Halloween Costume ideas 2015

आमच्या मोहल्ल्यात गटारी बसवून देण्याचे आश्वासन दिलंय

थंडीचा पारा चढलाय, म्हणजे नुसता गारठ्याचा कहर आणि भितीला बहर येतोय. वाजणार्या थंडीपासून वाचण्यासाठी वाट्टेल ते उपाय आपण करतोय. वाढणार्या वाटणार्या भीतीसाठीच्या उपायांचे काय? या प्रश्नाचं साधं उत्तर तयार आहे. अलिकडच्या निवडणुकांचे निकाल पहा. सत्ताबदल होतोय. व्वा! पण व्यवस्थेचं काय? व्यवस्थेबद्दल ठोस काही नाहीच. व्यवस्था तीच तशीच. दगड - विटांचा बॅलन्स सांभाळणारी. निवडणूक निकालांबरोबर, 1984 च्या दंग्याचेही निकाल लागले. आज नवनवीन नावे उजाडतील. आपण मात्र गुजरातच्या 2002 च्या निकालाची वाट पाहू. लोकशाही न्यायव्यवस्थेचा हा प्रचंड विश्वास अबाधित ठेवू. तिकडे सध्याचे सत्ताधीश संघी बरळताहेत वाट्टेल ते, त्यांना बरळू दे. आपण रोहित वेमुलाच्या जाण्याचा, प्रशासकीय हत्तेच्या तिसर्या स्मृतीदिनानिमित्त विद्रोही आक्रोश करू. नजीबचा पत्ता मात्र अजिबात विचारायचा नाही. आरक्षणाच्या मुद्दयासाठी वकीलांची फौज उभी राहू दे. आपण गटातटातून पंथ वादातून, ” मुद्दा” मिरवत - झुलवत ठेऊ. त्यांची मनकी बात - ’धर्मव्याख्या बनली.’ त्यांनी विटा रचल्या, कुजल्या, भिंती उभ्या पक्क्या केल्या. आपण समतेचा डफ वाजवीत राहू, नसेल तर राग एफबीवर वैयक्तिक व्यक्त करू. ते जात, धर्म, वर्ग शोधून मांडताहेत. हिंदू देवतांची आपण ” सबका मालिक एक” म्हणत शांत राहू. ठेका मिळालाय आपल्याला, आपलं आपण काहीचं बोलायचं नाही. गोड बोलत, लिहत, ऐकत राहू. सभा-संम्मेलन घेऊ, मौन रागात राहू, हमाली करू, पंक्चर काढू, छोटे छोट्या उद्योगातून गुजारा करू. झोपडपट्ट्यांतून झोपड्या वाढवू. मध्यंतरी धार्मिक म्हणवणार्या संस्था - संघटनांनी उघडलेला कुठल्याही सात्विक मोहिमा पुर्णत्वास नेल्या का? त्याचं काय झालं? चारभिंतीत झाली चर्चा, चार चेहरे रस्त्यावर नंतर सगळं गायब. जैसे थे! बेगाने शादी में नाचून झाले. आता जरा ताळ्यावर येऊ?
    शादीवरून आठवलं, भांडवली, ब्राम्हणी, सनातन मुल्यांची निष्ठा बळकट करणारी जगप्रसिद्ध शादी आपल्या हिंदुस्थानात गाजत राहिली. वर्तमानपत्रे, मीडिया, गुलाबजाम पाकासारख्या मुरवून बातम्या पुरविल्या. लताबाईंनी निवृत्ती घेताघेता गायत्रीमंत्राने लग्नाची सुरूवात केली. श्रीमंत गोतावळ्यातल्या अमिताभ व श्रीवास्तव, आमीरखान, कालारजनिकांत यांनी मैत्रीपूर्ण गुलामी सख्य जोपासत पंगती वाढल्या. हिंदुस्थानी नायक- नायिकांची लग्ने परदेशात झाली. अख्ख जग हिंदुस्थानात आणलं अंबानी यांनी, किती देशप्रेम ! कसला भांडवलशाही राष्ट्रवाद! व्वा! आपण बघायचं आणि आणि गरीबाच्या लग्नाला पन्नास रूपयांच्या भेटीत दोघे-तिघे जेऊन खाऊन यायचं.. ढेकर देत देत लग्नातल्या जेवणात मिठ कमी होतं या बद्दल बोलत राहायचं.
    खाल्यामिठाला जागायचं का नाही! विशेष मुस्लिमांच्या मुलींच्या पळॅन किंवा लग्न करण्याच्या प्रश्नावर माथेफोडून घ्यायचे. आणि ज्या घरात एकवेळी उपासमार आहे, अशा घरातल्या मुलीने स्वतःहून पळून जाऊन लग्न केले, तर नजरअंदाज करायचे.
    श्रीमंत नामचिन हस्ती असेल तर लेखणी चालवायची, जीभ पाजळायची, बुद्धीची कसरत करायची कमाल आहे!!
    कव्वालीत टाळ्या पिटतात, तशा इथल्या भयावह व्यवस्थेला मुकसंमती देत सपोर्टीव्ह टाळ्या वाजवायच्या.. पुरे...गर्दीतल्या गुन्हेगाराला ओळखून देखील सावध व्हायचं नसेल तर बंधुत्व.. माणुसकीचं कोणतं नातं आपणं सांगतोय... काय सांगावे? ’मानवाधिकार दिवस’, ’अल्पसंख्यांक दिवस’, साजरे करताना दिखाव्याचा कंठोशोष  केवळ पोपटपंची ठरतोय. खैरलांजीच्या क्रुरकतेने न्यायासाठी लढणारा भारतीय भोतमांगे, शेवटचा  
लढवय्या भैय्यालाल भोतमांगे न्यायाविनाच मरून गेला... आणि.. मोहसिन शेखच्या बाबाचेही तेच झाले. कदाचित नजिबच्या आईचे...? आपण त्यांच्या गोड पेढ्याच्या बातांवर समाधान व्यक्त करत राहू. मोहसिन, नजीब यांच्या पाठीशी आपण उगाच कशाला वेळ घालवायचा. मी ही थांबतो... मला गावातल्या नगरसेवक असणार्या घरून लग्नासाठीचे निमंत्रण आहे... परवा यांनी अयोध्येच्या दौर्यासाठी पोस्टरभर शुभेच्छा दिल्या होत्या. अख्ख शहर येईल लग्नाला...शेवटी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात आज अखेर अल्पसंख्यांक मुस्लिम मंचातून यशस्वी वाटचाल करत... गावात दोन मंदिरे, इंग्लीश शाळा, एक नवी दर्गा आणि ब्राम्हणपुरीत रस्ता रूंदीकरण केलाय. आमच्या मोहल्ल्यात गटारी बसवून देण्याचे आश्वासन दिलंय त्यांनी... म्हणून जातोय... आपण येताय का?

- साहिल शेख
8668691105
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget