Halloween Costume ideas 2015

टिपु सुलतान लोकोत्तर इतिहासपुरुष

“सल्तनत-ए-खुदादाद” ऐतिहासिक ग्रंथ- राम पुनियानी
हैदरअली- टिपू सुलतान स्थापित, सल्तनत ए खुदादाद ” या महत्त्वपुर्ण ग्रंथासाठी प्रस्तावना लिहिताना मला खूप आनंद होत आहे. अलिकडच्या काळात धर्मवेड्या समाजात फुट पाडणार्‍यांच्या हातचं फुटीर शस्त्र ठरत चाललेल्या  इतिहासलेखनशास्त्राच्या मर्यांदांच्या खूप पलिकडे जाणारा, अत्यंत सखोल संशोधनाचा दर्जा असणारा हा ग्रंथ आहे. धर्माधिष्ठीत राष्ट्रवादाची उभारणी करु पाहणार्‍या धर्मवादी राजकीय शक्ती नेहमीच इतिहासाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत आलेल्या आहेत. ह्या प्रवृत्तीची सुरवात वसाहतीक कालखंडात झाल्याचे दिसून येते.
राजाचा धर्म चर्चेच्या केंद्रस्थानी ठेउन आपले विभाजनवादी इतिहासलेखन पुढे आणले. हाच कित्ता धर्मवादी राष्ट्रवाद्यांनी उचलून आपल्या राजकीय कार्यक्रमाला सोईस्कर पध्दतीने विकसित करुन वापरण्यास सुरूवात केली. गमतीची बाब म्हणजे  भारतीय इतिहासकार त्याच कालखंडाकडे दोन्ही धर्मांच्या राजांमधील फक्त सत्ता संघर्ष म्हणून पाहतात.
धर्मवादी इतिहास लेखन प्रवाहातील पहीला महत्त्वाचा प्रयोग म्हणजे जेम्स मिल लिखीत भारताचा इतिहास (हिस्ट्री ऑफ इंडीया) होय. खरे तर भारताला कधीही भेट दिलेली नसतानाही, तत्कालीन भारतीय नागरी सेवाद्वारे भारतात प्रशासकीय आधिकारी म्हणून जाऊ इच्छिणार्‍या परीक्षार्थींसाठी जेम्स मिलने हा इतिहास लिहला. त्याने त्याच्या कल्पनेप्रमाणे (सोयीने) भारतीय इतिहासाची हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड आणि  ब्रिटीश कालखंड अशी विभागणी करुन टाकली. तसे तर हिंदू शब्द 8 व्या शतकात वापरात आल्याचे दिसून येते. त्यावेळी वेगवेगळ्या राजांची अनेक राज्ये वेगवेगळ्या प्रदेशात असलेली दिसून येतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की, त्या-त्या राज्यात राजाचा धर्म हा राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी नसे. आणि राजकीय सत्तेच्या अनुषंगानेच इतर धर्मीय राजांबरोबर संबंध व तह स्थापित होत असत. मिलच्या पुस्तकातून हिंदू आणि मुस्लीम हे स्वतंत्र  आणि एकजिनशी समूह आहेत, असे ध्वनित केले आहे.  यावरुन असे भासते की, जसे काही या काळात एका धर्माच्या राजांची दुसर्‍या धर्माच्या राजांशी युध्दे व संघर्ष चालत होती. त्यासाठी हेतूतः संपूर्ण चित्र दडवून सोयीचे भाग निवडून संपूर्ण इतिहास सादर करत असल्याचा भास निर्माण केला जात असल्याचे दिसते. त्यासाठी काही मंदीरांची तोडमोड किंवा काही धर्मांतरे (संदर्भ गाळून) त्यामागची वस्तूस्थीती व हेतूतः दडवून सांगितली जाताना दिसतात.
    अन्य साम्राज्यवाद्यांप्रमाणेच ब्रिटीशांनीसुध्दा ‘फोडा आणि झोडा’ म्हणजेच विभाजनवादी राजकारणाची खेळी केल्याचे दिसून येते. भाषा, वांशिकता, किंवा अन्य असाच एखादा मुद्दा त्यांनी वापरला असता. मात्र त्यांनी दक्षिण आशीयायी राजकारण प्रदेशात प्रभावी व संवेदनशील  असणार्‍या धर्मवाद ह्या मुद्याचा उपयोग करुन घेतल्याचे दिसून येते. भरीस भर म्हणजे त्यांचा मुस्लीमांबद्दलचा तिव्र आकस (पूर्वग्रह)  जोडीला होता. तो दोन कारणांनी होता. एक म्हणजे त्यांना मोठ्या प्रदेशावर सत्ता असमार्‍या मुस्लीम राज्याकर्त्यांच्या मुकाबल्यात जनसमर्थन मिळवणे आवश्यक होते. दुसरा  महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटीशांना असं वाटत होतं की, 1857 च्या बंडात मुस्लीमांचा विशेष व मोठा सहभाग होता. खरं तर मुस्लीम आणि हिंदू यांचा संयुक्त सहभाग या बंडात होता व औपचारीक पातळीवर त्याचे नेतृत्व शेवटचा मुगल बादशहा बहादूरशहा जफर याने केले होते. एवढी एक सबब ब्रिटीशांना 1857 च्या घटनेनंतर मुस्लीमांवर सुडचक्र सुरु करण्यास पुरेशी होती. ती त्यांनी पुरेपूर वापरली.
    यासाठी अनेक ग्रंथाद्वारे वगैरे पुढे आणलेला मुद्दा म्हणजे मुस्लीमांनी हिंदूवर अनन्वीत अत्याचार केले हा आणि त्या पार्श्‍वभूमीवर मग हिंदूसाठी मुक्तीदायी ब्रिटीश शासन हे हिंदूच्या मनावर बिंबवण्याचा प्रकल्पच जणू राबवला. त्याकाळी राज्यांचे नियम वेगळेच होते. म्हणजे कायद्याचे जनक व अंमलबजावणी करणारेही राजे तसेच असत. व न्याय मग त्यांच्या शहाणपणाच्या प्रमाणात व त्यांच्या लहरीनुसार ठरत असे. असे चित्र रंगवल्याचे दिसून येते. याचप्रमाणे हिंदूचे इस्लामीकरण (सुरुवातीला सामाजिक सहवासातून व सुफी संतांच्या मानवीयतेच्या शिकवणूकीद्वारे ) हे तलवारीच्या धाकाने घडवून आणल्याचे रंगवल्या गेले. जिंकलेला राजा युध्द हरलेल्या हिंदूराजाचा कसा छळ करतो असा एखादा किस्सा वापरुन मुस्लीम राज्यकर्ते कसे क्रूर व अन्यायी होते, असे मांडले गेल्याचे दिसते. याच्याच जोडीला मंदीरांचा विध्वंस आणखी एक अन्याय केल्याचे मांडले गेले. काही वेळेला मंदीरात असलेल्या प्रचंड संपत्तीच्या भांडारामुळे किंवा क्वचित प्रसंगी पराभूत राजाच्या मानभंग करण्याच्या उद्देशाने मंदीर उद्ध्वस्त करण्याची काही कृत्ये हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्माच्या राजांकडून घडत असत. यामुळे इथल्या खर्‍या बहुमित्र परंपरा हिंदू मुस्लीमांमधील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सामंजस्य अशा अनेक  स्तरावरील हिंदू मुस्लीम राजांच्या दरबारातील परस्पर सहभाग या सकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
आणि दुसरीकडे ब्राम्हणी जन्माधारीत विषमतावादी परंपरापासून पुर्णतः भिन्न असणार्‍या उदार, समतावादी महान हिंदू परंपरेकडे दुर्लक्ष करुन ब्रिटीशांनीसुध्दा अशा ब्राम्हणीधर्मालाच इथल्या खर्‍या हिंदूधर्माच्या जागी मानले. तसेच मुस्लीम जमातवादी शक्तींनीही ब्रिटीशांनी मुस्लीमांकडेच राज्य परत सोपवले पाहीजे कारण ब्रिटीशांपुर्वीच हे मुस्लीम राज्यच होते अशी भूमिका घेतली. तर  दुसरीकडे हिंदू जमातवाद्यांनी असा घोषा लावलेला होता की, मुस्लीम व त्यांच्याच जोडीला पुढे ख्रिश्‍चन हे परकीय असून हा देश हिंदूचा असल्यामुळे देशाची सत्ता ही हिंदूकडेच सोपवली गेली पाहीजे. मुस्लीम जमातवादी इतिहास मुस्लीम राज्यकर्त्यांचा उदात्तीकरण  करण्याचा खेळ करुन पाकीस्तानात स्थान पक्के करत आहे. तर भारतात हिंदूत्ववादी इतिहासलेखन गेली काही दशके मुस्लीम शासकांचे दानवीकरण करुन हिंदूत्ववादी इतिहासाचे प्रस्थ माजवताना दिसत आहे. जमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करुन घेताना दिसतात. त्याच सूत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लीम शासकांचेच प्रतिनिधी आजच्या मुस्लीम समाजाला ठरवून आजचे हिंदू हे त्या मुस्लीम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत असे मांडून मुस्लीमांचे दानवीकरण करण्यात येत आहे. हा भूतकाळ आज अल्पसंख्याक (विशेषतः मुस्लीम) वर केल्या जाणार्‍या अत्याचाराचे पुष्ट्यर्थ पुढे केला जातो आहे. याचाच आधार घेऊन मंदीर उद्ध्वस्तीकरणावर प्रकाश टाकण्याचा  प्रयत्न  म्हणून राममंदीराचा मुद्दा उचलला गेला आहे. हिंदूच्या ध्रुवीकरणासाठी, संघटीकरणासाठी त्यांच्या भावनिक उद्रेकाला वात लावून मग हिंसाचार घडवण्यासाठी बाबरी विध्वंस घडवला गेला. इतिहासातील काही मुस्लीम राज्यकर्त्यांना लक्ष्य करुन त्यांची रस्त्यांना दिलेली नावे बदलून टाकण्याचे सत्र सुरु केले आहे. (उदा. औरंगजेब) अगदी अकबराचे नाव दिलेला रस्ताही या हिंदुत्ववाद्यांचे लक्ष्य होऊ लागले आहेत. मात्र सरदार मानसिंह याचे नाव मात्र प्रचलित ठेवले जाणार आहे.
उत्तर भारतातील अनेक घटनांचा प्रभाव जमातवादी इतिहासलेखनावर पडला आहे. या इतिहासलेखनाचा मुख्य गाभा हा हिंदू मंदीरांचा विध्वंस, मुस्लीम शासकांनी घडवलेली हिंदूची धर्मांतरे आणि त्यांनी हिंदू स्त्रीयांवर केलेले अत्याचार राहीला आहे. राणी पद्मावतीचा जौहार आणि सैन्याद्वारे स्त्रीयांवर केलेले अत्याचार हे मुस्लीमांनी केले अशी भावनोद्रेकी मांडणी करण्यात येते. खरंतर कोणत्याही सैन्याने कोणत्याही धर्मावरच्या स्त्रीयांवर केलेल्या अत्याचाराची असंख्य उदाहरणे इतिहासात असतानाही जमातवादी इतिहासशास्त्र आपल्या विशिष्ट हेतूला पोषक घटना फक्त निवडून भूतकाळात सर्वथा तसेच घडत होते असा सूर लावलेला दिसतो.
    महाराष्ट्रात या पध्दतीने शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण केल्याचे दिसते तर टिपू सुलतानला मात्र अनेक विवादात अडकवून टाकलेले दिसते. हजारो ब्राम्हणांना शस्त्राच्या धाकाने मुस्लीम केल्याच्या गोष्टी रंगवून लिहल्याचे दिसते. विशेषकरुन अलिकडच्या काळातच टिपू सुलतानच्या अत्याचाराच्या घटनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खरं तर ऐकीव भाकड गोष्टींशिवाय या घटनांचा ठोस संदर्भ कुठेही उपलब्ध नाही. कर्नाटकातील काँग्रेस पक्षीय सरकारने टिपू सुलतानच्या 265 व्या जयंतीनिमित्त (10 नोव्हेंबर 2016) मोठा सोहळा आयोजित केला आहे. त्याविरोधात तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी छेडलेल्या आंदोलनात तीन लोक मृत्युमुखी पडले आहेत.
    टिपू सुलतानला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे मान्यता मिळाली नाही अशी खंत प्रसिध्द नाट्यलेखक गिरिष कर्नाड यांनी व्यक्त केली आहे. टिपू जर हिंदू असता तर शिवाजीराजांना जसा मान महाराष्ट्रात मिळतो तसा मान टिपूला मिळाला असता. कर्नाड पुढे असेही म्हणतात की, बंगळुरु विमानतळाला टिपूचे नाव देणे औचित्याचे ठरले असते. मात्र टिपू कन्नडद्वेष्टा होता, त्याने दरबारी भाषा म्हणून पर्शियनचा वापर केला होता असे तुणतुणे भाजपाने सुरु ठेवले आहे. त्याकाळी त्या परिसरात राजदरबारी भाषा म्हणून पर्शियनचा वापर सर्रास होत असे. खरे म्हणजे टिपूने कन्नडला राज्यकारभारात पर्शियनच्या वापराबरोबरच कन्नडचाही वापर वाढवण्याचे अधिकृत प्रयत्न केले होते हि वस्तूस्थिती आहे. आरएसएस कंपूने टिपूचे नाव ट्रेनला देण्यासही विरोध केला आहे. या अपप्रचारामुळे टिपूची प्रतिमा धर्मद्वेष्टा अशी ठसवण्यात येत आहे. टिपूने आपल्या सैन्याधिकार्‍यांना पत्रे लिहून काफीरांना नष्ट करुन टाकले पाहिजे अशा आज्ञा देणारी पत्रे आहेत. (हि पत्रे ब्रिटीशांच्या ताब्यात आहेत. ) असा अपप्रचार केला जात आहे. याचप्रकारे लंडनमध्ये विजय मल्ल्यांनी टिपू सुलतानची 8 फूट तलवार लिलावात विकत घेतली. तेंव्हा असाच गदारोळ करण्यात आला. वेळोवेळी अशा कुरापती उकरुन काढून धर्मवेड्यांनी गोंधळ घालण्याच्या कृत्यांचा मोठाच सुकाळ माजला आहे.
मग टिपू सुलतान खरा कसा होता? हैदर आणि टिपू सुलतान यांचे युध्दशास्त्रातील योगदान स्पष्ट करणारे सुस्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या लढायांबाबतच्या तपशीलवार नोंदी उपलब्ध आहेत. त्यांनी ब्रिटींशाविरुध्द युध्दात क्षेपणास्त्रांचा (अग्नीबाणाचा) वापर केलेला दिसून येतो. त्यांची ब्रिटींशाविरोधातील युध्दे अविस्मरणीय आहेत. ब्रिटीशांचा भारतातील वसाहतवादी विस्तार हैदर टिपू या जोडीने मोठ्या ताकदीने रोखला होता. पवित्र स्थळांच्या विध्वंसासारख्या घटनांना टिपूच्या धार्मिक धोरणात बिल्कुल स्थान नव्हते. उलटपक्षी त्याने राजकीय निष्ठा मिळवण्यासाठी का होईना, पण अनेक हिंदू मठांना आर्थिक अनुदाने दिल्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत. ब्रिटीशांना कडवा विरोध करत राहील्यामुळेच ब्रिटीशांनी टिपूची प्रतिमा धर्मांध करुन त्याचे विकृत दानवीकरण केले आहे.
सरफराज शेख यांच्या पुस्तकाने विकृतीच्या ढिगार्‍यातून खरा टिपू शोधून काढण्याचे महत्वाचे काम केले आहे. अत्यंत नेटक्या, नेमक्या व ठोस संदर्भाच्या आधाराने टिपू सुलतानचे व्यक्तीत्व, कार्य, राज्यकारभार, धोरणे, दृष्टीकोण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व महत्त्व जाणणे यांसह आपल्या राज्याच्या विस्ताराबरोबरच सुस्थीर शासन, शांततापूर्ण प्रजाजीवन याबाबत तो कसा दक्ष व व्यापक क्षमतांचा धनी होता याचे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत.  लेखकाने हिंदुत्ववादी विचारवंत सावरकर यांचा टिपूला धर्मांध ठरवण्याच्या कृत्याचा परखड व पुराव्याधारीत समाचार घेतला आहे. खरे तर टिपूचे तह व सहकार्याचे करार हे धर्माच्या आधाराने किंवा धर्मासाठी नव्हते तर 
राजकीय कारणाने व सत्ताकारणाच्या दृष्टीने होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. टिपूचे महत्वाचे व अत्यंत विश्‍वासू सहकारी हिंदू होते. हे ही लेखक पुराव्याने स्पष्ट करतात. अत्यंत महत्वाचे म्हणजे ‘धर्माच्या आधाराने परधर्मीयांना अवमानीत करु नये, त्यांना कमी लेखू नये अशी कडक ताकीद स्पष्ट करणारा जाहीरनामाच लेखकाने उधृत केला आहे. त्या जाहीरनाम्या टिपू पुढे म्हणतो, “ माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत माझ्या राज्याचे व प्रजेचे रक्षण मी करीन, आणि  ब्रिटीशांना येथून पिटाळून लावीन” हे त्याच्या राज्यकारभाराचे तत्त्व होते. पेशव्यांनी आपल्या राज्यातील लुटलेल्या हिंदू मंदीराला टिपू सुलतानने नुकसान भरपाई दिल्याचे उदाहरण तर अत्यंत हृदयस्पर्शी आहे. टिपू शृंगेरीच्या शंकराचार्यांचा खूप आदर करत असे. त्याने त्यांच्या मठास असंख्य देणग्या दिल्या आहेत. राजाने सर्वांना समानतेने सोबत घेऊन चालले पाहीजे  या तत्वाला धरुन टिपूचे हे वर्तन आदर्शच होते.
हा धर्मांधता प्रधान इतिहासलेखनाचा (जमातवादी इतिहासशास्त्र) विकृत खेळ आता शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांपर्यंत येऊन पोहचला आहे. मागच्या एनडीए सरकारने (1998) इतिहासाचे भगवेकरण करण्याचा अत्यंत हिणकस धर्मवेडा प्रयास केला. अता मोदींच्या नेतृ्त्वाखालील सरकार द्वारे शिक्षणव्यवस्थेचा, अभ्यासक्रमाचा धर्मवादी कायापालट करुन टाकण्याचे कार्य मोठ्या जोमाने सुरु आहे.  अशा विपरीत परिस्थीतीत सरफराज शेख यांचे पुस्तक या धर्मवेड्या, जमातवादी, प्रचारास ठोस आव्हान देऊन खरा, संतुलित व न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व  एकात्मता सक्षम करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य करू शकते. अशा प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणात येणे ही काळाची गरज आहे. टिपू सुलतान यांच्यासंबधाने दडवून ठेवलेल्या, सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने पोषक , इतिहासाचे वस्तुनिष्ठत्व स्पष्ट करणार्‍या व त्याबरोबरच त्याच्या कालखंडाशी निगडीत अन्य महत्वपूर्ण बाबींवर या संशोधन दर्जाप्राप्त पुस्तकाच्या लेखनाद्वारे आमच्या ज्ञानात भर टाकण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल सरफराज शेख यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी घेतलेल्या प्रचंड व अविरत कष्टाचे कौतूक व सार्थ आभार मानणे आवश्यक आहे. माझी ठाम खात्री आहे की, सदर पुस्तक या क्षेत्रातील संशोधन, समीक्षा व लेखनास नक्की प्रेरणादायी ठरेल व  या सदृश्य कार्य पुढे जाण्यास सहाय्यभूत ठरेल.
( राम पुनयानी यांनी लिहिलेल्या इंग्रजीतील प्रस्तावनेचे मराठी भाषांतर सरफराज शेख यांनी केले आहे.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget