Halloween Costume ideas 2015

आपलं स्वत:चं हक्काचं घर


"केल्याने देशाटन" असे एक सुभाषित आहे, या सुभाषितामध्ये पर्यटनाचे उद्दातीकरण केले आहे, अर्थात जो माणूस फिरतो, त्याला जग कळते, त्याच्या एकूणच ज्ञानात भरत पडते असं म्हणतात, आमच्या कोल्हापूर भागात "त्यो बारा गावचं पाणी प्यायलाय!" असं एखाद्या व्यक्तीचं वर्णन केलं की, समजायचं ती व्यक्ती बेरकी आहे,शिवाय पायाला भिंगरी लावून फिरल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये एकप्रकारचा बेफिकीरीपणा आलेला आहे, अशी व्यक्ती बोलण्यात पटाईत, वागण्यात धिटाईत तर फसविण्यात सराईत आहे, हे नक्की.

जगाला गवसणी घालणार्‍या फिरस्ती स्वभावाचा कुणीही, कितीही पुरस्कार केला तरी जगात सर्वात आपलं आवडतं ठिकाण कोणतं? असा मला कुणी प्रश्न टाकला तर मी बिनदिक्कतपणे उत्तर देईन ते म्हणजे "माझं स्वतःच घर".

स्वत:च्या राहत्या घराविषयी प्रत्येकालाच मनापासून आपुलकी, जिव्हाळा, ममत्व आणि वात्सल्यही असतं, दिवसभर राबराब राबून घरी आलं की प्रत्येकालाच आपल्या घरात एक स्वर्गीय सुख अनुभवायला मिळते, मग ते घर लहान असो, अगर मोठे. प्रत्येकाला बाहेर किती ही फिरलं तरी आपल्या घराचं उत्कट आकर्षण हे असतंच. संपूर्ण कष्टाचा, परीश्रमाचा परीहार करणारं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे आपलं घर असतं, घरात येवून हातपाय धुवून नेहमीच्या जागी दोन मिनिटं विसावलं की, प्रत्येकाच्या मनाला समाधान वाटतं. शांतीचा अनुभव देणारं घर प्रत्येकालाच हवंहवसं वाटत असतं. ज्यांना घर नाही त्यांना तर आपले स्वत:चे हक्काचे घर कधी एकदा होईल, असे होवून जाते, त्याकरिता कित्येक मैल दूरवर असले तरी हक्काचे आपले घर होतेय याचा आनंद अवर्णनिय असतो. आपल्या स्वत:च्या हक्काच्या घरात, आवडत्या हक्काच्या माणसांशी, हक्काने हव्या त्या विषयावर मनमोकळेपणाने बोलता येणे याहून सुंदर सौख्यदायी काय असू शकते?

माझ्या जवळच्या नातेवाईकांनी पूर्वी अत्यंत अत्यल्प भाड्याचे घर असून तसेच घराच्या मालकांचा स्वभाव ही वात्सल्यपूर्ण असूनही शिवाय घरमालकांबरोबरच गल्लीतील इतर माणसांचा भक्कम आधार असूनही त्यांनी शहरापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील माळरानावर स्वस्तात प्लॉट मिळतोय म्हणून घेतला आणि फ्लॉटवर फक्त एक खोलीचे घर बांधून त्याठिकाणी ते रहायला गेले. त्यावेळी त्यांच्या या धाडसाला अनेकांनी वेड्यात काढले असलेतरी स्वत:च्या हक्काच्या घराचे किती आणि केवढे आकर्षण असते, ते यावरून दिसून येते. आज ४०-५० वर्षाने त्याच माळरानाचा कायापालट झाला आहे, आणि एका अत्याधुनिक रहिवाशी काॅलनीत त्या माळरानाचे रूपांतर झाले आहे.शहरातील उच्चभ्रूंची एक चांगली व श्रीमंत कॉलनी म्हणून पूर्वीच्या त्या माळरानावर आज कोट्यावधी रुपयांचे बंगले झाले आहेत, एकूणच शहरातील एकमेव प्रचंड भाव असणारी ही कॉलनी केवळ उद्योगपती, राजकारणी व श्रीमंत व्यक्तींची म्हणून नावाजली गेली आहे. चाळीस- पन्नास वर्षापूर्वी माझ्या नातेवाईकांनी घेतलेला निर्णय आज प्रचंड फायद्याचा झाला आहे.

घर हे प्रत्येकालाच हवहवसं वाटत असतं, सर्वात प्रिय असलेल्या माणसाची आपल्या मनातली जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही, तसंच आपल्या प्रिय घराची गोष्ट. वास्तू म्हंटली तर निर्जीव, पण ती जीवलग असते, आपला दैनंदिन वावर त्या जागेला जिवंतपणा आणित असतो, अर्थात ती जागासुद्धा आपल्या जीवनाला भक्कम आधार आणि सुबक आकार देत असते. एकंदरच हक्काने विसावण्याची जागा म्हणजे आपलं घरं. इंग्रजी भाषेत ज्याला लाईफ स्पेस म्हणतात. अशी स्वत:ची स्पेस घरामुळे लाभते. इथे कुणाशी स्पर्धा नसते. कुणाशी कसली रेस नसते. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात घर नावाची वस्तू लाभणं भाग्याचं असतं. डोळं मिटून ध्यान लावून आपल्या आत डोकावून पाहण्यासाठी, कुणाच्यातरी हृदयात घर करून राहण्यासाठी, आपल्या जीवनातील परीश्रम आणि पराक्रमाचं चीज होण्यासाठी, बाहेरच्या जगाकडून कितीही व केवढीही अवहेलना व अवमानाला सामोरं जावं लागलं तरी घरात आल्यानंतर शांतपणे दोन घटका सुख अनुभवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाच्या द्रूतगती वेगाने आपण थकलो-दमलो तरी घरात आल्यावर त्याचा परीहार होतो, एक प्रकारची मानसिक शांतता लाभते. प्रचंड भावनिक चढउतार, वाढलेला व्याप, झालेला ताप यांचे निरसन होण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर हवेच...

रात्रीच्या निरव शांततेत सुखाची  झोप घेवून सकाळी सूर्य उगवताच घरातून बाहेर पडणारी पाखरं जेव्हा सायंकाळी घरी परततात, तेव्हा घराचं गोकुळ बनतं, संपूर्ण घर गजबजतं, घराला घरपण देणारा ताजेपणा येतो. घरसुद्धा आपल्याशी संवाद साधतं, त्याला ही घरातली सर्व मंडळी घरात आली की मनापासून आनंद होतो,  जे घरापासून लांब गेले त्यांच्यासाठीतर कवीमन जागे होते, आणि त्याच्या ओठांवर शब्द येतात..."या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या!"

प्रत्येकाचे स्वत:चे घर म्हणजे केवळ सिमेंट, वाळू, विटांनी बांधलेली वास्तू नव्हे तर घरातल्या जीवंत माणसांप्रमाणेच घर सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यच असते, ते आपल्या जीवनातील आनंदाच्या क्षणी मोहरते, बहरते, हसते, सौख्याची कारंजी फुलवते आणि संकटांच्या, दु:खाच्या, आव्हानांच्या काळात ते सुद्धा कुटुंबातील सदस्यांबरोबर जिद्दीने साथ देत असते, कधी कधी आपण हिरमुसतो, दु:खी, कष्टी होतो, तेव्हा घरंच आपले  वातावरण बदलण्यासाठी प्रवृत्त करते.खरं सांगू का.... इवल्या इवल्या पिलाचे नाजूक साजूक हात  गळ्याभोवती पडल्यानंतर आपसूक जे वात्सल्य जे प्रेम, सहजपणे उत्पन्न होते. अगदी तसंच घर आपल्याला प्रत्येक चांगल्या-वाईट वेळेला योग्य ते मार्गदर्शन करते, आपल्याला शिकवते, आणि आपल्याला सर्वकाळी सावरते ही...! अत्यंत स्वार्थी, हिशेबी जगात आपलं म्हणून असं हक्काचं आपलं घर नेहमीच आपल्यावर नि:स्वार्थी आणि अकृत्रिम प्रेम करतं, आपल्यावर प्रेमाची, सुखाची, समाधानाची सावली बनून नेहमीच आपल्या मनाला टवटवीत ठेवणारा तजेला देते...! आपल्या जीवनाच्या वाटचालीतील प्रत्येक क्षणी ते आपल्याला साथ देते...

- सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर, भ्रमणध्वनी - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget