Halloween Costume ideas 2015

गोली मारो सालों को.. हे बरोबर आहे काय?

Goli maro
केंद्रीय वित्तराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उत्तेजीत भाषणाने प्रेरीत होऊन महात्मा गांधीच्या हत्येच्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारी 2020 रोजी गोपाल शर्मा या माथेफिरूने जामियाच्या आंदोलकावर पोलीसांच्या साक्षीने गोळ्या झाडल्या व त्याचीच री ओढत कपील गुर्जर या तरूणाने 1 फेब्रुवारी रोजी शाहीन बागेमध्ये जावून फायरींग करत, ’या देशात फक्त हिंदूंचेच म्हणने ऐकले जाईल’ असे जाहीर केले. दिल्लीच्या एका सभेत वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी भक्तांकडून देश के इन गद्दारो को गोली मारो सालो को असे वदवुन घेतले होते. स्वतः मंत्र्याचेच पाठबळ असतांना अंधभक्त तरी कसे थांबणार? देश गंभीर आर्थीक संकटात असतांना आणि बजेट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी देश आर्थीक संकटातुन कसे बाहेर येईल यावर चिंतन करण्याऐवजी माननिय मंत्री महोदय देशाची संकटे कशी वाढतील या प्रयत्नात दिसले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हा लोकशाहीची मुल्ये जोपासण्यात 51 व्या क्रमाकांत असावा या दुर्देवाची मंत्र्यांना  जाणीव नसावी , गेल्या काही महिन्यात  तर मानवाधिकारांच्या पायमल्लीमुळे  हा क्रमांक 10 अंकानी घसरला असून जगभरातून भारतात होत असलेल्या मानवी अधिकाराच्या पायमल्ली बाबत टिका होत आहे. युरोपियन युनियनच्या संसदेत सी. ए. ए.  हा कायदा हा भेदभावपूर्ण आणि नागरीकत्वाचे अभुतपूर्व असे जागतिक स्तरावरील संकट निर्माण करणारा आहे, असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.  अमेरीकेच्या संसंदेत देखील अशा अविवेकी कायद्या बद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारताची प्रतिमा सुधारण्याऐवजी स्वतः भाजपाचे नेते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम करीत आहेत.  हे नेते ज्या संविधानाची शपथ घेऊन मंत्री झाले, त्या संविधानात कोणाला गद्दार ठरवायचे याचे अधिकार फक्त आणि फक्त न्यायालयाकडेच आहे. सत्ताधारी पक्षाला त्याच्या चुकीच्या निर्णयांचा लोकशाही पध्दतीने विरोध करण्याचे अधिकार घटनेने नागरीकांना दिलेले आहे. आण्णांच्या देशव्यापी आंदोलनात मनमोहन सिंग सरकारचा प्रचंड विरोध झाला असतांना देखील त्यांना त्यावेळी कोणीही गद्दार म्हणून संबोधले नाही. त्यावेळचे हेच विरोधक आज सत्तेत असतांना आपल्या विरोधकांना थेट गद्दार आणि देशद्रोही सारखी शेलकी विशेषणे देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेऊन कोणालाही गोळ्या मारण्याचा अधिकार मुळीच नाही, मंत्र्यानाच काय साक्षात भारताच्या पंतप्रधान यांना देखील नाही. असे असतांना सरकार मधील एका जबाबदार मंत्र्याने अशा प्रकारे असंवैधानिक वक्तव्ये करून जनतेला उत्तेजित करणे कितपत कायदेशीर आहे आणि सरकार स्वतः कायदा पाळत नसेल तर जनतेकडून काय अपेक्षा करणार? या उत्तेजनेमुळे गोपाल शर्मा याच्या बरोबरच सदर मंत्र्यावर गोळ्या घालण्याची चिथावणी दिल्याबद्दल देखील गुन्हा नोंदवीला जाईल काय?
    30 जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने आज नथुराम गोडसे पुन्हा आठवला. सत्तर वर्षांपुर्वीच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत खूप बदल झालेला आहे. नथुराम गोडसेने मुस्लिमांची वेशभुषा धारण करून आणि सुन्ता करून गांधीची हत्या यासाठी केली होती की, हत्येचा आरोप मुस्लिमांवर यावा आणि संपूर्ण भारतात मुस्लिमांचा नरसंहार व्हावा. परंतु, हे षड्यंत्र अपयशी ठरले आणि नथुराम ओळखला गेला. परंतु गोपाल शर्माचा नावाचा नथ्थु राजरोसपणे पोलिसांच्या साक्षीने आणि माध्यमांच्या कॅमेर्‍यांसमोर अगदी राजधानी दिल्लीच्या प्रमुख मार्गावर हातात कट्टा घेऊन शेकडो विद्यार्थ्यांना ’मै तुमको आजादी दूंगा’ म्हणजेच जीवे ठार मारण्याची धमकी देतो आणि शादाब नावाच्या एका विद्यार्थ्याला जखमी करतो. तरी दिल्लीतील बहाद्दर पोलीस हातघड्या घालून हे दृष्य अशा तर्‍हेने पाहात होते जसा सिनेमा पाहताहेत.
    पोलीस प्रशासनाच्या हतबलतेचा असे दृष्य भारतीयांनी या दशकात तरी पाहीले नसावे. गोळी चालविण्या पर्यंत पोलीस या अतिरेक्याला कोणताच अडथळा आणत नाही याचा अर्थ अप्रत्यक्षपणे संपूर्ण पोलीस फोर्सच्या प्रोत्साहनाने त्याने आंदोलकावर गोळी झाडली असा होतो. जसे गांधी निशस्त्र होते तसेच आदोंलक देखील निःशस्त्र होते. 30 जानेवारीला गांधीजींची हत्या होऊन देखील गांधीजी मेले नाहीत त्यांच्या विचाराने आजही ते जिवंत आहेत आणि जीवंत राहणार, तसाच फाशीची शिक्षा होऊन देखील नथुराम जीवंत आहे आणि आज गांधीपेक्षा जास्त शक्तीशाली दिसत आहे.  सत्तर वर्षांपूर्वी या नथुरामला कटकारस्थानांची गरज होती आज सत्तेचे पाठबळ असल्यामुळे  मस्तीत मदमस्त झालेल्या या माथेफिरूंना कोण रोखणार? जेंव्हा कुंपणनानेच शेत खाल्ले!
    स्वतंत्र्य भारतातील पहिला आतंकवादी म्हणून नथुराम गोडसेचे नाव इतिहासात नोंदले गेले. जेंव्हा विचारावर विजय मिळविणे अशक्य होते तेंव्हा अतिरेकी विचारांची माणसे हिंसेचा अवलंब करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु विचार कधीच मरत नसतो. विविधतेतून एकता हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे. वेगवेगळ्या सभ्यता, धर्म, पंथ, भाषा, रंग, जरी असले तरी देशाने मतभेदासहीत सहजीवन स्विकारले आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी लोकशाहीचा अवलंब केला. आमच्या सामुहीक जीवनात राष्ट्रधर्माचा प्राधान्यक्रम  आहे म्हणून आम्हाला शाळेत दररोज सर्व भारतीय माझे बांधव आहेत याची शपथ दिली जाते. मुळात राष्ट्राच्या निर्मीतीचा उद्देशच आमचे सामाजिक आणि भौतिक हित जोपासण्याचा आहे. धर्म ही व्यक्तीगत बाब असल्यामुळे सर्वांना धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याला घटनेने मर्यादा घातल्या. हे स्वातंत्र्य जोपासत असतांना इतर कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य सर्वांना असले तरी इतरांवर आपले विचार लादण्याचा अधिकार कोणालाही नाही. 
    अभिव्यक्ती स्वातंत्र्याची स्पष्ट व्याख्या संविधानाने अधोरेखीत केली असतांना देखील काही अतिवादी लोक आपला विचार लादण्याचा प्रयत्न करतात आणि विरोध झाल्यास बळाचा वापर करतात आणि हिंसेचा मार्ग अवलंबतात. ही प्रवृत्तीच संघर्षाचे मूळ कारण आहे. या प्रवृत्ती जेंव्हा-जेंव्हा बळकट होतात तेव्हा-तेव्हा देशात अस्थैर्य आणि असुरक्षितता निर्माण होत असते, नेमके हेच सध्या देशात घडत  आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यावर अशा माथेफिरूनां हिंदू महासभा सन्मानित करणार हा तर कळसच झाला. यापूर्वी देखील मॅाबलिंचींगच्या आरोपींना पुष्पमाला अर्पण करण्याचा पराक्रम देशाचे मंत्री सिन्हा यांनी केला होताच. 
    धर्मांध शक्ती नेहमीच भितीच्या बळावर राजकारण करत असतात. वास्तविक पाहता जगातील कोणत्याही धर्मांध आणि अतिरेकी संघटनेचा कोणताच धर्म नसतो. कारण की कोणत्याही धर्माची मुलभुत शिकवण ही मानवतावाद आहे.  मानवावर प्रेम, बंधुभाव आणि सदाचार ही धर्माची मुल्ये आहेत.   धर्म माणसाला जोडतो. जो माणसा-माणसात द्वेष निर्माण करतो तो धर्म नसुन अधर्म आहे. अशा अधर्मी प्रवृत्ती धर्माला बदनाम करतात किंबहुना आपले स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा वापर मात्र करित असतात. देशात निर्माण झालेल्या या असहिष्णू आणि विस्फोटक परिस्थिीतीमुळे आपण प्रगतीच्या ऐवजी प्राचीन युगाकडे तर वाटचाल करत नाही ना? देशासमोर अनेक आव्हाने आणि समस्या आवासून उभे असतांना येथील प्रत्येक गोष्ट आपण हिंदू-मुसलमान याच दृष्टीकोनातून पाहणार का? बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, प्रदुषण , पर्यावरण, शेतकरी आत्महत्या इत्यादी अनेक निधर्मी प्रश्‍नांचा हिंदू-मुसलमांनाशी काहीच संबध नसतांना त्यांच्या विषयी आपण अलिप्त  कसे राहू शकतो? मुठभर लोकांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण अविवेकी बुध्दीने संपूर्ण राष्ट्र वेठीस धरणार का? धर्माने शिकवलेला मानवतावाद आणि मुल्ये तसेच ज्या बंधुत्वाची शपथ शाळेत असतांना दररोज अनेक वर्षे घेतली ती वाया जाणार का? असे असतांना आणि सर्व भारतीय बांधव मानणारा राष्ट्रधर्म काही अधर्मी लोकांच्या उत्तेजनामुळे आपण सोडणार का? जर आपण भारताय नागरीकच एकमेकांना आपले शत्रू समजू लागलो तर भारताला बाहेरच्या शत्रुंची गरज काय? भारतीयांनी भारतीयांचाच पराभव केला तर जिंकणार कोण? या सर्व लढाईत कोणाचे नुकसान होणार? भारताचेच ना? हा कसला राष्ट्रवाद ज्या लढाईचा अंत राष्ट्राला पराभूत करणे आहे. असा असुरक्षीत, असहिष्णू आणि प्रदुषित राष्ट्र आम्ही आमच्या भावी पिढीला देणार काय? संवैधानिक पध्दतीने विरोध करण्याचे स्वातंत्र्य असतांना देखील जर प्रत्येक मतभेदाचे उत्तर गोली मारो सालो को असेल तर भारतामध्ये आपापसातच रक्तपात होणार आणि यात फक्त भारत मातेचेच काळीज रक्तबंबाळ होणार. असाच भारत आम्हास हवा आहे काय?

- अर्शद शेख
9422222332
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget