नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा राज्यात मुस्लिम लोक आणि त्यांच्या धर्मस्थळावर काही समाज विघातक तत्वांकडून हल्ले केले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. मस्जिदींमध्ये आग लावण्यात येत आहे. तसेच मुस्लिम पुरूष आणि महिलांवर हल्ले केले जात आहेत. त्यांच्या घरावर भगवे झेंडे लावण्याच्याही बातम्या येत आहेत. जमाअते इस्लामी हिंद या बळजबरीच्या घटनांची तसेच जे लोक सांप्रदायिक तणाव निर्माण करीत आहेत. त्यांची निंदा करीत आहेत.
जमाअत ए इस्लामी हिंदची ही मागणी आहे की, त्रिपुरा राज्यात हिंसा माजविणार्यांविरूद्ध कारवाई करावी. पोलीस विभागाने आपले कर्तव्य ईमाने इतबारे पार पाडावे आणि त्या ठिकाणची परिस्थिती लवकरात लवकर सामान्य करण्याचे प्रयत्न करावेत. बांग्लादेश येथील हिंसेच्या विरोधात जी निदर्शने करण्यात आली आहेत त्यामध्ये मुस्लिमांविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. ही बाब निषेधार्ह आहे.
जमाअत ए इस्लामी हिंदचे सचिव मलिक मोहतसीम यांनी या संबंधात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात बांग्लादेशात जी सांप्रदायिक हिंसा तेथील असामाजिक तत्वांनी केली त्याची जमाअत ए इस्लामी हिंदकडून निंदा केली आहे. त्याचबरोबर बांग्लादेश सरकारकडे ही मागणी करण्यात आली होती की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तेथील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे. त्यांच्या जीवाची आणि मालमत्तेची कोणत्याही परिस्थितीत हानी होऊ देऊ नये. आमचे असेही म्हणणे आहे की, बांग्लादेशमधील घटनांचा उपयोग भारतात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी केला जावू नये. आज जगभरात अल्पसंख्यांकांविरूद्ध अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. काही राजकीय पक्ष या हिंसक घटनांचा आपले राजकीय उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शॉर्टकर्ट म्हणून वापर करीत आहेत. जगातील कोणत्याही सभ्य समाजामध्ये अशा घटनांना स्थान नाही. यांना चिंतेची बाब समजण्यात येते. देशातील सर्व न्यायप्रिय लोकांनी बांग्लादेशातील घटनांची निंदा करत असतानाच त्याचे पडसाद इतरत्र उमटणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांनी सरकारवर शांतता बहाल करण्यासाठी दबाव आणावा. अशा परिस्थितीमध्ये धार्मिक नेत्यांची जबाबदारी दुपटीने वाढलेली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही घटनांचा कारण म्हणून कुठेही अत्याचार माजविण्यासाठी वापर केला जावू नये. धार्मिक नेत्यांनी राजकीय नेत्यांना अशा घटनांचा वापर करण्याची संधी मिळू देऊ नये. मानवता आणि राष्ट्राच्या हिताला नजरेआड होऊ देऊ नये, असे आवाहन जमाअत ए इस्लामी हिंदने केल्याचे मीडिया सचिव सय्यद तन्वीर अहेमद यांनी सांगितले .
Post a Comment