महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेलीआहे.शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील सर्वाच्च न्यायालयाचा निकाल साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असताना हा निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागेल याचे वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. कायदेतज्ज्ञामध्ये एकनाथ शिंदे सोबत जे सुरूवातीला आमदार आधी सुरत मग गुवाहटीला गेले त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही होऊ शकते याबाबत एकमत आहे. तसे झाल्यास राज्यातील सत्ताधारी पक्ष अल्पमतात येऊन सरकारच्या भवितव्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडून पहाटेच्या शपथविधीचा राहिलेला सोपस्कार पूर्ण करेल आणि अनेक वर्षापासुन मुख्यमंत्री होण्याची अजित पवार यांची मनिषा पूर्ण होईल असे भाकीत केले जात आहे. यात काहीअंशी तथ्य असले तरी तशी शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. शिवसेना कधी काँग्रेस राष्ट्रवादी यासारख्या पुरोगामी पक्षाशी युती करेल अशी शक्यताही नसताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ज्या पद्धतीने निर्मिती झाली आणि या आघाडीने जवळपास अडीच वर्षे आपला कारभार अतिशय योग्य पद्धतीने सांभाळला हे लक्षात घेता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शकतील ही शक्यताही नाकारता येत नाही. यामागे दोन कारणे आपल्याला स्पष्टपणे दिसतात एक राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहण्यास नेहमी रस राहिलेला आहे महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जे अस्वस्थता आहे ती आता लपून राहिलेली नाही.
इकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या नावाने वज्रमूठ सभा घेत आहे या सभांना प्रचंड गर्दी होताना आपण पाहतो आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची घोर फसवणूक केली हा विचार सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही कायम आहे आणि तो विचार आणि उद्धव ठाकरेंनी आगामी काळामध्ये घेतलेली भूमिका यांचा एकत्रित विचार करता महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळेल यात शंका नाही. हे यश पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचे असेल आणि या यशामध्ये त्यांचा वाटा लक्षात घेता त्यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने घोषित केल्यास आपले राजकीय अस्तित्व काही अंशी का होईना कमी होईल अशी भीती काही अंशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बघायला मिळते आहे आणि त्या भूमिकेतूनच हे नेते आपल्या पक्षांचा महाविकास आघाडीतील राजकीय दबाव वाढवण्यासाठी आणि शरद पवारांचे त्यावरील नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून नवनवीन मुलाखतीतून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय बाबतीत निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत कदाचित भविष्यात आम्ही महाविकास आघाडीतून बाहेरही पडू अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली नसली तरी त्यांचा एकूणच कल पाहता एकीकडे आपले महाविकास आघाडीतील प्रस्थ वाढवायचे तर दुसरीकडे भाजप सारख्या पक्षाशी सख्य ठेवून राहायचे अशी दुहेरी भूमिका राष्ट्रवादीचे नेते घेताना दिसत आहेत. यातून दोन बाबी स्पष्ट होताना दिसतात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असल्यामुळे त्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून का होईना हे सर्व नेते भाजपशी सख्य राखून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
एकूणच राष्ट्रवादीचा अलीकडच्या कार्यकाळातला प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही निर्णय घेऊ शकतो हे आता उघड होत आहे. शरद पवार एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेतात तर दुसरीकडे आपले मित्र म्हणून अदानीचेही समर्थन करतात ही बाब आता लपून राहिलेली नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणात कायमच शरद पवार हे एक प्रकारचे दबाव तंत्र वापरून राजकारण पुढे नेणारे नेते म्हणून राजकीय पटलावर वावरलेले आहेत. शरद पवार स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असले तरी एकेकाळी जनसंघासारख्या पक्षांबरोबर पुरंदरचे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या राजकीय यशामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेतात यावरच पुढच्या राजकीय गोष्टी बऱ्यांशी अवलंबून आहेत. उद्धव ठाकरे वज्रमूठ सभांमधून महाविकास आघाडीची भूमिका जरी मांडत असले तरी त्यांच्या भूमिकेशी विसंगत परस्पर विरोधी भूमिका राष्ट्रवादीचे नेते मांडताना दिसत आहेत. विशेषतः शरद पवार व अजित पवारांच्या अलीकडच्या मुलाखती आपण पाहिल्या तर त्यातून त्यांचा रोख हा दोन्ही बाजूने आपला पक्ष कसा वाढेल यावरच दिसतो आहे.
महाराष्ट्रातल्या राजकारणापासून सुप्रिया सुळे या कायमच अंतर ठेवून राहिलेल्या आहेत.त्यामुळे अजित पवारांचे आगामी काळातील पाऊल हे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवे वळण निर्माण करेल अशी शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन स्थापन झालेल्या सरकारला आता जवळपास दहा महिन्याहून अधिक काळ लोटला आहे .या काळामध्ये दिल्लीतील भाजपा नेत्यांचे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. काहीही करून उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा त्यासाठी संभाव्य सगळे प्रयत्न करायचे अशी एक अढ मनात घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट महाराष्ट्र मध्ये काम करतो आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांना तोडीस तोड सभा शिंदे गटाकडून घेतल्या जात आहे आणि त्याला भाजपाचे समर्थन आहे हेही आता लपून राहिलेले नाही .अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आगामी राजकीय परिस्थिती काय असू शकते याचा या लेखांमध्ये मागोवा घेणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते.
महाराष्ट्र ही कायमच पुरोगामी, लोकशाही परंपरा मानणारे राज्य म्हणून देशभर ओळखले जाते याच महाराष्ट्रामध्ये संतांची, समाज सुधारण्यांची आणि राजकीय नेतृत्वाची मोठी फळी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक ,विनायक दामोदर सावरकर ते अलीकडच्या काळातील यशवंतराव चव्हाणांपासून पासून शरद पवारांपर्यंत देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने कायमच आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.अशा स्थितीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला यश मिळेल किंवा नाही हे महाराष्ट्रासारख्या राज्यातून निर्माण होणाऱ्या लोकमातवर ठरणार असल्याने महाराष्ट्रावरले भारतीय जनता पक्षाचे लक्ष हे त्यामुळेच अधिक आहे. भारतीय जनता पक्षाला कडवा विरोध करणारा शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष या राज्यात असल्याने आणि या पक्षाने देशभरातली भाजप विरोधी पक्षांची मूठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असल्याने शिवसेनेला काहीही करून संपवायचे असा एक सर्वसाधारण प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आगामी काळात राहणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्याची रंगीत तालीम असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव केल्यास आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विस्तारावर काही अंशी का होईना पायबंद घालता येईल अशी अडगळ भारतीय जनता पक्ष बांधून आहे. आणि हे खरे आहे की शिवसेना हा पक्ष वाढला तो प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यासारख्या भागात मराठी माणूस त्यांची अस्मिता आणि त्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना कायमच प्रादेशिक पक्षाच्या चौकटीत काम करत आलेली आहे आणि तिने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये महत्त्वाची राहिलेली आहे .त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेनेला हिंदुत्वाचा जो एक चेहरा आहे तो घालवून आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव केल्यास तोच कल संबंध देशांमध्ये आपल्याला निर्माण करून पुन्हा एकदा २०२४ मध्ये सत्तेत जाता येईल असे भारतीय जनता पक्षाला वाटते आहे. महाराष्ट्रात सद्यस्थिती लक्षात घेता तरुणांचे प्रश्न हे ऐरणीवर येताना दिसत आहेत. राज्याच्या लोकसंख्येमध्ये तरुणांच्या वाटा मोठा आहे हे तरुण गेली दहा वर्षापासून रोजगाराच्या शोधामध्ये पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून रात्रंदिवस अभ्यास करत आहेत.
- हर्षवर्धन घाटे
नांदेड, ९८२३१४६६४८
(पूर्वार्ध)
(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)
Post a Comment