यूक्रेनमध्ये युद्ध चालू असून एक वर्ष झाले पण ते युद्ध काही थांबत नाही. रशियाने स्वतःहून चर्चेद्वारे यूक्रेच्या बाबतीत परस्परांतील सामंजस्याने समस्येचे निवारण करावे यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले, पण अमेरिकेला हे मान्य नाही. यूक्रेनच्या हातात अब्जावधी डॉलर्स ठेवतो जेणेकरून त्याने हे युद्ध चालूच ठेवावे. कारण एकमेव अमेरिकेतील शस्त्रास्त्रांचे उत्पादन अबाधित राहावे. कारण शस्त्र उत्पादन आणि विक्री हा तिथल्या उद्योगपतींचा धंदा आहे. जगात कुठे न कुठे युद्ध चालू राहिले तरच त्यांचे कारखाने चालू राहतील. त्यांना दुसऱ्या कोणत्या उद्योगधंद्यात स्वारस्य नाही. एकीकडे युद्धात लाखो माणसं ठार होत राहतील, तर दुसरीकडे त्यांच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन चालू राहील. असे वाटते की अमेरिका या शस्त्रांच्या माफियांपुढे हतबल आहे.
केवळ राष्ट्राराष्ट्रांमध्ये युद्ध चालू ठेवूनच तो आपले कारखाने चालू ठेवत नाहीत तर अमेरिकेतील प्रत्येक नागरिकांना सुद्धा शस्त्रे विकण्याची सोय त्यांनी केलेली आहे. तिथे कुणीही व्यक्ती सर्रास शस्त्रांची विक्री करू शकतो आणि कुणीही नागरिक आपल्याला हवे तसे शस्त्र खरेदी करू शकतो आणि कोणत्याही नागरिकाला जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करून त्यांचे जीव घेऊ शकतो. क्षुल्लक कारणांवरून त्यांना निर्दोष म्हटले जाते. कोणता कायदा कोणता नियम त्यांना गजाआड करू शकत नाही. सामूहिक हत्याकांड वर्षभर चालू राहते. म्हणजे कोणत्याही माणसाने एकाच वेळी चार व्यक्ती किंवा त्यापेक्षा अधिक जणांची गोळ्या घालून हत्या केली तर त्याला सामूहिक हत्याकांड म्हटले जाते. सामूहिक हत्याकांडातून देखील गोळ्या झाडणारा व्यक्ती अनेक वेळा सुखरूप निर्दोष ठरवला जातो. खरे पाहता शस्त्रसंस्कृती अमेरिकेच्या नसानसांत भिनलेली आहे. एक तर कोणी याविरुद्ध बोलत नाही, जर कुणी आवाज उठवला तरी त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या समस्येवर आळा घालण्याचे अनेक प्रयत्न केले, पण यशस्वी झाले नाहीत. त्यांच्यानंतर आलेल्या ट्रंप यांनी एक नवी युक्ती नागरिकांना शिकवली ती म्हणजे जर कुणाला शाळेत किंवा इतर ठिकाणी सामूहिक हत्याकांडाचा धोका असेल तर त्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी किंवा दुसरे कोणते सार्वजनिक स्थळ असेल तर त्याच्या व्यवस्थापकांनी सुद्धा शस्त्रे बाळगावीत. म्हणजे याची लोकांना भीती वाटून कुणी अशा सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणार नाही. म्हणजे शस्त्रास्त्रांची निर्मिती किंवा खरेदीवर बंदी नकोच, ती सर्रास चालू ठेवावी. भीती वाटणाऱ्यांनी स्वतःदेखील शस्त्रे बाळगावीत, असे त्यांचे म्हणणे होते.
किती क्षुल्लक कारणावरून गोळ्या झाडल्या जातात! एखाद्या तरुणाने चुकीने कुणाचे दार ठोठावले तर त्या घराचा मालक त्या व्यक्तीला काहीही न विचारता दरवाजाच्या काचेमधूनच त्याच्यावर गोळा झाडतो. कुणाची कार चुकून दुसऱ्या कुणाच्या जागेवर आली किंवा कुणी चुकून आपल्या गाडीचा दरवाजा न उघडता दुसऱ्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काही न विचारता लोक त्याच्यावर गोळीबार करतात आणि पोहीस त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाहीत. या गोळीबारात लहान आणि तरुण मुलेदेखील आहेत. म्हणजे अमेरिकेतली भावी पिढी निरपराध लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात करत आहे. अशात येणाऱ्या पिढीचे काय होणार? जगाला शांततेचे धडे देणाऱ्या अमेरिकेचे नागरिक स्वतः किती हिंसक वृत्तीचे आहेत हेच यावरून सिद्ध होते. एकीकडे शांततेच्या बाता आंतरराष्ट्रीय स्तरावर करायच्या आणि दुसरीकडे आपल्या देशातच रक्तपात चालू राहू द्यायचे. गेल्या वर्षी २०,००० निरपराध लोक यात मारले गेले तर या वर्षी दिवसागणिक ५० लोकांचे प्राण जात आहेत. शस्त्र ठेवण्याची अमेरिकी नागरिकांना तिथल्या संविधानानेच अनुमती दिलेली आहे. याला ते स्वतःचे मूळ स्वातंत्र्य समजतात. तिथल्या दर शंभर नागरिकांमध्ये १२० पिस्तूल, गन वगैरे आहेत. अमेरिका म्हणजे बंदूकधारी शांतिदूत असेच म्हणावे लागेल.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment