Halloween Costume ideas 2015

मनामध्ये वाईट विचारांचे संगोपन करू नका : प्रेषितवाणी (हदीस)

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले,
‘‘माणसाला त्याच्या व्यभिचाराचा वाटा मिळाल्याशिवाय राहाणार नाही. व्यभिचारी दृष्टीने पाहाणे डोळ्यांचा व्यभिचार आहे. अश्लील व नग्नतेच्या गोष्टी ऐकणे कानांचा व्यभिचार आहे.  या विषयावर बोलणे जिव्हेचा व्यभिचार आहे. या हेतूने स्पर्श करणे हातांचा व्यभिचार आहे. त्यासाठी चालणे पायांचा व्यभिचार आहे. त्याची इच्छा करणे मनाचा व्यभिचार आहे. शेवटी  जननेंद्रिय व्यभिचारी कृत्य करील अथवा त्यापासून अलिप्त राहील.’’

मुस्लिम व अबूदाऊद या हदीससंग्रहांमध्ये पुढे म्हटले आहे की ‘‘आणि (व्यभिचारी हेतूने) चुंबन घेणे तोंडाचा व्यभिचार आहे.’’
(बुखारी, मुस्लिम, अबू दाऊद, निसाई)

निरुपण
हे पैगंबरी (स.) बोल प्रत्येक माणसासाठी दैनंदिन जीवनात फार फार महत्त्वाचे आहेत. पैगंबरांनी ही बाब अधोरेखित केली आहे की माणसाचं मन त्याच्या शरीरातील ‘राजा’समान आहे.  एखादा वाईट विचार मनात आला आणि माणसाने त्याचे संगोपन केले तर मग त्या वाईट कृत्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही. जेव्हा मनातच वाईट विचाराचे संगोपन होते तेव्हा  तमाम अवयव त्या इच्छेची परिपूर्ती करण्याच्या कामाला लागतात. डोळे, कान, जिव्हा, हात-पाय आणि शेवटी जननेंद्रि; सर्व व्यभिचारात सहभागी होतात.
म्हणूनच सज्जन माणसाने वाईट विचारांपासून सदैव जागृत राहिले पाहिजे. एखादा वाईट विचार मनात आल्यास त्वरित त्याला साऱ्या कुवतीने हटविण्याचा प्रयत्न करावयास हवा. या  बाबतीत त्याने गफलत केल्यास अनर्थ होऊ शकतो.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपदेशातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो तो हा की प्रत्यक्ष व्यभिचाराची कृती होईल तेव्हा होईल, मात्र त्या विचाराने एखाद्या परस्त्रीकडे पाहिले, तर डोळ्यांनी व्यभिचार केला! व्यभिचाराच्या भावनेने माणूस चालला तर पायांनी व्यभिचार केला! याच दुष्ट भावनेने तो बोलतो तर जिव्हेचा व्यभिचार झाला! सावधान!  सावधान!! डोळ्यांच्या, कानांच्या, हातापायांच्या, जिव्हेच्या आणि मनाच्या व्यभिचारापासून सावधान!!! डोळ्यांनी कुणाकडे वाईट नजरेने पाहू नका. जिव्हेला अश्लील वा नग्नतेच्या  गोष्टींची चटक लावू नका. कानांना अशा वाईट गोष्टी ऐकण्याकडे आकर्षित होऊ देऊ नका. अन्यथा, खबरदार! डोळ्यांना, कानांना, जिव्हेला, हातापायांना या दुष्कृत्याचे फळ भोगावे लागेल!
अशी सावधानता जर माणसाने अंगीकारली तर त्याचे चारित्र्य किती उदात्त, किती उच्चकोटीचे होईल, यात शंका ती कोणती!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget