद्धासाठी आतुर होते. नेहमी तक्रार करीत की आमच्यावर अत्याचार होत आहे. आम्ही सतावले जात आहोत, मारले जात आहोत, शिवीगाळ केली जाते.  आम्ही कोठवर धैर्याने घ्यावे व संयम राखावा, आता तरी युद्ध करण्याची परवानगी द्यावी. त्या वेळी त्यांना संयमाने काम करण्यास सांगितले जाई. तसेच नमाज व जकातद्वारा  आत्मोन्नती करावी. तर हा धैर्य आणि सहनशीलतेचा आदेश त्यांच्यावर ओझे बनत होता. परंतु आता तर युद्ध करण्याचा आदेश दिला आहे आणि त्यांच्याचपैकी काही लोक शत्रूपक्षाची जास्त गर्दी आणि जीव धोक्यात टाकण्याने भयभीत होत आहेत.
(२) जोपर्यंत मागणी नमाज, जकात आणि अशाच विनाजोखीमाच्या कामांची होती तोपर्यंत जीव धोक्यात टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. अशा वेळी हे लोक पक्के धार्मिक (दीनदार)  होते. परंतु आता सत्यासाठी जीव धोक्यात टाकण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा मात्र यांना थरकाप सुटला आहे.
(३) तिसरा भावार्थ आहे, पूर्वी तर लुटालूटसारख्या इतर स्वार्थापायी त्यांची तलवार नेहमी म्यानाबाहेर यायची आणि रात्रंदिवस युद्धात सामील होते. त्या वेळी त्यांना खूनखराबा न करता  नमाज व जकातने आत्मोन्नती करण्यास सांगितले होते. आता जो अल्लाहसाठीच फक्त तलवार हातात घेण्याचा आदेश दिला तर ते लोक जे स्वार्थासाठी युद्धवीर होते; अल्लाहसाठी युद्ध  करण्यात मागेमागे पडले. तलवारवाला तो हात जो मन आणि शैतानाच्या मार्गात मोठी चपळाई दाखवित होता तो हात अल्लाहच्या मार्गात मात्र थंड पडला. हे तिन्ही अर्थ वेगवेगळया  प्रकारच्या लोकांना लागू होतात आणि तिन्ही अर्थ इतके अर्थगर्भित आहेत की तिन्ही अर्थ समान रूपात वापरली जाऊ शकतात.
१०८) म्हणजे तुम्ही अल्लाहच्या धर्माची सेवा कराल आणि अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण कराल तर अल्लाहच्या येथे तुमच्यासाठी महान मोबदला आहे.
१०९) अर्थात विजय आणि सफलता जेव्हा मिळते तेव्हा त्याला अल्लाहची कृपा ठरवितात. परंतु विसरून जातात की हा अनुग्रह (कृपा) अल्लाहने त्यांच्यावर पैगंबरद्वाराच केलेला आहे. परंतु आता आपल्या उणिवांमुळे कधी पराजय झाला तर पूर्ण आरोप पैगंबराच्या माथी मारतात आणि स्वत:मात्र नामानिराळे राहतात.
११०) म्हणजे आपल्या कर्मांचे स्वत:जबाबदार आहेत. त्यांच्या कर्मांची विचारपूस तुमच्याशी होणार नाही. तुमच्यावर ज्या कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे ती फक्त हीच आहे  की अल्लाहचा आदेश आणि मार्गदर्शन त्यांच्या पर्यंत पोहचवावा. हे काम तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडले आहे. आता हे तुमचे काम नाही की हात धरून त्यांना बळजबरीने  सरळमार्गावर चालवावे. त्यानी त्या आदेशांचे पालन केले नाही जे तुमच्यामार्फत दिले जात आहे, तर याची कोणतीच जबाबदारी तुमच्यावर नाही. तुम्हाला हे विचारले जाणार नाही की हे लोक नाकांरीत करीत होते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget