Halloween Costume ideas 2015

अस्पृश्यतेविरूद्ध इस्लामचा लढा

दिनांक ८ सप्टेंबर रोजी मराठी वृत्तपत्रांमध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून आलेली एक बातमी वाचून मन खिन्न  झाले. लाखो लोकांचा अवमान करणारी व माणुसकीला कलंक लावणारी ही बातमी अशी- पुण्यातील उच्च पदवीधर महिला व हवामान  खात्याच्या माजी संचारिका डॉ. मेधा खोले यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या एक गरीब महिला निर्मलाबाई हिच्या विरोधात  पोलीस ठाण्यात फिर्याद केली आणि तिच्याविरूद्ध फसवणूक, हल्ला करणे आणि धमकावणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला. आता प्रश्न असा की या गरीब महिलेचा गुन्हा तरी काय? तर ही महिला मराठा जातीची आहे. म्हणजेच डॉ. खोलेंनुसार शूद्र  आहे आणि डॉ. खोले ब्राह्मण. एका शूद्राने ब्राह्मणाच्या घरात प्रवेश करून पाप केले आणि सोवळ्याचा नियम मोडला म्हणून या  उच्चशिक्षित महिलेने गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले.
एकविसाव्या शतकात या मानसिकतेला काय म्हणावे? पण हे  सत्य आहे की आज पण हिंदीभाषिक प्रदेशात व राजस्थानमध्ये लाखो लोकांना अशीच अवमानकारक वागणू दिली जाते आणि त्यांना  ती सहन करावी लागते. कधी कधी माध्यमांना असे वाटते की ही पण एक बातमी आहे म्हणून ते प्रकाशित करतात. गुजरातमध्ये  उनीची घटना त्याचे ताजे उदाहरण आहे.
आता आपण थोडा विचार करावा की शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा भारतात लोकशाही नव्हती. राजेशाही पद्धतीने देशाचा कारभार चाललेला होता. राजाला प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी ज्योतिषाचा म्हणजेच ब्राह्मणाचा सल्ला घ्यावा  लागत असे. म्हणजे राजाच्या प्रत्येक निर्णयाला ब्राह्मणाची परवानगी आवश्यक होती. अशा काळात शूद्रांची काय अवस्था होती याचा  अंदाज लावणे कठीण नाही. त्यांना बाजारात येण्याचा अधिकार नव्हता, त्यांना विहिरीतून पाणी नेण्याचा अधिकार नव्हता, त्यांना  घोड्यावर बसण्याचा, सार्वजनिक ठिकाणी येण्याचा, सकाळी घराबाहेर पडण्याचा अधिकारसुद्धा नव्हता. एका माणसाचा जन्म शूद्र  जातीत झाला तर त्याला काय सहन करावे लागत असे हे आपण संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचून अंदाज लावू शकतो. कधी कधी तर वाचताना अश्रू अनावर होतात!
आता अशा या अमानवी समाजव्यवस्थेमध्ये कुरआन हा संदेश घेऊन आला, ‘‘हे मानवा, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळग, ज्याने तुला एकाच जीवापासून निर्माण केले व त्यातून त्याचे जोडपे निर्माण केले आणि त्या दोघांपासून असंख्य पुरुष आणि स्त्रिया जगभर  पसरविले.’’ (कुरआन)
अशा या अमानवी जातीव्यवस्थेवर आधारित समाजामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांचा हा संदेश पाहा, ‘‘कोणत्याही अरबाला एखाद्या  अरब नसलेल्या व्यक्तीवर, कोणत्याही प्रकारचे श्रेष्ठत्व नाही. गोऱ्याला काळ्यावर, काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही. तुम्ही सर्व  आदम (अ.) म्हणजे एकाच बापाची संतती आहात व आदम यांचा जन्म मातीपासून झाला.’’ (हदीस)
इस्लाम धर्माचा मानवतेवर आधारित हा संदेश ज्याने सर्व भेदभाव मुळापासून कापून टाकले. इस्लामप्रमाणे मानवाला हा अधिकार  मानव म्हणून प्राप्त आहे की जेणेकरून त्याच्या त्वचेचा रंग अथवा त्याचे जन्मस्थळ, त्याला जन्म देणारा वंश व जातीच्या आधारे  भेदभाव केला जाऊ नये. त्याला अन्य लोकांच्या तुलनेत नीच ठरविले जाऊ नये आणि त्याचे अधिकार इतरांपेक्षा कमी केले जाऊ नयेत. भारतातील जातीव्यवस्थेवर आधारित समाजामध्ये जेव्हा हा संदेश आला असेल तेव्हा लोकांनी किती स्वखुशीने त्याचा स्वीकार  केला. असेल! याचा अंदाज लावणे कठीण नाही. त्यांचे हिरावून घेतलेले मानवाधिकार बहाल करणारा हा संदेश होता. लाखो लोकांसाठी  जीवनदान ठरला, लाखो लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला, यात मुळीच शंका नाही. कारण इस्लामची मानवता, समानतेवर आधारित  शिकवणीमुळे प्रत्येक मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. कुरआनने सांगितले की प्रत्येक मानव ही अल्लाहची सर्वांत उत्तम कृती. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. या संदेशाने लोकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण केली आणि त्यांचा  आत्मविश्वास वाढला. यामुळेच जगभर इस्लामचा प्रसार झाला.
असे म्हटले जाते की भारतात इस्लामचा प्रसार तलवारीचा धाक दाखवून झाला. ज्या लाखो लोकांना जनावरांपेक्षा वाईट जीवन  जगण्यास भाग पाडले गेले होते त्यांना त्यांनी तलवारीचा धाक दाखविण्याची गरज होती की त्यात मानव म्हणून जगण्याचा अधिकार  बहाल करण्याची गरज होती. पण हा प्रचार याचसाठी की जर सांगण्यात आले की लोकांनी जातीव्यवस्थेला कंटाळून इस्लाम कबूल  केला तर लोक शोध घेतील की आमच्या पूर्वजांवर जुलूम करणारे कोण? आणि आमचा गुन्हा काय होता की आम्हाला हे सहन  करावे लागले? म्हणून इस्लाम तलवारीच्या साह्याने पसरविण्यात आला असे जाणूनबुजून रंगविण्यात येते.
जातीव्यवस्थेच्या विरोधात मुस्लिमांनी कसा लढा दिला आणि दलितांना कशा प्रकारे साथ दिली याचे दाखले पुढीलप्रमाणे आहेत.  महान समाजसेवक व लेखक साने गुरूजी यांनी आपले पुस्तक ‘मंदिर प्रवेशाची भाषणे व इतर’ मध्ये पृ. क्र. २७ वर ‘हरीजनास  मशिदीत आधार’ या शीर्षकाखाली लिहिले आहे, ‘‘पूर्वी खानदेशातील जळगाव शहरात काही हरीजन (दलित) एकदा मला म्हणाले, ‘‘गुरुजी आम्ही रात्री कुठे झोपलो माहीत आहे? आम्हाला राहायला खोली मिळत नाही. शेवटी मुस्लिम बंधुंच्या मशिदीत आम्ही  झोपलो. तेथे जागा मिळते दीड रुपया महिना मशिदीला आम्ही भाडे देतो.’’ त्यांचे शब्द ऐकून मला वाईट वाटले. आमच्यातील  काहींना मुस्लिमांचा राग येतो, परंतु आमच्या अस्पृश्य बंधुंस तेच आधार देतात. त्यांच्याच हॉटेलात त्यांना जेवण मिळते. त्यांची मशीद कृतार्थ झाली. तेथे तरी देवाची लेकरं देवाजवळ झोपली.’’
याच पुस्तकात साने गुरूजी आपला अनुभव सांगतात, ‘‘अमळनेरला माझ्या मित्रांनी हरीजन विद्यार्थ्यांचे लहानसे छात्रालय चालविले आहे. परंतु कित्येक वर्षे नीट जागा मिळेना. काही महिन्यांपूर्वी एका बोहरी व्यापाऱ्याने एका मुस्लिम बंधूने इमारत दिली. तुम्हा  आम्हास लाज वाटावी. कोट्यवधी हरीजनांस तुमच्याविषयी का प्रेम वाटावे?’’ आता विचार करा की ज्या लोकांना बाजारात येण्याचा,  विहिरीतून पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी मशिदीत राहण्यास जागा देणारे हे मुस्लिम बांधव! कारण इस्लामनुसार सर्व  मानवजात समान म्हणून द्वेष करण्याचे कारणच नव्हते. हे सगळे आमचे बांधव, ही मानसिकता इस्लामने घडविली आणि  जातीव्यवस्थेविरूद्ध लढा दिला आणि दलितांना आधार दिला. आता ज्या लोकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला त्यांना पण समान  अधिकार बहाल केले. त्याचे एक उदाहरण पानिपत हरियाणामध्ये मौलाना अब्दुल्लाह गजनवी राहत असत. त्यांच्या कुरआन, हदीस प्रवचनाला एक नवमुस्लिम दलित बांधव फार आवडीने येत असे. त्या काळात मशिदीत नळ नव्हते. एक विहीर होती. त्या  विहिरीतून सगळे लोक पाणी घेऊन वुजू करीत असत. मौलानांना जाणवले की नवमुस्लिम दलित बांधवाने विहिरीतून पाणी घेणे  काही लोकांना चांगले वाटले नाही. एक दिवस ते विहिरीजवळ आलगे. त्या नवमुस्लिम बांधवास विहिरीतून पाणी काढण्यास  सांगितले. त्याने बादलीभर पाणी काढले. मौलानांनी सांगितले, ‘पोटभरून पाणी प्या.’ तो पाणी प्यायला. त्याचे उरलेले पाणी मौलाना  स्वत: प्यायले. नंतर त्या बादलीतील पाणी उरलेले पाणी विहिरीत टाकले. मग सर्व लोकांनी वुजू केली आणि पाणी प्यायले. अशा  प्रकारे केवळ तोंडी उपदेश व समानतेवर प्रवचन न करता जे दोन पाच लोकांची मानसिकता खराब होती, तीदेखील बदलून टाकली. (संदर्भ : कुछ यादें कुछ बातें, मो. मुस्लिम)
सांगण्याचे तात्पर्य हेच की भारतीय जातीय  व्यवस्था संपविण्यात इस्लामचा सिंहाचा वाटा आहे. पण ते इस्लाम तलवारीच्या जोरावर  पसरला, हे रंगवून लोकांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण केली जाते, ही खेदाची बाब होय
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget