एक खेडूत व्यक्ती ज्यांचे नाव जाहिरा बिन हराम (र.) आहे. ते नेहमी प्रेषित मुहम्मद (स.) यांना खेड्यातल्या वस्तू भेट देत होते आणि जेव्हा ते आपल्या गावी परत जात तेव्हा प्रेषित (स.) त्यांना शहरातल्या काही वस्तू भेट देत असत. प्रेषित (स.) आपल्या अनुयायींना म्हणाले, "हे आमचे खेडूत मित्र आहेत आणि मी त्यांचा शहरी मित्र आहे. " ते खेडूत दिसायला सुंदर नव्हते. एकदा तेमदीनेत खेड्यातून आणलेल्या वस्तू विकत होते तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) मागून आले आणि त्यांना उचलून घेतले. जाहिरा (र.) प्रेषितांना पाहू शकत नव्हते. ते म्हणाले, 'कोण तुम्ही? मला सोडा.' जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांनी प्रेषितांना पाहिले आणि असा प्रयत्न करू लागले की प्रेषितांनी जास्त वेळ त्यांना धरून ठेवावे. प्रेषित (स.) म्हणाले, "या गुलामाला कुणी विकत घेणार आहे का?" (ते गुलाम नव्हते, पण काळ्या रंगाचे होते.) जाहिरा (र.) म्हणाले, 'हे अल्लाहचे प्रेषित, तुम्ही फार तोट्यात राहणार.' (मला विकून जास्त काही मिळणार नाही.) प्रेषितांनी उत्तर दिले, "दुनियेच्या नजरेत तुमची किंमत कमी असली तरी अल्लाहजवळ तुम्ही फार मौल्यवान आहात." (ह. अनस (र.), मिश्कात)
हजरत असवद बिन यजीद म्हणतात की ह. आयेशा (र.) यांना विचारले की जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) घरी असतात तेव्हा ते काय करतात? त्यांनी उत्तर दिले, 'ते घरकामात आमची मदत करतात आणि नमाजची वेळ झाली तेव्हा ते मस्जिदीत जातात.' (बुखारी)
ह. इब्ने अब्बास म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे, "तुमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ ती व्यक्ती आहे जो आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ असेल. मी तुमच्यामध्ये सर्वांत जास्त श्रेष्ठ आहे कारण मी आपल्या पत्नींशी चांगला व्यवहार करतो." (इब्ने माजा, इब्ने अब्बास)
ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी म्हणायचे, "माझ्या साथीदारांविषयी कुणीही साथीदार मला कधीही काही सांगू नये. कारण मला हे आवडते की मी तुमच्या समोर येताना अशा प्रकारे यावे की तुमच्याविषयी माझ्या मनात काहीही नसावे." (अबू दाऊद, इब्ने मसऊद)
ह. अबू कुलाबा म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे काही अनुयायी प्रेषितांकडे गेले आणि आपल्या एका साथीदाराची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, 'आम्ही यांच्यासारखा माणूस पाहिला नाही. प्रवासात हे गृहस्थ कुरआनचे पठण करत होते आणि ज्या वेळी आम्ही विश्रांती घेत होतो त्या वेळी ही व्यक्ती नमाज अदा करत होती.' प्रेषितांनी विचारले, "मग त्यांच्या सामानाची देखरेख कोण करत होते? त्यांच्या उंटाला चारा कोण घालत होते?" लोकांनी सांगितले, 'आम्ही देखरेख करत होतो.' त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, "मग तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहात." (तरगीब व तरहीब, दाऊद)
यहया बिन मर्रा म्हणतात की मी एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत बसलो होतो. तितक्यात एक उंट तिथे आला आणि तो खाली बसला. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. प्रेषितांनी मला सांगितले, "चौकशी करा की हा उंट कुणाचा आहे, त्याला काहीतरी झालंय." मी त्या माणसाची चौकशी केली तेव्हा समोर आले की हा उंट एका अन्सारीचा आहे. प्रेषितांनी त्यांना विचारले, "या उंटाची अवस्था अशी का झाली?" तो म्हणाला, 'आम्ही त्याच्याकडून काम करून घेत होतो. आता तो काही कामाचा राहिला नाही. म्हणून असे ठरवले की त्याला जुबह करावे.' प्रेषित (स.) म्हणाले, "तुम्ही याला कापू नका. मला तसेच द्या अगर काही किंमत ठरवा." ते म्हणाले, 'हे प्रेषिता, ह्या उंटाला तुम्ही तसाच घ्या, विकत नको.' प्रेषितांनी त्या उंटावर बैतुलमालचा शिक्का लावला आणि त्याला सरकारी पशुंमध्ये सामील केले. (तरगीब व तरहीब, अहमद)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment