राजकारणातील नवा ’राज’ पॅटर्न
एखाद्या तज्ञ चित्रकाराने ब्रशच्या फटकाऱ्यांसह लिलया एखादं सुंदर चित्र कॅन्व्हासवर साकारावं तेवढ्याच शिताफीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कॅन्व्हासवर आपल्या कुंचल्यातून फटकारे मारून भाजपला सळो की पळो करून सोडत आहेत. गुढी पाडव्याला 6 एप्रिल रोजी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झालेल्या प्रचंड सभेमध्ये त्यांनी भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या एका देखण्या प्रचारशैलीची सुरूवात केली आणि बघता- बघता नांदेड, सोलापूर आणि इचलकरंजीमध्ये त्यांच्या या नव्या भाषण शैलीने भाजपला इतके घायाळ करून सोडले की, विनोद तावडे यांना राज यांच्या सभां खर्चा संबंधी दाद निवडणूक आयोगाकडे मागावा लागत आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांना राज यांनी विचारलेल्या प्रश्नांचे खुलासे करावे लागत आहेत.
2014 सालच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रधानमंत्री बनण्याच्या अगोदर मोदींनी केलेल्या अफाट आश्वासनांच्या आणि गेल्या पाच वर्षातील त्यांनी केलेल्या कामामधील विसंगती नेमक्यापणे हेरून त्यांच्या ऑडिओव्हीडीओ्निलपच्या माध्यमाने लोकांसमोर मांडून त्यांना संमोहित करण्याचे एक नवेच शास्त्र त्यांनी जन्माला घातले आहे. एखादी विसंगती हेरून त्यावर आपल्या धीर गंभीर आवाजात पार्श्वभूमी तयार करून राज ठाकरे थोडासा पॉज घेतात... सभेमध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरते आणि लगेच राज ठाकरे म्हणतात ’ये लाव रे तो व्हिडीओ’ आणि लगेच एक व्हिडीओ सुरू होतो आणि व्हीडीओ संपल्याबरोबर त्यातील विसंगतीवर राज ठाकरे आपल्या विशिष्ट शैलीत भाष्य करतात आणि सभेमध्ये हास्यकल्लोळ होतो. क्रमा-क्रमाने राज ठाकरे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांचे एवढे राजकीय वस्त्रहरण करतात की, पाहणाऱ्यांना त्यांची दया यावी.
ते स्वतःही उमेदवार नाहीत, त्यांच्या पक्षाचाही कोणी उमेदवार नाही आणि ते कोणाला मत द्या, म्हणूनही आवाहनही करीत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्याखाली किंवा आचारसंहितेखाली आणणेच शक्य नाही. विशेष म्हणजे याच कारणामुळे त्यांच्या सभांचा खर्च मागण्याचाही निवडणूक आयोगाला अधिकार नाही. अशा विचित्र अवस्थेत राज ठाकरे यांनी या अफलातून प्रचार तंत्राद्वारे अनेकांची गोची करून ठेवलेली आहे. त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये एकेक नवीन व्हिडीओ सामील केला जात आहे. त्यामुळे उत्सुकता पण प्रत्येक सभागणिक वाढत आहे. केवळ दादरमध्येच त्यांच्या सभेला गर्दी होते हे गृहितकही त्यांनी मोडून काढलेले आहे. आज महाराष्ट्रात दोनच नाव प्रचारादरम्यान चर्चेत आहेत. एक बॅरिस्टर ओवेसी दूसरे राज ठाकरे.
आजपर्यंत कोणीही प्रचारामध्ये जे तंत्र वापरले नव्हते ते राज ठाकरे यांनी वापरून भाजपच्या प्रचार यंत्रणेला जबर हादरा दिलेला आहे. परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न, प्रश्नपत्रिकेत पाहून हुशार विद्यार्थ्याचीही जी अवस्था होती तीच अवस्था भाजपची झालेली आहे. स्वतःचा प्रचार करावा का राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत हे त्यांना कळेनासे झालेले आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर त्यांनी सभेत विचारलेल्या प्रश्नाची पुनरावृत्ती प्रचंड प्रमाणात समाजमाध्यमातून होत असल्यामुळे एक नवीनच डोकेदुखी भाजपसमोर निर्माण झालेली आहे. ज्यांची उत्तरच देता येणार नाहीत, असे प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी भाजपला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडलेले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामधील जनसामान्यांच्या विकासाच्या विषयांना मिळणारी बगल नेमकी हेरून राज ठाकरे थेट पंतप्रधानांना मुद्यांवर येण्यासाठी भाग पाडतांना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या या प्रश्नाच्या सरबत्तीने पंतप्रधान मोदी हे गांगारून गेल्याचे अकलूजच्या सभेमध्ये ठळकपणे जाणवले. 17 एप्रिल रोजी अकलूजमध्ये त्यांनी स्वतः मागासवर्गीय असल्यामुळे सर्व लोक त्यांना छळत आहेत, असे म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. राज ठाकरेंच्या या झंझावाती प्रचाराचा मतदारांवर थेट परिणाम जाणवत आहे. राज ठाकरे जरी कोणाला समर्थन करायचे, याचा थेट उल्लेख करत नसले तरी शरद पवारांबरोबर औरंगाबाद ते मुंबई पर्यंत केलेला एकत्रित विमान प्रवास आणि सोलापूरला एकाच हॉटेलमध्ये थांबून त्यांनी मतदारांना योग्य तो संदेश दिलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना धमकीवजा आव्हान देउन म्हटले आहे की, शरद पवारांची झोप तिहाडमधील एका कैद्याने उडविलेली आहे. यावरूनही महाराष्ट्रातील मराठा समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. स्वतः शरद पवार यांनीही यासंबंधी भाष्य करताना मोदींना स्पष्ट सुनावले आहे की, एकीकडे ते म्हणतात, ’माझे बोट धरून राजकारण शिकलो आणि दूसरीकडे माझ्या परिवारातील सदस्यांवर टिका करतात.’ एकंदरीत दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपलेला असतांना किमान महाराष्ट्रात तरी अॅडव्हान्टेज काँग्रेस - राष्ट्रवादी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच येत्या विधानसभेचे आव्हानही कडवे झालेले आहे.
- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com
Post a Comment