Halloween Costume ideas 2015

माणसांचे प्रकार

हमारा काम ही दुश्मन से प्यार करना है
जमाने भर को दिया दर्स-ए-दोस्ती हमने

श्रद्धा आणि वर्तनाच्या आधारे जर का माणसांचे वर्गीकरण केले तर साधारणपणे तीन प्रकारची माणसं असतात. एकप्रकार अशा माणसांचा असतो की ज्यांना कुठलीच बंधने मान्य  नसतात. व्यक्ति स्वातंत्र्य हीच त्यांची विचारसरणी असते. प्रत्येक बाबतीत त्यांची स्वतःची अशी मतं असतात. असे लोक प्रचंड बुद्धी प्रामाण्यवादी असतात. कोणताही निर्णय ते  आपल्या बुद्धी प्रमाणे घेतात. त्यांना स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड विश्वास असतो. अशा लोकांना कुठल्याही धर्माची बंधने आवडत नाहीत. स्वतःला एथिस्ट (नास्तीक) म्हणवून घेतांना त्यांना कोण कौतूक वाटतं.
दुसऱ्या प्रकारची माणसे एखाद्या धर्माला जरूर माणतात. परंतु धर्माचरणामध्ये स्वतःच्या बुद्धीलाच प्रमाण माणतात. जी धार्मिक बंधने त्यांच्या बुद्धीला पटतात त्या बंधनाची ते  अंमलबजावणी करतात जी पटत नाहीत त्यांचा ते विरोध करतात. त्यांची स्वतःची अशी जीवनशैली असते. त्यानुसार ते जगत असतात. त्यांच्यात काही प्रमाणात धार्मिकता तर काही प्रमाणात धर्म विरोध दोन्ही असतात. एकंदरित ते धर्माप्रमाणे चालत नाहीत तर धर्माला आपल्या प्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करत असतात.
तीसऱ्या प्रकारचे लोक स्वतःच्या बुद्धीचा अजीबात वापर करत नाहीत तर वाडवडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांना दुसऱ्यांचे अंधानुकरण करतांना काहीच वाईट  वाटत नाही उलट अभिमान वाटतो.
पहिल्या प्रकारची माणसे स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही योग्य नियंत्रण सुद्धा नाकारतात. स्वैराचाराला सुद्धा स्वातंत्र्य समजण्याइतपत काहींनी प्रगती (?) साधलेली असते. त्यांना ही  गोष्टच मान्य नसते की विचार आणि वर्तनाच्या स्वातंत्र्यावर थोडी तरी बंधने असावित. मग अशा प्रकारची माणसं जेव्हा सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा अनियंत्रित होऊन  समाजाला हानी पोहचविण्यास सुरूवात करतात.
जी माणसं प्रत्येक बाबतीत स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, आपल्या विचारांनाच सर्वश्रेष्ठ समजतात व त्यानुसारच आचरण करतात. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीप्रमाणेच सोडविण्याचा आग्रह धरतात. दूसऱ्यांच्या विचारांना काडीची किमत देत नाहीत. अशा माणसांचा असा समज असतो की त्यांना जगातल्या साऱ्या गोष्टी कळतात. त्यांच्या बुद्धीच्या वर  कुठलीच गोष्ट नाहिये. त्यांना प्रत्येक गोष्टींचा बारिक सारिक तपशील, आरंभ आणि अंत सर्व काही माहित आहेत. अशा अविर्भावात ते जगत असतात. आपण कुठल्याही परिस्थितीचे  विश्लेषण करून त्याचे अचूक निदान करू शकतो, यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. आपण धर्मचिकित्सा करू शकतो, त्यातील क्लिष्ट गोष्टी सुद्धा आपणास समजतात. प्रत्येक  मार्गाचा शेवट आपल्याला तसाच माहित आहे जसा त्याचा आरंभ. अशा पद्धतीने जगणाऱ्या माणसांचे विचार जेव्हा त्यांच्या स्वतःच्या धर्मातील कांही संज्ञाशी जुळत नाहीत, तेव्हा असे  लोक त्या संज्ञाच बदलून त्या आपल्या विचारानुरूप करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. कुरआनमध्ये बनी इसराईल नावाच्या ज्या लोकसमुहाचा उल्लेख केलेला आहे ते लोक असे  करण्यात तरबेज होते. कुरआन अशा लोकांना मुनाफिक (पाखंडी) असे म्हणतो. धर्माविरूद्ध बंड करण्याइतपत धाडस त्यांच्यात नसते म्हणून ते धर्मात राहून त्याच्या विरूद्ध आचरण करत असतात.
तिसऱ्या वर्गातील लोक तर बौद्धिकरित्या दिवाळखोर असतात. आपल्या घराण्या किंवा समुदायाच्या चालीरितींची डोळे झाकून अंमलबजावणी करीत असतात. त्यातील उघड हानी सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. पहिल्या दोन वर्गातील लोक किमान बुद्धीचा बरा-वाईट कसा का असेना वापर तरी करत असतात. पण या तिसऱ्या वर्गातील माणसे तर चक्क बुद्धी गहाण  ठेवल्यागत वागत असतात. त्यांच्या एवढे सुद्धा लक्षात येत नाही की भुतकाळातील सर्वच रूढी ह्या योग्य नसतात. आजच्या काळात मोठ्या संख्येने जी माणंसे ज्या प्रमाणे वागत  आहेत ते सुद्धा सगळे योग्यच आहेत, असेही नाही. हंसक्षीर न्यायाने त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टींचा त्याग करावा हे सुद्धा त्यांच्या गावी नसते. यांची सर्वात मोठी चुकी  ही की हे लोक अकलेचा वापरच करत नाहीत.
म्हणजे गंमत पहा, पहिल्या दोन वर्गातील लोक बुद्धीचा क्षमतेपेक्षा अधिक वापर करतात तर तिसऱ्या गटातील लोक तिचा वापरच करत नाहीत. केवळ परंपरांचे अनुकरण करत  असतात. बुद्धीच्या दिवाळखोरीचे यापेक्षा मोठे उदाहरण ते कोणते? असे लोक म्हणत असतात की, आम्ही असे यासाठी वागतो की ही आमची वाडवडीलांपासून चालत आलेली परंपरा  आहे. किंवा असे म्हणतात की अमुक लोकांनी असे वागून प्रगती सधलेली आहे म्हणून आम्ही सुद्धा असेच वागतो. या काळात हे लोक सत्तेवर आहेत म्हणूनच ते योग्य आहेत. म्हणून  आम्ही सुद्धा त्यांच्या सारखेच वागतो. असे समजणे सुद्धा बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होय. त्यांच्याकडे स्वतःचे असे कोणतेच एकक नाही की जे चांगले-वाईट, खरे-खोटे यात फरक करू  शकेल. ते समाजा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कुठल्यातरी घराण्यात जन्मले असते तर त्यावरच ते आपला जीव ओवाळून टाकणार. योगयोगाने त्यांच्या काळात ब्रिटीश सत्तेवर  असतील तर ते ब्रिटिशांप्रमाणे वागणार, चिनी सत्तेवर असतील तर चिन्यांसारखे वागणार व त्यांच्या चालीरितीने श्रेष्ठ समजणार किंवा एखादा आफ्रीकण गट सत्तेवर असेल तर हे  आफ्रिकन चालीरितींना स्वतःच्या साठी श्रेष्ठ समजणार कारण यांचे स्वतःचे असे काही मतच नाही. मुळात कुठल्याही गोष्टीला श्रेष्ठ समजण्यासाठी हा युक्तीवाद होऊच शकत नाही के  ती आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा जगात आजकाल असेच होत आहे. जगात तर यापूर्वी ही फार काही झालेले आहे, आजही होत आहे, म्हणून ते सगळेच  चांगले आहे? असे नाही. आपले काम त्यांचे अंधानुकरण करणे नाही. अल्लाहने बुद्धी यासाठी दिलेली आहे की चांगले आणि वाईट त्यातील फरक माणसाने करावा. हे काम बुद्धी अगदी  चांगल्या प्रकारे करू शकते. कुणामागे जाण्यापूर्वी त्याला चांगल्या प्रकारे पारखून घेणे की तो आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? हे कामही बुद्धि चांगल्या प्रकारे करू शकते.

इस्लामच्या दृष्टीने श्रेष्ठ कोण?
इस्लाम वर नमूद तीन्ही प्रकारच्या माणसांना नाकारतो. पहिल्या वर्गाबद्दल इस्लामचे म्हणणे आहे की या वर्गातील लोक कुणाचेच मार्गदर्शन स्वीकारत नाहीत. त्यांचे असे मत आहे की,  त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते जगातील सर्वच गोष्टी स्वतः च्या बुद्धीच्या बळावर समजू शकतात. त्यांचे उदाहरण अशा लोकांसारखे आहे की जे अंधारामध्ये केवळ अंदाजावरून  चालत आहेत. शक्य आहे की ते, सरळही जाऊ शकतात व हे ही शक्य आहे की ते एखाद्या खड्ड्यात जाऊन पडू शकतात. कारण अंदाजावर मार्गक्रमण करणे कधीही विश्वासार्ह ठरू  शकत नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्यता आहेत. किंबहुना वाईट घडण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,

’’जो लोग खुदा के सिवा दुसरों को खुदाई का हिस्सेदार ठहराते और उनको पुकारते हैं जानते हो वो किस चीज के पैरो हैं? वो सिर्फ गुमान के पैरो हैं और महेज अंदाजे पर चलते हैं.’’ (सुरे युनूस)
जेव्हा कुरआन अवतरित होत होते त्याच काळात बनी इसराईल स्वतःला प्रेषित मुसा अलै. यांना पैगंबर तर तौरातला अल्लाहचा ग्रंथ मानत होते. मात्र त्यांचे वर्तन या दोहोंच्या  विरोधात होते. त्या दोहोंच्याही शिकवणीचा अर्थ त्यांनी आपल्या मर्जी आणि सोयीप्रमाणे लावून ईश्वरीय मार्गदर्शनाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
तिसऱ्या वर्गातील लोकांच्या बाबतीत जे बुद्धिमान असतानाही तिचा उपयोग न करता कोणाचेतरी अनुकरण करतात अशा लोकांना कुरआन खालील शब्दात संबोधतो. ’’ हे बहिरे, मुके  (व) आंधळे आहेत. तेव्हा हे मागे परतणार नाहीत.’’ (सुरे बकरा आयत नं. 18). इस्लाम त्यांना जनावरांपेक्षाही कमी समजतो. कारण जनावरांना तर बुद्धीच नसते. हे लोक तर बुद्धी असूनसुद्धा ती नसल्यासारखे इतरांचे अंधानुकरण करतात. या तिन्ही वर्गातील लोकांची विचारसरणी असंतुलित आहे, असे इस्लामचे म्हणणे आहे. या तीन वर्गाव्यतिरिक्त समाजामध्ये  इस्लाम एक चौथा वर्ग स्थापन करू इच्छितो ज्या वर्गातील लोक संतुलित विचार करणारे, आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करणारे तसेच योग्य मार्गाने जाणारे असतील. आता प्रश्न उत्पन्न होतो की, संतुलित विचार म्हणजे काय? बुद्धीचा संतुलित वापर कशाला म्हणतात? आणि योग्य मार्ग कुठल्या मार्गाला म्हणावे? तर याचे उत्तर असे की, बुद्धी ज्या आणि जितक्या कामासाठी बनविण्यात आलेली आहे, त्या आणि तितक्याच कामासाठी तिचा उपयोग करावा. तिच्यावर अधिक भार टाकला तर ती हँग होते, हे लक्षात घ्यावे. सर्वप्रथम बुद्धिचा  खरा वापर म्हणजे काय, हे ओळखण्यासाठी खालील प्रश्न स्वतः ला विचारावेत. 1. ही सृष्टी कोणी निर्माण केली? 2. ईश्वर एक आहे का अनेक? 3. माणसाला सद्मार्गावर चालण्यासाठी ईश्वरीय मार्गदर्शनाची गरज आहे किंवा नाही? 4. अल्लाह आणि त्याचे प्रेषित (अल्लाह क्षमा करो) खरे आहेत की खोटे? कुरआन  जीवन जगण्याचा जो मार्ग लोकांसमोर मांडतो तो  सरळ आहे का वाकडा?
वरील सर्व प्रश्नांवर सांगोपांग विचार केल्यानंतर जर तुमचे मन साक्ष देईल की, एका ईश्वराला मानने ही बाब तुमच्या प्रवृत्तीत सामील आहे, तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की,  सरळ मार्गाने जीवन जगण्यासाठी एक ईश्वरीय मार्गदर्शनाचा प्रकाश आवश्यक आहे आणि तो प्रकाश वेळोवेळी पृथ्वीच्या अनेक भागात पाठविण्यात आलेल्या पैगंबरांनी आणलेला प्रकाश  होय.
जर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पवित्र जीवन आणि वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर तुमचा असा विश्वास झालेला असेल की, एवढ्या उच्च चारित्र्याच्या माणूस खोटे बोलून जगाला  धोका देणार नाही. त्यांनी अल्लाह एक आहे व स्वतः त्याचे अंतिम प्रेषित असल्याचा जो दावा केलेला आहे तो खोटा असूच शकत नाही. माणसांसाठी योग्य मार्ग हाच आहे. वरील सर्व  प्रश्नांचा वेध घेतांना जी चिकित्सा करावी लागते ती करणे म्हणजेच बुद्धिचा संतुलित वापर करणे होय. एकदा का या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केल्यावर विश्वास बसला की,  मग जगाच्या विरोधाची परवा न करता, कोणाचीही भीती न बाळगता, कुठल्याही हानीची तमा न करता हा मार्ग स्वतःसाठी निवडा व ह्याच मार्गावर आपल्या घरातील इतर सदस्य,  त्यानंतर गल्लीतील लोक, त्यानंतर शहरातील, त्यानंतर राज्यातील, त्यानंतर देशातील व शेवटी जगातील सर्व लोक चालतील, यासाठी यथायोग्य, निरंतर आणि आयुष्यभर प्रयत्न करत रहा. व्यापक मानवकल्याण हाच या जीवन पद्धतीचा हेतू आहे, म्हणून इस्लाममध्ये रंग, रूप, नाते संबंध, भाषा, प्रदेश, वंश याला काडीचे महत्व नसून केवळ श्रद्धेला महत्व आहे.  इस्लाममध्ये सर्वांचा दर्जा समान व सर्वांना समान काम दिलेले आहे. एकदा का प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगासमोर मांडलेल्या एक ईश्वर, एक ग्रंथ, एक प्रेषित या विचारांचा तुम्ही स्विकार केला की, तुमच्या बुद्धीचा अनिर्बंध वापर करण्याचा तुमचा अधिकार संपला. आता तुम्हाला कुरआन आणि हदीस यांच्या चौकटीत राहूनच बुद्धीचा वापर करावा लागेल, त्याबाहेर तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला कोणताही निर्णय, कोणताही निवाडा स्वतःच्या मर्जीने करता येणार नाही. तो तुम्हाला अल्लाहच्या मर्जीनेच व प्रेषित सल्ल. यांच्या पद्धतीनेच करावा  लागेल. त्यावर टिका करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला राहिलेला नाही. आता तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याचा वापर अल्लाहने दिलेल्या आदेशामागील आणि प्रेषितांनी घालून दिलेल्या पद्धतीमागील कार्यकारणभाव शोधण्यासाठीच करता येईल. मात्र तुमच्या बुद्धिला एखाद्या आदेशामागील कार्यकारणभाव उमजला नाही. तरी तुम्हाला त्या आदेशाच्याविरूद्ध जाता येणार  नाही.
एखादा निर्णय तुमच्या हिताच्या विरोधात जरी जात असेल तरी तुम्हाला विरोध करता येणार नाही. तेव्हा असे म्हणता येणार नाही की अल्लाहचा हा आदेश आमच्या घराण्याच्या किंवा आजकालच्या रीतिरिवाजांच्या विरूद्ध आहे. म्हणून याचे पालन मला करता येणार नाही. जो काही विचार करायचा तो इस्लाम स्विकारण्याच्या पूर्वीच करायचा. एकदा का इस्लाम  स्विकारला की अनिर्बंध विचार स्वातंत्र्याचा अधिकार संपतो व शरियतच्या चौकटीत राहूनच विचार करण्याचे बंधन येते. खरे पाहता बुद्धीला सुद्धा हीच गोष्ट पटते की कुठलाही अधिकार  अमर्याद नसावा मग तो विचार स्वातंत्र्याचा का असेना. जीवनाचा हाच मार्ग इस्लाम आहे आणि या मार्गावर चलणारेच मुस्लिम आहेत. आता प्रत्येक मुस्लिमाने ज्यांनी आपले नाव  आणि धर्म जनगणनेमध्ये मुस्लिम आणि इस्लाम लिहिलेला आहे त्यांनी स्वतः स्वतःचा आढावा घ्यावा की, वर नमूद अटी व शर्तींमध्ये किती बसतो?

- एम.आय.शेख
9764000737

(संदर्भ : जमाअते इस्लामीचे  संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचा तर्जुमानुल कुरआन नोव्हेंबर 1933 मध्ये प्रकाशित ’मुसलमान का हकीकी मफहूम’ या लेखावर आधारित)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget