एक वेडेपणा, एक भयावह अराजकता, का कुणास ठाऊक या देशाच्या अनेक भागांमध्ये पसरत चालली आहे. गोहत्येची अफवेमुळे कुणा निरपराधाची हत्या होते तर कुठे मुले चोरण्याच्या आरोपाखाली कुणा निष्पापाला ठार मारण्यात येते. हे फक्त जमावाच्या वेडेपणामुळे घडलेल्या घटना नाहीत. त्या वारंवार घडत आहेत. याचा अर्थ त्यांना नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेचे आणि त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजाचे काही पूर्वनियोजित मनसुबे असायला हवेत. गेल्या सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात जे काही घडले त्यामुळे तर या वेडेपणाच्या या कथेमध्ये एक नवीन अध्याच जोडला गेला. यामुळे येथील जनतेमध्ये नवनवीन चिंता जागृत होऊ लागल्या आहेत. या जनसमूहाने गोहत्येवरून अराजकता माजविणाऱ्यांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. गेल्या काही महिन्यापासून अशा प्रकारच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही.
बुलंदशहर हिंसाचारात असे असामाजिक तत्त्व सक्रिय होते. अधिकाराचा दर्प असे याचे विश्लेषण करता येईल. व्यवस्थाशून्य वातावरणात समाजातील एका घटकास सत्ता आपल्याच हाती असल्याचे वाटू लागते आणि काहीही केले तरी कोण आपणास हात लावणार असा त्याचा समज होतो. आपल्यासारख्या देशात दुर्दैवाने तो खराही असतो. या आणि अशा हिंसाचाराचा उपयोग सत्ताकारणासाठी झाल्याचा इतिहास असेल तर मग विचारायचीच सोय नाही. त्यातून हा समाज बेमुर्वतखोर होतो आणि विनाकारण हिंसाचार करू लागतो. बुलंदशहरात हे असे घडले. ज्या प्रदेशात एखादा समुदाय जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनाच लक्ष्य करतो तेव्हा ते दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थितीचे निदर्शक असते. ज्या जमातीच्या नेत्यांहाती सत्तेची दोरी त्या जमातीचे गुंडपुंड सर्रास सरकारी यंत्रणेस बटीक बनवीत. अशा ठिकाणी पोलिसांवरही सहज हात टाकला जात असे. कारण कोण आपणास अडवणार, ही भावना. बुलंदशहरातील हिंसाचारामागे ती ठसठशीतपणे आढळते. या हिंसाचारात प्राण गमावलेल्यांतील पोलीस अधिकारी हिंदू आहे आणि दुसरी व्यक्तीही अल्पसंख्य समाजातील नाही. तसेच ज्याने कायदा हाती घेतल्याचा आरोप आहे तोदेखील याच हिंदू समाजाचा भाग आहे. किंबहुना सदर संबंधित आरोपी तर एका धर्माभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. हिंसाचाराचा आरोप असलेला आणि हिंसाचारात बळी पडलेला हे दोघेही हिंदूच. यात लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे मारल्या गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोवंश हत्या प्रकरणातील भूमिका. तीन वर्षांपूर्वी, २०१५ साली, उत्तर प्रदेशातच घडलेल्या दादरी गोवंश हत्या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची तत्परता बुलंदशहरात बळी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवली होती. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून त्या वेळी दादरी गावातील महंमद अखलाख यास जमावाने ठेचून मारले. त्यातील आरोपींना ज्या पोलीस अधिकाऱ्याने कार्यक्षमता दाखवून जेरबंद केले तोच अधिकारी बुलंदशहरात मारला गेला यास केवळ योगायोग मानणे अगदीच भाबडेपणा ठरेल. या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने मंगळवारी केलेले भाष्य हेच दर्शवते. धर्माच्या नावावर आपण कधीही कोणाचा विद्वेष करू नये असे वडील सांगत, असे या अधिकाऱ्याचा बारावीत शिकणारा मुलगा म्हणतो. प्रस्तुत वातावरणात तो अत्यंत रास्त म्हणावा लागेल. याचे कारण धार्मिक विद्वेष, पाठोपाठ येणारा हिंसाचार आणि त्याचा राजकीय परिणाम याचे म्हणून एक समीकरण उत्तर प्रदेशात दिसते.
याच राज्यातील मुझफ्फरनगर येथे तरुणीच्या छेडछाडीच्या कारणावरून पसरलेल्या धार्मिक विद्वेषाचे लोण इतके पसरले की त्यात साठ जणांचे जीव गेले. ही घटना २०१३ सालातील. ताजा हिंसाचार ज्या शहरात उसळला ते बुलंदशहर हे पश्चिम उत्तर प्रदेशातच येते या योगायोगाकडे कसा काणाडोळा करणार? ब्रिटिशकालीन भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणीतील काडतुसांना गाईची चरबी लावली जाते या संशयावरून हिंदू शिपायांनी बंड केले. त्या वेळी त्यास काही ठाम अर्थ होता आणि त्या कृतीमागे देशप्रेम होते. आज गो-हत्येच्या संशयावरून प्राण घेतले जातात, यामागील अर्थ शोधणे अवघड नाही आणि त्यास देशप्रेम म्हणता येणार नाही. परंतु १८५७ ते २०१८ या काळात आपला प्रवास कोठून कुठपर्यंत झाला हे मात्र यातून दिसते आणि ते निश्चितच अभिमानास्पद नाही. या घटनेमध्ये रक्षकांनाच भक्ष बनविण्यात आले आहे. समाजात अराजकता माजविणाऱ्यांचे मनसुबे फारच विकोपाला पोहोचल्याचा हा बोलका पुरावा आहे.
पोलिसांना या प्रकरणात दोषींना पकडण्यात यश येईल की नाही? हे आता पाहायचे आहे. त्यांना यश मिळेल त्यासाठी त्यांना जुन्या पद्धतींना तिलांजली द्यावी लागेल आणि राजकारणाशीदेखील दोन हात करावे लागतील. असे घडले तर पोलिसांना नवीन आत्मविश्वास प्राप्त होईल. जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये नवीन उदाहरणदेखील सादर होईल. याचबरोबर समाजासमोर या गोष्टीचेदेखील आव्हान आहे की समाजात भावना भडकविण्याचे कुकर्म करणाऱ्यांच्या कारस्थान सामोरे जावे लागेल.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment