Halloween Costume ideas 2015

राष्ट्रवाद कुणाची मिरासदारी?

टिपू सुलतान, डॉ. मुहम्मद इकबाल, मौलाना आझाद  आणि पंडित नेहरू या चारही महापुरुषांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अतुलनीय असं आहे. चौघेही आपल्या जाज्वल्य राष्ट्रवादासाठी भारतीय इतिहासात अजरामर ठरले. आज भाजपप्रणित कथित देशभक्तीच खरा राष्ट्रवाद आहे, अशी चर्चा मुख्य प्रवाही माध्यमातून होत असताना वरील महापुरुषांनी मांडलेल्या नॅशनलिझमची नव्यानं मांडणी करणे क्रमप्राप्त ठरते.
धर्मवाद पोसून त्याला राष्ट्रवादाचा मुलामा चढवण्यात आल्यानं त्याकडे अभ्यासकांचे फारसं लक्ष जात नाही, अशी परिस्थिती दिसते. प्रसारमाध्यमांना हाताशी धरून भाजपचा धर्मवाद हाच खऱा राष्ट्रवाद आहे, असं प्रचारित केलं जात आहे. त्यामुळे अलीकडे याला पुरक व पर्यायी राष्ट्रवाद निर्मितीची चर्चा जोर धऱत आहे.
मौलाना आझाद, इकबाल आणि नेहरूंचा राष्ट्रवाद समाजहितावर आधारलेला होता. सर्वहारा वर्गाच्या मिश्र संस्कृतीतून व सहजीवनातून आकाराला आलेला समाज त्यावर हा राष्ट्रवाद उभा होता. पण दुर्दैवानं नेहरूंच्या निधनानंतर मतपेटीचं राजकारण सुरू झालं. सत्ता हस्तगत करणे ती मिळवण्यासाठी विविध पायंडे व प्रघातांची निर्मिती करणे, वेळेप्रसंगी प्रशासन व सरकारी अधिकारांचा दुरुपयोग करणे आदी प्रकार सुरू झाले. खरं पाहिलं तर आणीबाणी या विकृत राष्ट्रभक्तीला शह देऊन गेली. इंदिरा गांधींचे सत्तापतन करणे हाच खरा राष्ट्रवाद म्हणून प्रचारित करण्यात आला. राजकीय सत्ताबदलासाठी त्यावेळी एकत्र आलेली मंडळी विविध राजकीय विचारसरणीची होती. इंदिरा गांधीना पायउतार करणे हे उद्दीष्टे घेऊन ही मंडळी एका छत्रीखाली आली होती. ही घटना हिंदू राष्ट्रवादाची बीजारोपण करून गेली.
भाजपचा राष्ट्रवाद हे त्यांच्या देशभक्तीचं प्रमाण असू शकते, पण ते बहुसंख्याकांचे नाही. त्यांचा हा राष्ट्रवाद बहुसंख्याकांना मान्य असावाच असं नाही. एका अर्थाने साडे तीन टक्क्याची संस्कृती बहुसंख्याकांची संस्कृती आहे, पर्यायाने मुसलमानांनी ते स्वीकारणे अपरिहार्य आहे, अशी मांडणी करण्यापर्यंत अलीकडे मजल गेली आहे. याचा दुसरा अर्थ असा की आम्ही जे सांगतो तोच राष्ट्रवाद असा प्रचार-प्रसार वाढला आहे. हाा कथित धर्मवादी राष्ट्रवाद बहुसंख्याकांच्या माथी मारण्याचं धोरण आखल जात आहे. या प्रक्रियेला चाप बसवण्यासाठी पर्यायी राष्ट्रवादाची मांडणी करणे गरजेचे झालंं आहे. याच दृष्टिकोनातून आज (रविवार, 11नोव्हेंबर) लातूरला पहिल्या ‘आझाद-इकबाल कॉन्फ्रेस’चं आयोजन करण्यात आलं आहे.
१९८०च्या दशकात भाजपने पर्यायी राष्ट्रवाद मांडून हिंदू हित म्हणजे राष्ट्रवाद अशी माडंणी केली, आज त्यालाच राष्ट्रवाद म्हणण्यात येत आहे. या हिंदू राष्ट्रवादाला पर्याय देण्यासाठी आझाद इकबाल कॉन्फ्रेसचे आयोजन 'गाजियोद्दीन रिसर्च सेंटर' तर्फे करण्यात आलं आहे. या परिषदेचं दुसरं उद्दिष्टे म्हणजे भारतातील मुस्लिम राष्ट्रपुरुषांना पुनर्जिवीत करणे होय.
फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा गेल्या काही दशकांपासून पुरोगामी चळवळीची वाहक झाली आहे. मुस्लिमातही अनेक महापुरुष झालेले आहेत. काही फुलेंच्या समकालीन होते, तर काहींनी शाहूंसोबत समाज प्रबोधनाचा विचार मांडलेला होता. आधुनिक भारतात तर अनेक मुस्लिम महापुरुषांची नावे घेता येतील. पण त्यांची पुनर्मांडणी झाली नसल्यामुळे ते विस्मृतीत गेलेली आहेत. फुले-शाहू-आंबेडकरचे बोट धरून ही राष्ट्रपुरुष पुनर्जीवत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आधुनिक भारतातील मुस्लिम महापुरुषांची नव्यानं पुनर्मांडणी करण्याचे आव्हान आमच्या पिढीनं स्वीकारलेलं आहे.
भाजपच्या कथित राष्ट्रवादाला शह द्यायचा असेल तर महापुरुषांना पुनर्जिवीत करण्याच्या प्रक्रियेत सर्व विवेकवादी चळवळींनी हातभार लावायची गरज आहे.
भाजपच्या राष्ट्रवादाने मुस्लिमच नव्हे तर सर्वच जातीय व धार्मिक अल्पसंख्याकांच्या सामाजिक व सांस्कृतिक अस्मितेला हादरे दिले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे.
भाजपच्या या कथित राष्ट्रवादाच्या प्रवासाची प्रक्रिया पाहिली तर ९०च्या दशकात तो ज्या जोमाने पुढे आला त्याला पुरक अशी अनेक घटना त्याकाळी घडल्या होत्या. दुसरं म्हणजे काँग्रेसप्रणित भारतीय राष्ट्रवादाला प्रतिक्रिया म्हणून हो हिंदू राष्ट्रवाद मांडण्यात आला होता. राजकीय भाष्यकारांच्या मते हा पर्यायी राष्ट्रवाद नसून तो हिंदू जमातवाद होता. या जमातवादाला राष्ट्रभक्तीचे स्वरूप मिळून भाजप सांगेल तोच राष्ट्रवाद अशी भ्रामक कल्पना मांडली गेली.
थोडसं मागे जाऊन पाहिलं तर हिंदू जमातवादाची (राष्ट्रवादाची) मुळं वसाहतकाळात रुजलेली आढळतात. राजकीय विचारवंत यशवंत सुमंत यांच्या मते, '१९४७ पूर्वी काँग्रेसप्रणित राष्ट्रवाद हाच एकमेव राष्ट्रवाद होता असे नाही तर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, संमिश्र संस्कृतीवर आधारीत राष्ट्रवादास विरोध करणारा हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रवादही स्वातंत्र्यपूर्व वसाहतकाळातच उदयास आला होता.'


स्वातंत्र्योत्तर काळा युरोपियन राष्ट्रवाद भारतीयांच्या माथी मारण्यात आला. भारताच्या भू-सांस्कृतिक, बहुधर्मीय व सामाजिक संरचनेनुसार राष्ट्रवादाची मांडणी अपेक्षित होती, पण तसं झालं नाही.
ब्रिटिशकाळात हिंदू राष्ट्रवादाचे धुरीण विविध प्रकारे सत्तेचा लाभ घेत होते. ब्रिटिश सत्तेच्या जवळ असणाऱ्या या वर्गाने राष्ट्रवादाच्या आधारे जमातवादाच्या (राष्ट्रवाद) मांडणीत केलेली प्रगती धोकादायक आहे.
काँग्रेसविरोध व मुस्लिमांचा अनुनय ही भाजपप्रणित राष्ट्रवादाचे विस्तारित स्वरुप होतं. मंडल कमिशनच्या शिफारशींच्या विरोधाला राम जन्मभूमी आंदोलनात रुपांतरीत करणे हे हिंदू जमातवादाचे नवं स्वरुप होतं. राम जन्मभूमूचं आंदोलन (बाबरीचा विरोध) मुस्लिमविरोधावर आधारित राहिला. त्यातूनच इतिहासातील अन्य मुस्लिम प्रतिकं नष्ट करणे, त्यांचे विकृतीकरण करणे त्याला हिंदू धर्म नष्ट करण्याची मोहिम म्हणत द्वेषभावना भडकावणे आदी अयाम जोडले गेले. बाबरी विध्वंसानंतर हिंदू हित, हिंदू संघटना, हिंदूंचे सैनिकीकरण, हिंदूंचे सामाजिक हीत हेच राष्ट्रवाद म्हणत तशी मांडणी सुरू झाली. हिंदू संस्कृती बहुसंख्याकाच्या माथी मारण्यातून असे विविध अयाम त्यास मिळत गेले. हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती अशी मांडणी त्याचकाळापासून सुरू झाली. ही भारतीय संस्कृती हेच हिंदुत्व आणि तेच राष्ट्रीयत्व, अशी या राष्ट्रवादाची मुख्य मांडणी होती.
भाजपचा हा राष्ट्रवाद राष्ट्रवाद नसून तो जमातवाद आहे हे सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोदीप्रणित भाजप सरकारमध्ये शोषित गटांची बाजू मांडणे म्हणजे देशद्रोह झालेला आहे. दलित, अल्पसंख्याकांच्या मानवी अधिकाराबद्दल बोलले की ते अनुनय मानला जात आहे, भाजप सरकारच्या जाचक धोरणाविरोधात बोलले की तो राष्ट्रद्रोह म्हणून प्रचारित केला जात आहे. वंदे मातरम, भारत माता की जय, मदरशांवर तिरंगा फडकावणे, सिनेमागृहात राष्ट्रगीतावेळी उभं राहणे देशभक्ती समजली जात आहे. जीवे मारण्याच्या धमक्या, महिलांविरोधात अश्लिल शेरेबाजी, माय-बहिणीला बलात्काराची धमकी देणे ही दुष्कृत्य देशप्रेमात बसवली जात आहेत.
गेल्या साडे चार वर्षांचा कालावधी पाहिला तर असं लक्षात येईल की गायींच्या संरक्षणार्थ माणसांवर हल्ले करणे, त्यांना जीवे मारणे हिंदू संस्कृतीचे जतन करणे असून तोच आमचा राष्ट्रवाद आहे, अशा प्रकारची मांडणी केली जात आहे. धर्मवाद पोसून त्याला राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याचा प्रघात पाडला जात आहे. सरकारचा वरदहस्त असल्यानं जमातवादाला राष्ट्रवाद म्हणून पोसण्यात यश आलं आहे. सरकारी अधिकाराचा गैरवापर करून हा जमातवादाचा दहशतवाद पसरवला जात आहे. या राष्ट्रवादाला पर्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन ही प्रक्रिया सुरु केली आहे. हा लढा आमच्या एकट्याचा नसून सर्वच विवेकशील भारतीयांंचा आहे. या लढ्यात सामील होऊन ऐकमेकांचे हात बळकट करू या..!

- कलिम अज़ीम
अंबेजोगाई

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget