Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


 (३२) हे लोक इच्छितात की अल्लाहच्या प्रकाशाला आपल्या फुंकरांनी विझवून टाकावे, पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, मग ते इन्कारकरणाऱ्यांना कितीही असह्य का होईना!

(३३) तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन व सत्य धर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याने या सत्य धर्माचे सर्व धर्म पद्धतींवर वर्चस्व प्रस्थापित करावे.३२ मग अनेकेश्वरवादींना हे कितीही असह्य का होईना!

(३४) हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडित व साधु-संत लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात.३३ दु:खदायक शिक्षेची खूशखबर द्या त्यांना जे सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत.

(३५) एक दिवस येईल की याच सोने आणि चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजू आणि पाठींना, डागले जाईल - हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वत:साठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.

(३६) वस्तुस्थिती अशी आहे की, महिन्यांची संख्या, ज्या दिवसापासून अल्लाहने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आहे, अल्लाहच्या लेखी बाराच आहेत३४ आणि त्यापैकी चार महिने हराम (आदराचे) आहेत.३४अ हाच योग्य नियम आहे म्हणून या चार महिन्यांत स्वत:वर जुलूम करू नका.३५ व सर्व मिळून अनेकेश्वरवाद्यांशी लढा द्या, जसे ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात.३६ आणि समजून असा की अल्लाह - ईशपरायणांच्या समवेतच आहे.

३७) नसी (महिने बदलणे) तर द्रोहामध्ये (कुफ्र)आणखीच एक द्रोही कृती आहे, ज्यामुळे हे काफिर लोक मार्गभ्रष्ट केले जातात. एखाद्या वर्षी एखाद्या महिन्याला वैध ठरवितात व एखाद्या वर्षी त्याला अवैध करून टाकतात, जेणेकरून अल्लाहने निषिद्ध ठरविलेल्या महिन्यांची संख्याही पूर्ण करता यावी व अल्लाहने ज्याला निषिद्ध केलेले आहे त्याला वैधसुद्धा करून घेता यावे३७ त्यांची अपकृत्यें त्यांच्यासाठी शोभिवंत करण्यात आलेली आहेत, व अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मार्गदर्शन करीत नसतो.

(३८) हे श्रद्धावंतांनो!३८ तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या मार्गात निघण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा तुम्ही जमिनीशी खिळून राहिलात? तुम्ही पारलौकिक जीवनाच्या तुलनेत या जगातील जीवनाला पसंत केले आहे काय? असे असेल तर तुम्हाला माहीत असावे की या जगातील जीवनाचा हा सर्व सरंजाम मरणोत्तर जीवनामध्ये फारच थोडा भरेल.३९



३२) मूळ अरबीमध्ये ``अद्दीन'' शब्दप्रयोग झाला आहे. दीनचा अर्थ ``जीवनव्यवस्था'' असा आहे. किंवा ``जीवन व्यतीत करण्याची पद्धत''साठी उपयोगात ``दीन'' हा शब्द येतो. या जीवनव्यवस्थेला स्थापित करणाऱ्याला विश्वसनीय आणि माननीय स्वीकार करून त्याचे पालन केले जावे. म्हणून पैगंबरांना नियुक्त करण्याचा उद्देश या आयतमध्ये स्पष्ट केला आहे. ज्या मार्गदर्शनाला आणि जीवनव्यवस्थेला (सच्च धर्म) पैगंबरांनी अल्लाहतर्फे आणले आहे त्याला पृथ्वीवरील दीन (धर्म) च्या स्वरुपात असलेल्या सर्व पद्धती आणि धर्म व्यवस्थांवर प्रभावी सिद्ध करावे. दुसऱ्या शब्दांत पैगंबरांना या उद्देशासाठी कधीही पाठविले गेले नाही की ज्या जीवनव्यवस्थेला ते घेऊन आले आहे त्यास एखाद्या दुसऱ्या जीवनव्यवस्थेच्या स्वाधीन करावे. त्या दुसऱ्या जीवन व्यवस्थेला वशीभूत होऊन आणि त्यात स्वत:च्या जीवनव्यवस्थेला विलीन करावे. किंबहुना पैगंबर तर पृथ्वी आणि आकाशाच्या स्वामीचा प्रतिनिधी बनून येतात  तो आपल्या स्वामीच्या सत्य  जीवनव्यवस्थेला प्रभुत्वशाली पाहू इच्छितात. जगात दुसरी जीवनव्यवस्था असली तरी तिला सृष्टीनिर्मात्याने दिलेल्या जीवनव्यवस्थेच्या अधिन राहावे लागते, जशी जिझिया देण्याच्या रुपात जिम्मीची जीवनव्यवस्था असते.

३३) म्हणजे अत्याचारी केवळ धर्मादेश विकण्याचेच अत्याचार करीत नाही तर लाच खातात, नजराने लुटतात आणि असे असे विधी-परंपरा आणि धर्मविधान स्वत: रचतात जेणेकरून लोकांनी आपली स्वत:ची मुक्ती त्यांच्यापासून खरेदी करावी. याचे जगणे व मरणे, लग्नविधी, सुख-दु:ख काही असो या दलालांना खाऊ घातल्याशिवाय पार पडत नाहीत. लोक आपले भाग्य बनविण्याचे व बिघडविण्याचे ठेकेदार यांना समजू लागतात. अशाप्रकारे यांच्या हातून अल्लाहचे दास (बंदे) मार्गभ्रष्ट होऊ लागतात. जेव्हा कधी सत्याची चळवळ मानवी जीवन सुधारकार्यासाठी उभी राहाते तेव्हा सर्वप्रथम हेच लोक आपल्या विद्वत्तापूर्ण धोकेबाजी आणि लबाडीने व मक्कारीच्या हत्यारांनी सत्याच्या चळवळीत अडथळे निर्माण करतात.

३४) म्हणजे जेव्हापासून अल्लाहने चंद्र, सूर्य आणि पृथ्वीला निर्माण केले त्यावेळेपासून हे गणित चालत आले आहे की महिन्यातून एकदाच चंद्र ``हिलाल'' (एकादशीचा चंद्र) बनून उदय होतो याच हिशेबाने वर्षाचे १२ महिने होतात. हे यासाठी सांगितले गेले आहे की अरब लोक नसी (अधिक मास)साठी महिन्यांची संख्या १३ किंवा १४ करीत असत. कारण ज्या हराम (अवैध) महिन्याला त्यांनी हलाल (वैध) केले आहे त्याला वर्षाच्या जंत्रीमध्ये बसविले जाते. याविषयी तपशील पुढे येत आहे.

३४अ) चार हराम महिने म्हणजे जीलकदा, जिल हज्ज आणि मुहर्रम `हज'साठी आहे आणि रजब `उमरा'साठी आहे.

३५) म्हणजे ज्या फायद्यासाठी व हितासाठी या महिन्यांत युद्ध करणे वर्जित केले त्यास नष्ट करू नका. त्या काळात अशांती फैलावून स्वत:वर अत्याचार करू नका.

३६) म्हणजे अनेकेश्वरवादी या महिन्यांत युद्धबंदीचे पालन करीत नसतील तर ज्याप्रकारे ते एक होऊन तुमच्याशी लढतात त्याचप्रमाणे तुम्ही एक होऊन त्यांच्याशी लढा (पाहा सूरह २, आयत १९४)

३७) अरबमध्ये नसी (अधिक मास) दोन प्रकारची होते. एक प्रकारची नसी म्हणजे भांडण, तंटे, लूटमार, खूनखराबा व रक्ताचा (खुनाचा) बदला घेण्यासाठी एखाद्या हराम महिन्याला हलाल करत होते आणि याच्या बदल्यात एखाद्या हलाल महिन्याला हराम करून हराम महिन्यांची संख्या पूर्ण करीत असत. दुसऱ्या प्रकारची नसी म्हणजे चांद्रवर्षाला सौरवर्षाप्रमाणे करण्यासाठी त्यात एक अधिक मास  धरत  असत  जेणेकरून  हज  एकाच  ऋृतुत   येत   राहावा. जेथे  हे  यासाठी  की  चांद्रवर्षानुसार  वेगवेगळया  ऋृतुत हज येत असे आणि त्या  लोकांना त्यामुळे त्रास होत असे. अशाप्रकारे ३३ वर्षापर्यंत हज वेळेविपरीत दुसऱ्या मोसमात येत असे आणि केवळ चौतीसाव्या वर्षी एकदा जिल हज्जच्या ९-१० तारखेला येत असे. हेच अंतिम हजच्या वेळी (हिज्जतुलविदा) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``या वर्षी हजची वेळ कालक्रमाने ठीक आपल्या त्या तारखेवर होत आहे जी निसर्गत: हजची खरी तारीख आहे.'' या आयतमध्ये नसीला हराम आणि वर्जित करून अरबच्या अज्ञानी लोकांच्या त्या दोन्ही उद्देशांना चुकीचे ठरविले आहे. पहिला उद्देश स्पष्ट आहे की हा उघड गुन्हा होता. याचा उद्देश हा होता की अल्लाहच्या हराम (अवैध) केलेल्या गोष्टींना हलाल (वैध)सुद्धा केले जावे आणि नंतर बहाणेबाजी करून आणि कायद्याचे प्रत्यक्ष पालन करून त्याची पूर्ती केली जावी. दुसरा उद्देश त्यात निर्दोष आणि स्वार्थपूर्ती करणारा दिसतो. परंतु प्रत्यक्षात तोसुद्धा अल्लाहचा घोर विद्रोह होता. अल्लाहने आपल्या नियुक्त केलेल्या कर्तव्यासाठी सौरवर्षांऐवजी चांद्रवर्ष गणना ज्या महत्त्वपूर्ण हितांसाठी स्वीकारली आहे त्यात हा उद्देशसुद्धा आहे की त्याचे दास प्रत्येक ऋृतूत व काळात अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्यास बाध्य व्हावेत. उदा. रमजान महिना कधी उन्हाळयात, कधी पावसाळयात तर कधी हिवाळयात येतो आणि ईमानधारक या बदललेल्या वातावरणात रोजे ठेवून अल्लाहच्या आज्ञापालनाचे प्रमाण देतात आणि सर्वोत्तम नैतिक प्रशिक्षणसुद्धा प्राप्त् करून घेतात. अशाप्रकारे हजसुद्धा चांद्रवर्षात वेगवेगळया मोसमात येतो आणि या सर्व चांगल्या आणि वाईट परिस्थितीत अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी हज यात्रा करून दास आपल्या स्वामीच्या घालून दिलेल्या कसोटीत पूर्ण उतरतात आणि उपासनेत दृढता प्राप्त् करतात. आता एखादा गट आपली यात्रा आपला व्यापार आणि उत्सवाच्या सोयीसाठी जर हजला एखाद्या चांगल्या मोसमातच सततच्यासाठी निश्चित करतो तर हे असेच आहे जसे मुस्लिमांनी एखादे संमेलन करून निश्चित करावे की यापुढे भविष्यात रमजान महिना हिवाळयातच (डिसेंबर/जानेवारी) येईल. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दासांनी (बंदे) आपल्या अल्लाहप्रति विद्रोह केला आहे. ते स्वच्छंद झाले आणि आपल्या तुच्छ स्वार्थ आणि इच्छापूर्तीसाठी श्रेष्ठतम हितांना बळी चढविले. म्हणूनच अल्लाहने या आयतमध्ये ``नसी''ला ``कुफ्र (विद्रोह) मध्ये दृढता करणे'' असे ठरविले आहे. येथे हेसुद्धा ध्यानात ठेवावे की नसी रद्द करण्याची ही घोषणा हि. सन ०९  मध्ये हजच्या वेळी करण्यात आली आणि पुढील वर्षी हि. सन १० मध्ये हज ठीक त्याच चांद्रवर्षाच्या तारखांमध्ये झाला. त्यानंतर हज आजतागायत आपल्या खऱ्या तारखांना होत आहे.

३९) याचे दोन अर्थ होतात एक म्हणजे परलोकातील असीम जीवन आणि तेथील अगणित आणि असीम सामुग्री जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला माहीत होईल की जगाच्या क्षणभंगूर जीवनात ऐशआराम मिळाले ते सर्व या देणग्यांपुढे तुच्छ आहेत. त्या वेळी तुम्हाला आपल्या भविष्याच्या परिणामांसाठी निष्काळजी व बेसावध असण्याचे आणि संकुचित दृष्टीचे अतिव दु:ख होईल. ते पश्चात्ताप करतील की जगातील या तुच्छ लाभासाठी आम्ही परलोकातील शाश्वत आणि श्रेष्ठ लाभाला कायमचे वंचित राहिलो. दुसरे हे की जगातील पुंजी (संपत्ती) परलोकात काम येणारी वस्तू नाही. जगात तुम्ही अमाप संपत्ती कमवा मृत्यूच्या झटक्यासरशी सर्वांपासून वंचित व्हावे लागेल. मृत्यूपश्चात जे जग आहे तिथे यापैकी कोणतीच गोष्ट तुमच्याबरोबर येणार नाही. तिथे या जगातील जे काही तुम्ही अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी खर्च केला तितकाच भाग कामाला येईल. अल्लाह आणि त्याच्या दीन (जीवनपद्धती) वरील प्रेमाला तुम्ही भौतिक सुखावर प्राधान्य दिले तर परलोकात तुम्हाला हे बलिदान कामी येईल. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget