एम.आर.शेख
हरसाज में होती नहीं ये धुन पैदा, होता है बडे जतनसे ये गुण पैदा
मिजान-ए-निशातो-गममें सदियों पलकर होता है हयातमें तवाजुन पैदा
आजकाल विकास वेडा झालाय हे वाक्य खूपच लोकप्रिय झालेले आहे. विकासाचे तर माहित नाही मात्र देशातील अनेक लोकांचा विवेक वेडा झालाय हे मात्र निश्चित. ते कसे? हे आपण पाहूया.
सर्वप्रथम आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेऊ या. असा आढावा घेतांना फक्त भौतिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक प्रगतिचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. सामाजिक प्रगती मोजताना त्या समाजाची नैतिक परिस्थिती कशी आहे? हे पहावे लागेल. ती पाहण्यासाठी समाजातील लोकांच्या सवई कशा आहेत हे तपासावे लागेल. समाजात अधिक संख्या कशा लोकांची आहे? ते प्रामाणिक आहेत काय? त्यांच्यात जबाबदारीची जाणीव आहे काय? कर्तव्यकठोर कितपत आहेत? त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण आहे काय? श्रीमंत लोकांना गरिबांचा कळवला आहे काय? लोकांचे जीवन पवित्र आहे काय? पुरूषांना स्त्रीयांविषयी आदर आहे काय? आपल्याचसारख्या इतरमाणसांच्या जीवाची त्यांना कितपत पर्वा आहे? वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये एकात्मता आहे का? देश आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर आहे की नाही? संपत्ती निर्मिती मुठभर लोकांकडूनच होते की त्यात मोठ्या प्रमाणात देशातील लोक सामिल आहेत? संसाधने किती लोकांच्या हाती आहेत? आर्थिक विषमता किती आहे? कारण कितीही उत्पादन झाले तरी त्यांचे समान वितरण होत नसेल तर त्यात काहीच अर्थ राहत नाही. अनुत्पादक क्षेत्रात प्रगती होत आहे की उत्पादक क्षेत्रात प्रगती होत आहे? सिनेमा व इतर मनोरंजन क्षेत्रात कोटी-कोटींची उलाढाल होऊन हजारो सिनेमा तयार होत असतील तरी त्यांचा काहीच उपयोग नाही. कृषी व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या क्षेत्रात किती उत्पादन होत आहे? त्याचे वितरण कसे होत आहे? यावर सर्वसामान्यांचे जीवनमान अवलंबून असते.
या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार केला तर आपल्या देशात निर्मिती कमी नुकसान जास्त होत असल्याचे चित्रदिसेल. मनोरंजन, आय.टी. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशामध्ये प्रचंड उत्पादन होत आहे मात्र कृषी क्षेत्रात प्रगती कमी आहे. अनेक पॅकेजेस देऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पुणे, मुंबई सारख्या शहरांवर भार वाढत आहे. खेडी भकास आणि शहरे बकाल अशी स्थिती आहे. २०१४ साली सत्तांतर होऊन सुद्धा काहीही फरक पडलेला नाही. दाम दिल्याशिवाय सरकारी काम होत नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे.
या सगळ्या गोष्टी समाजाचे सामुहिक अधःपतन झाल्याने झालेल्या आहेत. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे प्रत्येक माणसाची अख्लाकी (नैतिक) पातळी कशी ऊंचावेल? यासाठी प्रयत्न करणे. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्याने विवेकशील वागावे. चांगल्या सवई जोपासाव्यात. विवेकाला विकासासारखा वेडा होऊ देऊ नये. तसे पाहता हे काम सहज शक्य नाही मात्र यासाठी इस्लामने एक परिपूर्ण व्यवस्था दिलेली आहे. देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता या संबंधी चर्चा करणे अप्रस्तुत ठरणार नाही.
इस्लामीअख्लाक
६ व्या शतकात इस्लामची घोषणा होण्यापूर्वी अरबस्थानातील जंगली टोळ्यांची नैतिक स्थिती अशीच होती जशी आजच्या सुसंस्कृत (?) समाजाची आहे. तेव्हाही लोक कन्याभ्रुणहत्या करीत होते, आजही करीत आहेत. तेव्हा सुद्धा एक टोळी दुसऱ्याला लुटत होती आजही समाजातील एक गट दुसऱ्याला लुटत आहे. तेव्हाही भ्रष्टाचार होता आजही आहे. किंबहुना वाढलेला आहे. ही लांबलचक यादी देण्यापेक्षा फक्त हजरत जाफर तय्यार रजि. यांचे ते चार वाक्य आपण पाहू जे त्यांनी हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर हबशचा राजा नज्जाशीसमोर उच्चारले होते. ते म्हणाले होते, ”हेराजा! नज्जाशी! आम्ही अडाणी होतो, मूर्ती पूजा करायचो, मुर्दाड खायचो, अश्लिलतेमध्ये जगायचो, स्वार्थासाठी रक्ताच्या नातेसंबंधांना तिलांजली द्यायचो, शेजाऱ्यांबरोबर अत्यंत वाईट वागायचो. थोडक्यात आमच्यापैकी जो बलवान होता तो कमकुवत लोकांना पिळायचा”
याशिवाय त्याकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला योद्धा रूस्तुमया जंगली अरबांविषयी काय सांगतो ते पहा, ”अनुशासन सामुहिक नैतिकतेचे दूसरे नाव आहे. ज्यांची अध्यात्मिक शक्ती जेवढी कमकुवत असते त्यांची सामुहिक नैतिकता तेवढीच कमकुवत असते. जर मुस्लिमांनी उच्चनैतिकतेचा उत्कृष्ट नमुना जगासमोर ठेवला नाही तर दूसरा कोणता समाज आहे जो असा नमुना ठेऊ शकेल? कोणीही नाही! इस्लामच्या शिकवणीचा अरबांसारख्या जंगली आणि उज्जड समाजावर किती चांगला परिणाम झाला हे त्याकाळातील जगात सभ्य समजल्या जाणाऱ्या संस्कृतीचा सेनापती रुस्तूमने जेव्हा पाहिले की युद्धाच्या मैदानात सुद्धा हजरत उमर रजि. अरबी मुस्लिमांना सरळ रांगेमध्ये उभे करून शिस्तीत नमाज अदा करायला लावत आहेत तर तो उद्गारला उमरनी तर माझे काळीज खावून टाकले, त्याने तर कुत्र्यासारख्या लोकांना शिस्त लावली” ( संदर्भः रूदाद भाग नं. ४, पान क्र. १२). वाईट प्रवृत्ती सहाव्या शतकात लोकांच्या अंगात इतकी भिनली होती की इस्लामचा स्विकार केल्यानंतर सुद्धा बराच काळ अनेक बद्दू (अशिक्षित अरब) लोकांना हे समजाऊन सांगून सुद्धा कळत नव्हते की दुसऱ्या टोळीतील लोकांना लुटण्यामध्ये वाईट ते काय? ते दुसऱ्यांना लुटणे आपला हक्क समजत. पण सदके जावां इस्लामवर की इस्लामचा स्विकार केल्यावर अरबस्थानातील हे अडाणी लोकच जगाचे मार्गदर्शक बनले. बॅडमॅनचे जन्टलमॅन बनले. लुटारूचे रूपांतरण मार्गदर्शकात झाले. हे केवळ त्यांच्या अंगामध्ये इस्लामी अख्लाक (सवई) भिनल्यानंतरच शक्य झाले. ईश्वरीय मार्गदर्शन किती महत्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी खालील वाक्य लक्षात घेणे आवश्यक आहे. “तुमच्या प्रवृत्तीला अल्लाह जेवढा जाणतो तेवढा दूसरा कोणी जाणू शकत नाही. तुम्ही स्वतः ही नाही. म्हणून त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला गत्यांतर नाही. दूसरी महत्वाची गोष्ट ही की, ज्याने तुम्हाला इस्तकरार-ए-हमल (आईच्या उदरात गर्भ) बनल्यापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सर्व छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली. तर हे मग कसे शक्य आहे की, तुम्ही कसे जगावे? या संबंधीचे तो मार्गदर्शन करणार नाही. तुम्ही जर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचे मोहताज (गरजू) आहात तर ते ईश्वरीय मार्गदर्शनाचे” (संदर्भः तफहिमुल कुरआन खंड १ पान क्र . २३२)
आज मोठ्या प्रमाणावर लोक इस्लाम धर्मात का दाखल होत नाहीत
मक्क्यामध्ये राहणारे अरबी लोक जरी अडाणी होते तरी ते मूर्ख खचितच नव्हते. त्यांनी प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैही वसल्लम यांचे जीवन अगदी जवळून पाहिले होते. ४० वर्ष त्यांच्यासोबत राहून त्यांना ”सादिक (खरा) आणि अमीन (विश्वासपात्र)” सारखी विशेषणे दिली होती. अशा सच्च्या वक्तीने (प्रेषितसल्ल.) जेव्हा इस्लामची घोषणा केली तेव्हा ज्यांचा स्वार्थ आडवा आला होता त्यांना खेरीज करून बाकी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात इस्लामचा स्विकार केला होता.
अनेक संस्थांच्या वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आलेली आहे की जगात सर्वात वेगाने वाढणारा धर्म इस्लाम आहे. आज ही जगभरात रोज अंदाजे २५०० लोक इस्लामचा स्विकार करतात. इतर धर्मांच्या तुलनेत ही गति अधिक आहे. पण इस्लामच्या सुरूवातीच्या काळाच्या तुलनेत ही गती मंद आहे. त्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर आहे मुस्लिमांची कमी झालेली विश्वासर्हता. जागतिक पातळीवर तसेच भारतातसुद्धा मुस्लिमांनी प्रेषित सल्ल.व त्यांच्या सहाबी रजि. च्या तोडीची तर सोडा त्यांच्या जवळपास पोहचेल इतपत सुद्धा विश्वासर्हता कमावलेली नाही. उलट आपल्या वर्तनाने कल्याणकारी इस्लामच्या प्रतिमेचे प्रचंड नुकसान केलेले आहे. म्हणून आज मोठ्या प्रमाणात लोक इस्लाममध्ये दाखल होत नाहीत. मिळेल त्या मार्गाने व पद्धतीने आपण पैसा कमावण्याच्या नादात नैतिकतेला तिलांजली दिलेली आहे. या स्थितीचे समर्पक वर्णन करताना डॉ.इक्बाल म्हणतात,
अहेद-ए-हाजीर मलेकुल मौत है तेरा जिसने
कब़्ज की रूह तेरी देके तुझे़ फिक्र-ए-मुआश
कोणतीही व्यक्ती एकदम भ्रष्ट होत नाही. अगोदर तिची श्रद्धा भ्रष्ट होते. मग विचार भ्रष्ट होतात. शेवटी व्यक्ती अन्मग समाज भ्रष्ट होतो. हे टाळायचे असेल तर आपल्याला आपली श्रद्धा भ्रष्ट होणार नाही यची अगोदर काळजी घ्यायला हवी. या साठी मुस्लिमांकडे एक परिपूर्ण व्यवस्था आहे. ज्याला शरियत म्हणतात. त्यात हलाल काय आणि हराम काय? याविषयी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहेत. त्यास अनुसरून आपण जगलो तर समाजाच्या आदरास पात्र ठरू.
यात एक अडचण अशी आहे की पाश्च्यात्यांनी जीवनमान उंचावण्याचे जे उद्देश्य जगाला ठरवून दिलेले आहे ते मुस्लिम समाजाचे सुद्धा जगण्याचे उद्देश्य बनलेले आहे. वास्तविक पाहता उच्च जीवनमान मुस्लिमांचे नस्बुल ऐन (उद्देश्य) असूच शकत नाही. आदर्श नैतिक समाजाची रचना हा मुस्लिमांचा नस्बुलऐन आहे. ते हस्तगत करतांना भ्रष्ट लोकांसारखे वाहवत न जाता सोशिकपणे जीवन जगणे गरजेचे आहे. चार पैसे कमी मिळाले, राहनीमान जरा खालच्या स्तरचे राहिले तरी चालेल पण नैतिकतेचा स्तर खाली येता कामा नये. हा उद्देश्य ठेवला तर आपण देशासमोर आदर्श समाजाचे उदाहरण ठेवू शकू.
आज जागतिक पातळीवर समाजात नैतिकता उत्पन्न करण्याऱ्या सर्व संस्था अपयशी ठरल्या आहेत, कायदे, पोलीस, न्यायालये, शासन, प्रशासन सर्वच अपयशी ठरलेले आहेत. आता आशा आहे ती केवळ फक्त इस्लामी व्यवस्थेकडूनच. याच आशेने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक मंदगतीने का होईना इस्लाममध्ये दाखल होत आहेत. तर मित्रांनो ! नैतिकतेची कास मुस्लिम नाही धरणार तर कोण धरणार ? माणसांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास इस्लाममध्येच होऊ शकतो. कारण याव्यवस्थेमध्ये शरीर व आत्मा या दोघांच्याही विकासाला समसमान संधी आहे. नैतिकता जोपासने सोपे काम नाही. चारीही बाजूंनी जेव्हा अनैतिकतेची, स्वार्थ्याची, गुन्हेगारीची, अश्लिलतेची मांदियाळी असेल तर खरंच चांगल्या सवई जोपासणे कठिण काम आहे. कठिण आहे म्हणूनच करण्यालायक आहे. कोणतेही महान काम सहज साध्य होत नसते. चांगल्या सवईचा जो फॉर्म्युला इस्लामने सांगितलेला आहे तो अगदी सोपा आहे. सर्वप्रथम स्वतःशी निश्चय करा की स्वतःला चांगल्या सवई लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जी भाषा चांगल्या प्रकारे येते त्या भाषेत कुरान समजून वाचण्यास सुरूवात करा, पाच वेळची नमाज न चुकता अदा करा. यातून जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये निर्माण होईल त्यातून तुमचा सहजविकास होईल. ईबादतीमुळे तुमच्या सवई चांगल्या होतील व तुम्ही चांगले व्हाल.
काय करावे त्याबद्दल विवेचन झाले आहे. आता काय करून ये याकडे पाहू या. सर्वप्रथम घरातून टी.व्ही. बाहेर काढा किंवा त्याला चाईल्ड लॉ गलावा व पासवर्ड कुणाला सांगू नका. त्याऐवजी चांगली पुस्तके, वर्तमान पत्रे घ्या व घरच्यांना वाचायला द्या. शक्य तितक्यावेळी सर्वांना बसवून घरात सामुहिक तालीमची व्यवस्था करा. येन केन प्रकारेण घराचे वातावरण पवित्र राहील याची व्यवस्था करा. मग तुमच्या घरच्या सदस्यांनाही चांगुलपणाची गोडी वाटायला लागेल. लक्षात ठेवा चकाचक चमकणाऱ्या घाणी पेक्षा साधी सिदी तहारत (स्वच्छ) वाली तनाव मुक्त जीवनशैली केव्हा ही चांगली. अल्लाह मला, तुम्हाला आणि आपल्या सर्वांना नैतिक जीवन जगण्याची शक्ती व युक्ती प्रदान करो. (आमीन.)
Post a Comment