ओनामा कुठून करावं हे कळतच नव्हतं ? पण करावं तर लागणार हे मात्र कळून चुकलं. आपण कोणत्याही गोष्टीची जेव्हा कल्पना करतो, तेव्हा आपल्याला खूपकाही सुचत असतं. पण जेव्हा ती कल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यास सुरुवात करतो, तेव्हा काहीच सुचत नसतं. हे माझ्याच बाबतीत नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. हे का बरं घडतं याचा विचार करू नका ? तर आपल्याला काय घडविता येतं याचा नेमका विचार करा. म्हणजे जीवनात काहीतरी केल्याचं समाधान तरी मिळेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कधीही अति समाधानी होऊ नका ? कारण ज्याप्रमाणे आपल्या जीवनात सुख हे क्षणिक असत, तसंच समाधान पण...
मला माझ्या मित्राकरवी एक संदेश प्राप्त झाला. त्यात स्वामी विवेकानंद यांचं आत्मबोल होतं. ते आत्मबोल त्यांनी कुणा एकालाच उद्देशून नाही, तर जगातील प्रत्येक व्यक्तीला उद्देशून म्हटलं आहे. "जिंदगी मे अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ...शायद किसी की तलाश पुरी हो जाए..." या विचाराने जेवढी माझ्या चिंतनाला चालना मिळाली, तेवढाच माझ्या मनाचा गोंधळ उडाला. तुम्ही म्हणाल, 'यात गोंधळ उडण्यासारखं काय आहे ?' प्रत्येक गोष्ट सुरुवातीला सहज शक्य वाटत असतं. पण जेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला त्यातील गहनता लक्षात येत असतं.
बरं! आता तुम्हीच सांगा, "खुद अच्छे बन जाओ" म्हणजे नेमकं काय करायचं ? आजचा प्रत्येक मानव हा दुस-याच्या उणिवा शोधण्यातच धन्यता मानत असतो; पण त्याला स्वत:तील उणिवा(दोष) कधी आढळतच नाही. दुस-यांकडे अंगुलीसंकेत करीत असतांना त्याला दुस-यातील एकच दोष दिसत असतं. परंतु उलट परिस्थिती बघता स्वत:कडे तीन बोटं वळली आहेत. म्हणजे तो स्वत:तील त्रिदोष मुठीबंद करून ठेवत, झाकत आहेत. याचं त्याला का बरं विसर पडतं ? दुस-यांच्या उणिवांवर बोट ठेवतांना आपण किती अंधारात आहोत ? याचा तो कधी विचारच करत नाही.
काही व्यक्ती तर निरर्थक बडबड करीत असते. न मागता दुस-याला उपदेश करणे आणि आपली इमेज बनविण्यासाठी दुस-याचे गा-हाणे कथन करून दुस-यातील दोष काढणे हे तर उंटावरून शेळ्या हाकण्यासारखंच आहे. या कृतीमुळे त्याला वाटत असावं की, आपल्याला मोठेपण मिळतं, पण समजदार व्यक्तीच्या दृष्टीत तर तो मुर्खातील मुर्ख असतो. स्वआत्म परीक्षणापेक्षा तो परआत्म परीक्षणातच जास्त रमत असतो. 'मी कसा लायक नि तो कसा नालायक' हे त्याला स्वत:ला आणि इतरांनाही सांगावसं वाटत असतं. हे सिध्द करण्यासाठी तो प्रयत्नशीलही असतो. स्वत:मध्ये प्रचंड दोष असूनही तो दुस-यांवर दोषारोपण करीत असतो. इतरांच्या अंगप्रत्यंगावर टीका करीत असतांना तो स्वत:च्या अंतरंगात चुकूनही डोकावत नसतो. नर असूनही स्वत:ला नारायण समजत असतो.
सरतेशेवटी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मबोलावर गांभीर्याने चिंतन करून 'पहिले स्वत:त परिवर्तन केलं, तर इतरही स्वत:त आपोआप परिवर्तन करतील.' "खुद अच्छे बन जाओ" म्हणजे साजशृंगार करून, चांगले कपडे परिधान करून नटणे-थटणे नव्हे ? तर आपल्या आचरणात म्हणजेच वर्तनात क्रांती घडविणे होय. सांगायचं तात्पर्य म्हणजे दुस-यांविषयी वाईट चिंतनाचा (विचारांचा) त्याग करणे. जर तुम्ही असे कराल तर इतरांचे मनं जिंकाल. हे जग जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आणि तितकेच खडतर पण असतं. मग बघा तुमच्या मुखातून आपसुकच शब्द बाहेर पडतील. "आनंदाचे डोही आनंद तरंग."
प्रेमात मैत्रीचा पवित्र धागा असावा...
सध्याच्या खडतर जीवनात माणसाला सर्वप्रथम कशाची गरज असेल? तर ती प्रेमाची. प्रेम हेच जीवन आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीही संकटे, अडथळे आली तरी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते दूर करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीच्या तिरस्काराने मात्र आपण पूर्णत: हतबल होतो. प्रेम ही जीवनाला परिपूर्ण करणारी भावना असून ती एक अलौकिक शक्ती आहे. म्हणून प्रत्येकाने आयुष्यभर मनमोकळे प्रेम करावे. एकदा का तुम्ही प्रेमाचे शिखर सर केले तर खरं प्रेम काय असतं ते तुम्हाला कळेल. पण ते प्रेम पवित्र असावे. त्या प्रेमात पवित्र मैत्रीचा धागा गुंफलेला असावा. प्रेम हे एक असं नातं आहे की, प्रत्येक व्यक्ती ते मनापासून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. स्वेच्छेने एखाद्यास मानतो आणि दु:खाचे क्षण, अपयशाचे प्रसंग, सुखाच्या आठवणी हक्काने त्यांच्यासोबत वाटून घेतो. परस्परातील मतभेद असं सारं काही बाजूला ठेवून दोन ह्रदय एकमेकांच्या जवळ येतात.
प्रेम ही मनुष्याला मिळालेली नैसर्गिक व अनमोल देणगी आहे. खरं प्रेम विनाअपेक्षेने आपोआपच होवून जातं. दोन मन केव्हा, कशी व कोणत्या परिस्थितीत जुळतात हे उमजतच नाही. प्रेमामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की, माणूस असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. त्यासाठी फक्त त्याला प्रेमाची साथ हवी असते. माणूस एका यशोशिखरावर प्रगतीनं तेव्हाच झगमगू शकतो, जेव्हा त्याच्या पाठीशी एक प्रेरणात्मक शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती...पण प्रेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याग व विश्वास...कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचे सुख कशात आहे हे शोधून त्याच्या सुखासाठी आपल्या सुखाची होळी करावी लागते. प्रेम शेवटपर्यंत यशस्वी होतंच असं नाही. काहींना त्यात रडावंही लागते. यासाठी प्रचंड विश्वासाची साथ व विचारांची जुळवणूक असावी लागते.
कारण प्रेम ही एक भाषा असते. फक्त प्रथम दोघांचे डोळेच प्रेमाची भाषा बनत असते. डोळ्यात प्रेमाची खोली आणि मनात प्रेमाचा सागर असतो. पण आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला आपण त्याच्यावर प्रेम करत असल्याचं पटवून द्यावं लागतं. ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. प्रेमाच्या वाटेत सुखरुपी फुले आणि दु:खरुपी काटे असते. यासाठी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक व जपून टाकावं लागते. आपले पाऊल काट्यावर पडले तरी चालेल. कारण यामुळे फक्त आपल्याला वेदना होतील. परंतु जर आपले पाऊल त्या फुलावर पडले तर त्या फुलाचे सौंदर्य, जीवनच नष्ट होईल. म्हणून आपल्या मनाच्या कोप-यात एखाद्याला जागा द्यायची असल्यास ती आयुष्यभरासाठी द्यावी. अन्यथा त्या गोष्टीचा विचारच मनात आणू नये.पण वास्तविक जीवनाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. कुणीतरी आपल्या जीवनात डोकावतं, आपल्या भावनेशी खेळतं. हा खेळ सुरू असताना आपण उज्ज्वल संसाराचे स्वप्न रंगवीत असतो. पण ते आपल्याला स्वप्नांच्या सोनेरी क्षितिजावर स्वप्न दाखवून दुराव्याच्या आगीत ढकलून जीवनाच्या अर्ध्या वाटेवरच सोडून जातात. मग आपल्याला त्याच्या विरहात काय करावे, काय नाही असं वाटते? पण काही करता येत नाही.
कारण आपल्याला आपल्यासाठी जगायचं नसलं तरी आपल्याकरीता जगणा-यांसाठी जगावं लागतं. प्रत्येकालाच प्रेम करणारं कुणीतरी आपलं हवं असतं. जीवन जगायला नव्हे तर फुलवायला...तारुण्यात तर असं विश्वासाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं, नकळत जुळून येणारं नातं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवंहवंसं वाटतं आणि हे तेवढंच सत्य आहे की, प्रेमामध्ये मिळणा-या एकूण उदासीनतेमुळे एका दिवसाच्या प्रकाशाचं एका क्षणाच्या अंधारात रूपांतर होतं.
प्रेम ही ईश्वराची अशी देण आहे की जी अंत:करणातून निर्माण होवून आयुष्यातील क्षणांना सोनेरी करते. यामुळे मनावरील दडपण थोडाफार का होईना कमी होवून मनाला प्रसन्नता प्राप्त होते. खरं तर माणसाचे माणूसपण सगळ्यात जास्त त्याच्या डोळ्यातून झरणा-या आसवातून प्रकट होते. ज्या माणसांना जीवनातल्या या आसवांचे महत्त्व कळलेले नाही, त्या माणसांना आणखी दोन पाय नाहीत म्हणून माणूस म्हणायचे यापलीकडे काय अर्थ?
- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ,
भ्रमणध्वनी-7057185479
Post a Comment