आजवरच्या आयुष्याकडे मागं वळून पाहतांना आपल्या जीवनात किती किती वळणवाटा आल्या, त्यामध्ये आपल्यात किती बदल झाला, किती वैविध्यता दिसून आली, दुनियेचा बाजार किती स्वार्थी, अप्पलपोटा आणि आपमतलबी भेटला, याचे सिंहावलोकन केले की, मनापासून आश्चर्य नवल आणि वैषम्य ही वाटते.
खर तर लहानपणापासून अतिशय खूजा, कुजक्या आणि क्षूद्र विचारांच्या लोकांमध्ये आपण वावरलो, हे लक्षात येते. अर्थात हे ज्या त्या वेळी समजले नाही, समजण्याचे वय नव्हते म्हणा किंवा बुद्घीची प्रगल्भता ही तेवढी नव्हती म्हणा, मात्र हल्ली हे सर्व प्रकर्षाने जाणवू लागले आहे. अगदी लहानपणापासून काहीतरी हटके पण विधायक करून दाखवायचे आणि कौतुकाची बक्षीसी पदरात पाडून घ्यायची ही सवय, पण याच काहीतरी हटके करून दाखवण्याच्या कर्तृत्ववान विचारांमुळे घरीदारी, आत-बाहेर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कैक शत्रू झाले. आपल्या अंगी परीश्रमपूर्वक मिळविलेल्या क्षमता वेळोवेळी सिद्ध करीत आलो, पण याच क्षमतांवर शंका घेणारे वळवणारे किडे क्षमतांच्या पंचामृतात डुंबतांना पाहणे नशिबी आले, हे दबा धरून बसलेले हीतशत्रू तोंडावर साखरपाकातून काढलेल्या गुलाबजामसारखे वाटायचे, अर्थात मी सुद्धा त्यांच्या या छद्मी छबीवर मनापासून विश्वास ठेवायचो, मात्र माघारी कागाळी करून कडू कारल्यासारखे येथेच्छ निंदा करून मला बाद करण्याचा त्यांचा अफलातून डाव असायचा. कुजबुजयंत्रणा काय, व किती परिणामाकारक असते, याची पुसटशीही कल्पना नसणार्या माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला एकामागून एक धक्के बसायचे. ते इतके वर्मी असायचे की काही वेळा मी कोळमडून पडायचो, गलितगात्र व्हायचो, पण यावर कोणताही उपाय मला सापडायचा नाही, हे असे का होते हा प्रश्न अनुत्तरित रहायचा. आज ही परिस्थिती तशीच आहे. पण म्हणतात ना काळ हेच सर्व मानसिक रोगावर अणि परिस्थितीवर जालीम औषध आहे. याचा प्रत्यय आताशा येऊ लागला आहे, कारण आपोआपच काही काळ गेल्यानंतर या षडयंत्राचा पडदापाश व्हायचा, पण काही काळ त्रास हा व्हायचाच. अलिकडे मी सर्व षडयंत्राकडे दुर्लक्ष करत आहे. आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करायची आणि ते झाले की,पुढचे काम हाती घ्यायचो. बर्याचदा संकल्पीत कामात यश ही मिळायचे, पण यशच पुन्हा या हितशत्रूच्या कारवायाचे कारण व्हायचे. माझे यशच त्यांना मनोमन खूपायचे.
आपण अतिशय प्रामाणिकपणे, जीव लावून मनापासून काम करतोय, मनात कुणाबद्दल असूया नाही की आकस नाही, मत्सर नाही की हेवा नाही, दुसऱ्याचं वाईट व्हावे ही भावना तर नाहीच नाही. कुणाशी फुकटची इर्षा सुद्धा नाही, फक्त "आपले काम भले आणि आपण भले". कामात इतका गढून जायचो की इतरांकडे पाहण्यासाठी क्षणभर वेळ ही मिळायचा नाही, त्यामुळे इतर लोकांच्या आयुष्यात कधीच उगाच नाक खुपसलो नाही, चौकशा करण्यात तर मला पहिल्यापासूनच अजिबातच रस ही नसतो, मग इतरांनी माझ्या अंगीकृत कामात उगाच नाक का खुपसावे? त्यांना माझ्याबाबतीत एवढा कमालीचा मत्सर पराकोटीचा द्वेष का बरे असावा? याचे उत्तर मला गतकाळात कधी मिळालेच नाही, उलट या प्रश्नांंच्या घोंगावणार्या वादळाने माझे कैक दिवसातील अनमोल क्षण आणि रात्रीच्या शांत साखर झोपेच उगाचच खोबरे झाले, मात्र अलिकडे या गुढ, रहस्यमय दुनियादारीचे उत्तर मला या 'काळ ' नावाच्या महायंत्राने दिले आणि दाखविलेही, आप सही ट्रॅकपर हो, आपका प्रवास सुखकर हो, आप यशस्वी हो रहे है, सफलता के शिखर पार कर रहे हो.
इतरांना माझ्याबाबतीत असणारा अवास्तव इंटरेस्ट का? याचं हे मिळालेलं उत्तर समर्पकच.
कुणीतरी म्हटलं आहेच की, किती तरी माणसं स्वत:ला मिळालेल्या सुखाने आनंदी होण्याऐवजी दुसर्याला मिळालेल्या सुखामुळे दुःखी होत असतात. आजच्या स्पर्धात्मक जगात तर पाऊलोपावली मत्सर, द्वेष, राक्षसी स्पर्धा याची चलती दिसून येते. अशावेळी संवेदनशील माणूस हतबल होतो, त्याच्या वाटेत ठीकठीकाणी पेरलेले काटे त्याला रक्तबंबाळ करतात. तुमची कामगिरी जर उल्लेखनीय व समाजोपयोगी असेल आणि तुम्हाला समाजाकडून वाहवा मिळत असेल तर ही काटेरी वाट अधिकच ठळक होते, अर्थात हे पुर्वपरंपरेने चालत आले आहे. ज्ञानेश्वर,तुकाराम या संंतांपासून ते फुले-शाहू या अनेक महामानवांना अशीच किंबहुना याच्यापेक्षा जास्त वेदना देणारी काटेरी वाट चालावयास लागली आहे, तिथे तुमची माझी काय पत्रास? असो...
बऱ्याचदा मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी संवेदनशील मनाला या गोष्टीचं वाईट हे वाटतच. मात्र ज्यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून विरोध अपमान- षडयंत्र- अनुल्लेख- दुजाभाव पचवत, पचवतच प्रतिकुल परिस्थितीतही भव्य दिव्य काम उभं करून ठेवलंय, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आणि चालत रहायचं. परकोटीची संवेदनशील व हळव्या मनाच्या या माणसांची महान काम करण्याची उमेद निश्चितच आपणाला ही प्रेरणा देते, अनेक खाचखळग्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेली ही वाट भावी आयुष्यात निश्चितच गुलाबपाकळ्यांचा सडा घातलेली आपल्या नजरेस येईल, तेव्हा आजुबाजुची, नात्यातली, गोत्यातली, घरची-बाहेरची कुणीही कपाळ करंटे आपले यश पाहून जळत असतील, आपला द्वेष-मत्सर करीत असतील तर डगमगायचं नाही.
आपण अत्यंत आत्मविश्वासानं एवढच समजून रहायचं की आप सही रस्तेपर हो, आपका ट्रॅक बिल्कुल सही है. कारण या चांगल्या मार्गावर तुम्ही चालत आहात, यश, ऐश्वर्य, मानमरातब मिळवत आहात, हे या खूजा, खुरट्या आणि क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना बघवत नाही, अर्थात शत्रुपक्षाला एखादी गोष्ट खटकणे, म्हणजे आपला एकप्रकारे विजयच आहे, हे लक्षात ठेवा, अशा कपाळकरंट्या शत्रुंना विसरायला शिका, हत्ती रस्त्यावरून आपल्याच डौलात चालत असतो, तेव्हा रस्त्यावरची भटकी कुत्री हत्तीवर भुंकत असतात, पण हत्ती त्यांच्याकडे ढुंकूंनही पाहत नाही, दैनंदिन जीवनात सुद्धा अशा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा अती त्रास होतो, तेव्हा शांत बसा, मनन करा, चिंतन करा, नक्कीच उद्याचा दिवस तुमचा असेल,..
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण' पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment