‘इमाम-उल-हिंद मौलाना अबुल कलाम आझाद’ हा लेख (शोधन, १६-२२/११/२०१८) वाचला. देशाची फाळणी झाली तेव्हा कुलीन, सधन, उच्चशिक्षित आणि सत्तेची गोडी चाखलेले मुसलमान पाकिस्तानात गेले आणि हातावर पोट भरणारे बहुजनवर्गातून धर्मांतरित झालेले मुसलमान भारतात राहिले. पाकिस्तानकडे प्रयाण करणाऱ्या स्वार्थी मुसलमानांनी आपल्या जहागिऱ्या, वतने, महाली सर्व संपत्तीचा त्याग केला. भारतात राहणाऱ्या उर्वरित बांधवांचा विचार केला नाही. काळ जातीय दंगलींचा होता. मौलाना आझाद यांनी फाळणी व स्वातंत्र्य दोन्ही अनुभवले. बहुसंख्याक हिंदू बांधवांपुढे मुसलमानांची काय गत होईल, त्यासाठी मुसलमानांसाठी त्यांनी कोणतीच योजना आखली नाही. त्यांनी सीलबंद पाकिटात काही पाने लिहून ठेवली, तीन दशकांनंतर त्यांच्या इच्छेनुसार ती उघडण्यात आली. त्यातही राजकीय हेवेदावे याशिवाय काहीच नव्हते. आंबेडकरांनी मुस्लिमांसाठी आरक्षणाची सोय केली होती व मौलानांना तसे सूचित केले होते. पण मौलाना आझादांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नेहरूंच्या हाकेला हो भरत राहिले. मौलाना शिक्षणमंत्री होते तरीही मुसलमान मागास राहिले. काही मंडळी मौलाना आझादांना केवळ ‘शोपीस’ म्हणून हिनवितात याच कारणाने. मौलानांनी स्वातंत्र्यासाठी आणि भारतासाठी आयुष्य वेचले, यात शंका नाही. म्हणून तर ते भारतरत्न आहेत. मात्र मुसलमानांची सध्याची अवस्था बघता ते पण जबाबदार नाहीत काय? असा प्रश्न पडतो.
- निसार मोमीन, पुणे.
Post a Comment