Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांनी बिगर राजकीय नेतृत्वासाठी पुढे यावे

वो जो खुर्शिद होते हैं जिनके आस्तीनों में
उन्हें कहीं से बुलाओ बहोत अंधेरा है
 
नेतृत्व म्हटलं की राजकीय नेतृत्व हाच विचार मनात येतो. एका अर्थाने तो बरोबरही आहे. कारण राजकीय नेतृत्व हेच नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव पाडत असते. आपल्या देशातील राजकारण आता जनसेवेचे साधन राहिलेले नाही, ते भ्रष्टाचाराचे साधन झालेले आहे. कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. देशातील गरीबांची गरीबी दूर झालेली नाही. मात्र गरीबी घालविण्यासाठी जे राजकारणात आले त्यांची मात्र गरीबी गेली.
    भारतीय राजकारणात मुस्लिमांना डावलण्याचा इतिहास तसा जुनाच आहे. मौलाना अबुल कलाम आझाद वगळता कुठल्याही मुस्लिम राजकीय नेत्याला राष्ट्रीय राजकारणावर छाप पाडता आलेली नाही. ती ही मौलानांची योग्यता आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांची अद्भूत भूमीका यामुळे त्यांना ते शक्य झाले. त्यालाही उतरती कळा लागलेली आहे. 11 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना आंदराजली वाहण्यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील त्यांच्या तस्बीरीसमोर फक्त तीन खासदार उपस्थित होते. त्यातही एक गुलाम नबी आझाद होते. एक श्रेष्ठ नेत्याचे सर्व गुण अंगभूत असतांना, संविधानावर अव्याभिचारी श्रद्धा असतांना सुद्धा बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसींची जी सर्वपक्षीय कोंडी केली गेलेली आहे ती फक्त ते मुस्लिम असल्यामुळे. हे सत्य आपण सर्वजण जाणून आहोत. आपले उभे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविल्यानंतरही गुलाम नबी आझाद सारखा नेता स्वतःला डावलला जाण्याची तक्रार सार्वजनिकरित्या करतो, यातच सारे आले. 71 वर्षाच्या अपयशी राजकारणानंतर आता वेळ आलेली आहे की, मुस्लिमांनी पर्यायी क्षेत्रात नेतृत्व देण्याचा विचार करावा. और भी दायरे हैं नेतृत्व केे राजनीति के सिवा.
नेतृत्वाचे पर्यायी क्षेत्र
    मग असे कोणकोणते क्षेत्र आहेत ज्यामध्ये मुस्लिम नेतृत्वाला वाव आहे? याचा विचार करता मस्जिद-ए- इशाअत-ए-इस्लाम दिल्लीमध्ये मागील ईद-उल-अजहाच्या नमाजच्या वेळी जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन उमरी यांनी दिलेल्या खुत्बा (भाषणा) ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या भाषणात कुरआनच्या ज्या आयातींचा संदर्भ दिला होता, त्या आयाती खालीलप्रमाणे - 1. ” हे पैगंबर (सल्ल.) ! सांगा माझ्या पालनकर्त्याने नक्कीच मला सरळ मार्ग दाखविला आहे. अगदी सरळ धर्म, ज्यात कोणतीही वक्रता नाही” 2. ” सांगा !  माझी नमाज, माझ्या सर्व उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व माझे मरण,  सर्वकाही समस्त विश्‍वाचा मालक अल्लाहसाठीच आहे.” (सुरे अनआम आयत नं. 161-162).
    वरवर पाहता वर नमूद आयाती या मूळ विषयाशी विसंगत वाटतात पण प्रत्यक्षात तसे नाही. या आयातींमध्ये मुस्लिमांचे त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान ठेव्याकडे मौलाना उमरी यांनी लक्ष वेधले आहे. तो ठेवा जो फक्त मुस्लिमांकडे आहे इतरांकडे नाही, तो म्हणजे इस्लामी मुल्यांचा ठेवा. हा ठेवा ज्याच्याकडे आहे तो यशस्वी व ज्याच्याकडे नाही तो अयशस्वी, अशी त्यांची सरळ मांडणी आहे. हाच ठेवा मुस्लिमांनी पुढे येऊन देशासमोर मांडावा. अर्थात या क्षेत्रामध्ये नेतृत्व करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दाव्याला स्पष्ट करण्यासाठी कवी इक्बाल यांचा शेर मी आपल्यासमोर मांडू इच्छितो, ते म्हणतात -
“ इक्बाल को उस देस में पैदा किया तू ने
जिस देस के बंदे हों गुलामी पे रजामंद”

कवि इक्बाल यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 चा. ते जेव्हा ऐन भरात आले तो काळ ब्रिटिश राजवटीचा. त्या काळातील भारतीय समाज ब्रिटिशांच्या दुहेरी गुलामीत होता. एक राजकीय गुलामी तर दूसरी मानसिक गुलामी. आश्‍चर्य म्हणजे बहुतेक भारतीय ब्रिटिशांच्या राजकीय गुलामीचे तर विरोधक होते मात्र त्यांची मानसिक गुलामी त्यांनी स्वतःच्या मर्जीने स्विकारलेली होती.    
    प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीचा त्याग करून अनेक हिंदूंनी तर अर्वाचीन इस्लामी संस्कृतीचा त्याग करून अनेक मुस्लिमांनी ब्रिटिशांच्या संस्कृतीचा स्विकार करून एका प्रकारे आपली संस्कृती ब्रिटिश संस्कृतीपुढे तुच्छ असल्याचे मान्य केले होते. आजही हीच मानसिकता जपणारा एक मोठा वर्ग देशातील हिंदू आणि मुस्लिम दोहोंंमध्ये अस्तित्वात आहे. म्हणूनच आजही देशाचा कारभार इंग्रजीत चालतो. इंग्रजीत बोलणे, इंग्रजांसारखे वागणे याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते. आपण आपली लोकशाही ब्रिटिश वेस्ट मिनिस्टर पद्धतीची निवडलेली आहे. आपले सर्व प्रमुख कायदे ब्रिटिश कायद्यांवर आधारित आहे, आपली न्यायप्रक्रिया ब्रिटिश न्यायप्रक्रियेवर आधारित आहे. आपले उठणे, बसणे, खाणे, पीने, पोशाख, भाषा सर्व इंग्रजाळलेली आहे. त्यांची नक्कल करण्यातच आपण स्वतःला धन्य मानतो. इक्बाल विचारतात त्याप्रमाणे ही मानसिक गुलामगिरी नाही तर काय आहे? इंग्रजांनी काय केले? या देशातील जनतेवर अत्याचार केले. इथली संपत्ती लुटून ब्रिटनला नेली. तरी ब्रिटिश जीवनशैलीपासून ते शासन शैलीपर्यंत सर्व काही ब्रिटिश पद्धतीने स्वतःवर लागू करणे ही मानसिक गुलामगिरी नव्हे तर काय आहे?    
    बरे! त्यांच्याच काय जगातील कोणाच्याही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी घेण्यास कोणाचीही हरकत नाही. पण येथे असे नाही. ब्रिटिशांसह सर्वच पाश्‍चात्य जीवन मुल्यांच्या मानसिक गुलामगिरीत राहणे आम्हाला पसंत आहे. अलिकडे ब्रिटनच्या आकर्षणाचा गुरूत्वमध्य अमेरिकेकडे सरकला आहे. आज अमेरिकन जीवनशैलीची भूरळ आम्हा भारतीयांवर पडली आहे. त्यांच्या सर्व अवगुणांसह बहुसंख्य भारतीयांनी त्यांची संस्कृती स्विकारून आपल्या संस्कृतीचा पराजय मान्य केला आहे. त्या संस्कृतीचा ज्याचा परिणाम समाज विस्कळीत होण्यात झाला आहे. याचा पुरावा म्हणून मी पुढील दाखला देत आहे. मागील 13 नोव्हेंबर 2018 च्या ’व्हाईस ऑफ अमेरिका’ मध्ये अमेरिकन सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीवर एक रिपोर्ट दाखविण्यात आली. त्यात असे म्हटलेले आहे की, 2017 मध्ये अमेरिकन नागरिकांकडून अमेरिकन नागरिकांवर करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारामुळे 407 नागरिक मारले गेले आहेत. आश्‍चर्य म्हणजे याच कालावधीमध्ये याच कारणासाठी अफगानिस्तानसारख्या युद्धजन्य देशात 397 नागरिकांचा बळी गेला. म्हणजे अमेरिकेची सामाजिक परिस्थिती अफगानिस्तानच्या सामाजिक परिस्थितीपेक्षाही भीषण आहे. त्यांच्या या पराजित समाज व्यवस्थेचे आपण अंधानुकरण करीत आहोत.
    या पराभूत मानसिकतेतून आपल्या देशबांधवांना काढून पर्यायी इस्लामी जीवनशैलीतील कल्याणकारी मुल्यांची त्यांना जाणीव करून द्यावी. यासाठी मुस्लिमांनी पुढे येवून नेतृत्व करावे, असे मौलाना उमरींचे म्हणणे आहे. ज्या पाश्‍चिमात्य देशांच्या जीवनशैलीची भूरळ आम्हा भारतीयांना पडली आहे त्यात अनेक वर्णवादी हल्ले सहन करूनही, त्यात अनेक मौल्यवान जीवांची हाणी पत्करूनही आपण एच-1 बी व्हिसासाठी केविलवाणी धडपड करत असतो. यावरून त्यांची गुलामगिरी आपल्या मनात किती खोलवर रूजलेली आहे, हे स्पष्ट होते.
    आश्यर्च म्हणजे ! अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचाच अहवाल आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. त्यांच्या अनेक उच्चशिक्षित महिला बिकीनीचा त्याग करून बुरखा घालत आहेत. तरूण दाढी ठेऊन इस्लामी जीवनशैलीचा अंगीकार करीत आहेत. त्यांना त्यांच्या विकृत जीवनशैलीचा उबग आलेला आहे. त्यातून होणारे नुकसान सहन करण्यापलिकडचे झालेले आहे. रोज-रोज होणार्‍या बेछूट गोळीबाराने त्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे. व्यवसनाधिनतेने कळस गाठलेला आहे. 12 व्या, 13 व्या वर्षी त्यांची मुले लैंगिकरित्या सक्रीय होत आहेत. अनेक मुली याच वयात आई बनत आहेत. अनौरस मुलांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. कायदा, कोर्ट, कचेर्‍या हतबल झालेल्या आहेत. स्त्री-पुरूष संबंध बिघडलेले आहेत. कुटुंब व्यवस्थेची वीण उसवलेली आहे. पाश्‍चिमात्य देशांच्या या उध्वस्त जीवन पद्धतीवर टिप्पणी करतांना एका भारतीय ख्रिश्‍चन व्यक्तीचे म्हणणे खालीलप्रमाणे - ’युरोपमध्ये कॅथलिक धर्म संपण्याच्या मार्गावर आहे.’ - मारकूस डाबरे, वसई.(संदर्भ : लोकसत्ता 3 फेब्रुवारी 2014 पान क्र. 6).
    हे सर्व टाळावे म्हणून पाश्‍चिमात्य देशातील बुद्धिवादी लोक इस्लामच्या शीतल छायेखाली येऊन सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या संस्कृतीच्या सुनामीने पश्‍चिमेत एवढे वादळ उठविले त्यांचेच अंधानुकरण आपण करू लागलो तर आपलेही तसेच नुकसान होईल, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
    सुदैवाने अनेक भारतीय मुस्लिमांमध्ये इस्लामी जीवनशैली बद्दलचा विश्‍वास आजही कायम आहे. अशा लोकांनी पुढे येवून पाश्‍चिमाळलेल्या या लोकांना सत्य मार्ग दाखवावा, यशस्वी जीवनासाठी त्यांचे मार्गदर्शन करावे, असा मौलाना जलालुद्दीन उमरी यांचा संदेश आहे. 

    मुस्लिमांच्या स्वतःच्या समस्या
 
न देखेंगे चमन बरबाद होते
के इसमें खून है शामिल हमारा
 
    मौलाना पुढे म्हणाले की, रमजानच्या ईदच्या दिवशी जी स्थिती होती, बकरीदच्या दिवशीही तीच स्थिती आहे. मॉबलिंचिंगच्या घटना बंद झालेल्या नाहीत. महिलांवर लैंगिक अत्याचार दिवसागणिक वाढतच आहेत. मुलींच्या अनाथाश्रमांची दारे प्रभावशाली वासनांधांसाठी मोकळी ठेवण्यात आलेली आहेत. संपूर्ण जगात नाहीत एवढ्या असुरक्षित महिला आपल्या देशात आहेत. समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. एवढेच नाही तर माझ्या मते नशेचे तर राष्ट्रीयकरण झाल्यात जमा आहे. व्याभिचाराला गुन्हेगारी कृत्यातून वगळण्यात आलेले आहे. अश्‍लिलता फोफावलेली आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठे तरूणांच्या लैंगिक क्रियाकलपांची केंद्रे झालेली आहेत. तेथे शिक्षण कमी आणि चाळे जास्त होत आहेत. म्हणून जगातील सर्वोत्कृष्ट 200 विद्यापीठांमध्ये आपल्या देशातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. या सर्व वाईट गोष्टींना भारताच्या प्राचीन सभ्यतेमध्ये कधीही प्रतिष्ठा लाभलेली नव्हती. मात्र आज ती लाभत आहे. काही क्षेत्रात देशाने निश्‍चितपणे प्रगती केलेली आहे. परंतु, आर्थिक विषमता कमी होण्यापेक्षा जास्त होत आहे. व ही सर्व राष्ट्रीय हानी आम्हा मुस्लिमांच्या डोळ्यासमोर होत आहे. ती हानी पोहोचविण्यात काही मुस्लिमसुद्धा हातभार लावत आहेत. अशा परिस्थितीत श्रद्धावान मुस्लिमांनी हातावर हात धरून गप्प रहावे काय?
    निश्चितपणे आपल्या समोर आपल्या समस्यांचा डोंगर उभा आहे. त्या सोडविण्यामध्ये आपली शक्ती खर्ची पडत आहे. असे असले तरी आपल्याला हे सुद्धा विसरता येणार नाही की, हा देश आपला आहे, येथील नागरिक आपले देशबांधव आहेत, राजकारण जर त्यांना वेगळ्या वाटेने नेत असेल व त्यात त्यांचे नुकसान होत असेल तर आपल्यासमोर आपल्या समस्या आहेत म्हणून मूकदर्शक बणून राहता येणार नाही. भ्रष्ट समाज व्यवस्थेमुळे होणारे नुकसान शांतपणे पाहता येणार नाही. असे जर आपण करीत असू तर ती आपल्या देशाची प्रताडणा ठरेल. आपल्या देशबांधवांवर अन्याय ठरेल. देशातील शासन, प्रशासन आणि बहुसंख्य लोक चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्याचे परिणाम आपल्यालाही निश्‍चितपणे भोगावे लागणार आहेत. 

गुलों से दाग कांटों से खलीश लेने आये हैं
गुलिस्तां में हम अपने दिल को बहेलाने नहीं आये
 
    खरं तर देशाला व देशातील सर्व नागरिकांना योग्य दिशा देण्याचे कर्तव्य राजकीय नेतृत्वाचे आहे. ते जर का आपले कर्तव्य पूर्ण करीत नसतील तर मुस्लिमांना पुढे यावे लागेल. राजकीय नेतृत्वाची नसली तरी नैतिक नेतृत्वाची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी पुढे यावे व देशाला हे नेतृत्व द्यावे, ही त्यांची दुहेरी जबाबदारी आहे. एक धार्मिक व दूसरी राष्ट्रीय. धार्मिक या अर्थाने की, अल्लाहने आपल्याला स्पष्ट आदेश दिलेला आहे की, ”आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (सुरे आले इमरान आयत नं.110).
    ”जे लोक रात्रं-दिवस आपल्या विधात्याचा धावा करतात, त्याची मर्जी राखतात, अशा लोकांच्या सानिध्यात रहा. या जगातल्या सौंदर्याच्या आहारी जावून त्यांच्याकडून आपले डोळे फिरवू नका. ज्यांची मन आम्ही आमच्या स्मरणापासून विभक्त केलेली आहेत, जे आपल्या आकांक्षांच अनुसरण करतात त्यांचं काही ऐकू नका, त्यांनी यातल्या सीमा ओलांडल्या आहेत. (सुरे कहफ आयत नं.28)”
    राष्ट्रीय जवाबदारी या अर्थाने की आज आपल्या देशात ज्या दर्जाची वाईट सामाजिक स्थिती आहे अगदी तशीच स्थिती प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या काळात होती. मक्कामध्ये सर्व प्रकारच्या वाईट प्रथा, चालीरिती, गुन्हेगारी अस्तित्वात होती. त्या काळीही कन्याभ्रुण हत्या होत होती आजही होत आहे. तेथेही व्यसनाधिनतेने कळस गाठला होता येथेही व्यसनाधिनतेने कळस गाठलेला आहे. तेथेही एक कबिला दूसर्‍या कबिल्याला लुटत होता आजही एक वर्ग दूसर्‍या वर्गाला लुटत आहे. त्या काळीही व्याज आणि जुगाराने थैमान घातले होते आजही घातलेले आहे. त्याकाळीही स्त्रियांवर अत्याचार होत होते आजही त्यापेक्षा जास्त होत आहेत.
    यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणीही व्यक्ती किंवा समूह समाज सुधारण्यासाठी आपल्या मनाने काही योजना आखत असेल तर त्या नक्कीच त्रुटी असतील. मात्र ईश्‍वरीय मार्गदर्शनामध्ये त्रुटी असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. अल्लाहचे असेच त्रुटी विरहित आणि सुरक्षित असे मार्गदर्शन कुरआनच्या रूपात आपल्याकडे आहे. त्या आधारे ज्या प्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी त्या काळातील मक्कातील लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणला त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपणही प्रयत्नांती अमुलाग्र असे परिवर्तन आपल्याही देशात आणू शकू यात शंका असण्याचे कारण नाही. मुस्लिमांनी पुढे यावे व समाजाचे नैतिक नेतृत्व करावे. त्यासाठी कुरआनच्या हिदायतीनुसार योजना आखावी व अंमलबजावणी प्रेषित सल्ल. यांच्या पद्धतीने करावी, असे झाल्यास देश सन्मार्गावर यायला वेळ लागणार नाही.
    काम कठीण आहे म्हणूनच करण्यासारखे आहे, आव्हान मोठे आहे, म्हणूनच पेलण्यासारखे आहे. गरज फक्त विश्‍वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. तर मित्रानों! उठा! सुरूवात स्वतःपासून करा. कारण हेच प्रेषित सल्ल. यांचे निर्देश आहेत. त्यांनी कधीच ’समाज को बदल डालो’ छाप पोकळ घोषणा केल्या नाहीत. त्यांनी शांतपणे ईश्‍वरीय मार्गदर्शनावर आधारित नितीमान समाजाची रचना केली. त्यासाठी सुरूवात स्वतःहापासून केली. नंतर दावत पेश केली. प्रथम तीन लोकांनी ती स्वीकारली. मात्र अल्पावधीतच अरबी रानटी टोळ्यांचे एका सभ्य समाजामाध्ये रूपांतरण झाले. आणि शंभर वर्षात एक तृतीयांश पृथ्वीवर या कल्याणकारी आंदोलनावर आधारित समाज निर्माण झाला.
    जगाने राजेशाही, लोकशाही, भांडवलशाही, साम्यवाद, समाजवाद सगळ्या पद्धती वापरून पाहिल्या आहेत. कोणत्याही पद्धतीने मानवकल्याणाचे व्यापक हित साधता आलेले नाही. बहुतांशी लोक आजही अज्ञानाच्या अंधारात भटकत आहेत. तुमच्याकडे नूर-ए-हिदायतीची मशाल आहे. ती आपल्या वाणी आणि वर्तनाने पेटवा व देशाला नैतिक नेतृत्व प्रदान करा. हे तुमचे कर्तव्यपण आहे आणि तुमचा अधिकारपण आहे.

मेरी बातों पर हस्ती है दुनिया अभी
मगर मैं सुना जाऊंगा फैसलोंकी तरह
 
    शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, मला, तुम्हाला आणि आपल्या सर्वांना हे महान नेतृत्व करण्याची सद्बुद्धी व संधी प्रदान करो. (आमीन.) (मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या भाषणावर आधारित.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget