कोरोना - मृत्युनंतर ... नाते मानवतेचे या अंजुम इनामदार यांनी लिहिलेल्या पुस्तकाची अभिप्राय आवृत्ती नुकतीच वाचली. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार हा या पुस्तकाचा मूळ विषय असला तरी कोरोनाची सुरुवात, त्यानिमित्ताने जाती धर्मासंबंधीचे ध्रुवीकरण, गलिच्छ राजकारण, अफवा, नातेवाईकांची उदासीनता, शंका कुशंकांचे मोहोळ व इतर ओंगळवाणी, किळसवाणी वस्तुस्थिती लेखकानं मांडली. तर दुसरीकडे लोकांनी जीवाची पर्वा न करता जाती धर्माचा भेद न करता केलेल्या सेवाकार्याचेही यथोचित वर्णन केले.
हे पुस्तक वाचतांना ’रडलो हा शब्द फारच तोकडा वाटतो, तर काही काही प्रसंग वाचतांना माझ्या अक्षरश: किंकाळ्या निघालेल्या आहेत. बौद्ध महिलेचा मुस्लिम कब्रस्तानात दफन विधी, कोरोना परतला तो कुंभमेळ्याने, लपलेले पुणेकर, दिल्लीवाले की तबलीगवाले, ख्रिश्चन दफन संस्कार, मस्जिद झाली क्वारंटाईन सेंटर ही प्रकरणे तर समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारे, धुसर चष्म्यांचे काच साफ करणारे आहेत.
लेखक अंजुम इनामदार यांनी घटनांचे वर्णन करतांना फार बारकावे लक्षात घेतलेले आहेत. विशेषतः सोबत काम करणाऱ्या सहकार्यांचं कार्य, त्यांच्या त्यागाविषयी भरभरून लिहिलंय. हे एका उत्तम नेतृत्वाचं लक्षण आहे. यांच्यासारख्या लोकांमुळेच इतर राज्यांत तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी मृतदेहांच्या विटंबनेची जीतकी दृष्ये दिसली तीतकी दृष्ये महाराष्ट्रात दिसणे थांबलीत.
प्रेतांची विटंबना या शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या सांस्कृतिक समुदायानुसार वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ पारसी समाजात त्यांच्या स्मशानात प्रेतांना पक्ष्यांना खाण्यासाठी एका ठिकाणी लटकवून ठेवण्यात येते. आता ही पद्धत दुसऱ्या धर्माच्या प्रेतांसाठी त्या समुदायाला अमान्य असू शकते. आपल्या नातेवाईकांचे अंतिम संस्कार आपल्याच संस्कृतीनुसार व्हावे, अशी जवळपास सर्वच भारतीयांना मनोमन वाटत असते. तसे झाले नाहीतर त्या नातेवाईकांच्या मनाला आयुष्यभर शल्य टोचत असते. आपला नातेवाईक सुखासुखी जगू शकला नाहीतर त्याला सुखानं मरताही आलं नाही, अशी भावना मनात डिवचत असते. या भावनिक तप्त भट्टीतून मूक्ती देण्याचं महान कार्य काही समाजसेवींनी केले आहे.
जाती धर्माचा भेद न करता मृतदेहांची विटंबना करु नये, विटंबना होऊ देऊ नये ही पैगंबरांची शिकवण होय. युद्ध सुरू होण्यापूर्वीच सैनिकांना ते ज्या सुचना द्यायचे, त्यात पैगंबर आवर्जून सांगायचे की, शत्रूंच्या प्रेतांचा ’मुसलाह’ करू नका (प्रेतांचा मुसलाह = प्रेताला भाल्यावर टोचून त्याला वर उंचावून नाचवणे) याचा संदर्भ हदिसग्रंथ ’मुस्लिम शरीफ’मध्ये सापडतो. प्रेषित काळात यहुदी (ज्यू) लोकं मुसलमानांचे सर्वात मोठे शत्रू समजले जात होते. तरीही एका यहुद्याची अंत्य यात्रा जात असतांना प्रेषित आदराने उठून उभे राहिले. लोकांनी सांगितलं की, तो तर यहुदी होता. तेंव्हा प्रेषित म्हणाले, काय तो माणुस नव्हता? (संदर्भ: हदिस ग्रंथ, बुखारी शरीफ, वचन क्र. 1250).
अशाप्रकारे जाती धर्माचा भेद न करता, मयताचा आदर करायला लावणाऱ्या शिकवणीची प्रेरणाच अंजुम भाईंच्या ’मूलनिवासी मुस्लिम मंच’च्या या महान कार्यामागे आहे. वैरी मेला, वैर संपलं म्हणून चक्क शत्रूच्या प्रेताचीही विटंबना न होऊ देता प्रतापगडावर शत्रूचा दफनवीधी करून त्याची कबर बांधणाऱ्या शिवरायांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. तो वारसा जपणाऱ्या लोकांच्या कार्यांची एकप्रकारची भावनिक स्मरणिका म्हणजे हे पुस्तक होय.
एकूण 292 पानांच्या या पुस्तकाची किंमत फक्त 200 रुपये आहे. मुखपृष्ठावर एका ख्रिश्चन माणसाचं कॉफीन आणि त्या बाजुला जमलेले नातेवाईक व दफनवीधी करणारे समाजसेवी असा ब्लॅक व्हाइट फोटो ह्रदयाचा ठोका चुकवतो. कागदाचा दर्जा, छपाई, बाईंडींगचा दर्जाही उत्तम आहे. अंजुम भाईंच्या 9028402814 या क्रमांकावर संपर्क करून प्रकाशनापूर्वीच आपली प्रत आजच सुरक्षित करून घ्यावी, असा माझा सल्ला आहे. कारण नंतर हे पुस्तक दुर्मिळ ठरू शकते, इतक्या झपाट्याने याचा खप होऊ शकतो. इतर भाषांतही याचे भाषांतर होणार असल्याचे ऐकून खुप बरं वाटलं. ही फक्त एक साहित्यिक कृती नसून महामारी आणि रीलीफ वर्क यासारख्या विषयांवरील एक माहितीपूर्ण असा हा संदर्भग्रंथ आहे. यातील काही मतांशी एखाद्याचे मतभेद होऊ शकतात, पण या संकटसमयी लोकांची मदत करणाऱ्यांची निष्ठा, त्यागभावना ही निर्विवाद आहे. त्याचा पुरेपूर मोबदला कोणतेही सरकार किंवा संस्था देऊच शकत नाही, तर याचा खरा मोबदला पारलौकिक जीवनात तो एकमेव सृष्टिकर्ताच देऊ शकतो, अन् त्याने तो मोबदला या सर्व समाज सेवकांना कयामतच्या दिवशी द्यावा, हीच दुआ!
- नौशाद उस्मान
Post a Comment