Halloween Costume ideas 2015

अखेर नजीब गेला कुठे?

कलीम अजीम, अंबाजोगाई
ऑक्टोबरच्या १६ तारखेला दिल्लीत एका सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेला पोलीस हात-पाय धरुन फरफटत नेत होते. या वृद्ध महिलेचा रडण्या-किंचाळण्याचा आवाज घटनेची भयावहता दाखवत होता. लोकशाही भारताची ही प्रशासकीय व्यवस्था पाहून जगभरात टीकेचा सूर उमटणं साहजिकच होतं. सोशल मीडियातून हा वेदनादायी फोटो दिवसभर दिल्ली पोलिसांच्या अब्रूची लक्तरे फाडत होता. जेएनयुचा मीसिंग विद्यार्थी नजीबच्या ७० वर्षीय आईला दिल्ली हायकोर्टाबाहेर पोलीस फरफटत नेत होते. ही धक्कादायक दृष्ये फोटोतून अंगावर काटा आणत होती. सीबीआयला प्रश्न विचारत असताना नजीबच्या आईला अचानक कोर्टातून बाहेर खेचण्यात आलं, हात-पाय धरुन ७० वर्षाच्या वृद्ध बाईला पोलीस फरफटत नेत होते.
किळसवाणी वाटणारी ही दृष्ये प्रथदर्शनी पाहून कुठल्याही आईचा मुलगा 'अॅण्टी नॅशनल' झाला असता. इथं मीडियाला 'सबसे पहले हम' वाली लाईव्ह रिपोर्टींग का करावीशी वाटली नाही?
क्षण दुसरा, सोमवार १६ ऑक्टोबरचा, दिवसभर 'राष्ट्रीय मीडिया' दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादच्या डासना जेलबाहेर तिष्ठत उभा होता. मुलीच्या खूनाच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तलवार दाम्पत्याचे सुटकेचे 'ऐतिहासिक' क्षण टिपण्यासाठी 'सबसे तेज' मीडिया आतूर होता. सध्याकाळी हे जोडपं बाहेर येणार होतं पण सकाळपासून डासना जेलबाहेर लाईव्ह कव्हरेज टिपत होता. गाझियाबाद ते दिल्ली हायकोर्ट केवळ ५० मिनिटाचं अंतर, पण 'राष्ट्रीय मीडिया' तिकडे खूनाच्या आरोपीकडे होता. सध्याकाळी पाचला तलवार दाम्पत्य जेलबाहेर पडताच मीडियाचे फ्लैश कॅमरे दोघांवर रोखले गेले. सर्व न्यूज चॅनल लाईव्ह वर आले. कथित दृष्यांना ऐतिहासिक म्हणत एक्सक्लुझीव्ह दाखवत होती. सुमारे तीस-एक मिनिटं हे दाम्पत्य टीव्हीवर झळकत होतं. पण नजीबच्या आईचा फरफटणारा साधा फोटोही कुठे दिसत नव्हता.
जेएनयुचा विद्यार्थी नजीब अहमदला गायब होऊन वर्ष उलटलं, तरीही अजून त्याचा शोध लागलेला नाहीये. दिल्ली पोलीस, क्राईम ब्रांच व सीबीआय वर्षभरात एका विद्यार्थ्याला शोधू शकलेली नाहीये. याचा निषेध म्हणून गेल्या रविवारी दिल्लीत सीबीआय हेडक्वॉटरबाहेर निदर्शनं करण्यात आली.  १४ ऑक्टोबरला रात्रीपासून देशभरातून पुरोगामी कार्यकर्ते सीबीआयच्या हेडक्वॉटरबाहेर नजीबला शोधण्याची मागणी करत होती. रविवारी दिवसभर नजीबच्या कुटुंबियासोबत अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलन करत होती.
२४ तास उलटूनही आंदोलनाची कुठलीच दखल सरकारनं घेतली नव्हती. सलग दोन दिवस धरणे आंदोलन सुरु होतं. सोमवारी नजीब संदर्भात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टानं या आंदोलनाची दखल घेत सीबीआय व दिल्ली पोलिसांची कानउघाडणी केली. 'वर्षभरानंतरही नजीबला का शोधून काढलं नाही'अशा शब्दात कोर्टानं सीबीआयला फटकारलं.
कार्यवाही संपल्यानंतर नजीबची आई नफीसा कोर्टाच्या आवारात मीडियाशी बोलत होत्या. त्याचवेळी नफीसा यांना पोलिसांनी कोर्टाबाहेर काढत ताब्यात घेतलं. या संदर्भात त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलंय की, 'मी ब्लडप्रेशरची पेशंट आहे, पोलिसांनी मला हात-पाय धरुन लटकवत पोलीस स्टेशनला आणलं, माझे दोन्ही हात व पाय जबर दुखत आहेत, मी तर फक्त माझ्या मुलाबद्दल विचारत होते, उत्तर न देता शाररिक त्रास देणं कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसतं' नफीसा यांच्या हा वेदनादायी चेहरा टीव्हीवर काही क्षणापुरता झळकला. पण तलवार दाम्पत्य सोमवारी 'राष्ट्रीय मीडिया'चा डे ड्राईव्ह होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या १४ तारखेला नजीब अहमद जेएनयू कॅम्पसमधून रहस्यमयरीत्या गायब झाला. नजीब उत्तर प्रदेशच्या बदायूँचा रहिवासी आहे. एमएस्सी बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असलेल्या नजीबचा कॅम्पसमध्ये अभाविपच्या विद्यार्थ्यांशी वाद झाला. यानंतर अचानकपणे नजीब गायब झाला. त्याच्या गायब होण्यामागे अभाविप असल्याचा आरोप नजीबच्या मित्रांनी केला होता. तसंच गायब होण्यापूर्वी अभाविपच्या सदस्याकडून नजीबवर हल्ला झाल्याचा आरोपही त्याच्या मित्रांनी केलाय. अभाविपवर कारवाईची मागणी करत जेएनयू व दिल्लीत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. ६ नोव्हेंबरला दिल्लीच्या जंतरमंतरवर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. यात नजीबच्या आईसह पूर्ण कुटुंब सामील होतं. आंदोलनादरम्यान नजीबच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. भारतात नजीबला शोधण्याची मागणी करणारे आंदोलन सुरु झाले. दिल्ली विधानसभा व संसदेत याचे पडसाद उमटले. याचा परिपाक म्हणून दिल्ली हायकोर्टानं नजीबचा तपास सीबीआयला सोपवण्याचे दिल्ली पोलिसाला आदेश दिले. पोलीस व सीबीआय मिळून अजूनही नजीबला शोधू शकले नाहीत.
नजीबचं गायब होणं अजूनही रहस्य आहे. त्यामुळे नजीब अखेर गेला कुठे? असा प्रश्न तयार होतो. नजीब मिसिंगबाबत जेएनयू प्रॉक्टर व तपास समित्यांनी वेगवेगळा अहवाल दिलाय. जेएनयूच्या डाव्या विद्यार्थी संघटना अभाविपला याला जबाबदार मानतात. नजीब सापडणं काही जणांना अडचणीचं ठरु शकतं असा आरोप करत विद्यार्थ्यांनी भाजपला जबाबदार धरलं आहे. कॅम्पसमधून गायब झालेला विद्यार्थी न सापडणं अनेक शंकाना जागा उत्पन्न करुन देतंय. तपास अधिकाऱ्यांनाच नजीबला शोधण्याची मानसिकता नाहीये, असा आरोपही वारंवार झाला. नजीब मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हता अर्थात तो वेडा होता अशी आवई पसरवण्यात आली. नजीबच्या कुटुंबीयाला धमकावण्यात आलं.
१४ ऑक्टोबरला नजीबला गायब होऊन वर्ष पूर्ण झालं. गेल्या नर्षभरापासून नजीबचं कुटुंब दिल्लीत ठाण मांडून आहे. आज ना उद्या मुलगा नजीब सापडेल या आशेवर नफीसा आहेत. नजीबच्या आठवणीत त्यांचे डोळे पानावले आहेत. न्यायालय व पोलिसांवरचा विश्वास तसूभरही कमी झालेला नाहीये. लवकरात-लवकर नजीबला शोधावं अशी मागणी नजीबचे मित्र व आई नफीसा करत आहेत. नजीबचा तपास पूर्ण करावा या मागणीसाठी सीबीआय हेडक्वॉटरबाहेर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. शनिवार रात्रीपासून सुरु झालेलं हे आंदोलन रविवार पर्यंत चाललं. सीबीआय, पोलीस व सरकारनं आंदोलनाची दखल न तो मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दिल्ली हायकोर्टात झालेला प्रसंग धक्कादायक होता. या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला.
सोशल मीडियावर सीबीआय व तपास यंत्रणेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. मीडिया विजीलनं नफीसाला फरफटत नेण्याला लाजीरवाणं म्हट़लंय. लोकशाही देशाला ही न शोभणारी घटना आहे अशा शब्दात मीडिया विजीलनं टीका केलीय. वृद्ध आईला त्याला मुलगा कधी परत करणार असं बीबीसीनं म्हटलंय. तर ज्येष्‍ठ पत्रकार किरण शाहीन यांनी फेसबुकवर नफीसा यांची तुलना मैग्झीम गोर्कीच्या आईशी केलीय. गोर्काच्या आईसोबतही असा व्यवहार झाला नसेल तेवढा नफीसासोबत पोलिसांनी केला आहे, असं शाहीन यांनी म्हटलंय.
काही दिवसापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाची संपत्ती वाढल्याची बातमी आली होती. यावर केंद्रातलं मंत्रिमंडळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे आलं होतं. सरकार एकिकडे 'बेटी बचाओ'ची घोषणा करतं तर दुसरीकडे 'बेटा बचाव'साठी सरकारचे मंत्री प्रेस कॉन्फ्रेस करत आहे. पण नफीसाच्या मुलाला शोधण्यासाठी मंत्रिमंडळातील अल्पसंख्याक मंत्रीही काही बोलत नव्हते. नजीब सापडेल का नाही याचा मुद्दा नाहीये, पण ज्या पद्धतीनं हा विषय सरकारकडून हाताळला जातोय ते नक्कीच शंकास्पद आहे. ज्या पद्धतीनं एका वृद्ध महिलेला टांगतं फरफटत नेण्यात आलं ते निषेधार्य आहे. एकिकडे वृद्धांचा सन्मान करण्यासाठी हजारो कोटींच्या जाहिराती करायच्या दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीच वृद्धांचा जाहीर अपमान करत आहेत, हा प्रकार निषेधार्य आहे.
सौजन्य- kalimajeem.blogspot.in
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget