Halloween Costume ideas 2015

‘आत्महत्येसाठी परवानगी द्यावी’

उर्दू टाईम्सने आपल्या 17 नोव्हेंबरच्या अंकात, ’आत्महत्येसाठी परवानगी द्यावी’ ही बातमी प्रामुख्याने दिली आहे. शासनाचा आरक्षणाबाबतीत दुजाभाव पाहता मुस्लिम अवामी कमिटीचे अध्यक्ष इलियास किरमानी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारणा केली आहे की, मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या करणे आवश्यक असेल तर तशी शासनाने कायदेशीर परवानगी द्यावी. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही मागणी केलेली आहे. मागच्या आघाडी शासनाने मराठा आणि मुस्लिम दोघांनाही आरक्षण दिलेले होते ते या शासनाने संपवले. विशेष म्हणजे सरकारमध्ये सामिल असलेल्या शिवसेनेनेही मुस्लिम आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर करून सर्वांनाच चकित केले आहे. यासंंबंधीची बातमीही अनेक उर्दू वर्तमानपत्रातून झळकली आहे. मागच्या आठवड्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोष करण्याची तयारी असे जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वच उर्दू वर्तमानपत्रांनी दखल घेतलेली आहे. 

केंद्र सरकार जवानांच्या मानवाधिकारासोबत खेळ करत आहे
    17 तारखेच्या उर्दू टाईम्समध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्याशी नाराज असलेल्या जायबंदी सैनिकाने दिल्लीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात आणि जम्मू कश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी कृत्याविरूद्ध लढताना जायबंदी झालेल्या सैनिकांनी हे उपोषण सुरू केलेले आहे. त्यांच्या एका प्रतिनिधीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केलेले आहे. हवालदार राजन, नाईक हरपालसिंग, कपिल सिलानी आणि नलीन तलवार यांच्या नेतृत्वामध्ये सदरचे निवेदन राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री यांना देण्यात आले. त्यांना दिलेल्या निवेदनात सर्वांना एक सारख्या सेवानिवृत्ती अनुदानाची मागणी पुन्हा नव्याने करण्यात आलेली आहे. माजी सैनिकांचे प्रवक्ते नलीन तलवार यांनी वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलेले आहे की, सध्याचे केंद्र सरकार जवानांच्या मानवाधिकारासोबत खेळ करत आहे. हे लोक 15 ऑक्टोबरपासून साखळी उपोषणावर बसलेले आहेत. 

शासन कधीच या बाबी उघड करणार नाही
नदीम अब्दुल कदीर यांचा राफेल घोटाळ्याच्या संबंधित 17 नोव्हेंबरला उर्दू टाईम्समध्ये लेख प्रकाशित झालेला आहे. ते लिहितात की, मोदी सरकारचे काम विचित्र पद्धतीने सुरू आहे. राफेल तयार करणारी कंपनी दासो ही राफेल संबंधी आवश्यक ती माहिती देण्यासाठी तयार आहे. या विमानात कोणते इंजिन आहे, याच्यात कोणकोणत्या व्यवस्था जोडलेल्या आहेत. हे विमान किती उंचीवर उडू शकते. किती लांबून शत्रूवर बाँबफेक करू शकते, याची गती किती यात कोणकोणते हत्यार वाहून नेता येतात. इत्यादी माहिती कंपनी देण्यास तयार असतांनासुद्धा आपले सरकार ती माहिती तर सोडा विमानाची किंमतसुद्धा जाहीर करण्यास तयार नाही. इत्यादी गोष्टींचा आपल्या लेखामध्ये त्यांनी उहापोह केलेला आहे. त्यांनी शेवटी असा विश्‍वासही व्यक्त केलेला आहे की, शासन कधीच या बाबी उघड करणार नाही. 

  16 वर्षांपासून जकीया जाफरींची लढाई
    18 तारखेच्या उर्दू टाईम्समध्ये शकील रशीद यांचा एक लेख प्रकाशित झालेला आहे. त्यात 79 वर्षाच्या वयोवृद्ध जकीया जाफरींनी सर्वोच न्यायालयात मोदी आणि इतर अधिकार्‍यांना 2002 च्या दंग्यात क्लिनचिट देण्याविरूद्ध अपील दाखल केल्याची व कोर्टाने ते अपील दाखल करून घेतल्याच्या बातमीचा मागोवा घेण्यात आलेला आहे. आपल्या लेखात त्यांनी जकीया जाफरी यांच्या धैर्यपूर्ण कायदेशीर लढाईचा मागोवा घेतलेला आहे. 16 वर्षांपासून जारी ही लढाई आजही जकीया जाफरी ज्या तडफने लढत आहेत त्याबद्दल लेखकाने त्यांचे कौतूक केलेले आहे. ’20 नोव्हेंबरच्या उर्दू टाईम्समध्ये मराख मिर्झा यांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे. याचा विषय बाबरी मस्जिदच्या ठिकाणी राम मंदिर कधीही नव्हतेच हा आहे.त्यात त्यांनी बाबरी मस्जिदीसंबंधी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे. भाजपाकडे 2019 साठीही बाबरी मस्जिदचाच मुद्दा आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे.’
    हाशिम खान यांनी 20 तारखेच्याच आपल्या एका लेखामध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा 2013 पासूनचा आढावा घेतलेला आहे. लखनऊहून प्रकाशित होणार्‍या तहरिक-ए-उर्दू या वर्तमानपत्रात हिजाब उतरवून शिकविण्याच्या संस्थाचालकाची मागणी मान्य करण्यापेक्षा नोकरीचा त्याग करणार्‍या ’फातेमा हसन’ या शिक्षिकेच्या बातमीचा उल्लेख करून शाळेच्या प्रशासनावर टिका केलेली आहे.
 

- फेरोजा तस्बीह
9764210789
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget