Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्रातील राजकारणाची आगामी वाटचाल...

आपले भवितव्य हे शासकीय सेवेत सुरक्षित असल्याचा एक भ्रम या तरुण मंडळीत असल्याने स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढलेली आहे. या मोठ्या कार्यकारी गटाला  रोजगार देण्यामध्ये राज्य सरकारांना सपशेल अपयश येत असल्याकारणाने या तरुणांना विधायक वळण देऊन त्यांचा वापर देश हितामध्ये करता येईल का?  या दृष्टीने आजघडीला कुठलाही राजकीय पक्ष गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही .दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. महाराष्ट्रातून मोठे उद्योग हे गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे येथील तरुणांना मिळणारा रोजगार हा बुडाला आहे परिणामी उद्योगधंदे नाहीत, नोकरी नाही, राबत्या हाताला काम नाही, शेतीला स्थैर्य नाही अशा स्थितीतला राज्यातला तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बाबतीमध्ये उदासीन दिसतो  आहे .राज्यांमधल्या राजकारणाकडे आपण डोळसपणे पाहिल्यास एकूणच कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका ही सर्व समावेशक ,लोक हिताची दिसून येत नाही. प्रत्येक पक्ष हा एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त झाल्याकारणाने जाती बाहेर येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर लावेल आणि ते तडीस नेईल अशी एक शक्यता दिसून येत नाही. प्रत्येक पक्ष आपले राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी जातीचा आधार घेतो आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जात ही अलीकडच्या काळामध्ये कळीची भूमिका निभावताना दिसून येत आहे. जातीचे राजकारण हे महाराष्ट्रासाठी कायमच कलाटणी देणारे राहिलेले आहे. राहिला प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांनी तर आपापल्या पद्धतीने आपला पक्ष कसा वाढेल हे प्रयत्न करत असतात परंतु त्यांचे नेते हे सर्वसामान्य लोकांपासून, त्यांच्या प्रश्नापासून दुरावलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये एक दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा एक नेता आणि त्या नेत्याकरवी त्या जिल्ह्यातील संघटन अशा सरंजामशाही पद्धतीने हे पक्ष आपली राजकीय वाटचाल करीत असल्यामुळे या पक्षांना आपला विस्तार करणे कठीण जाताना दिसून येत आहे.

दुसरीकडे एमआयएमसारखे पक्षही महाराष्ट्राच्या मोजक्या शहरांपुरते मर्यादित होताना दिसून येतात याचे कारण मुस्लिम समाजाची लोकसंख्या, त्यांच्यातील अल्पशिक्षितपणा, राजकीय प्रगल्भतेचा अभाव, भीषण गरीबी आणि राजकीय पक्षांमध्ये विभागली गेलेली त्यांची नेतृत्वाची फळी यामुळे या समाजाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करता आलेले नाही. मनसेसारख्या पक्षाची  दरवेळी नव नवी भूमिका आणि सत्तेचे प्रादेशिक विभाजन यामुळे या पक्षाला ऊर्जितावस्था आलेली आहे. कुठलाही प्रश्न मनसेला तडीस नेताना जे संघटन कौशल्य लागते त्याचा अभाव यामुळे या  पक्षाला राजकीय यश मिळवता आलेले नाही. त्यातच नव्यानेअलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये तेलंगणाच्या विकासाच्या स्वप्नांची भुरळ घालून भारत राष्ट्र समिती सारख्या पक्षाने आपला जम बसवायला सुरुवात केलेली आहे .के सी आर हे महाराष्ट्रातील जनतेला तेलंगणाच्या धर्तीवर विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचे चे स्वप्न दाखवत आहेत त्याला महाराष्ट्रातील जनता विशेषतः मराठवाड्यातील जनता कितपत दाद देते हे निवडणुकानंतरच लक्षात येणार आहे. याचे कारण या पक्षांमध्ये जी नेतेमंडळी नव्याने दाखल झाली आहे ती पूर्वापार काँग्रेस ,राष्ट्रवादी ,भाजप यासारख्या पक्षांमध्ये आपले स्थान निर्माण न करता आल्याने त्यांनी भारत राष्ट्र समितीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे तेव्हा अशा नेतृत्व म्हणून पुढे येणाऱ्या फळीने या पक्षाची धुरा हाती घेऊन महाराष्ट्रातली राजकारण कितपत पुढे नेतील हे आत्ताच सांगणे कठीण होईल. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नेमके काय होऊ शकते याचाही मागवा या निमित्ताने घेणे आपल्याला महत्त्वाचे ठरते.

महाविकास आघाडीला आपली एकसंधता आणि नेतृत्वाची कमान राखण्यात यश आल्यास महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळू शकते परंतु तशी एकता महाविकास आघाडीमध्ये टिकून राहील अशी शक्यता दुरापास्त आहे .याचे कारण काँग्रेस आणि त्यांची नेते मंडळी ही कायमच शिवसेनेपासून विशेषत उद्धव ठाकरेंपासून थोडीशी आंतरराखून राहताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये थोड्या बहुत प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे गटाचा ते प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्यांना मोठे आव्हान या निवडणुकांमध्ये मिळणार आहे .ते पेलून सत्तेत येणे हे ठाकरे गटाला थोडेसे कठीण जाणार. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा प्रचार जोर धरेल आणि सर्व प्रकारची यंत्रणा वापरून हे पक्ष ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न करतील. आणि ते गेल्या काही पोटनिवडणुकीत पहायला मिळाले आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी शक्यता नाही. भारतीय जनता पक्षाला अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असला तरी महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागवर राजकीय  विचार करता विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतरत्र भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल अशी शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नेतृत्व हे जाणीवपूर्वक रुजू न दिल्याने मराठवाड्यातील सत्ता कमान सांभाळेल असा एकही नेता या स्थितीत भाजपाकडे नाही. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यासारखी नेतेमंडळीही आपापला गड राखण्यात यशस्वी होतील की नाही अशी शक्यता मराठवाड्यात आहे. मराठवाडा हा कायमच काँग्रेस आणि समविचारी पक्षांचा बालेकिल्ला राहिल्याने तसेच काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेतेमंडळी ही याच भागात निर्माण झालेली असल्याने मराठवाड्यामध्ये शिंदे भाजप गटाला फारसे यश मिळणार नाही. विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप यामध्येच प्रामुख्याने संघर्ष पाहायला मिळतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कायमच विदर्भामध्ये सत्ता विस्तार करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड राहिलेला आहे. अलीकडच्या काळात या भागांमध्ये भाजपाचे वर्चस्व वाढले  असले तरी राष्ट्रवादी  काँग्रेस पक्ष या भागामध्ये आपले संघटन वाढवून राजकीय यश प्राप्त करेल अशी शक्यता दिसते आहे. कोकणामध्ये शिंदे गट ठाकरे गट यांच्यामध्येच प्रामुख्याने लढत पाहायला मिळेल .त्यामुळे मुंबई ,पुणे ,नाशिक, औरंगाबाद यांसारखी मोठी शहरे वगळता अन्यत्र भाजप आणि शिंदे गटाला पोषक स्थिती सद्यस्थितीत दिसून येत नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका राजकीय पक्षाला एक हाती यश मिळेल अशी शक्यता नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये छोट्या पक्षांचाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. गिरणी कामगारांची, कष्टकऱ्यांची चळवळ आता जागतिकीकरणानंतर कुठेतरी आपला जम बसवताना दिसून येत आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांसारखे भाजपापासून दुरावलेले कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळा आयाम देतील अशी शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातले राजकारण हे अधिकाधिक संघर्षाकडे आणि राजकीय अस्तित्व पणाला लावून आपला संघर्ष व्यापक पटलावर मांडण्याचा प्रयत्न करतील. त्यातून महाराष्ट्राचे राजकारण हे अधिक सर्व समावेशक व लोकाभिमुख होईल. त्यातून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना विवेकी राजकारणाची दिशा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.       (उत्तरार्ध)

- हर्षवर्धन घाटे

नांदेड, ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget