Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(५) आणि आपली ती संपत्ती जिला अल्लाहने तुमच्यासाठी जीवनयापन करण्याचे साधन बनविले आहे, नादान लोकांच्या स्वाधीन करू नका. परंतु त्यांना आहार व वस्त्रप्रावरण द्या आणि त्यांना सन्मार्गदर्शन करा.८
(६) आणि अनाथांची काळजी घेत राहा इथपावेतो की ते विवाहयोग्य वयात येतील.९ मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा.१० असे  कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईने गिळंकृत कराल की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्कांची मागणी करू लागतील. अनाथांचा जो  पालक धनवान असेल त्याने ईशपरायणतेने वागावे व जो गरीब असेल त्याने परिचित भल्या पद्धतीने खावे.११ नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना  त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे.
(७) पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रीयांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या  नातेवाईकांनी मागे ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त,१२ हा वाटा (अल्लाहकडून) ठरविलेला आहे.
(८) आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.१३
(९) लोकांना या गोष्टीचा विचार करून भीती वाटली पाहिजे की जर त्यांनी स्वत: आपल्या पाठीमागे असहाय संतती सोडली असती तर मृत्यूसमयी आपल्या संततीविषयी कसकशा  प्रकारची शंका त्यांना वाटली असती, म्हणून त्या लोकांनी अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि रास्त वचन बोलले पाहिजे.
(१०) जे लोक अन्यायाने अनाथांची मालमत्ता गिळंकृत करतात खऱ्याअर्थी ते आपले पोट आगीने भरतात आणि निश्चितच ते नरकाच्या अग्नीत भडकत असलेल्या आगीत झोकून दिले जातील.१४



८) या आयतद्वारा मुस्लिम समुदायाला व्यापक आदेश दिला आहे की संपत्ती जीवन जगण्याचे एक साधन आहे म्हणून ते अज्ञानी लोकांच्या अधिकारात आणि वापरात राहू नये. असे  लोक त्याला चुकीच्या मार्गाने खर्च करून सांस्कृतिक, आर्थिक आणि शेवटी नैतिक व्यवस्थेला बिघडून टाकतील. ज्या व्यक्तीला आपल्या संपत्तीचे अधिकार प्राप्त् आहे ते अमर्यादित  नाहीत की ते या अधिकारांना व्यवस्थितरित्या वापरात आणण्यास योग्य नाहीत आणि त्यांच्या वापरामुळे सामाजिक बिघाड निर्माण होत असेल तरी ते अधिकार हिरावून घेतले जाऊ  नयेत. या आदेशानुसार लघु प्रमाणात प्रत्येक संपत्तीधारकाला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली संपत्ती जो कोणी दुसऱ्याच्या हवाली करीत असेल तर तिच्या वापराची योग्यता ठेवतो किंवा नाही आणि मोठ्या प्रमाणावर इस्लामी राज्याला याचे प्रबंध केले पाहिजे. जे कोणी चुकीच्या मार्गाने व समाजात बिघाड होईल अशाप्रकारे संपत्ती खर्च करीत असेल तर इस्लामी  शासन त्यांच्या संपत्तीला आपल्या अधिकारात घेऊन त्याच्या उपजीविकेचा प्रबंध करील.
९) म्हणजे जेव्हा ते प्रौढ होतील तेव्हा पाहा की त्यांचा मानसिक विकास कसा होत आहे आणि त्यांच्यात आपले व्यवहार आपल्या जबाबदारीवर करण्याची योग्यता कितपत प्राप्त् होत आहे.
१०) संपत्ती त्यांच्या हवाली करण्यासाठी दोन अटी घातल्या गेल्या आहेत. एक प्रौढावस्थेला पोहचणे. दुसरी अट म्हणजे समझदारी येणे म्हणजे संपत्तीच्या योग्य वापराची योग्यता.  पहिल्या अटीवर मुस्लिम फिकाहशास्त्रींचे एकमत आहे. दुसऱ्या अटी बाबत इमाम अबू हनीफा (रह.) यांचे मत आहे की जर प्रौढावस्थेला पोहचल्यानंतर अनाथामध्ये योग्यता आणि  समझदारी आली नाही तर अनाथाच्या पालकाला जास्तीत जास्त सात वर्ष आणखी प्रतिक्षा केली पाहिजे. नंतर समजदारी येवो अथवा न येवो ज्याचा माल त्याच्या हवाली केला पाहिजे.  इमाम अबू यूसुफ, इमाम मुहम्मद व इमाम शाफई (रह.) यांचे मत आहे की संपत्ती हवाली करतेवेळी कोणत्याही स्थितीत समजदारी पाहिली गेलीच पाहिजे. नंतरच्या विद्वानांच्या  मतानुसार हे अधिक उचित होईल की या विषयी शरियतच्या काझीचा सल्ला घेतला जावा. काझीने ठरविले की त्याच्यात पूर्ण समजदारी आलेली नाही तर त्या अनाथाच्या निगराणीसाठी योग्य प्रबंध करील.
११) म्हणजे आपले सेवाशुल्क या मर्यादेपर्यंत घ्यावे की नि:पक्ष आणि समजदार व्यक्तीने ते उचित ठरवावे. ते सेवाशुल्क चोरून लपून घेतले जाऊ नये तर जाहिररित्या ठरवून घेतले जावे आणि त्याचा हिशेब ठेवला जावा.
१२) या आयतीत स्पष्ट रूपाने पाच कायदेशीर आदेश दिले आहेत. (१) एक वारसा संपत्तीत फक्त पुरुषांचाच हक्क नाही तर स्त्रीयासुद्धा हकदार आहेत. (२) वारससंपत्तीचे वाटप केले  गेले पाहिजे मग ती कितीही कमी का असेना. मरणाऱ्याने एक वार कापड जरी मागे सोडले असेल आणि दहा वारस आहेत तर त्या कापडाला दहा हिश्यात वाटले गेले पाहिजे. ही वेगळी  गोष्ट आहे की एका वारसाने दुसऱ्याकडून त्याचा हिस्सा खरेदी करावा. (३) वारसा कायदा प्रत्येक प्रकारच्या संपत्तीवर व मिळकतीवर लागू होतो मग ती चल असो की अचल, कृषिय  की अकृषिय किंवा वडिलोपार्जित असो की नसोत किंवा अन्य. (४) वारसाहक्क त्या वेळी उत्पन्न होतो जेव्हा मृतकाने मागे काही संपत्ती सोडली असेल. (५) यापासून हा नियम निघतो  की जवळचे नातेवाईक जिवंत (उपलब्ध) असतील तर दूरच्या नातेवाईकाला हक्क मिळणार नाही. पुढे या नियमाला आयत नं. ११ च्या शेवटी आणि आयत ३३ मध्ये अधिक स्पष्ट  करण्यात आले आहे.
१३) संबोधन मृतकाच्या वारसांशी आहे आणि त्यांना आदेश दिला जात आहे की वारसा संपत्तीच्या वाटपाप्रसंगी जवळचे व दूरचे नातेवाईक, बिरादरीतील गरीब व मुहताज लोक आणि  अनाथ मुले आली तर त्यांच्याशी संकुचितपणाचा व्यवहार करू नका. वारसा संपत्तीत शरियतनुसार त्यांचा हिस्सा नसला तरी उदारतापूर्ण व्यवहार करून त्यांना मृतकाने सोडून गेलेल्या  संपत्तीतून काही न काही द्यावे आणि कोत्या मनाच्या लोकाप्रमाणे त्यांना झिडकारू नका.
१४) हदीसमध्ये आले आहे की उहुद युद्धानंतर माननीय साद बिन रुबैअ (रजि.)यांची पत्नी आपल्या दोन मुलींना घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाली आणि सांगितले,  ``हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.)! या सादच्या मुली आहेत जे उहुद युद्धात शहीद झाले आहेत. यांच्या चुलत्यांनी पूर्ण संपत्तीवर कब्जा केला आहे आणि यांच्यासाठी एक दानासुद्धा  सोडला नाही. आता या मुलींशी कोण विवाह करेल? यावर या आयतींचे अवतरण झाले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget