रॉकेट तंत्रज्ञान, बिनव्याजी बँका, साखर कारखाने ते आरमारांचा निर्माता
टिपू सुलतानने आपल्या राजकीय धोरणात सामान्य माणासाला सामावून घेण्याचे धोरण आखले होते. त्याने व्यापाराच्या माध्यमातून सामान्य रयतेच्या प्रगतीची योजना आखली होती. भारतातील उत्पादनावर आणि जगभरातील बाजारपेठेवर त्याची नजर होती.
लंडनच्या लिडनहाल स्ट्रीटवर ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते. टिपू जोपर्यंत हयात होता, तोपर्यंत लिडनहाल स्ट्रीटसाठी म्हैसूर हे धडकी भरवणारे आणि कंपनीच्या अस्तित्त्वाला हादरे देणारे भारतातील महत्वाचे केंद्र होते, असे मत प्रसिद्ध इतिहासकार बी. शेख अली यांनी मांडले आहे.
बी. शेख अली यांच्या विधानाचा अर्थ काही घटना आणि समकालीन कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होऊ शकेल.
टिपू सुलतानने आपल्या राजकीय धोरणात सामान्य माणासाला सामावून घेण्याचे धोरण आखले होते. त्याने व्यापाराच्या माध्यमातून सामान्य रयतेच्या प्रगतीची योजना आखली होती. भारतातील उत्पादनावर आणि जगभरातील बाजारपेठेवर त्याची नजर होती.
स्वदेशी वस्तूंच्या वापरासंदर्भात आणि परदेशी व्यापाऱ्यांवरील बहिष्कारासंदर्भात कालिकतच्या फौजदाराला त्याने आदेश दिले होते. त्या आदेशात तो म्हणतो, ‘तेथील जनतेला आणि व्यापाऱ्यांना तू सांगितले पाहिजेस, इंग्रज व्यापाऱ्यांना कोणतेही माल विकू नये आणि त्यांच्याकडून कोणतेही माल खरेदी करु नये. त्यामुळे इंग्रज व्यापाऱ्यांचा इथे निभाव लागणार नाही.’
शेतमाल जगभरात विकण्यासाठी व्यापारी कंपनीची स्थापना
नुसत्या परदेशी वस्तूंच्या वापरांना आळा घालून टिपू थांबला नाही, तर त्याने सामान्य शेतकऱ्यांमध्ये जागतिक बाजारपेठेविषयी जागरुकता निर्माण केली. व्यापारी कंपनीची स्थापना करुन त्यात रयतेला सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्या कंपनीत लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी आवाहन केले. कंपनीचा जो हुकुमनामा त्याने काढला होता. त्यात तो म्हणतो, “सल्तनत-ए-खुदादादच्या रयतेला कोणत्याही धर्म आणि वर्णभेदाशिवाय व्यापारात सहभागी होऊन नफा मिळवण्याबाबत आदेश दिला जात आहे. रयतेतील जी व्यक्ती 5 ते 500 इमामीपर्यंत रक्कम व्यापारात लावण्यासाठी जमा करेल, त्याला वर्षाच्या अखेरीस त्याच्या स्वतःच्या रकमेसह प्रत्येक इमामीच्या बदल्यात अर्धा इमामी म्हणजे मुळ गुंतवणुकीच्या शेकडा पन्नास टक्के नफा दिला जाईल. जी व्यक्ती 500 ते 5,000 इमामी गुंतवेल, त्याला 25 टक्के, जी व्यक्ती 5,000 इमामीपेक्षा आधिक रक्कम जमा करेल, त्याला 12.5 टक्के नफा दिला जाईल.’’
याचा अर्थ टिपू सुलतान गरीबांना आर्थिक सक्षमता प्रदान करुन राज्यात आर्थिक समता प्रस्थापित करु इच्छित होता. टिपू सुलतानने मस्कत, बहरीन, कतर, इराक, इराण, तुर्कस्तानसह जगातील अनेक देशात आपली व्यापारी केंद्रे स्थापन केली होती. म्हैसूरमध्ये आपल्या कंपनीच्या एजंटांद्वारे जे माल जमा केले जाई. त्यावर प्रक्रिया करून टिपू तो माल मोठमोठ्या जहाजांवर लादून जागतिक बाजारपेठेत नेऊन विकत असे. त्यातून कंपनी आणि म्हैसूरच्या शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत असे.
म्हैसूरला ‘सिल्कसिटी’ करणारा टिपू
टिपूने जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून परदेशातील अनेक पिके भारतात आणण्याचा प्रयत्न केला. ही पिके म्हैसूरमध्ये उगवता, यावी यासाठी टिपूने संशोधन सुरु केले. लालबाग नावाची कृषी प्रयोगशाळा स्थापन केली. तेथे या पिकांचे पहिले उत्पादन घेतले जाई व त्यानंतर त्याची बिजे शेतकऱ्यांना वाटली जात होती. टिपू सुलतानने राज्यात शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने सुरु केले होते. जगातल्या वेगवेगळ्या भागातून रेशीमकिडे आणून त्याचे संगोपन सुरु केले. त्यातूनच म्हैसूर सिल्कसिटी म्हणून जगात नावारुपाला आले. इतिहास संशोधक आणि प्रसिद्ध लेखक इरफान हबीब म्हणतात, ‘टिपूच्या दुरदृष्टीचे एक उदाहरण म्हैसूरमध्ये रेशीम उत्पादनाची सुरुवात होती. जे पुढील काळात एक यशस्वी उद्योगाच्या रुपात विकसित झाले. तुतीची झाडे लावण्याची कामे निवडक शेतकऱ्यांना व तालुकेदारांना सोपवण्यात आली. रेशीमच्या किड्यांचे संगोपन व जतन करण्यासाठी राज्यात 21 केंद्रे स्थापन करण्यात आली होती.’’
साखरेबाबतच्या स्पर्धेत जगात पहिला क्रमांक
श्रीरंगपट्टणमजवळ पालहल्ली आणि चिन्नपट्टणम या शहरांमध्ये दोन साखर कारखान्यांची निर्मिती केली होती. त्यातील एका साखर कारखान्याचे नाव ‘श्री अष्टग्रामा शुगर मिल्स’ असे होते. त्यातून उत्पादित साखर जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जात असे. टिपूच्या साखर कारखान्यातील साखर 1803 पर्यंत जागतिक पातळीवर झालेल्या जागतिक साखर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर होती. टिपूने राज्यातील कृषिक्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्याने काझींना दिलेला हुकुमनामा अतिशय महत्वाचा आहे. त्यात तो म्हणतो, “काझीने आपल्या प्रदेशात जनगणना करुन पुरुष, स्त्री आणि लहान मुले यांची सर्व माहिती गोळा करावी. त्यांची उत्पन्नाची साधने कोणती आहेत ते देखील पहावे. कोणी बरोजगार असेल तर त्यांना सरकारकडून पन्नास ते शंभर रुपये मिळवून द्यावेत आणि कामावर लावावे. शेती करणाऱ्या व्यक्तींनी काही कारणाने शेती सोडली असेल, बेरोजगार झाले असतील तर प्रत्येकाला दोन नांगर आणि बैलांसोबत कृषी खर्चासाठी 20 ते 30 रुपये द्यावेत.”
‘शेती करेल त्याला करमाफी’
याशिवाय टिपूने कावेरी नदीवर मही धरण बांधण्याची योजना आखली होती. ‘या धरणाचे पाणी घेऊन जो शेतकरी शेती करेल त्याला कर माफ’ करण्यात येईल अशीही घोषणा या धरणाच्या कोनशिलेत करण्यात आली होती. ही कोनशिला कृष्णराजसागर धरण बांधत असताना 1911 साली खोदकामात सापडली. या कोनशिलेवर 12 जून 1798 ची तारीख नोंदवलेली आहे. ही कोनशिला कृष्णराजसागर धरणाच्या प्रवेशद्वारात लावण्यात आली आहे. टिपू सुलतानने राज्यात बिनव्याजी बँका स्थापन केल्या. त्या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले. त्याशिवाय या बँका शेतकऱ्यांना शेळ्या व अन्य गरजेच्या वस्तू देखील पुरवत असत.
अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती
हैदर अली आणि टिपू सुलतान दोघांनीही म्हैसूरच्या सैन्याचे आधुनिकिकरण करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी फ्रेंचांची आणि इतर मित्रांची मदत घेऊन युरोपी शस्त्रांची म्हैसूरमध्ये निर्मिती करण्याची योजना आखली. त्यातून अनेक नव्या शस्त्रांचा शोध लावण्यातही टिपू सुलतानला यश आले होते. 1787 साली टिपूने आपल्या फ्रान्सला जाणाऱ्या राजदूतांना आपल्या कारखान्यात बनवलेल्या बंदुका सोबत नेण्यास सांगितले. विशेषतः फ्रान्सच्या राजाला हे सुचित करायला सांगितले की, आपल्याकडे अशा बंदुका बनवणारे दहा कारखाने आहेत. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत बंदुका बनवल्या जात आहेत. इरफान हबीब लिहितात, “टिपूच्या कारागीरांकडून बनवलेल्या बंदुका पाहून 1786 मध्ये पाँडेचरीच्या गव्हर्नर कोसिनीने या बंदुका युरोपीयन बंदुकांपेक्षा चांगल्या दर्जाच्या असल्याचे म्हटले होते. 1788 मध्ये 16 व्या लुईला जेव्हा या बंदुका भेट दिल्या त्यावेळी त्यानेही अशाच पद्धतीचे मत मांडले होते.”
टिपूने शस्त्रास्त्रनिर्मिती कारखान्यांची क्षमता वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करुन पाहिले. कर्नल कर्क पेट्रीक याने टिपू सुलतानचे पत्रे भाषांतरीत केली आहेत. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती त्याने दिली आहे. तो लिहितो, ‘श्रीरंगपट्टणम येथील बंदुकीच्या कारखान्यातील कुल्ले पाण्याच्या दाबावर चालत होती. या कारखान्यात अशी एक मशीन होती, जी पुर्णतः जलसंचलित होती. या मशिनद्वारे बंदुक आणि तोफेच्या नळीला भोके पाडली जात होती. टिपूने अनेक यंत्र बनवले होते. त्यात घड्याळ, खेळणी वगैरेंचाही समावेश होतो. टिपूचे एक स्वयंचलित खेळणे आजही अभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे. त्या खेळण्याला चावी दिल्यानंतर त्यातील वाघाच्या तोंडून डरकाळ्या बाहेर निघतात. तर इंग्रज सैनिकाच्या तोंडून विव्हळण्याचा आवाज बाहेर पडतो.’
(पूर्वार्ध)
(साभार : बीबीसी मराठी)
- सरफराज अहमद
इतिहास संशोधक, सोलापूर
भ्रमणध्वनी : ९५०३४२९०७६
Post a Comment