Halloween Costume ideas 2015

कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ असल्याचे ९ ठोस वैज्ञानिक पुरावे

-एम.आय.शेख

जेव्हा बुद्धीजीवी माणसे या ब्रह्मांडाच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, ही रचना अतिशय चिकित्सीय पद्धतीने केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की, ज्या अल्लाहने मानवाला बुद्धी देऊन वैचारिक शक्ती दिली, त्या बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती दिली, त्याला तमीज (शिष्टाचार) ने वागण्याची उर्मी दिली, त्याने त्या सगळ्या शक्तींचा वापर कसा केला? यासंबंधी त्याला विचारपूसही केली जाणार नाही.
त्याला पुण्य केल्यावर पुरस्कार व पाप केल्यावर शिक्षा दिली जाणार नाही, हे कसे शक्य आहे? ब्रह्मांडाच्या रचनेवर अशा प्रकारे जे विचार करतात त्यांचा आखिरतवर विश्वास बसतो व ते अल्लाहने तजवीज (प्रस्तावित) केलेल्या शिक्षेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात.” (अर्थात आपल्या जीवनात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करतात.) (संदर्भ : सय्यद अबुल आला मौदुदी, तफहिमल कुरआन खंड-१, पान क्र. ३११).
        वरील विचार बुद्धीजीवी माणसांना पटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या संबंधी विस्तृतपणे विचार करणे अप्रस्तुत होणार नाही. पृथ्वीवर माणसाचे आगमन झाल्यापासूनच तो निसर्गातील अनेक शक्तींचा वापर करत आलेला आहे. हा वापर त्याने अतिशय विचारपूर्वक केलेला आहे. त्यातूनच त्याला धर्माची गरज भासू लागली. पृथ्वीवर अवतरित झालेल्या पहिल्या जोडप्याच्या शुद्ध एकेश्वरवादाच्या धार्मिक संकल्पना या कालौघात मागे पडल्या व जसजसा मानववंश वाढत गेला तसतसे नवे धर्म उदयास आले.
    सहाव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी पृथ्वीवर अवतरित झालेल्या पहिल्या जोडप्याच्या मूळ धर्माची म्हणजेच इस्लामची पुर्नस्थापना केली. कालौघात विकृत झालेल्या धार्मिक विचारांची शुद्ध स्वरूपात पुनर्मांडणी केली. ही मांडणी कुरआन या ग्रंथावर आधारित होती. कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे, म्हणूनच त्यात एका शब्दाचा तर सोडा, काना मात्राचाही बदल करता येत नाही, हा ईश्वरीय ग्रंथ असल्यामुळे सर्व प्रकारच्या त्रुटींपासून तो मुक्त आहे, असा मुस्लिमांचा ठाम विश्वास व दावा आहे. मात्र यासंबंधी चर्चा जास्त व समज कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच या आठवड्यात आपण कुरआन हा खरोखरच ईश्वरीय ग्रंथ आहे का? याचा वैज्ञानिक पद्धतीने आढावा घेऊया. कारण ज्या क्षणी माणसाच्या बुद्धीला पटेल की हा खरोखरच ईश्वरीय 
 ग्रंथ आहे, त्या क्षणापासून या ग्रंथाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टीकोणच बदलून जाईल.
    आज जागतिक पातळीवर अनेक धर्म अस्तित्वात आहेत. प्रत्येक धर्मात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला धर्म प्रिय असतो. म्हणून तो वैज्ञानिक कसोटीवर आपल्या धर्माच्या पुस्तकांना कसू इच्छित नाही. अनेक अंधश्रद्धांचे पालन कुठल्याही पुराव्याशिवाय धर्मकार्य समजून केले जाते. धर्मचिकित्सा महाकठीण कार्य आहे. या बाबतीत लोक इतके संवेदनशील असतात की प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा ऐकत नाहीत. मात्र इस्लामचे तसे नाही. हा धर्म इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. तो तर्काच्याच नव्हे तर विज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा खरा उतरतो. पुराव्याची भाषा बोलतो. हा धर्म ज्या कुरआनवर आधारित आहे तो ईश्वरीय ग्रंथ आहे. याचे ९ वैज्ञानिक दाखले मी आज वाचकांच्या प्रज्ञेच्या कोर्टापुढे मांडणार आहे.
पुरावा क्रमांक - १
    “काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?” (संदर्भ : कुरआन - सुरह अल्अंबिया- आयत क्रमांक ३०)
    या आयातीमध्ये दिले गेलेले जबरदस्त आव्हान पाहा! यात मानवजातीला विचार करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. यात दोन वैज्ञानिक सत्य मांडलेली आहेत. जी सहाव्या शतकात जेव्हा कुरआन अवतरीत झाले तेव्हा सभ्य जगाला माहित नव्हती. एक - आकाश व पृथ्वी एकसंघ होते व नंतर ते विभक्त झाले. हीच गोष्ट अगदी अलिकडे बिग बँग थेअरीच्या स्वरूपात जगाला कळाली. शिवाय माकडापासून मनुष्याची उत्पत्ती झाली असे मानणाऱ्या जगाला सहाव्या शतकात कुरआनने असे सांगितले की, अल्लाहने प्रत्येक जीवाची निर्मिती पाण्यापासून केली. आपण सर्व जाणून आहात जीवनाचे मूळ पाण्यात आहे. पाण्यापासून सुरूवातीला पेशी तयार होतात व पेशीच्या समुच्चयातून जीव तयार होतात. पण १४३९ वर्षापूर्वी हे सत्य कोणालाच माहित नव्हते. कुरआन ईश्वरीय ग्रंथ असल्याचा हा पहिला पुरावा आहे. जगामध्ये विज्ञानाला जी गोष्ट अलिकडच्या शतकात कळाली ती कुरआनने सहाव्या शतकात वर नमूद आयातीमध्ये सांगितलेली आहे.
पुरावा क्रमांक - २
    “आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट संकेतचिन्हे व सूचनेसहीत पाठविले, आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरविली जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावे, आणि लोखंड उतरविले ज्यात मोठे बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत, हे अशासाठी केले गेले आहे की अल्लाहला माहीत व्हावे की कोण न पाहता त्याला व त्याच्या पैगंबरांना मदत करतो. निश्‍चितच अल्लाह मोठा बलवान आणि जबरदस्त आहे.” (कुरआन : सुरे अल्हदीद आयत नं. २५)
    मागील सहा हजार वर्षांपासून मानव लोखंडाचा वापर करत आहे. बॅबीलोन, इजिप्त, चीन, भारत, युनान आणि रोमन संस्कृतीमध्ये लोखंडाचा वेगवेगळ्या स्वरूपात वापर केला जातो. मात्र प्रत्येकजण हे समजत होता की, लोखंड पृथ्वीच्या गर्भात तयार होते. आजही अनेक लोकांचा हाच गैरसमज आहे. मात्र १८ व्या शतकात जापानच्या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम असा दावा केला की, लोखंड हे पृथ्वीच्या गर्भात निर्माण होत नसून ते आकाशातून उल्कापिंडाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतो आणि शेकडो वर्ष मातीत दबून राहिल्यानंतर त्याचे रूपांतर लोखंडात होते. या संदर्भात कोणाला शंका वाटत असेल तर लोखंडाच्या निर्मिती संबंधीच्या वैज्ञानिक पुस्तकांचे त्यांनी अवलोकन करावे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, लोखंड हे आकाशातून आम्ही पृथ्वीवर उतरविले, असा दावा कुरआनने सहाव्या शतकात कसा काय केला? याचाच अर्थ हा ग्रंथ ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ३
    “काय ही वस्तूस्थिती नाही की आम्ही पृथ्वीला बिछाना बनविले, आणि पर्वतांना मेखांसमान रोवले” (कुरआन : सुरह अन्नबा - आयत नं. ६ आणि ७)
    आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोल आहे. परंतु प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत की ती आपल्यासाठी बिछान्या (अंथरूणा) सारखी सपाट आणि सरळ आहे. पृथ्वीवर उंच-उंच दिसणारे पर्वत वास्तविक पाहता मेख रोविल्यासारखे पृथ्वीच्या आत खोलवर रोवलेले आहेत. केवळ दगड-मातीचा ढिगारा पृथ्वीवर ठेवलेला आहे, अशी त्यांची रचना नाही. या संदर्भात फ्रँक प्रेस नावाच्या भूगर्भ वैज्ञानिकाने ‘अर्थ’ नावाच्या आपल्या पुस्तकात हा दावा केलेला आहे की, डोंगर हे पृथ्वीमध्ये खोल मेकीसारखे रोवलेले आहेत. संशोधनाअंती त्याने हिमालयाबद्दल म्हटलेले आहे की, हिमालयाची उंची पृथ्वीपासून वर जवळ-जवळ ९ किलोमीटर आहे. मात्र हिमालयाचा पाया जमीनीमध्ये १२५ किलोमीटर खोल आहे. हा सुद्धा आधुनिक वैज्ञानिक शोध आहे. मग ही बाब सहाव्या शतकात कुरआनमध्ये कशी आली? स्पष्ट आहे हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ४
    “आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.” (संदर्भ : कुरआन - सुरह अ़ज़्जरियात आयत नं.४७)
    प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग यांनी आपले पुस्तक ’ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ मध्ये लिहिलेले आहे की, युनिव्हर्स (ब्रह्मांड) हे असिमीत आहे व त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. हा ग्रंथ विसाव्या शतकात आलेला आहे. मात्र कुरआनमध्ये अल्लाहने ब्रह्मांड स्वसामर्थ्याने बनविण्याचा दावा सहाव्या शतकात केलेला आहे. अर्थात जी गोष्ट जगाला विसाव्या शतकात कळाली ती कुरआनमध्ये सहाव्या शतकात नमूद केलेली आहे. म्हणजेच कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ५
“आणि तो अल्लाहच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनविले आणि सूर्य व चंद्र निर्माण केले. सर्व आपापल्या नभोमंडळात मार्गरत आहेत.”(कुरआन: सुरह अल्अंबिया, आयात नं. ३३).
    १५१२ मध्ये ऍस्ट्रॉनॉमस निकोलस कोपर्निकस याने दावा केला होता की, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह तारे त्याच्या भोवती प्रदक्षिणा करीत आहेत. विसाव्या शतकापर्यंत कोपर्निकसचा हाच विचार सर्वमान्य वैज्ञानिक विचार होता. मात्र विसाव्या शतकामध्ये वैज्ञानिकांच्या हे सत्य लक्षात आले की, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर नसून तो ही ब्रह्मांडात फिरत असतो. जी गोष्ट विसाव्या शतकात वैज्ञानिकांना कळाली त्याचा दावा कुरआनने सहाव्या शतकात केला. याचाच अर्थ कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ६
“अथवा त्याचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छदिली आहे, त्यावर आणखी एक लाट, आणि तिच्यावर ढग, अंध:कारावर अंध:कार आच्छादित आहे, माणसाने हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लाहनेच प्रकाश प्रदान केला नाही त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. (कुरआन : सूरह नूर, आयत नं. ४०)
     गुन्हेगार माणसांचे वर्णन करताना वर प्रमाणे आयत अवतरित झालेली आहे. भारताचे वीसाव्या शतकाच्या साठाव्या दशकातील एक रोचक घटना आपल्याला सांगण्याचा मोह आवरत नाहीये. त्या काळात फ्रान्समध्ये भारताचे राजदूत महेमूद बे. मिस्त्री नेमणुकीस होते. त्यांनी एक तपशीलवार घटना अशी सांगितली की, डॉ. घारिनीया नावाचे पॅरिसमध्ये राहणारे एक सज्जन गृहस्थ होते. ते अतिशय सहृदयी आणि सेवाभावी वृत्तीने आपली वैद्यकीय सेवा बजावत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे लोकांनी त्यांना फ्रान्सच्या संसदेमध्ये निवडूणसुद्धा दिले होते. निवडूण आल्यानंतर एकदा कुरआनच्या फ्रान्सीसी भाषेतील भाषांतरीत ग्रंथाचे विवेचनाच्या कार्यक्रमात ते गेले. त्या ठिकाणी त्यांना कुरआनची एक प्रत भेट म्हणून देण्यात आली. तेव्हा त्यांनी सहज कुरआन चाळली असता त्यांची नजर वरील आयातीवर पडली. ती आयात वाचून ते अतिशय अभिभूत झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या वाचनात आले की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कधीच समुद्री प्रवास केला नव्हता. तेव्हा मात्र ते बेचैन झाले. त्यांनी प्रेषित सल्ल. यांनी खरोखरच कधीच समुद्र प्रवास केला नव्हता काय, याची खात्री केली व त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी सरळ इस्लामचा स्विकार केला. जेव्हा पत्रकारांनी त्यांना इस्लाम धर्म का स्विकारला म्हणून विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ” माझे वडील खलाशी होते. त्यांचा माझ्या आईबरोबर मतभेद झाल्याने ते विभक्त झाले व माझा सांभाळ माझ्या वडिलांनी केला. त्यांच्याबरोबर माझ्या बालपणाचा एक मोठा कालावधीत समुद्रात गेला. समुद्री वातावरणामध्ये येणाऱ्या प्रत्येक बदलाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. सुरे नूरच्या आयात नं. ४० मध्ये अंधाऱ्या रात्री समुद्रात वादळ आल्यानंतर काय अवस्था असते? याचे अगदी तंतोतंत वर्णन केलेले आहे. जेव्हा मला ही वस्तुस्थिती कळाली की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कधीच समुद्र प्रवास केला नाही तेव्हा माझ्या लक्षात आले की, हा ग्रंथ त्यांनी लिहिलेलाच नाही. कारण ज्या माणसाने कधी समुद्र प्रवास केलाच नाही तो समुद्रातील काळ रात्रीचे इतके नेमके वर्णन करूच शकत नाही. म्हणजेच हा ईश्वरीय ग्रंथ आहे. म्हणून मी इस्लाम स्विकारला आहे.
 पुरावा क्रमांक - ७
    “कदापि नाही, जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याला, कपाळाचे केस धरून ओढू, त्या कपाळाचे जे खोटारडे व मोठे गुन्हेगार आहेत. (कुरआन : सुरह अल्अल़क- आयत नं. १५, १६).
    या आयातीमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत. कपाळाचे केस धरून ओढू. हे जे म्हटलेले आहे, यात आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की, माणसाच्या सर्व ऐच्छिक वैचारिक घडामोडी मेंदूच्या पुढच्या भागात घडतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ऍनॉटॉमी आणि फिजिओलॉजीच्या पुस्तकामध्ये मेंदूच्या या भागातील घडामोडीबद्दल म्हटलेले आहे की, माणसाच्या सर्व ऐच्छिक घडामोडी मेंदूच्या पुढच्या भागात घडतात. माणसाला जेव्हा खोटं बोलायचं असतं तेव्हासुद्धा मेंदूच्या याच भागात रासायनिक प्रक्रिया होत असते. पेन्सिलवानिया विद्यापिठामध्ये केलेल्या अभ्यासात खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या इंट्रॉगेशन (विचारपूस) ची जेव्हा संगणकीय चिकित्सा केली गेली तेव्हा लक्षात आले की, खोटे बोलत असतांना खोटे बोलणाऱ्या माणसाच्या मेंदूच्या पुढच्या भागात प्रचंड उलथापालथ होत होती. ही आश्चर्यजनक बाब आहे की, सहाव्या शतकामध्ये कुरआनमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, खोटारड्या माणसाच्या कपाळाचे केस ओढून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचाच अर्थ हा ग्रंथ ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ९
    “ज्या लोकांनी आमची संकेतवचने मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ आणि जेव्हा त्यांच्या शरीराची त्वचा गळून पडेल तेव्हा त्या जागी दूसरी त्वचा निर्माण करू जेणेकरून ते प्रकोपाचा खूपच आस्वाद घेतील, अल्लाह खूप समर्थ आहे आणि आपल्या निर्णयांना अंमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो.” (कुरआन : सुरह - अन्निसा, आयत नं. ५६)
    अगदी अलिकडच्या काळापर्यंत व आजही अनेक लोकांचा असा समज आहे की, भाजल्याच्या वेदना ह्या मेंदुमध्ये जाणवतात. मात्र जीवशास्त्राच्या वैज्ञानिकांनी हे मान्य केलेले आहे की, जळाल्या/भाजण्याच्या वेदना या मेंदूमध्ये जाणवत नसून त्वचेमध्ये जाणवतात. म्हणूनच कुरआनने गुन्हेगारांच्या जळालेल्या त्वचेवर पुन्हा नवीन त्वचा देऊन त्यांना पुन्हा जाळण्यात येईल, अशी तंबी दिलेली आहे. आधुनिक जीवशास्त्राला जी गोष्ट अलिकडे कळाली तिचा दावा कुरआनने सहाव्या शतकात कसा केला? याचाच अर्थ कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ९
    “आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित आच्छादन बनविले. परंतु हे सृष्टीच्या संकेतांकडे लक्षच देत नाहीत.” (कुरआन : सुरह अल् अंबिया, आयत नं. ३२)
     सूर्यामध्ये प्रचंड उर्जा असते. सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान अनेक अच्छादनाचे आकाश आहे. हे असे वैज्ञानिक सत्य आहे ज्याचा अलिकडे शोध लागलेला आहे. आकाशाची रचना अशी आहे की, ती जरासुद्धा विस्कळीत झाली तर पृथ्वीवरील जीवन छिन्न विछिन्न होऊन जाईल. आकाशाचे आवरण सैल झाले तर पृथ्वीपर्यंत सूर्याची तप्त किरणे इतक्या मोठ्या प्रमाणात येतील की पृथ्वीवरील सर्व जीवन जळून भस्म होऊन जाईल व हे आवरण जरासुद्धा घट्ट झाले तर पृथ्वीवरील जीवन बर्फाने थिजून नष्ट होऊन जाईल. आकाशाची रचना पृथ्वीवर एका ब्लँकेटसारखी केलेली आहे. ज्यातून तेवढीच उर्जा पृथ्वीला मिळते जेवढी तिला आवश्यक आहे. हा दावा सहाव्या शतकात कुरआनने केलेला आहे, जो की काल परवापर्यंत आधुनिक विज्ञानाला माहित नव्हता. म्हणजेच कुरआन हा ग्रंथ ईश्वरीय आहे.
    हे मान्य आहे की, कुरआन हा विज्ञानाचा ग्रंथ नाही. परंतु तो विज्ञानाशी सुसंगत असा ग्रंथ आहे. त्यात विज्ञानाच्या विरोधात कुठल्याच गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. या तर झाल्या भौतिक विज्ञानाच्या गोष्टी. कुरआनमध्ये मनोविज्ञानाशी सुद्धा सुसंगत अशा अनेक आयाती आहेत, ज्या मानवाला एक नैतिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचा समावेश जागेअभावी या लेखात करणे शक्य नाही. भौतिक विज्ञान आणि मनोविज्ञान यातील मुलभूत तत्वे कुरआनमध्ये सहाव्या शतकात योगायोगाने आली असा दावा कुठलाही बुद्धीमान माणूस करू शकणार नाही. स्पष्ट आहे वरील सर्व वैज्ञानिक गोष्टी अल्लाहने प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्यापर्यंत जिब्राईल अलै सलाम या फरिश्त्या (ईशदूत) मार्फत पोहोचविलेल्या आहेत. कुरआन एक असा ग्रंथ आहे की, जो फक्त विज्ञानाशी सुसंगतच नाही तर आपल्या आत्म्याशी, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुशी निगडीत आहेत. कुरआनमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचे कोट्यावधी लोकांनी पालन केलेले नाही व आजही करीत नाहीत. मात्र हे श्रद्धाहीन लोक त्याचे मूल्य अनेक प्रकारची हानी सहन करून चुकवित आहेत. हा ग्रंथ सर्वांसाठी आहे, फक्त मुस्लिमांसाठी नाही. जो कोणी कुरआनचे मार्गदर्शन स्विकारेल तो स्वच्छ, नैतिक आणि यशस्वी जीवन जगेल. आणि जो कोणी याच्या मार्गदर्शनाचा अस्विकार करेल, त्याला नक्कीच त्याचे मूल्य चुकवावे लागेल. इतिसिद्धम !   

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget