Halloween Costume ideas 2015

रमजानचं प्रशिक्षण झालं; पुढ काय?


कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणाऱ्या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. 

असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानमध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले. उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले. मित्रानों, हेच कार्य आम्हाला पुढील 11 महिने अमलात आणायचे आहे. इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे. कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, ‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’  (3:110)

मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहे. रमजानच्या काळातील प्रशिक्षणानंतर समजते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे. 

कुरआनच्या पुढील काही मोजक्याच आयातीचे फक्त भाषांतर आपल्या सेवेत. ’’हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.’’  (16:125)

’’ आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (41:34)’’

बदलते वातावरण आणि आपली भूमिका

मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. कुरआनही हेच फरमावितो, ’’तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.’’ (109:6), ’’धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.’’  (2:256) सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. 

मित्रानों! रामनवमीच्या पर्वावर देशात जवळपास 24 ठिकाणी दंगे भडकावण्यात आले. काही मदरशांना जाळण्यात आले. मुस्लिम समाजाला टार्गेट करून काही ठिकाणी मारहाण करण्यात आली. हे सर्व संवैधानिक मार्गाने रोखणे काळाची गरज होती. परंतु, विविध राज्यसरकारांना यात अपयश आले.  

राजकारण करायचेच असेल तर लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरिणांकडे आहे. विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते. 

कुरआनमध्ये सांगितले आहे की,  

’’आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.  (14:42)’’

’’जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ’’आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!’’ (2:11) ’’सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. (2:12)’’ 

मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणाऱ्यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा, त्यांच्यात सामील होवू नका.  ईश्वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.

‘‘ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’’  (5:32). या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

कुरआनमध्ये फरमाविले, ‘‘काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.  (103:1-3).’’

सर्व ईमानधारकांना विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात कुरआनचे मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत, दंगली घडवत आहेत, विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.

मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी,  त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी ऐहिक आणि पारलौकिक मार्गदर्शन कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वचनातून मिळतो. हे एकदा आपण अवश्य वाचावे.

ईश्वर मला तुम्हाला सद्बुद्धी देऊन आपल्या हातून मानवकल्याणाचे कार्य घडो. आमीन. 

- बशीर शेख ‘कलमवाला’

8830273038


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget