Halloween Costume ideas 2015

आई


आपल्या आई वडिलांनी जसे आपल्याला लहानापासून मोठे होईपर्यंत सर्व लाड पुरविले़ तसेच आपणही आई-वडिलांचे वृद्धापकाळात सेवा करून आपले जीवन सार्थक करून घ्यावे.

प्रेम, वात्सल्य, मायेचा सागर म्हणजे आई. जीवनाची सुरूवात आणि शेवटपर्यंत मुलांसाठी सदा व्याकूळ राहणारी आई. मुला-बाळांसाठी स्वर्ग आणि स्वर्गात जाण्यासाठी जामीन ठरणारी आई. सर्वांपेक्षा तीन दर्जे अधिक महत्वाची आई. लेकरांसाठी सुरक्षेच कवच असणारी आई, सदा सर्वदा ईश्वरासमोर आपल्या पिल्लांसाठी प्रार्थना करीत बसणारी आई, कधीच घरच्या कामातून सुट्टी न घेणारी आई, स्वत: उपाशी राहून लेकरांना घास भरविणारी आई, थंडीत स्वत: कुडकुडत राहील पण लेकरांना पांघरून घालणारी आई. जिची महती लिहिण्यासाठी कागद आणि शाई अपुरी पडेल अशी आई !

९ मे मदर्स डे सा-या जगात उत्साहात साजरा केला जातो. आईवर प्रेम दाखविण्यासाठी हा एक दिवस नसून प्रत्येक क्षणी आईला सुख देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आईकडे प्रेमाने पाहणेही पुण्यप्राप्ती आहे. 

मात्र परिस्थिती अशी आहे की, कोरोना सारख्या काळातही अनेक महाभाग आईला वृद्धाश्रमात सोडून राहत आहेत‌. आई तिथेही आपल्या लेकराच्या भल्यासाठी प्रार्थना करत बसते. वृद्धाश्रमात राहत असलेल्या अनेक माता मुलांच्या आठवणीत तिथे रडत असतील आणि आजारपणात कन्हत असतील. त्यांना वाटत असेल की, माझा राजा मला घेवून जाईल, मी त्याला उराशी झोपवून सुखाचा श्वास घेईन. त्याच्या संसाराचा वेल माझ्या डोळ्यासमोर गगनाला पोहचेल. मात्र असे होताना दिसत नाही. 

अनेक निष्ठूर मुलं आजही भौतिक सुखाच्या शोधात आई-वडिलांना आश्रमात सोडून बायकां-पोरांसमवेत मजा करीत आहेत. त्याचं प्रमाण वाढलं की काय, म्हणून कृत्रिम म्हणा की आसमानी संकट म्हणा, कोंडवाडा काय असतो, घरात गुदमरण काय असतं हे या शापित कोरोना काळानं  दाखवून दिलं. हा त्या मातांचा शाप तर नसावा ज्यांची लेकरं शहरांवर शहरं फिरत आहेत मात्र त्यांची आई वृद्धाश्रमात माथ्याला हात लावून लेकराची फिकीर करत बसलेली आहे. अनेकजणांना आई - बाबांना सांभाळणे जणू डोक्यावर ओझे असल्यासारखे वागत आहेत. स्टेटस आणि सेलेब्रिटी बनण्याच्या नादात आई-वडिलांना समोर न येवू देणा-या पिल्लांची संख्याही कमी नाही. मुलं विसराताहेत की, त्यांच्या यशस्वी जीवनाचं रहस्य त्यांचे आई-वडिलच आहेत. मुलांच्या यशात मोठा वाटा तर आईचाच आहे़. 

आजचा कोरोनाचा काळ वेदनादायी आहे़. प्रत्येक आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी रात्ररात्र जागत आहे़. मी ऑफिसमधून घरी येईपर्यंत आईचा तीन ते चार वेळेस फोन येत असतो. घरी आल्यानंतर ती जागीच असते. जेवण कर म्हणून सगळ्या वस्तू जवळ आणून देते, आजारी असतानाही उठून पाणी देते, नको म्हटलं तरी भाजी गरम करून देते, थोडा ठसका काय मला लागावा लागलीच गरम पाणी, दुसऱ्या दिवशीपासून अंडी, काढा बनवून द्यायला सुरूच झालं. वारंवार ताकीद़ ऑफिसहून घरी आल्याबरोबर लागलीच निरीक्षण तब्येत कशी आहे, आवाज कसा येत आहे, चेह-यावर तणाव वाटत आहे का, हावभाव कसे आहेत, जर काहीही असतसं वाटलं की लगेच प्रश्न सुरू झाले आणि इलाजही सुरू झाला. आई मुलांचा चेहरा कसा वाचते तीच जानो. प्रेम कसं असावं हे पदोपदी आईची ममता दाखवून देते. तिला कधीच आवडत नाही तिच्या मुलांबद्दल कोणी अपशब्द बोललेला. सूने समोर सदैव मुलाचं गुणगाण करणारी, त्याची बाजू सदैव उचलून धरणारी आई. जेव्हा चिंतन करतो तेव्हा ईश्वराची अपार कृपा आपल्यावर असल्यासारखे वाटते. कारण तो ही आपल्या आईपेक्षा ७० पट अधिक प्रेम आपल्यावर करतो. त्यानेच तर आपल्या आईला निर्मिले, ममतेची सगळी रुपं तिच्यात ठेवली. किती कृपा ईश्वराची आपल्यावर आहे. 

किती नशीबवान आहोत आपण, किती उपकार आहेत आपल्यावर ईश्वराचे की त्याने आईची माया आपल्यावर कायम ठेवलेली आहे़. एकदा प्रेषित मुसा अलै़ हे कोहे तूर पर्वतावर जात असताना त्यांचे पाय घसरत होते, त्यावेळेस अल्लाहने त्यांना म्हटले होते की, ''ऐ मुसा ! तुमच्याकरिता सदैव प्रार्थनेसाठी उठणारे हात आता राहिले नाहीत. जरा सांभाळून चढा़ ''   (प्रेषित मुसा अलै. सलाम यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते)

अनेक माता आपल्या मुलांसाठी अहोरात्र प्रार्थना आणि परिश्रम करतात़ त्या सर्व आईंचे उपकार कोणताच मुलगा फेडू शकत नाही. एकदा एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांच्याकडे आला आणि म्हणाला, हे अल्लाहचे प्रेषित! मी माझ्या खांद्यावर बसवून आईला हज करविले. काय मी तिचा हक्क अदा केला? तेव्हा प्रेषित सल्ल. म्हणाले,  तू ज्यावेळेस जन्मत होता त्यावेळेस तुझ्या आईने मारलेल्या एका किंचाळीचाही तू हक्क अदा करू शकला नाहीस.

एका माणसाने प्रेषित सल्ल़ यांना विचारले, हे अल्लाहचे प्रेषित स. माझ्या सदव्यवहारास सर्वाधिक पात्र कोण आहे? प्रेषित सल्ल़ म्हणाले, तुझी माता, त्याने विचारले, मग कोण? प्रेषित सल्ल़ यांनी सांगितले, तुझी माता, त्याने विचारले, मग कोण ? त्यावर प्रेषित सल्ल़ म्हणाले, तुझी माता, त्याने विचारले, मग कोण? तेव्हा प्रेषित सल्ल़ यांनी सांगितले, मग तुझा पिता. नंतर दर्जानुसार तुझे जवळचे नातेवाईक़ (बुखारी, मुस्लिम अबु हुरैरा (ऱ))़

प्रेषित सल्ल़ यांनी सांगितले, सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुमच्यावर हराम (अवैध) केली आहे माता-पित्याशी वाईट वागणूक करणे"

कुरआनमध्ये वारंवार ताकीद केलेली आहे की, आई-वडिलांशी सदव्यवहार करा़ त्यांची काळजी घ्या़ जर ते वृद्धावस्थेस पोहोचले असतील तर त्यांना उफ तक म्हणू नका. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि बाप स्वर्गाचा दरवाजा आहे़ .

कुरआनमध्ये अनेक  आयाती आई-वडिलांबद्दल आलेल्या आहेत़ त्याचा प्रत्येकाने अभ्यास करणे गरजेचे आहे़ यासाठीच की आपले नेमकं अस्तित्व काय आहे, आपल्यावर किती अनंत उपकार आहेत. जो व्यक्ती या गोष्टी जाणतो, त्याची अमलबजावणी करून आई-वडिलांशी त्याच प्रमाणे वागतो जसा आदेश ईश्वराने कुरआनमध्ये दिलेला आहे़ तो व्यक्ती ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही  यशस्वी होतो.

आजच्या पीढितील अनेक महाभाग व्यसनाच्या आहारी जावून, आर्थिक मायाजालात अडकून आई-वडिलांशी दुर्व्यवहार करतात, असे करणं दुरूस्त नाही. आई आणि वडिल प्रत्येक मुलासाठी ऐहिक आणि पारलौकिक जीवनाच्या यशस्वीतेची गुरूकिल्ली आहेत़ तर आजपासून निश्चय करा की, आपल्या आई वडिलांनी जसे आपल्याला लहानापासून मोठे होईपर्यंत सर्व लाड पुरविले़ तसेच आपणही आई-वडिलांचे वृद्धापकाळात सेवा करून आपले जीवन सार्थक करून घ्यावे.

आपल्या सर्वांना आईची सेवा करण्याची सद्बुद्धी मिळो आमीन.


- बशीर शेख कलमवाला


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget