(८३) (मग पाहा की) मूसा (अ.) ना त्यांच्या लोकांपैकी काही तरुणांखेरीज७ कोणीही मानले नाही,७९ फिरऔनच्या भीतीने आणि आपल्या लोकांतील श्रेष्ठजनांच्या भीतीपायी (ज्यांना भय होते की) फिरऔन त्यांचा छळ करील. वस्तुस्थिती अशी आहे की फिरऔन भूतलावर वर्चस्व बाळगत होता आणि तो त्या लोकांपैकी होता जे कोणत्याही मर्यादेवर थांबत नाहीत.८०
(८४) मूसा (अ.) नी आपल्या लोकांना सांगितले, ‘‘लोकहो! तुम्ही खरोखरच अल्लाहवर श्रद्धा ठेवत असाल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही मुस्लिम असाल.’’८१
(८५) त्यांनी उत्तर दिले,८२ ‘‘आम्ही अल्लाहवरच भिस्त ठेवली, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हास अत्याचारी लोकांसाठी उपद्रव (परीक्षा) बनवू नकोस.८३
(८६) आणि आपल्या कृपेने आम्हाला अधर्मियांपासून मुक्ती दे.’’
(८७) आणि आम्ही मूसा (अ.) आणि त्याच्या बंधूला संकेत दिला, ‘‘मिस्रमध्ये काही घरे आपल्या लोकांकरिता उपलब्ध करा आणि आपल्या त्या घरांना उपासना-दिशा ठरवा आणि नमाज कायम करा८४ आणि श्रद्धावंतांना खूषखबर द्या.’’८५
७८) मूळ अरबी शब्द `जुर्रीयह' आहे याचा अर्थ `संतान' आहे. आम्ही याचा अनुवाद `नौजवान' असा केला आहे. या शब्दाच्या प्रयोगाने कुरआन जे वर्णन करू इच्छितो ते म्हणजे धोकादायक वेळी सत्याची साथ देणे आणि सत्याच्या ध्वजवाहकाला आपला मार्गदर्शक मान्य करण्याची हिंमत काही नौजवान मुले आणि मुलींनी केली होती. परंतु आईवडिलांना आणि समाजातील प्रौढांना याचे सौभाग्य प्राप्त् झाले नाही, त्यांच्यावर भौतिक लाभ, आपले स्वार्थ इ. याप्रकारे प्रभाव पाडत होते की ते सत्याचा साथ देण्यास तयार झाले नाहीत. हा मार्ग त्यांना संकटमयी मार्ग वाटत होता. ते तर नौजवानांनाच मूसा (अ.) यांच्याजवळ जाण्यास रोखत होते आणि धमकी देत होते की अशामुळे फिरऔनचा कोप तुमच्यावर होईल. या तुमच्या वागण्यामुळे सर्वांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. कुरआनने हे अगदी स्पष्ट यासाठी केले आहे की मक्कावासीयांपैकी पैगंबर (स.) यांचे साथ देण्यासाठी सुरवातीला काही साहसी युवकच होते. त्यांना प्रौढ लोकांनी सुरवातीला साथ दिली नव्हती. अली (रजि.) जाफर (रजि.), जुबैर (रजि.), तलाहा (रजि.), साद (रजि.), मुसअब बिन उमैर (रजि.), अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) अशा वीस वर्षाखालील युवकांनी इस्लाम स्वीकार केला होता. अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.), बिलाल (रजि.) आणि सुहेब (रजि.) यांचे वय ३० ते ५० च्या आत होते. अबू उबैदा बिन जरी (रजि.), जैद बिन हारिसा (रजि.), उस्मान बिन अफ्फान (रजि.) आणि उमर फारुख (रजि.) यांचे वय ३० ते ३५ वर्षाच्या आतील होते. यांच्यापैकी अधिक वयाचे माननीय अबू बकर (रजि.) होते आणि त्यांचे वय ईमान धारण करतेवेळीसुद्धा ३८ वर्षापेक्षा जास्त नव्हते. प्रारंभीच्या मुस्लिमांपैकी एक सहाबी उबैदा बिन हारीस यांचे वय पैगंबर (स.) यांच्या वयापेक्षा जास्त होते. तसेच अम्मार बिन यासिर (रजि.) हे एकमेव सहाबी (साथीदार) पैगंबर (स.) यांच्या वयाचे होते.
७९) मूळ अरबीत `फ़म़ा आमन लिमूसा' हे शब्द आहेत. यामुळे काहींना अशी शंका आली की शक्यतो बनीइस्राईल सर्व ईशद्रोही अनेकेश्वरवादी होते आणि सुरवातीला त्यांच्यापैकी काहींनीच ईमान धारण केले होते. परंतु अरबी भाषेच्या व्याकरणात ईमान शब्दाच्या जोडीला अरबीतील `लाम' हा वर्ण संबंधवाचक म्हणून येतो तेव्हा त्याचा अर्थ सामान्यता आज्ञापालन आणि समर्पण होतो. म्हणजे एखाद्याचे म्हणणे मान्य करणे आणि त्यानुसार आचरण करणे वास्तविकपणे या शब्दांचा अर्थ होतो की काही नवयुवकांना सोडून बनीइस्राईलच्या लोकसमुद्रायातून कोणीही मूसा (अ.) यांना आपला मार्गदर्शक व नेता मान्य करून त्यांचे आज्ञाधारक बनले नाही. नंतरच्या वाक्याने स्पष्ट केले की, त्यांच्या अशा वागणुकीचे मूळ कारण हे नव्हते की पैगंबर मूसा (अ.) आणि त्यांच्या संदेशाला सत्य समजण्यात कोणतीच शंका नव्हती; परंतु याचे कारण केवळ हेच होते की लोक मूसा (अ.) यांना साथ देऊन स्वत:ला फिरऔनच्या क्रूरतेत ढकलण्यास तयार नव्हते. याचकडे सूरह ७, आयत १२९ यात संकेत केला आहे आणि याचे विवरण बायबल निर्गमन (१६:२०-२१) मध्ये आलेला आहे.
८०) अरबीत `मुसरिफीन' शब्द आला आहे. म्हणजे मर्यादाभंग करणारा. परंतु या शाब्दिक अनुवादाने मूळ आत्मा प्रकट होत नाही. मुसरिफीन त्या लोकांना म्हणतात जे आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी वाईटाहून वाईट पद्धतीचा अवलंब करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. असे लोक कसलाही अत्याचार, दुराचार आणि रानटीपणा करण्यास चुकत नाहीत. आपल्या इच्छा आकांक्षाच्यामागे कुठवरही ते जाऊ शकतात. जेथे जाऊन ते थांबतील अशी सीमा त्यांच्यासाठी नसतेच.
८१) स्पष्ट आहे की हे शब्द एखाद्या ईशद्रोहीला संबोधन करून सांगितलेले नाहीत. आदरणीय मूसा (अ.) यांचे हे कथन स्पष्ट करीत आहे की सर्व बनीइस्राईल त्या वेळी मुस्लिम होते आणि मूसा (अ.) त्यांना उपदेश देत होते. तुम्ही वास्तविकपणे मुस्लिम असाल तर फिरऔनच्या शक्ती सामर्थ्याचे भय बाळगू नका तर अल्लाहच्या शक्तीवर विश्वास ठेवा.
८२) हे उत्तर त्या नवयुवकांचे होते. जे मूसा (अ.) यांना साथ देण्यासाठी तयार झाले होते. येथे `त्यांनी उत्तर दिले' याने अभिप्रेत राष्ट्र (समुदाय) नाही तर ते काही नवयुवक आहेत. (जुर्रियत) प्रसंगानुरुप हाच अर्थ योग्य आहे.
८३) त्या खऱ्या ईमानधारक नव युवकांची ही प्रार्थना होती, ``आम्हाला अत्याचारी लोकांच्या स्वाधीन करून आमची परीक्षा घेऊ नकोस.'' ही प्रार्थना मोठा व्यापक अर्थ ठेवून आहे. पथभ्रष्टतेच्या स्थितीत जेव्हा काही लोक सत्याच्या स्थापनेसाठी उठतात तेव्हा त्याना निरनिराळया प्रकारच्या अत्याचारींना सामोरे जावे लागते. सत्यआवाहकांची प्रत्येक विफलता, अडचण, विवशता आणि उणिव त्या अत्याचारींना उपद्रव ठरते. (आणि ते सत्यवादीला असत्यावर असण्याचा पुरावा म्हणून लोकांपुढे ठेवतात) म्हणून ही मोठी व्यापक प्रार्थना होती. जी मूसा (अ.) यांच्या साथीदारांनी अल्लाहजवळ केली होती. ``हे अल्लाह! आमच्या वर अशी कृपाकर की आम्ही अत्याचारींसाठी फितना (उपद्रव) ठरू नये.'' म्हणजे आम्हास चुकां, उणिवा आणि कमजोरीपासून वाचव आणि आमच्या प्रयत्नांना जगात यशस्वी कर जेणेकरून आमचे अस्तित्व तुझ्या दासांसाठी भलाईचे कारण बनावे, जालिमांसाठी दुष्टतेचे साधन आम्ही बनू नये.
८४) या आयतच्या अर्थाविषयी भाष्यकारांमध्ये मतभेद आहेत. त्याच्या शब्दांवर आणि त्या वातावरणावर जेव्हा हे शब्द वापरले गेले, यावर विचार केल्यावर मला असे समजते की शक्यतो इजिप्त्च्या सत्ताधारी पक्षाने हिंसा करून बनीइस्राईलच्या ईमानच्या कमतरतेमुळे बनीइस्राईली आणि इजिप्शियन मुस्लिमांच्या येथे सामुदायिक नमाज व्यवस्था नष्ट केली होती. ही घटना त्यांच्यातील दुफळीचे आणि धार्मिक आत्मा मृतवत झाल्याचे मोठे लक्षण होते. यासाठी आदरणीय मूसा (अ.) यांना आदेश दिला गेला की नमाजच्या व्यवस्थेला पुन्हा स्थापित केले जावे आणि इजिप्त्मध्ये काही घरे सामुदायिक नमाजसाठी प्राप्त् केली जावीत जेणेकरून एका बिघडलेल्या आणि विखुरलेल्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक आत्म्याला पुन्हा जीवित केले जावे. या समाजाच्या विखरुलेल्या शक्तीला पुन्हा स्थापित करण्यासाठी इस्लामी पद्धतीप्रमाणे जे प्रयत्न केले जातील त्यापैकी पहिला प्रयत्न अनिवार्यत: सामुदायिक नमाज व्यवस्था स्थापित केली जावी; हा आहे. या घरांना `किब्ला' ठरविणे म्हणजे सर्व मुस्लिम समाजासाठी केंद्र आणि प्रार्थनास्थळ ठरवावे. आणि त्यानंतरच नमाज स्थापित करा याचा अर्थ होतो की वेगवेगळया जागी स्वत: नमाज अदा न करता निर्धारित जागेत सामुदायिक नमाज अदा करावी. कुरआनच्या पारिभाषिक शब्दावली मध्ये ``नमाज कायम करणे'' यात सामुदायिक नमाजसुद्धा संमिलित आहे.
८५) म्हणजे ईमानधारकांवर निराशा, सत्तापक्षाचे आतंक आणि खिन्न मनोदशेचा प्रभाव पडलेला आहे, त्याला दूर करून त्यांना आशावान, हिंमतवान बनवा. तसेच त्यांचे मनोबल वाढवा. `शुभ-सूचना द्या' यात वरील सर्व अर्थ समाविष्ट होतात.
Post a Comment