Halloween Costume ideas 2015

जिद्दीचे पंख


लातूर जिल्ह्यातील अहमदपूरसारख्या छोट्या तालुक्यातून प्रा.डॉ. सय्यद अकबर लाला यांनी शुन्यातून आपले जीवन घडविलेले आहे. एमएस्सी. डी.फार्म, एमएड, पीएचडी पर्यंत शिक्षण झालेले सय्यद अकबरलाला हे व्यावसायाने प्राध्यापक आहेत. मुक्तरंग प्रकाशन लातूर यांच्या मार्फतीने त्यांचे हे कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आलेले असून, कविता का लिहिली? या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाने म्हटलेले आहे की, ”पोट भरण्यासाठी पैसा कमाविणे आवश्यक आहे मात्र ते ही योग्य मार्गाने. पैसा हे बहुतांश आहे सर्वस्व नाही. पैशाने भौतिक सुख मिळते मात्र आत्मिक सुख नाही. अति पैसा कमाविण्याच्या चिंतेने रात्रीची झोप उडते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. माझा देश मला काय देईल, यापेक्षा माझ्या देशाला मी काय देऊ शकतो, हा विचार घेऊन मी जीवन जगत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले असतांनासुद्धा मी जिद्दीने मराठी भाषा विकसित केली म्हणूनच माझ्या या कविता संग्रहाला जिद्दीचे पंख म्हणून नाव दिले आहे. 

डॉक्टर तुमचे :ख पाहूने, मन सुन्न झाले

बालरोग तज्ज्ञ राहूनही तुम्ही हजारो बालकांचे प्राण वाचविले. 

झाले जीवनाचे वाळवंट या पहिल्याच कवितेतील या चार ओळी व त्यानंतरची संपूर्ण कविता एका वृद्धाश्रमामध्ये राहणार्‍या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरच्या जीवनाचा वेध घेते. ज्याची दोन्ही मुलं विदेशात राहतात व त्याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत व परस्पर अंत्यसंस्कार करून आस्थी कुरिअरने पाठवून द्या, असा निरोप देतात. हृदय पिळवून टाकणारी ही कविता वाचणार्‍याला सुन्न करून टाकते. 

आयुष्यभर सोबत राहूनही जवळ कधी बसत नाही

एकाच राष्ट्रात राहूनही एकमेकांना प्रेमाने वागवत नाही

नंतर स्वातंत्र्य मिळणार नाही, या शिर्षकाखाली या कवितेच्या ओळी हिंदू मुस्लिम संबंधातील महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. संपूर्ण कविता वाचल्यानंतर देशाहितासाठी या दोन्ही समाजांनी एकत्र येण्याची किती गरज आहे, हा संदेश या कवितेतून देतो. 

शाहण्या माणसानं आत्महत्या करावं 

मग वेड्या, भिकार्‍यांनी कसं जगावं

नाही आत्महत्या करणार या शिर्षकातील ह्या ओळी असून, शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं विदारक सत्य या कवितेतून मांडण्यात कवि यशस्वी ठरलेला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी काठीचा आधार या 24 व्या क्रमांकावर असलेल्या कवितेमध्ये कवी म्हणतो, 

मुलांसाठी आई-वडिल देह झिजवितात

मुलं आई-वडिलांना सोडून जातात

या कवितेतून वृद्ध आई वडिलांच्या आयुष्याच्या संध्याकाळाचे चित्रण कविने अतिशय प्रभावीपणे केलेले आहे. 25 व्या क्रमांकाची कविता भ्रमणध्वनीच्या दुष्परिणामांबाबत तरूणांना सावधान करणारी असून, 

कामापुरता मोबाईलचा वापर करूनही

काही युवक पोहोचलेत उच्च पदावर

या सुरूवातीच्या ओळीतून दहा कडव्यांची ही कविता आकार घेत जाते. या कवितेत भ्रमणध्वनीपासून होणार्‍या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आजारांपासून होणार्‍या नुकसानीसंंबंधीचे चित्र आपल्या शब्दातून रेखाटलेले आहे. 

भूलथापांना बळी पडत आहोत, या 48 व्या कवितेतून भारतीय राजकारणारचे चित्रण केलेले असून, असे चित्रण 50 व्या कवितेतूनही करण्यात आलेले आहे. 51 वी कविता स्वच्छतेला समर्पित असून, स्वच्छ भारत या केंद्र शासनाच्या योजनेचे महत्व अधोरेखित करणारी आहे. एकंदरित हा कविता संग्रह वाचनीय झालेला आहे. 


पुस्तकाचे नाव : जिद्दीचे पंख (कविता संग्रह). 

एकूण कविता : 51,      

लेखक : प्रा.डॉ.अकबर सय्यद लाला

मुल्य : 100


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget