प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक उगवणाऱ्या सू्र्यासोबतच तुमच्यावर दानधर्म करणे अनिवार्य होते. दोन माणसांमध्ये न्याय करणे, एखाद्याला गाडीत स्वार होताना मदतीचा हात देणे, त्यांचे सामान उचलून गाडीत ठेवणे, लोकांना भलाईच्या गोष्टी सांगणे ही सर्व जणू दानधर्माची कार्ये आहेत. तसेच नमाजसाठी मशिदीकडे जाणे. जाताना रस्त्यात कुणाला इजा होईल अशी वस्तू रस्त्यावर दिसल्यास ती बाजुला सारणे या सगळ्या गोष्टी दान करण्यासारख्या आहेत. कुणाला वाईट कृत्यापासून रोखणे हेदेखील दान केल्यासारखे आहे. (संदर्भ – अबु हुरैरा, बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”
नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)
Post a Comment