प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि हाताने मुस्लिम सुरक्षित आहेत ती व्यक्ती मुस्लिम आहे. म्हणजे एक मुस्लिम कुणाला वाईट बोलत नसेल आणि कुणाला शारीरिक त्रास देत नसेल तर अशी व्यक्ती मुस्लिम आहे.
ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात, एका व्यक्तीने प्रेषितांकडे इस्लामच्या बाबतीत विचारणा केली असता प्रेषित (स.) म्हणाले, ‘तुम्ही ज्या लोकांना ओळखता आणि ज्यांच्याशी तुमची ओळख नसेल तर अशांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा उच्चतम इस्लाम आहे.’
ह. हुरैरा यांनी म्हटले आहे की रात्री रस्ता दिसण्यासाठी जसे गावात, शहरांमध्ये प्रकाशाची सोय करण्यासाठी लाईटचे खांब असतात. तसेच इस्लामची वाट दाखवण्यासाठी अल्लाहची भक्ती, त्याच्याबरोबर कुणाला भागीदार न जोडणे, नियमित नमाज अदा करणे, जकात देणे, रोजे ठेणे या सर्व गोष्टी इस्लामचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशाचे दिवे आहेत. याचबरोबर भल्या गोष्टी लोकांना सांगत राहाणे, वाईटापासून त्यांना रोखणे. आदम (अ.) यांच्या सतती (सबंध मानवजातीतील लोकांना) सलाम करणे, घरात गेल्यावर घरच्या लोकांना सलाम करणे हे सर्व इस्लामचे दीपस्तंभ आहेत. मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. एकमेकांनी दुसऱ्यावर अत्याचार करू नये. त्याला अपमानित करू नये. जर कुणी दुसऱ्या मुस्लिमाचा अपमान करत असेल तकर त्याला वाईट समजण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. प्रत्येक मुस्लिमावर दुसऱ्या मुस्लिमाचे रक्त सांडणे, त्याची मालमत्ता हडप करणे आणि त्याची मानहानी करणे निषिद्ध आहे.
ह. उमरो बिन अतबा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना विचारले, इस्लाम म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, ‘सभ्य बोलणे आणि लोकांना जेवू घालणे.’ मी परत विचारले, ईमान (श्रद्धा) काय आहे? ‘संयम ठेवणे आणि मनाची उदारता.’ कोणता इस्लाम उच्चतम आहे? मी पुन्हा विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतील. तसेच उदार मनाने लोकांशी संभाषण करणे.’ (हदीस : मुस्नद अहमद)
सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम तो जो चारित्र्यसंपन्न असेल. प्रेषित म्हणतात, सर्वश्रेष्ठ ईमान (श्रद्धा) ही आहे की तुम्ही जिथे कुठे असाल अल्लाह तुमच्या संगे आहे याची जाणीव ठेवणे होय.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा असा उच्चा केला की ‘अल्लाहची शपथ, ती व्यक्ती श्रद्धावंत होऊच शकत नाही ज्याच्या वाईट वृत्ती आणि इजा पोहोचण्यापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.’
Post a Comment