भारतातील धनदांडगे दशकानुदशके अपरंपार संपत्ती मिळूनही विविध मार्गांनी अब्जावधी रुपयांची कर बुडवेगिरी करीत आले आहेत किंवा सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत अब्जावधी रुपयांचे कर माफ करवून घेत आलेले आहेत. मोदी सरकारने मात्र कर सवलती देण्याचा उच्चांक पार केला आहे. त्यांच्या सरकारने ज्या चिमूटभर उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर माफी दिली आहे त्यात अंबानी आणि अदानी हे आघाडीवर आहेत. वास्तवात हा भारतीय जनतेच्या निढळाच्या घामाचा पैसा आहे.
चीन ग्रीसमधील एकदंतकथा फार प्रसिद्ध आहे. देवांचा राजा झुस याच्याकडून प्रोमेथस या देवाने अग्नी चोरला आणि पृथ्वीवरील मानवाला दिला. भडकलेल्या झुसने प्रोमेथसला शिक्षा करण्यासाठी ‘पँडोरा’ ही रूपसुंदरी निर्माण करून तिला प्रोमेथसच्या भावाला, एपिमेथसला भेट दिली. पँडोराच्या मोहात पडलेल्या एपिमेथसने तिच्याशी लग्न केले. झुसने पँडोराला लग्नाची भेट म्हणून एक संदुक दिला. मात्र तो कधीही उघडूनकोस असेही बजावले. त्या संदुकीत काय असावे या उत्सुकतेने कासावीस होऊन तिने ती शेवटी उघडलाच आणि तिच्यात झुसने भरून ठेवलेले द्वेष, मत्सर, हाव, वेदना, व्याधी सारे काही मानवजातीला पिडण्यासाठी बाहेर पडले. अशीच एक पँडोराची संदुक ‘इंटरनॅशनल कन्सॉर्टीयम फॉर इन्व्हेस्टीगेटीव जर्नालिझम’ या संस्थेने उघडली आणि तिच्यात दडलेल्या ओंगळवाण्या संपत्तीचे जगाला जे दर्शन घडले ते धक्कादायक होते. ही संपत्ती आपापल्या राष्ट्रांपासून दडवून ठेवणाऱ्या नररत्नांची यादी आणि त्यांचे दस्तऐवज, ‘पँडोरा पेपर्स’ या संदुकीतून बाहेर पडले आहेत. या संस्थेने यापूर्वी 2016 साली पनामा पेपर्स आणि 2017 साली पॅरॅडाईज पेपर्स यांच्या माध्यमातून जगातील अतिश्रीमंत आपली संपत्ती; देशाबाहेर बोगस संस्था आणि कंपन्या निर्माण करून कशी दडवतात आणि कर बुडवतात, याचा पर्दाफाश केला होता. यातील फार मोठा पैसा हा दहशतवादी कृत्यांसाठीही दिला जातो हेही त्यांनी जगापुढे आणले होते. या पेपर्समध्ये जगभरातील राजकीय नेते, सत्ताधारी, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू अशी अनेकक्षेत्रांतील बडी धेंडे होती. यातून आईसलँडचे पंतप्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि पाकिस्तानच्या नेत्याला देशाबाहेर जावे लागले. पँडोरा पेपर्सच्या माध्यमातून हेच वास्तव अधिक स्पष्ट रूपात समोर आले आहे. यासाठी गेली कित्येक वर्षे 117 देशांमधील 600 हून अधिक पत्रकार अहोरात्र काम करीत होते.
जगभरातील 14 कॉर्पोरेटसेवा संस्थांनी निर्माण केलेल्या 29 हजार पेढ्या आणि विश्वस्त संस्थांच्या सुमारे सव्वा कोटी फाईल्स, 5 लाख ताळेबंद आणि 10 लाख ईमेल्स या पत्रकारांनी खोदून काढले. यातून 1970 ते 2020 या काळातील 3 टेराबाईट्स एवढी माहिती हाती आली. या माहितीतून समोर आलेले आर्थिक वास्तव भयानक आहे. जगभरातील सत्ताधारी, नेते, कोट्याधीश, सेलेब्रिटीज, धार्मिक नेते आणि अमली पदार्थांचे व्यापारी यांनी आपली संपत्ती राजेशाही वास्तू, अलिशान बोटी अशांसारख्या ऐय्याशीच्या गोष्टींमध्ये गुप्तपणे कशी गुंतवतात आणि आपापल्या देशांच्या करव्यवस्थेला कसे फसवतात याचे तपशीलच समोर आले आहेत. यासाठी ‘ऑफशोअर’ कंपन्यांचा आधार घेतला जातो. ऑफशोअर म्हणजे असे देश की जेथे कंपनी निर्माण करणे सुलभ असते, कंपनीच्या मालकाला गुप्ततेची हमी दिली जाते आणि जेथे अत्यंत अल्प कर आकारले जातात किंवा नसतातच. असे देश म्हणजे ‘टॅक्स हेवन’, करबुडव्यांसाठी आश्रयस्थान, स्वर्ग. कायमन बेटे, ब्रिटीश व्हर्जिनिया बेटे, स्वित्झरलँड, सिंगापूर, समोआ, बेलीझ, पनामा अशा अनेक देशांमध्ये असे अशी हेवन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे सर्व करण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक फर्म्स जगभर आहेत. अशा फर्मच्या मदतीने करबुडवी व्यक्ती अशा ठिकाणी पूर्ण तोतया कंपनी वा ट्रस्ट स्थापन करते आणि ही कंपनी वा ट्रस्ट गुंतवणूक करतो. परदेशात ट्रस्ट स्थापन करणे बेकायदेशीर नाही. भारतीय विश्वस्त संस्था कायदा 1882 नुसार असा ट्रस्ट परदेशात उघडण्यास कायदेशीर परवानगी आहे. प्रश्न आहे तो ट्रस्ट निर्माण करण्याच्या हेतूचा, उद्दिष्टांचा आणि त्याच्या कार्यपद्धतीचा. आता उघडलेल्या पँडोराच्या संदुकीत अशा कंपन्या वा ट्रस्ट यांच्या माध्यमातून अंदाजे 32 ट्रिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती दडवली असण्याची शक्यता आहे. यामुळे जगाचे प्रतिवर्षी 600 बिलियन डॉलर्स एवढ्या करांचे नुकसान होते. पँडोराच्या संदुकीतून अनेक भारतीय नररत्नेही बाहेर पडली आहेत. भारतरत्न सचिन तेंडूलकर, त्याची पत्नी अंजली आणि सासरे आनंद मेहता, भारतात दिवाळखोरी जाहीर केलेला अनिल अंबानी, हजारो कोटी बुडवून भारत सोडून पळालेल्या नीरव मोदीची बहीण पुरवी मोदी, दिवंगत काँग्रेस नेते कॅप्टन सतीश शर्मा, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि कुटुंबीय, नीरा राडीया, गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी, किरण मुजुमदार शॉ यांचे पती आणि दाउदचा सहकारी इक्बाल मिर्ची इ. असे 300 पेक्षा अधिक भारतीय आहेत. ही नावे छापतानाही माध्यमांनी पक्षपात करून सतीश शर्मा यांच्या नावापुढे ‘गांधी कुटुंबाचे मित्र’ असे आवर्जून लिहिले पण अनिल अंबानी यांच्या नावापुढे ‘राफेल निर्माते’ किंवा अदानी यांच्या नावापुढे ‘मोदींनी ज्यांच्या बंधूची विमाने प्रचारासाठी वापरली’ असा उल्लेख करण्याचा त्यांना विसर पडला. 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन ज्या अदानी यांच्या बंदरात सापडले त्यांचे नाव घ्यायला माध्यमांची जीभ लुळी पडते आणि त्यांना वेळ कमी पडतो पण शाहरुख खानच्या मुलाची बातमी देताना त्यांच्या जिभेला धार येते आणि त्यांना 24 तास पुरत नाहीत. आपल्या देशातील माध्यमांनी बेशरमपणाच्या सर्व हद्दी ओलांडल्या आहेत.
भारतातील धनदांडगे दशकानुदशके अपरंपार संपत्ती मिळूनही विविध मार्गांनी अब्जावधी रुपयांची कर बुडवेगिरी करीत आले आहेत किंवा सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत अब्जावधी रुपयांचे कर माफ करवून घेत आलेले आहेत. मोदी सरकारने मात्र कर सवलती देण्याचा उच्चांक पार केला आहे. त्यांच्या सरकारने ज्या चिमूटभर उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर माफी दिली आहे त्यात अंबानी आणि अदानी हे आघाडीवर आहेत. वास्तवात हा भारतीय जनतेच्या निढळाच्या घामाचा पैसा आहे. या पैशातून भारतीय जनतेचे शिक्षण, आरोग्य, कुपोषण, पाणी, निवारा, रोजगार असे अनेक मूलभूत प्रश्न सुटू शकतात. अब्जावधी रुपयांचे उत्पन्न मिळवणाऱ्या धनदांडग्यांना इतकी संपत्ती मिळूनही प्रामाणिकपणे कर द्यावेसे का वाटत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर लोभी आणि स्वार्थी प्रवृत्तीत आहे. मुेभांडवलशाहीने मुठभरांना जगातील बहुतांश संपत्तीचे धनी केले. कंपू भांडवलशाही, क्रोनी कॅपिटॅलीझम तर याच्या पुढे काही पावले गेला. या अर्थव्यवस्थेने संपत्ती चिमुटभरांच्या हाती एकवटण्याची सुरुवात केली. असे असतानाही आपल्या देशात अमर्यादित आणि अनिबंरध भांडवलशाहीचा पुरस्कार केला जात आहे. त्यासाठी देशातील सर्व सार्वजनिक उद्योग विकण्याचा सरकारने सपाटा लावला आहे. अंबानी किंवा अदानी आपले उद्योग चोऱ्या-माऱ्या, लांड्या-लबाड्या, अनेक बेकायदेशीर मार्ग वापरूनही नफ्यात चालवू शकत नाहीत म्हणून त्यांना कर सवलती लागत असतील तर त्यांनी एल.आय.सी.सारख्या सरकारच्या तिजोरीत प्रचंडनफा जमा करणाऱ्या सरकारी उपक्रमाचा अभ्यास केला पाहिजे. अत्यंत बेभरवशाचा शेती नावाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर त्यांना ‘आळशीपणा आणि व्यसने सोडा म्हणजे नफा मिळेल’ अशी व्याख्याने दिली जातात. असंघटित कष्टकऱ्यांनी फुटकळ निवृत्ती वेतन मागितले तर त्यांची उपेक्षा केली जाते. पण आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला तिला 250 कोटी रुपयांचे विमान भेटदेणारे मुकेश अंबानी किंवा दिवाळखोरी जाहीर करून हात वर करणारा अनिल अंबानीला कोट्यावधी रुपयांची कर माफी दिली जाते. हजारो कोटी रुपयांचे भंपक साम्राज्य उभे करणाऱ्या रामदेवला हजारो शेकडो एकर जमिनी कवडीमोलाने दिल्या जातात.
स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. ही अर्थव्यवस्था सार्वजनिक आणि खाजगी या दोनही क्षेत्रांना एकमेकांना पूरक भूमिका बजावून देत पुढे जाणारी होती. पुढील अनेक दशके भारतातील सार्वजनिक क्षेत्राने आपल्या देशाच्या उभारणीत जी भूमिका बजावली ती अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील दळणवळण, वाहतूक, रस्ते, रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक, संपर्क, तार, टपाल, धरणे, वीज निर्मिती, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, शिक्षण, विद्यापीठे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, अन्न धान्य सार्वजनिक वितरण, औषध निर्मिती, शस्त्रास्त्र निर्मिती, अणुऊर्जा, इंधन, संशोधन, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तर आरोग्य यंत्रणा, आय.आय.टी, आय.आय.एम., फिल्म इन्स्टिट्यूट, विमा, पर्यटन... अशी अनेक क्षेत्रे ही सार्वजनिक उद्योगांची यशस्वी मक्तेदारी असणारी होती. आज सरकार हे सर्व मोडीत काढण्यास निघाले आहे. हे सर्व ज्यांना विकण्याचा सरकारचा डाव आहे ही मंडळी पँडोराच्या संदुकीतील साऱ्या काही वाइटाचे प्रतिनिधी आहेत हे विसरून चालणार नाही. भारतासारख्या देशात काही क्षेत्रे चालवण्याची जबाबदारी ही सरकारनेच घेतली पाहिजे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला रोजगार आणि संपत्ती निर्मितीची मुभा देताना हे क्षेत्र न्याय्य आणि समान पद्धतीने वाढेल असेही पाहिले पाहिजे. पँडोराने कुतूहल अनावर होऊन संदुक उघडली त्याच क्षणी झुसने त्यात कोंडून ठेवलेले सारे काही वाईट बाहेर पडायला लागल्यावर तिने पटकन त्या संदुकीचे झाकण बंद केले. पण झुसने त्या संदुकीत सर्व वाईटगोष्टींच्या बरोबर एक चांगली गोष्टठेवली होती, आणि ती म्हणजे ‘आशा’. पँडोराने घाबरून झाकण बंद केले आणि त्या संदुकीतून तेवढीच एक गोष्टबाहेर पडू शकली नाही. पँडोराच्या त्या संदुकीत आजही ‘आशा’ नावाची ती गोष्टबंदिस्त आहे. जगभरातील निर्भय पत्रकारांनी जगाच्या भेसूर आर्थिक चेहरा दाखवणारी पँडोराची संदुक उघडलीच आहे तर आता ‘आशा’ नावाची गोष्ट तिच्यातून बाहेर पडेपर्यंत तिचे झाकण बंद करून चालणार नाही. जगाला ग्रासणारी कोरोनाची महासाथ येणाऱ्या दीपावलीच्या प्रकाशाबरोबर संपेल, देशाच्या अर्थव्यवस्थेला रसातळाला नेणाऱ्या, भारताच्या आत्म्याच्या चिंधड्या करणाऱ्या सत्ताधाऱ्यांपासून आपल्या देशाला लवकरच मुक्ती मिळेल अशा ‘आशे’सहीत आमच्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
- डॉ. अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com
(लेखक पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत.)
Post a Comment