(६९) हे पैगंबर (स.)! सांगा, जे लोक अल्लाहवर खोटे कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाहीत.
(७०) जगातील काही दिवसाच्या जीवनांत मौजमजा करून घ्या, मग आमच्याकडे त्यांना परतावयाचे आहे, मग त्या कुप्रâच्या (इन्कार) बदल्यात जे ते करीत आहेत आम्ही त्यांना कठोर यातनेचा आस्वाद चाखवू.
(७१) या लोकांना नूह (अ.)६९ ची सत्य कथा ऐकवा, त्या वेळेची सत्य कथा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले होते, ‘‘हे देशबंधुंनो, जर माझे तुमच्या दरम्यान राहणे व अल्लाहची वचने ऐकवून ऐकवून तुम्हाला गाफीलपणातून जागे करणे तुम्हाला असह्य झाले आहे तर माझा विश्वास अल्लाहवर आहे, तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचारविनिमय करा जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीतून सुटू नये, मग ती माझ्याविरूद्ध अंमलात आणा आणि मला मुळीच सवड देऊ नका.७०
(७२) तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरविले (तर माझे कोणते नुकसान केले?) मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो, माझा मोबदला तर अल्लाहपाशी आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहे की (मग कुणी मान्य करो वा न करो) मी स्वत: मुस्लिम (आज्ञाकारी) बनून राहावे.’’
(७३) त्यांनी त्याला खोटे लेखले आणि परिणाम असा झाला की आम्ही त्याला व त्या लोकांना जे त्याच्याबरोबर नावेत होते वाचविले आणि त्यांनाच भूतलावर उत्तराधिकारी बनविले आणि त्या सर्व लोकांना बुडवून टाकले ज्यांनी आमच्या संकेताना खोटे लेखले होते. तर मग पाहा ज्यांना सावध केले गेले होते (आणि तरीदेखील त्यांनी मान्य केले नाही) त्यांचा कसा शेवट झाला.
(७४) मग नूह (अ.) नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठविले आणि ते त्यांच्याकडे उघड-उघड संकेत घेऊन आले, परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोटे लेखले होते त्याला पुन्हा मानले नाही. अशाप्रकारे आम्ही मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या हृदयावर मोहर लावतो.७१
६६) वरील आयतीमध्ये लोकांना त्यांच्या अज्ञानतेवरून टोकले गेले की त्यांनी आपल्या धर्माचा पाया ज्ञानाऐवजी अनुमानावर आणि अंधविश्वासावर रचला आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीने त्यावर विचार करत नाही की आम्ही ज्या धर्माला आचरणात आणत आहोत त्याचे एखादे प्रमाण आहे किंवा नाही. याच अनुषंगाने िख्र्तासी आणि इतर धर्मियांच्या या गैरसमजुतीवर त्यांना टोकले गेले आहे की त्यांनी अनुमानावरच कुणाला ईश्वराचा पुत्र ठरवून टाकले आहे.
६७) 'सुब्हानल्लाह' हा शब्द आश्चर्य किंवा विस्मय व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. कधी याच्या वापराने त्याचा तात्पर्य अर्थानुसार आहे. म्हणजे 'अल्लाह सर्व त्रुटींपासून पवित्र आहे' येथे हे वाक्य दोन्ही अर्थ देत आहे. लोकांच्या या कथनावर विस्मय व्यक्त करणेसुद्धा योग्य आहे. तसेच उत्तरात त्यांना सांगणे की अल्लाह त्रुटीहीन आहे आणि त्याचा कोणी पुत्र आहे हा संबंध व्यक्त करणे कशा प्रकारे योग्य होऊ शकते?
६८) येथे त्यांच्या कथनाचे खंडन करण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या आहेत. एक अल्लाह त्रुटीहीन आहे. दुसरी अल्लाह निस्पृह आहे. तिसरी आकाश आणि जमिनीतील सर्व वस्तू अल्लाहची संपत्ती आहे. हे संक्षिप्त् उत्तर थोड्याशा तपशीलाने समजून घेतले जाऊ शकते, स्पष्ट आहे की पुत्र सख्खा असू शकतो किंवा दत्तकपुत्र असू शकतो. जर हे लोक एखाद्याला अल्लाहचा सख्खा पुत्र ठरवितात तर अर्थ होतो की, अल्लाहला त्या प्राण्यासारखे समजतात जे व्यक्तिगत रूपात नश्वर असते. त्याच्या अस्तित्वाला शिल्लक ठेवण्यासाठी त्याची एखादी जात आणि त्या जातीतील एखादे जोडपे असणे आवश्यक आहे. या जोडप्यापासून त्यांची संतती व्हावी ज्याद्वारे त्याचे अस्तित्व आणि कार्य शिल्लक राहील. जर हे लोक या अर्थाने अल्लाहचा पुत्र ठरवतात की अल्लाहने कुणाला आपला पुत्र मानले आहे. तरी या स्थितीपासून ते अलग होऊ शकत नाही. त्यांनी अशा स्थितीत अल्लाहला त्या माणसासारखे समजून घेतले जो निपुत्रिक असल्याने आपल्या जातीतील एखाद्याला आपला पुत्र म्हणून दत्तक घेतो. त्यामुळे तो त्याचा वारस बनतो आणि निपुत्रिकतेचा कलंक थोड्या-फार प्रमाणात पुसला जातो. किंवा या लोकांचा विचार असेल की अल्लाहसुद्धा मनुष्याप्रमाणे भावनाशील आहे आणि आपल्या अगनीत दासांपैकी एकाशी त्याचे असे प्रेम जडते की त्याला आपला पुत्र बनवितो. या तिन्ही प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारात अल्लाह वर अनेक दोषारोप, त्रुटी आणि अनेक गरजांची इच्छा असल्याचा आरोप लावला गेला आहे. म्हणून पहिल्याच वाक्यात स्पष्ट सांगितले गेले आहे की अल्लाह त्या सर्व त्रुटी, दोष आणि उणिवांपासून पवित्र आहे, ज्या तुम्ही त्याच्याशी जोडत आहात. दुसऱ्या वाक्यात सांगितले गेले की अल्लाह त्या गरजांपासूनही निरपेक्ष आहे, ज्यामुळे नश्वर माणसाला संततीची आवश्यकता भासते आणि तिसऱ्या वाक्यात स्पष्ट सांगण्यात आले आहे की जमिनीवर व आकाशांत अल्लाहचे दास आणि त्याची संपत्ती आहे. त्यांच्यापैकी कुणाशीही अल्लाहचे वैयक्तिक संबंध नाही की सर्वांना सोडून त्याला आपला पुत्र बनवितो, एकुलता एक पुत्र बनवितो किंवा उत्तराधिकारी घोषित करतो. गुणांच्या आधारावर निश्चितच काही लोकांना दुसऱ्यांच्यापेक्षा जास्त प्रिय ठेवतो. परंतु या प्रेमाचा हा अर्थ होत नाही की एखाद्या दासाला उपासनेच्या आणि दासत्वाच्या ठिकाणाहून उठवून ईशत्वात भागीदार बनविले जावे. या प्रेमाचा फार तर अधिकार आहे ज्याला वरील आयतीत वर्णन केले आहे. ''ज्यानी ईमान धारण केले आणि ईशपरायणता स्वीकारली त्यांच्यासाठी कोणत्याही भय आणि दु:खाचे कारण नाही. जगात आणि परलोक दोघांत त्यांच्यासाठी शुभसूचना आहेत.''
६९) येथपर्यंत या लोकांना उचित प्रमाण आणि मनाला भिडणाऱ्या उपदेशाने समजाविण्यात आले. त्यांना दाखविले गेले की त्यांच्या विचारात, आचारात, विश्वासात आणि जीवनशैलीत कोणत्या चुका आणि उणिवा आहेत आणि त्या चुकीच्या का आहेत? याविरुद्ध सत्यमार्ग कोणता आहे आणि तो का खरा आहे, हे समजून सांगण्यात आले. आता त्यांच्या त्या कार्यशैलीकडे लक्ष वेधले गेले आहे जे ते स्पष्ट समजून सांगण्याच्या उत्तरात स्वीकारत होते. दहा-अकरा वर्षांपासून त्यांची कार्यशैली (मक्केतील अनेकेश्वरवादी) नकारात्मक होती. हे सत्य मार्गदर्शनाने आपल्यात सुधारणा करणे दूरच, परंतु ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवावर उठले होते. पैगंबर मुहम्मद (स.) त्यांना सत्यमार्गदर्शन त्यांच्या भल्यासाठीच करत होते. त्यात त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. ते लोक तर्कांचे उत्तर दगडांनी आणि उपदेशाचे उत्तर शीवराळ भाषेत देत होते. त्यांच्या समाजात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अस्तित्व त्यांना असह्य झाले. ते वाईटाला वाईट म्हणत होते आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची मागणी होती की आम्हा आंधळयांमध्ये हे डोळस आहेत त्यांनी आमचे डोळे उघडण्याऐवजी स्वत:चेच डोळे बंद करावे. अन्यथा आम्ही जोर जबरदस्ती करून त्यांचे डोळे फोडून टाकू. ही कार्यशैली त्यांनी स्वीकारलेली होती. त्यावर काही सांगण्या ऐवजी अल्लाह आपल्या पैगंबरांना आदेश देतो की त्या लोकांना आदरणीय नूह (अ.) यांची ऐतिहासिक घटना सांगा. त्या घटनेतच त्यांच्या आणि तुमच्या कार्यशैलीचा परिणाम स्पष्ट करण्यात आला आहे.
७०) हे आव्हान होते की मी आपल्या कार्यापासून दूर जाणार नाही तुम्हाला माझ्याविरुद्ध जे काही करावयाचे आहे, ते तुम्ही करा. माझा विश्वास अल्लाहवर आहे. (तुलनेसाठी पाहा सूरह ११, आयत नं. ५५)
७१) सीमेचे उल्लंघन करणारे लोक ते आहेत जे एकदा चूक केल्यानंतर पक्षपातीपणा, दुराग्रह आणि हठधर्मीमुळे आपल्या त्याच चूक करण्यावर अडून राहातात. ज्याला मान्य करण्यास एकदा नकार दिला तर त्याविषयी समजावून किंवा उचित तर्क आणि प्रमाण देवूनसुद्धा ते मान्य करीत नाही. अशा लोकांवर शेवटी अल्लाहचा धिक्कार होतो आणि नंतर कधीच सरळमार्गावर येण्याचे सौभाग्य त्यांना लाभत नाही.
Post a Comment