Halloween Costume ideas 2015

आर्वी : कन्याभ्रुण हत्या


वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटल येथे कन्याभ्रूण हत्याकांडाच्या बातमीने अवघे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरले. या हत्याकांडाने परळी येथील मुंडे हॉस्पिटल च्या भ्रुण हत्याकांडाची आठवण ताजी करून दिली. आर्वी येथील ताज्या प्रकरणामध्ये 12 कवठ्या, 54 मांसाचे तुकडे, हाडे इत्यादी अवशेष खोदकामात मिळाले. याप्रकरणी कलम 409 भादंवि कलम 12 महाराष्ट्र रूग्ण परिचर्या घरे नोंदणी कायदा, कलम 29 महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 1965, कलम 5 (2) वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971, कलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि कलम 27 औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 अन्वये चार डॉ्नटरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. ज्यात डॉ. कुमारसिंग कदम, डॉ. शैलजा कदम, डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम यांचे नाव सामील आहे. यात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक झाल्याची माहिती यशवंत सोळंकी अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांनी माध्यमांना दिलेली आहे. डॉ. नीरजकुमारसिंग कदम यांनाही बडतर्फ करण्यात आलेले आहे. डॉ. नीरज हे 2018 पासून स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून सरकारी रूग्णालयात कार्यरत होते.  

कन्याभ्रूण हत्येसाठी वापरली जाणारी औषधे केवळ सरकारी रूग्णालयांनाच पुरविण्यात येतात. खाजगी मेडिकल स्टोअरवर ती मिळत नाहीत. याचाच अर्थ स्थानिक सरकारी रूग्णालयातून गर्भपाताच्या औषध आणि इंजे्नशनचा पुरवठा झाला असल्याची दाट शक्यता आहे. डॉ. रेखा कदम यांना अवैध गर्भपात करण्यासाठी मदत करणाऱ्या संगीता काळे आणि पुनम दहाट अशा दोन परिचारीकांनाही अटक करण्यात आलेली आहे. 

या हत्याकांडात सर्वच किंवा बहुतांशी मुलींचेच गर्भ ते ही 14 आठवड्यावरचे पाडण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असल्यामुळे तपास योग्य दिशेने होत आहे, असे दिसते. त्यामुळे डॉ. सुदाम मुंडे दाम्पत्याप्रमाणे कदम दाम्पत्यांवरही योग्य प्रकारे दोषारोप पाठविण्यात येतील आणि त्यांना शिक्षा होईल, अशी आशा करूया. ही झाली हत्याकांडानंतरची पोलीसी कारवाई. परंतु, अशी हत्याकांडे घडूच नये यासाठी समाज आपली जबाबदारी जोपर्यंत उचलणार नाही तोपर्यंत अशी हत्याकांडे थांबणार नाहीत. परळी झाली, आर्वी झाली आता पुढे काही काळ शांतता राहील आणि पुन्हा एखादे हत्याकांड उघडकीस येईल पुन्हा महाराष्ट्र हादरेल, हे चक्र तोपर्यंत असेच चालू राहील जोपर्यंत समाज यात आपल्या वाटेची जबाबदारी उचलत नाही. 

जबाबदारी उचलायची म्हणजे नक्की काय करायचे? 

यासाठी आपल्याला कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणींकडे पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण की इस्लामपूर्व काळामध्ये कन्येचा जन्म होताच तिला जीवंत पुरण्याची प्रथा समाजात रूढ होती. इस्लामने त्या प्रथेचे कसे उच्चाटन केले? कन्येला जिवंत पुरणारे लोक तिला वारसा हक्क देण्यापर्यंत कसे बदलले? हे पाहणे नक्कीच उद्बोधक ठरेल. 

गरीबी हे कन्याभ्रुण हत्येमागचे सर्वात मोठे कारण आहे. महागडे लग्न सोहळे करण्यामध्ये भारतीयांची बरोबरी जगात कोणी करू शकेल, असे वाटत नाही. मुलगी जन्मल्याबरोबर तिच्या लग्नाचा अवाढव्य खर्च कसा करता येईल? हीच भीती छातीवर दगड ठेवून लोकांना तिला गर्भातच मारण्यासाठी विवश करित होती आणि करीत आहे. गरीबी आणि महागडे लग्ने ही वेगवेगळी कारणे नसून एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुरआनने या कारणाच्या मुळावरच घाव घातला. या संदर्भात  कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजिविका देऊ आणि तुम्हालासुद्धा. वस्तुतः त्यांना ठार करणे एक मोठा अपराध आहे.’’(सुरे बनी इस्राईल आयत नं. 31). 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी या संदर्भात जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती केली. ती म्हणजे लग्न सोपे केले. त्यांनी स्वतः आपल्या आचरणाने लग्नाचे स्वरूप सोहळ्याचे नसून फक्त कराराचे आहे. त्यात वधू-वर यांची संमती, दोन साक्षीदार, एक वकील, महेर आणि खुत्बा-ए-निकाह एवढ्याच गोष्टी अनिवार्य केल्या. याशिवाय, इस्लामी लग्नामध्ये दुसरी कुठलीही बाब सामील होणार नाही याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष्य दिले. त्यामुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये कमालीचा बदल झाला. मग एक-दोन नव्हे, चार-सहा-आठ-दहा मुली जरी झाल्या (तत्कालीन प्रथेप्रमाणे) तरी कोणाला त्याची भीती वाटेनासी झाली. उलट प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ’’ज्याला दोन मुली झाल्या आणि त्यांचा सांभाळ त्याने आनंदाने मुलांना त्यांच्यावर महत्त्व न देता केले तर तो नक्कीच स्वर्गात जाईल.’’प्रेषित सल्ल. यांच्या या आश्वासनानंतर तर मुलींचे आनंदाने लालन पालन करण्याची अरबी समाजामध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली आणि बघता-बघता अशी सामाजिक क्रांती झाली की कुमारिका तर सोडा घटस्फोटिता किंवा विधवांची इद्दत (चार महिने चार दिवस) संपण्यापूर्वीच त्यांना पुनर्विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. जोपर्यंत या स्तरापर्यंत भारतीय समाजामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत कन्याभ्रुण हत्या थांबणार नाहीत. एक महिला म्हणून मी ठामपणे सांगू इच्छिते, कुठलीही महिला आपल्या उदरामध्ये वाढत असलेल्या आपल्याच सारख्या मुलीला ठार मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. केवळ गरीबी आणि महागड्या लग्नाचा खर्च झेपणार नाही म्हणूनच महिला नाविलाजाने आपल्या गर्भातील मुलींना मारण्यासाठी मोठ्या कष्टाने राजी होतात. दुर्दैवाने इस्लामच्या चांगल्या शिकवणी देशबांधवांपर्यंत पोहोचविण्यामध्ये आपल्याला अपयश आल्याने भारतामध्ये अशी सामाजिक क्रांती लवकर होईल, असे वाटत नाही. परंतु, समाज माध्यमांच्या वाढत्या सवलतींमुळे या शिकवणी लवकरच सर्वांपर्यंत पोहोचतील आणि लोक जागृती होईल, अशी आशा करते आणि थांबते.

- मिनाज शेख, पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget